'हिंसा काही काळापुरती असते. पण त्यात ज्यांचं नुकसान होतं ते आयुष्यभराचं असतं'

- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
धुळे... वर्ष 2013 … रविवार दुपारची वेळ होती. हॉटेलचं बील देण्यास स्पष्ट नकार दिल्याच्या कारणावरून दोन जणांमध्ये भांडण झालं. ते इतकं वाढत गेलं की, दोन धर्माच्या गटांमध्ये वाद पेटला. हा वाद दंगलीपर्यंत पोहचला होता.
25 वर्षांचा रिझवान साडी विक्रीसाठी पिशव्या आणायला बाहेर पडला होता. मच्छीबाजार चौकात दगडफेक सुरू होती.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे पोलीसांनी गोळीबार केला. घरी परत जाण्यासाठी मागे फिरलेला रिझवान अचानक खाली कोसळला. पोलीसांनी केलेल्या गोळीबारात त्याला दोन गोळ्या लागल्या. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेला आता 10 वर्ष उलटून गेली. पण हसन शहा यांच्या डोळ्यासमोरून मुलाचा तो मृत्युमुखी पडलेला चेहरा जाणं शक्य नाही.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
गावांगावांत जाऊन साड्या विकणं वयानुसार आता हसन शहांनी बंद केलं आहे. ते आम्हाला सांगत होते, “रिझवानच्या मृत्यूनंतर पूर्ण कुटुंब हादरून गेलं. रिझवानला पोलीस व्हायचं होतं. दोनवेळा त्याने पोलीस भरतीची परीक्षाही दिली होती. पण पोलीसांच्या गोळीने …!” हसनजी बोलताना थांबले.
काही वेळाने ते पूर्वी असलेल्या धार्मिक एकीबाबत सांगू लागले, “साड्या विकायला गेल्यावर नेहमीच्या महिला ग्राहक जेवू घालायच्या. रक्षाबंधनला राखी बांधायच्या. दिवाळीला फराळ द्यायच्या. पण रिझवानच्या मृत्यूनंतर सगळं थांबलं. मनात भीती बसली. वेगळ्या धर्माच्या लोकांच्या कार्यक्रमाला जायला नको असं वाटू लागलं. पण आम्ही आता त्यातून सावरलोय. परत सगळं पूर्वीसारखं वातावरण व्हावं असं वाटतंय”.
डोक्यावर पांढरी टोपी, सुरकुतलेला चेहरा.. वयाने साठीत पोहचलेले हसन शहांचं लक्ष सतत घडाळ्याकडे जात होतं. ते नेरकर कुटुंबाची वाट बघत होते.
घर नीटनेटकं आवरून ठेवलं होतं. घरातल्या महिला बुरख्यात वावरत होत्या. घरी पाहुणे येणार म्हणून चहा नाश्त्याची तयारी करत होत्या.
सध्या छोट्या छोट्यागोष्टीवरून धार्मिक तेढ निर्माण होतात. वातावरण बिघडतं , दंगली पेटतात. हे कमी करण्यासाठी देशभरातील शेकडो सामाजिक संस्थांकडून ‘मेरे घर आके तो देखो’ हा उपक्रम राबवला जात आहे.
या उपक्रमात हिंदू कुटुंबियांकडून मुस्लिम कुटुंबाला घरी चहापानाला बोलवलं जातं. यानंतर मुस्लिम कुटुंबही हिंदू कुटुंबाला घरी चहापानाला बोलवतं. दोन वेगवेगळ्या धर्माच्या कुटुंबातील अंतर, धार्मिक मतभेत कमी करण्याचा हा प्रयत्न या उपक्रमाद्वारे केला जातो.
या उपक्रमात भाग घेत हसन शहा यांनी नेरकर कुटुंबियाना घरी आमंत्रित केलं होतं.
सहवासात आलं की कळतं हे लोक 'तसे' नाहीत
साधारण चार वाजताच्या सुमारास बेबी नेरकर आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य हसन शहा यांच्या घरी पोहचले. नव्याने ओळख झाली. चहा नाश्ता झाला. गप्पा झाल्या. नेरकर कुटुंब पूर्वीपासून धुळ्यात राहत.
बेबी नेरकर या स्वतः शिक्षिका आहेत. त्यामुळे नवीन पिढीच्या मनातले धार्मिक तेढ कमी व्हावेत असं त्यांना वाटतं.
बेबी नेरकर हा भेटीचा कार्यक्रम झाल्यावर त्यांचा अनुभव आम्हाला सांगत होत्या. त्या म्हणाल्या, “रामनवमी किंवा इतर काही सणांच्यावेळी काहीतरी होईल अशी भीती वाटते. मुस्लिम सण आले तरीही भीती वाटते. मिरवणूकीच्या वेळी काही घडलं तर...कारण पूर्वी जे घडलं ते डोळ्यांनी पाहिलं होतं. पण मुस्लिम कुटुंबात वावरल्यावर खूप छान वाटलं. त्यांच्याबद्दल जे पसरवलं जातं तसं नाही हे त्यांच्या सहवासात आल्यावर कळतं.
दोन्ही धर्माच्या सामान्य कुटुंबांना हे संबंध बिघडायला नको आहे. काही मूठभर लोकांमुळे सगळ्याचं नाव खराब होतं. 'मेरे घर आके तो देखो' या उपक्रमाअंतर्गत आम्ही हसनभाईंच्या घरी आलो. त्यांनी खूप छान पाहुणचार केला. त्यांच्याशी बोलून बरं वाटलं.”

दहा वर्षांपूर्वी झालेल्या दंगलीत आपला मुलगा गमावल्यानंतरही हसन शहा यांची दोन्ही धर्मांमधले संबंध चांगले असावेत ही भावना आहे.
“हिंदू- मुस्लिम हे भाई भाई असले पाहिजेत. त्यांनी तसंच राहीलं पाहिजे,” असं हसन शहा सांगतात.
हसनजींची मुलगी फरझानाही या उपक्रमासाठी पुढाकार घेऊन काम करते आहे.
फरझाना तरूणांना यात सहभागी होण्याचं आवाहन करतेय. राजकारणासाठी दोन धर्मांच्या गटात वाद निर्माण केला जातो असं फरझानाला वाटतं. ती सांगते, “ ती हिंसा काही काळापुरती असते. पण त्यात ज्यांचं नुकसान होतं ते आयुष्यभराचं असतं.
जे दंगे झाले आहेत. त्यात मी स्वतः माझा भाऊ गमावला आहे. म यामुळे कुटुंबियांना काय त्रास होतो हे मी भोगलं आहे. मी ज्यातून गेले मला नाही वाटतं अजून नव्या पिढीतल्या लोकांनी ते सहन करावं.”
‘मेरे घर आके तो देखो’ या उपक्रमाची गरज का वाटते?
‘मेरे घर आके तो देखो’ हा उपक्रम 15 अॉगस्टपासून देशभरात सुरू झाला. काही सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने देशभरात हा उपक्रम सुरू करण्यात आला. त्यानंतर वेगवेगळ्या भागातील छोट्या मोठ्या सामाजिक संस्था यासाठी जोडल्या जाऊ लागल्या.
15 अॉगस्ट ते 30 जानेवारीपर्यंत देशातील किमान एक लाख हिंदू-मुस्लिम कुटुंबांना एकमेकांना भेटवण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून केला जात आहे. वाढत्या दंगलींच्या घटना आणि सामाजिक अस्थिरता यामुळे दोन धर्मांमध्ये अविश्वासाची भावना निर्माण झाली आहे.
त्यासाठी देशात हा उपक्रम गरजेचा असल्याचं यासाठी काम करणाऱ्या संस्थांचं म्हणणं आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या माहितीनुसार, देशभरात 2016 ते 2020 या पाच वर्षात दंगलीच्या 2.76 लाख केसेस दाखल करण्यात आल्या. त्यापैकी सांप्रदायिक आणि धार्मिक दंगलीचे 3399 गुन्हे दाखल आले आहे.
2021 ला दंगलीचे एकूण 90527 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी सांप्रदायिक आणि धार्मिक प्रकारच्या दंगलींचे 908 गुन्हे दाखल झाले आहेत. तर 2022 आणि 2023 सालाची आकडेवारी अजून प्रकाशित झालेली नाही.

हा उपक्रम चांगला असला तरी जास्तीत लोकांना यात सहभागी करून घेणं एक मोठं आव्हान आहे. काही कुटुंब आपुलकीने या उपक्रमासाठी एकत्र येत असली तरी काही लोकांना याचं महत्व पटवून देण्यासाठी कसरतही करावी लागतेय. या उपक्रमाच्या कॅम्पेनर नाजनिन शेख सांगतात, “जेव्हा लोकांना आम्ही ‘मेरे घर आके तो देखो’ याबद्दल सांगतो तेव्हा ते वेगळा विचार करतात. हे कोण आहेत? उजव्या की डाव्या विचारसरणीचे आहेत? राजकीयदृष्ट्याही विचार करतात.
त्यासाठी ते थोडेसे बिचकतात. मग आपल्या लोकांना माहिती पडलं तर… पण तरीही भरपूर लोकांनी चांगला रिस्पॉन्स दिला. अनेक सामान्य कुटुंब यात सहभागी होत आहेत. पण अधिकाधिक युवकांनी यात सामिल व्हावं असा आमचा प्रयत्न आहे. जेवढा प्रतिसाद युवकांकडून मिळायला हवा होता तेवढा मिळत नाही. पण काही कुटुंब आनंदाने यात सहभागी होत आहेत”.
आतापर्यंतच्या दंगलीत आमची कुटुंब एकतेने राहीली…!
धुळ्याहून मालेगावकडे जाताना त्या शहरात झालेले बॉम्बस्फोट, दंगली डोळ्यासमोर येत होत्या. 2021ला एका आक्षेपार्ह व्हिडीओवरून झालेल्या हिंसाचाराची घटना आजही ताजी आहे. पण ज्या शहराकडे हिंसाचाराच्या दृष्टीकोनातून बघितलं जातं. त्या शहरातल्या काही माणसांना भेटल्यावर दोन धर्मांमधला एकोपा जाणवतो.
मालेगाव बस स्टॅन्डपासून एक किलोमीटरवर एक छोटी गल्ली आहे. त्याच्या एका बाजूला हिंदू आणि समोरच्या बाजूला मुस्लिम धर्मीय राहतात. त्यालाच लागून दलित समाजाचीही वस्ती आहे. याठिकाणी प्रत्येक धर्माचे सण उत्साहाने साजरे केले जातात.
संजय जोशी आणि रहीम शेख हे दोन मित्र यासाठी एकत्रित काम करतात.
संजय जोशी , रहिम शेख आणि त्यांचे इतर मित्र एकमेकांच्या घरी जाऊन एकोपा वाढवण्याचा प्रयत्न करतात. मालेगाव शहराबद्दल समज गैरसमज आहेत. पण आतापर्यंत झालेल्या दंगलीत इथे वर्षानुवर्ष राहणारा सामान्य माणूस कधीच नव्हता असं संजय जोशी सांगतात.
ते म्हणतात, “अनेक दंगलींमध्ये मुस्लिम मोहल्यांमध्ये असलेल्या हिंदूंचं आणि हिंदूच्या भागात असलेल्या मुस्लिमांचं संरक्षण ज्या पध्दतीने केलं गेलं. त्यांना आठ आठ दिवस घरात ठेवलं जातं. ती मेहमान नवाजी या शहराने जपली आहे."

"बाहेरून आलेली किंवा मूठभर समाजकंठकांमुळे या शहराच्या नावाला डाग लागला आहे. इथला व्यापारात हिंदू मुस्लिम एकता आहे. इकडच्या कापड व्यापारात जर एखादा हिंदू व्यापार करत असेल तर त्याचे व्यवहार सांभाळणारा हा मुस्लिम आहे. इथे जर परिस्थिती बिघडली तर सामान्य व्यापारी भरडला जातो. अर्थव्यवस्था ठप्प होते.
त्यामुळे इथल्या स्थानिकांना चांगलं वातावरण हवं आहे.”
‘मेरे घर आके तो देखो’ या उपक्रमाअंतर्गत अनेक कुटुंब मालेगावातही एकत्र येताना दिसतायेत. इकडचे लोक व्यापराच्या दृष्टीने एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे सण तितक्यात उत्साहात साजरे करत असल्याचे स्थानिक सांगतात. या उपक्रमामुळे दोन धर्मांमध्ये माणूसकीचा एक दुवा तयार होतोय. तो अधिक बळकट होण्याची गरज आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








