हलाल हॉलिडेज म्हणजे काय आणि मुस्लिमांमध्ये हा ट्रेंड का वाढतोय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, एम्ब हाशमी
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
"मला कोवळ्या उन्हात बसून व्हिटॅमिन डी घ्यायला आवडतं, यामुळे त्वचेवर जो टॅनचा रंग येतो तो ही वर्षभर असावा असं वाटतं. त्यामुळे मी सुट्ट्यांसाठी बऱ्याच ठिकाणी जात असते, पण अशा ठिकाणी एकांत असावा."
ब्रिटीश एन्फ्ल्युएन्सर जहरा रोजच हे मत आहे. तिला फिरायला आवडतं पण सोबतच तिला तिच्या मुस्लीम आस्था आणि प्रथाही पाळायच्या आहेत.
ती आजपर्यंत 30 हून जास्त 'हलाल हॉलिडेज' वर गेली आहे.
इस्लामच्या अनुयायांना ज्या गोष्टीसाठी मान्यता दिलेली असते त्याला अरबी भाषेत हलाल म्हणतात. हलाल हॉलिडेज म्हणजे अशी ठिकाणं जिथे मुस्लिमांना त्यांच्या धार्मिक श्रद्धा आणि प्रथांशी तडजोड न करता भेट देता येईल.
गोपनीयता सर्वात महत्वाची
जगभरातील धर्मधारित अनुयायांची संख्या विचारात घेता ख्रिश्चन धर्मानंतर इस्लाम दुसऱ्या क्रमांकावर आहे. अनेक मुस्लिम देशांमध्ये मध्यमवर्गीयांची संख्या वाढत आहे.
तर पश्चिम युरोप आणि उत्तर अमेरिकेत दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीतील मुस्लिमांकडे त्यांच्या पालकांपेक्षा खर्च करण्यासाठी जास्त पैसे आहेत.
हलाल हॉलिडेज ही एक वाढती बाजारपेठ आहे.
जहरा रोज म्हणते, "माझ्यासाठी हलाल हॉलिडेज आणि सामान्य सुट्टीतील सर्वात मोठा फरक म्हणजे गोपनीयता आहे."
ती सांगते की, या सुट्ट्यांमध्ये त्यांना हलाल जेवणही सहज मिळतं.
36 वर्षीय हेजर सुजोगलू आदिगुजाई तीन मुलांची आई आहे. त्या इस्तंबूलमध्ये राहतात.
त्यांना तुर्कीमध्ये हलाल हॉलिडेजसाठी जायचं असेल तर कोणतीही अडचण येत नाही. पण जेव्हा त्यांचं कुटुंब गैर-इस्लामिक देशांमध्ये सुट्ट्यांसाठी जातं तेव्हा त्यांना खूप माहिती घ्यावी लागते, बरंच नियोजन करावं लागतं.
हेजर आदिगुजाई सांगतात,"आम्ही हल्लीच मॅसेडोनिया आणि कोसोवोला गेलो होतो. आम्ही आमच्या हॉटेलमध्ये नाश्ता केला आणि दुपारच्या जेवणासाठी आम्ही पारंपारिक ठिकाणी गेलो. तिथे मद्यपान करण्यास मनाई असते."

फोटो स्रोत, ZAHRA ROSE
आदिगुजाई दिवसातून पाच वेळा प्रार्थना करतात. त्यांना इस्लामिक मूल्यांचे पालन करण्यात रस आहे.
त्या सांगतात, "हलाल हॉटेल्समध्ये नमाज अदा करण्यासाठी चटई दिली जाते. जर आम्ही एखाद्या साध्या हॉटेलमध्ये राहणार असू तर मी माझ्यासोबत नमाजसाठी चटई घेऊन जाते."
"हॉटेल्समध्ये गेल्यावर आम्हाला कमी कपडे घातलेले लोक बघायचे नसतात. आमची मुलं आमची श्रद्धा आणि संस्कृती पाळणाऱ्या लोकांसोबत रहावीत अशी आमची इच्छा असते. आम्ही त्यांना अशा समुद्रकिनाऱ्यांवर नेऊ इच्छित नाही जिथे लोक नग्न होऊन उन्हात बसलेले असतात."
हेजर महिलांना ऑनलाइन उद्योजकता आणि सोशल मीडियाचे प्रशिक्षण देतात. त्यांचं असं म्हणणं आहे की, पर्यटन उद्योगाला अद्याप हलाल हॉलिडेज पूर्णपणे अमलात आणता आलेल नाही.
उदयोन्मुख बाजार
ग्लोबल मुस्लीम ट्रॅव्हल इंडेक्सनुसार, 2022 मध्ये हलाल हॉलिडे व्यवसायाची बाजारपेठ 220 अब्ज डॉलर इतकी होती.
काही कंपन्या हलाल पर्यटनात पुढे आहेत, तर इतर कंपन्या याकडे पर्याय म्हणून बघत आहेत.
पाश्चिमात्य देशांमध्ये मालदीवची ओळख तिथल्या खास हॉटेल्ससाठी आहे. पण आता जगभरातील हलाल पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे.
मालदीवचे पर्यटन मंत्री डॉ. अब्दुल्ला मौसूम म्हणतात, "मालदीव हा एक मुस्लिमबहुल देश आहे आणि आपल्याकडे आधीपासूनच मुस्लीम-अनुकूल पर्यटन आहे. हे क्षेत्र खूप वेगाने वाढत आहे."
डॉ. मौसूम यांच्या मते, सर्व हॉटेल्सपैकी एक चतुर्थांश हॉटेल्स आता समुदाय-आधारित किंवा देशांतर्गत पर्यटनासाठी वेगळी काढण्यात आली आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
ते सांगतात, "अनेक रिसॉर्ट्समध्ये खोल्या, त्यांची रचना आणि अगदी जेवणाच्या बाबतीत ही मुस्लीम-अनुकूल वातावरण असतं."
देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन उद्योगाचे योगदान एक चतुर्थांशपेक्षा जास्त आहे.
हलाल हॉलिडेजसाठी केलेले बदल
2023 च्या ग्लोबल मुस्लीम ट्रॅव्हल इंडेक्समध्ये बहुतांश मुस्लीम देशांचं वर्चस्व आहे. यात सर्वात वरच्या स्थानावर आहे इंडोनेशिया आणि मलेशिया.
सिंगापूर (11 व्या स्थानी) आणि ब्रिटन (20 व्या स्थानी) या दोन बिगर मुस्लीम देशांनी या यादीत स्थान मिळवलं आहे.
लंडनमधील पंचतारांकित लँडमार्क हॉटेल 1899 मध्ये सुरू करण्यात आलं होतं. इथे येणाऱ्या ग्राहकांसाठी हलाल मांस उपलब्ध करून दिले जाते. हॉटेल मधील कर्मचार्यांना मध्यपूर्वेतील धार्मिक आणि सांस्कृतिक गोष्टींचं प्रशिक्षण देखील दिलं जातं.
मध्य पूर्वच्या विक्री संचालक मॅग्डी रुस्तम सांगतात, "आमच्याकडे अल्कोहोलयुक्त पेयं आणि विना-अल्कोहोल पेयं उपलब्ध आहेत. आमच्या बारमध्ये तुम्हाला विना-अल्कोहोल कॉकटेल मिळू शकतं जे खूपच लोकप्रिय आहे."
हॉटेलमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे आहेत. उत्तरेकडील एक दरवाजा वैयक्तिक वापरासाठी आहे. मध्य पूर्वेतील बहुतेक कुटुंबांना, विशेषत: स्त्रियांना सर्वांसमोर येणं आवडत नाही. अशावेळी त्या उत्तरेकडील दरवाजातून आत प्रवेश करतात. एक विशेष लिफ्ट देखील आहे जी त्यांना थेट खोलीत घेऊन जाते जेणेकरून कोणीही त्यांना पाहू शकणार नाही."
हॉटेलमध्ये एक मोठा बॉलरूम आहे तो विवाह सोहळ्यासाठी वापरला जातो. इस्लामिक पद्धतीनुसार पुरुष आणि महिला पाहुण्यांना स्वतंत्र बसवण्याची देखील व्यवस्था आहे.
परंतु अशा व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च होतात. ब्रिटिश एन्फ्ल्युएन्सर जहरा रोज हे मान्य करते.
ती सांगते, "एखाद्या सामान्य सुट्टीपेक्षा हलाल हॉलिडेजसाठी जास्त पैसे मोजावे लागतात. एखाद्या स्विमिंग पूलमध्ये महिला आणि पुरुषांना एकत्र सहभागी होता येईल अशा रिसॉर्ट्समध्ये बुकिंग करणं सोपं असतं. पण तेच तुम्हाला गोपनीयता बाळगायची असेल तर त्याचा खर्च अर्थातच जास्त आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.








