बेन ब्रिल : ज्याच्यासोबत बॉक्सिंग खेळला, त्यानेच त्याला नाझींच्या छळछावणीत पाठवलं...

    • Author, मॅथ्यू केन्यन
    • Role, बीबीसी स्पोर्ट्स

माजी डच बॉक्सिंग चॅम्पियन बॅरी ग्रोंटमन त्यांच्या अॅमस्टरडम शहराबाहेर असलेल्या बॉक्सिंग जिममध्ये बसून काही आठवणींमध्ये रमले होते. बॅरी त्यांच्या आजीच्या घरी जायचे तेव्हाच्या त्या आठवणी होत्या.

त्यांची आजी एका रिटायरमेंट होममध्ये राहायची आणि बॅरी त्यांना भेटण्यासाठी जायचे. त्यावेळी त्यांना तिथं नेहमी एक वृद्ध व्यक्ती दिसायचे. ते कायम हॉलमध्ये तिथल्या नर्सबरोबर बॉक्सिंगचा सराव करताना दिसायचे.

"ते मला त्यांची अंगठी दाखवायचे. त्या अंगठीवर स्टार ऑफ डेवीड होता. माझी आजी हळूच मला सांगायची : 'ते बेन ब्रिल' आहेत," असं बॅरी ग्रोंटमन म्हणाले.

तरुण ग्रोंटमन यांच्यासाठी ही अशा व्यक्तीबरोबरची भेट होती, ज्या व्यक्तीचा पुढं त्यांच्या आयुष्यावर प्रंचड प्रभाव राहिला. त्यामुळं त्यांची कहाणी आपण सर्वांना सांगायलाच हवी, असं ग्रोंटमन यांना वाटलं.

त्यांच्याप्रमाणंच ब्रिल हे अॅमस्टरडममधील इतर यहुदी मुलांप्रमाणे लहानाचे मोठे झाले होते. तसंच ग्रोंटमन यांच्यासारखंच ब्रिल यांचंही संपूर्ण आयुष्य बॉक्सिंगनं व्यापून टाकलं होतं. पण ही तुलना इथंच संपायला हवी.

'ते गवताच्या वाळलेल्या पेंढ्यांवर झोपायचे'

ग्रोंटमन यांचा जन्म 1986 मध्ये झाला होता. तर ब्रिल यांचा जन्म 1912 मधला. ब्रिल तिशीचे होईपर्यंत त्यांचं संपूर्ण जीवन आक्रमण, हिंसाचार आणि ज्यूविरोधी वातावरणामुळे पूर्णपणे बदलून गेलं होतं.

डच बॉक्सिंग क्षेत्रातील लोक अॅमस्टरडॅमच्या प्रसिद्ध कॅरे थिएटरमध्ये बेन ब्रिलच्या यांच्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या मेमोरियल नाईटसाठी एकत्र जमतात.

इथं जे लोक आले होते त्यांना कायम हे स्मरणात राहील की, सलग अनेकदा नॅशनल चॅम्पियन राहिलेल्या एका चॅम्पियनला कशाप्रकारे नाईलाजानं लपून राहावं लागलं आणि त्यानंतर ऑलिम्पिकच्या संघातील त्यांच्याच सहकाऱ्यानं त्यांना नाझींच्या ताब्यात कसं दिलं होतं. पण त्याचबरोबर ते या सर्वातून कशाप्रकारे बाहेर पडले या उल्लेखनीय प्रवासाचेही ते साक्षीदार बनतील. त्यामुळं बॉक्सिंग रिंगच्या आत आणि बाहेरही त्यांचं जे महान व्यक्तिमत्त्व होतं त्याची सर्वांना ओळख होईल.

ब्रिल अॅमस्टरडॅममधील अत्यंत गरीब भागात लहानाचे मोठे झाले. कुटुंबातील सात भावंडांपैकी ते सहावे होते.

त्यांचा बालपण ते मोठं होण्याचा प्रवास अत्यंत संघर्षमय होता, असं स्टिव्हन रोझनफेल्ड सांगतात. स्टिव्हन हे ब्रिल यांच्या पत्नी सेलिया यांच्या नात्यातील आहेत. त्यांनी ब्रिल यांच्या जीवनावर 'दानसेन ओम ते ओव्हरलिव्हन' (अ डान्स विथ सर्व्हायव्हल) नावाचं पुस्तकही लिहिलं आहे.

"ब्रिल लहानशा भाड्याच्या घरात राहायचे, ते कधीही बेडवर झोपले नाहीत, ते गवताच्या वाळलेल्या पेंढ्यांवर झोपायचे, त्यांच्याकडं टॉयलेट नव्हतं त्यामुळं त्यांना बकेट घेऊन रस्त्यावर जावं लागायचं," असं रोझनफेल्ड सांगतात.

कसायाच्या दुकानात नोकरी

ब्रिल तरुण होते तेव्हा वाद किंवा भांडणं हा त्यांच्या रोजच्या आयुष्याचा भाग होता. मित्रांच्या दृष्टीनं तर ते अगदीच टाकाऊ असल्यासारखे होतेच, पण प्रचंड गर्दी असलेल्या शहरामध्ये विविध समुदायांच्या इतर गटांबरोबरही त्यांचा संघर्ष व्हायचा, असं मत बेन ब्रेबर यांनी व्यक्त केलंय. ब्रेबर हे इतिहासकार असून त्यांनी गृहयुद्धाच्या काळातील अॅमस्टरडॅममधील यहुदींच्या जीवनाबाबत अत्यंत विस्तृपणे लिखाण केलंय.

पण ब्रिल यांचे सगळे मित्र भांडणांमध्ये अडकलेले असताना, ते मात्र क्रीडा क्षेत्राच्या दिशेनं वळले.

"दुसऱ्या महायुद्धाच्या आधी ज्यू समुदायामध्ये बॉक्सिंग अत्यंत लोपकप्रिय होतं," असं ब्रेबर सांगतात.

"काही मुलांसाठी हा खेळ म्हणजे केवळ जुगाऱ्यांमधील भांडणाचा एक भाग होता. पण इतर ज्यू तरुणांनी मात्र बॉक्सिंग क्लबमध्ये प्रवेश घेतले होते. हे क्लब त्यावेळी लोकप्रिय होते. त्याचं आणखी कारण म्हणजे त्याठिकाणचं प्रशिक्षण आणि स्पर्धा हे रोजच्या संघर्षमय जीवनातून आणि विशेषतः गरिबीतून सुटका मिळण्याचं एक माध्यम होतं.

"तरुणांनी यातून स्वाभिमानही मिळवला. कारण त्याठिकाणी स्वसंरक्षणाबरोबर, धाडस, सहनशक्ती, त्वरित प्रतिक्रिया देण्याची क्षमता किंवा चपळता आणि सोबतच तांत्रिक कौशल्याचीही गरज असायची."

ब्रिल हे अशाच तरुणांपैकी एक होते. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात जीवनाच्या अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे ते अवघे 15 वर्षांचे असताना झाली. 1928 च्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी अॅमस्टरडॅमच्या संघात त्यांची त्यांची निवड झाली होती.

स्पर्धेची सुरुवात झाली त्यादिवशीच ते 16 वर्षांचे झाले होते. (पात्रता मिळवण्यासाठी त्यांना खोटी जन्मतारीख सांगावी लागली होती. प्रत्यक्षात ते 15 वर्षांचेच होते, असंही काहींचं मत आहे) या स्पर्धेत त्यांच्या वजनगटात म्हणजे फ्लायवेट प्रकारात ते उपांत्यपूर्व (क्वार्टर फायनल) फेरीपर्यंत पोहोचले होते.

ब्रिल मोठे झाले तेव्हा त्यांना एका कसायाच्या दुकानात काम मिळालं होतं. त्याचाही वापर त्यांनी त्यांच्या खेळाची कौशल्य विकसित करण्यासाठी केला होता.

"त्यांनी मला सांगितलं की, जेव्हा त्यांना मांसाचे तुकडे करायचे असायचे, तेव्हा ते नेहमी डाव्या हाताचा वापर करायचे. नैसर्गिकरित्या ते उजव्या हातानेच सर्व कामं कारत असले तरी, डावा हात किंवा पंजा मजबूत व्हावा म्हणून ते असं करायचे," असं ब्रेबर जुन्या आठवणी सांगताना म्हणाले.

रोझनफेल्ड यांनादेखील त्यांच्या वीटांसारख्या कडक हातांची आठवण झाली.

ऑलिम्पिकसाठी बर्लिनला जाणं नाकारलं...

1920 च्या दशकाच्या अखेरीस आणि 1930 च्या दशकात ब्रिल हे सलग चॅम्पियन बनले. त्यांनी आठवेळा डच विजेतेपद मिळवलं आणि त्यामुळं त्यांना देशभरात प्रसिद्धी मिळाली.

पण त्या काळामध्ये अॅमस्टरडॅममधील जीवन नाट्यमयरित्या बदलत होतं. विशेषतः ब्रिल यांच्यासारख्या ज्यूंचं जीवन.

आर्थिक संकट, जर्मनीतील नाझींचा उदय आणि त्याचवेळी नेदरलँडमध्ये ज्यूंना होणाऱ्या विरोधात झालेल्या वाढीमुळं ज्यूंच्या विरोधातील भेदभावातही वाढ होत होती.

ब्रिल यांना त्याचा थेट अनुभव आला होता. त्यांनी देशांतर्गत स्पर्धांमध्ये मिळालेल्या यशाकडं दुर्लक्ष करत 1932 च्या लॉस एंजल्समध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी नेदरलँड्सच्या संघात त्यांना स्थान मिळालं नव्हतं.

त्यावेळी काय झालं हे ब्रिल यांना नीट समजलं नव्हतं, असं रोझनफेल्ड म्हणाले. पण नंतर त्यांना समजलं की, डचच्या राष्ट्रीय बॉक्सिंग समितीतील ज्यू विरोधकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता.

त्यानंतर तीन वर्षांनी 1935 मध्ये असं काही घडलं जे ब्रिल यांच्या मते, त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची बाब होती. कारण त्यामुळंच त्यांना स्टार ऑफ डेव्हीड असलेली रिंग मिळाली होती, ती त्यांनी अगदी वृद्धत्वातही परिधान केलेली होती.

ब्रिल त्यावेळी दुसऱ्या मेकबाया स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तेव्हाच्या पॅलेस्टाईनमधील तेल अविव्हला गेले. जगभरातील ज्यू खेळाडूंसाठी या स्पर्धांचं आयोजन केलं जायचं.

ब्रिल आणि त्यांचे डच यहुदी मित्र अॅपी डे व्ह्रीस या दोघांनीही या स्पर्धेत सुवर्णपदकं मिळवली. अॅमस्टरडॅममध्ये परतल्यानंतर तेथील ज्यू समुदायानं अत्यंत जल्लोषात त्यांचं स्वागत केलं.

याच काळाच्या सुमारास ब्रिल यांनी, त्यांना मिळालेल्या अंगठीला मॅच करण्यासाठी म्हणून स्टार ऑफ डेवीड असलेले शॉर्ट्स परिधान करण्यासही सुरुवात केली होती.

ज्यू बॉक्सरमध्ये अशा प्रकारे हा स्टार परिधान करण्याची जणू परंपराच होती. त्यामुळं असं करणारे ब्रिल हे काही पहिलेच ज्यू बॉक्सर नव्हते.

'द घेट्टो विझार्ड' नावानं प्रसिद्ध असलेले 1920 मधील अमेरिकेतील लाईटवेट महान बॉक्सर बेनी लिओनार्ड यांनीदेखील त्यांच्या भरभराटीच्या काळात तसं केलं होतं.

त्याच्या खूप नंतरच्या काळात बॅरी ग्रोंटमन यांचं करिअर आकाराला आलं तेव्हा त्यांनी या माध्यमातून अशा व्यक्तीचा सन्मान केला, ज्यानं स्वतः अंगठीमध्ये असलेला स्टार ऑफ डेवीड दाखवून प्रेरणा दिली होती.

मात्र ब्रेबर यांच्या मते, 1930 च्या काळातील नेदरलँड्समध्ये ब्रिल यांनी स्वतःकडं अशा दृष्टीनं पाहणं ही एक अत्यंत महत्त्वाची बाब होती.

"त्यांनी अगदी स्पष्टपणे ज्यू म्हणून स्वतःची ओळख स्वीकारली होती. पण त्याचवेळी इतरांनीही आपली हीच ओळख स्वीकारावी, असं त्यांना वाटत होतं. त्यांच्यासाठी तेदेखील अत्यंत महत्त्वाचं होतं," असं ते म्हणाले.

1939 पर्यंत ब्रिल त्यांच्या अंगठीमध्ये स्टार परिधान करत होते. तसंच ते स्वतः स्टार असलेली शॉर्ट्स परिधान केलेले फोटोदेखील वितरीत करत होते.

रोझनफेल्ड यांनी त्यांच्या पुस्तकासाठी अनेकवेळा ब्रिल यांच्या मुलाखतीदेखील घेतल्या. त्यांच्या मते, हा स्टार परिधान करण्यामागं ब्रिल यांची भावना किंवा भूमिका राजकीय नव्हती. तर मेकबायामध्ये झालेल्या स्पर्धेत त्यांनी मिळवलेल्या यशाचं प्रदर्शन करणं ही त्यांची यामागची प्रेरणा होती.

त्याचवेळी युरोप आणि त्याच्या आजुबाजुच्या परिसरातील परिस्थितीची त्यांना स्पष्टपणे जाणीव होती. पण ते त्यांना हवं तसं वागायला जराही घाबरत नव्हते.

1934 मध्ये ब्रिल डच ज्यू संघाबरोबर स्पर्धेसाठी जर्मनीला गेले.

त्यावेळी तिथं नाझींना सत्तेत येऊन एक वर्ष झालं होतं. त्यांनी देशात यहुदींच्या विरोधात थेटपणे भेदभाव करायला सुरुवात केली होती. अगदी द्वेषपूर्ण वातावरण होतं आणि दैनंदिन जीवनही कठिण बनत चाललं होतं.

ब्रिल यांनी तिथं जे काही पाहिलं त्यामुळं ते घाबरून गेले.

"आम्हाला सगळीकडं तपकिरी रंगाचे गणवेश आणि स्वास्तिक असलेले झेंडे दिसत होते. तसंच ज्यू लोकांच्या व्यवसायांच्या ठिकाणी ज्यू लिहिलेलं होतं," असं ब्रिल यांनी अनेक वर्षांनंतर एका डच वृत्तपत्राला सांगितलं होतं.

"मी तेव्हा म्हणालो होतो, जोपर्यंत हे सरकार सत्तेत आहे तोपर्यंत मी कधीही जर्मनीला जाणार नाही."

त्यांना जेव्हा 1936 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धांसाठी बर्लिनला जाण्यासाठी बोलावण्यात आलं, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. चार वर्षांपूर्वीच त्यांची पात्रता असूनही ऑलिम्पिक खेळांसाठी निवड झाली नव्हती, पण तरीही त्यांनी यावेळी नकार दिला होता.

सहकाऱ्यानंच दगा दिला...

ब्रिल यांचं हौशी बॉक्सर म्हणून करिअर सुरू होतं आणि त्यांना चांगली प्रसिद्धीही मिळत होती. त्यादरम्यान त्यांनी पत्नी सेलियाबरोबर विवाह केला. त्यांना अब्राहम नावाचा एक मुलगा होता. उट्रेच शहरामध्ये त्यांनी सँडविचचं एक शॉपही सुरू केलं होतं.

पण 1939 मध्ये युरोपात युद्धाला सुरुवात झाली आणि त्यामुळं त्यांच्यासह देशातील प्रत्येकाच्यात जीवनात उलथा-पालथ झाली. मे 1940 मध्ये जर्मनीनं नेदरलँडवर हल्ला केला.

सुरुवातीला फार काही बदललं नाही. पण हळू-हळू डच ज्यूंवर अधिक निर्बंध लागू लागले आणि त्यांना असलेला धोका वाढत गेला.

"1941 मध्ये आणखी कठोर निर्बंध लादण्यात आले. त्यात नेदरलँड्समधील ज्यूंना इतर लोकसंख्येपासून वेगळं करण्याचा थेट प्रयत्न करण्यात आला होता," असं इतिहासकार ब्रेबर सांगतात.

ज्यू लोकांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्याबाबतच निर्बंध लावण्यात आले होते. विशेषतः बार आणि कॅफेंवर ज्यूंना त्यांच्या परिसरात प्रवेशापासून रोखण्यासाठी बळजबरी करण्यात येत होती. या सर्वाचा शेवट अनेकदा हिंसाचारानं व्हायचा.

या सर्वातूनच अनेक ज्यू संरक्षण समुहांचीही निर्मिती झाली. त्यापैकी काहींचं केंद्र हे त्याठिकाणचे स्पोर्ट्स क्लब आणि त्याच्या आसपास होती. ब्रिल अशाच एका स्पोर्ट्स क्लबचे सदस्य होते.

11 फेब्रुवारी 1941 रोजी डच नाझींनी ज्यूंचा जिल्हा असलेल्या अॅमस्टरडममध्ये मार्च केला.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या घुसखोरीत प्रामुख्यानं ज्यू लोकांची घरं आणि व्यावसायिक ठिकाणांना लक्ष्य करत त्यावर हल्ले करण्यात आले होते. आता त्यांचं पुढचं लक्ष्य सभास्थळ असू शकतं, अशी भीती तेव्हा असल्याचं मत ब्रेबर यांनी व्यक्त केलं.

त्यामुळं संरक्षक समुहातील सदस्यांनी वीटा, लोखंडी सळया आणि हाती येईल ती शस्त्रं घेत आणखी एका संघर्षाची तयारी केली होती.

तेव्हा झालेला संघर्ष हा अधिक हिंसक आणि रक्तपात घडवणारा होता. अत्यंत निर्घृण असा संघर्ष झाला आणि त्यात एका नाझीचा मृत्यूदेखील झाला. यहुदी समुदायाला पुढं त्याचे मोठे आणि गंभीर परिणाम भोगावे लागले.

दोन आठवड्यांमध्ये जवळपास 400 जणांना पकडून नाझी छावण्यांत नेण्यात आलं. काही महिन्यांनी त्यापैकी मोजकेच जीवंत वाचू शकले होते.

त्यात ब्रिल यांचा समावेश होता, असं ब्रेबर यांना ब्रिल यांच्या मित्रानं सांगितलं होतं. तसंच त्यात त्यांच्या ओळखीचेही अनेक जण होते. प्रशिक्षक आणि इतर बॉक्सर असे अनेकजण त्यात असल्याचं सांगण्यात आलं. पण तरीही ब्रिल यांनी थेट संघर्षात सहभाग घेतल्याची शक्यता कमीच होती.

रोझनफेल्ड यांच्या मते, ब्रिल यांना या सर्वापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. कारण ते प्रसिद्ध असल्यामुळं त्यांना लक्ष्य केलं जाण्याची अधिक शक्यता होती.

दरम्यान, अॅमस्टरडॅमच्या वॉटरलूपल्पिन स्क्वेअरवर ज्यूंच्या संरक्षक समुहांबरोबर नाझींचा संघर्ष झाला होता. हा संघर्ष ज्यूंच्या विरोधाचं युरोपातील एक अनोखं उदाहरण ठरलं. शहरातील परिस्थिती कशाप्रकारे बदलली आहे, याचं ते जीवंत उदाहरण होतं, असं ब्रेबर म्हणतात.

त्यानंतरच्या महिन्यांमध्ये घुसखोरी, हिंसाचार आणि थेट भेदभावाचे प्रकार वाढतच गेले. नंतर 1942 मध्ये म्हणजे पिवळा स्टार परिधान करणं अनिवार्य करण्यात आल्यानंतर डच ज्यूंचं पहिलं बळजबरीचं स्थलांतर (छावण्यांत) करण्यात आलं होतं.

"पण ज्या छावण्यांमध्ये या ज्यूंना पाठवलं जात आहे, त्याठिकाणी नेमकं काय होत होतं? याबद्दल त्या क्षणी नेमकी कुणालाही काहीही माहिती नव्हती," असं ब्रेबर सांगतात.

"गॅस चेंबर आणि छळ छावण्या किंवा नरसंहाराबाबत आज आपल्याला जे काही माहिती आहे, ते सर्व युद्धानंतर समोर आलं होतं. अंदाजे 20 टक्के लोकांना छावण्यांमध्ये स्थलांतरीत करण्यासाठी बोलावण्यात आलं होतं, पण ते तयार झाले नाही आणि लपून बसले."

त्यांच्यामध्ये ब्रिल आणि त्यांच्या कुटुंबाचाही समावेश होता. ब्रेबर म्हणाले की, लपून बसण्याचा त्यांचा निर्णय अत्यंत धोकादायक होता. "'आपण एकत्र राहू शकतो का?, आपल्याला मदत मिळेल का? किंवा सोबत असलेले इतर लोक विश्वासार्ह आहेत का? अशा अनेक गोष्टींचा त्यावेळी विचार करणं गरजेचं होतं."

रोझनफेल्ड यांच्या मते, ब्रिल आणि त्यांच्या कुटुंबानं अनेक ठिकाणी आश्रय घेतला होता आणि धोका असतानाही ते अनेकदा सहजपणे तिथून बाहेर पडले होते.

पण अखेर त्यांच्याबरोबर दगा झाला आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलं. ब्रिल यांच्या क्रीडा जीवनातील कटू इतिहासाचा फटका त्यांना बसला होता. 1928 मधील ऑलिम्पिकच्या बॉक्सिंग पथकातील त्यांच्या संघातील सहकारी सॅम ओलिज यानं त्यांना दगा दिला होता.

ब्रिल यांनी अॅमस्टरडममध्ये ओलिज यांच्या मुलांबरोबरही बॉक्सिंग केलं होतं. पण ओलिज कुटुंबीय नाझींचे विश्वासू बनले होते. डच क्रीडा इतिहासकार डरीट वॅन डेवूरन यांच्या मते, ओलिज यांच्या मुलानं ब्रिल यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलाला अटक केली होती.

ब्रिल यांच्या कुटुंबाला या छावण्यांत पाठवण्यात आलं होतं. सुरुवातील काळात नेदरलँड्सच्या वूटमध्ये नंतर जर्मन सीमेच्यावर उत्तरेला असलेल्या वेस्टरबोर्कमध्ये आणि शेवटी बर्गन-बेल्सन याठिकाणी असलेल्या छावण्यांत त्यांना नेण्यात आलं. याठिकाणी सुमारे 50 हजार लोक मारले गेल्याचा अंदाज असून त्यात अॅन फ्रँक यांचा समावेश होता.

डेवूरन यांनी ओलिज यांचं वर्णन "डचच्या क्रीडा विश्वात अत्यंत वाईट विश्वासघात करणारा ज्यूंचा कुख्यात शिकारी" असं केलंय. युद्धानंतर त्यांनी नऊ वर्ष तुरुंगवास भोगला आणि 1975 मध्ये त्यांचं निधन झालं. तर त्यांचा मुलगा जेन हा अर्जेंटिनाला पळून गेला होता, असं सांगितलं जातं.

या युद्धामध्ये एक क्षण असा होता जो ब्रिल यांच्या जीवनात इतर सर्वांपेक्षा वेगळा ठरला होता. त्या क्षणी ब्रिल यांनी मोठ्या धोक्याचा सामना केला, पण ते त्याला अगदी सहजपणे सामोरे गेले होते. वूटमधील नाझी छावणीमध्ये हा प्रसंग घडला होता. स्वतः ब्रिल यांनी 1980 मध्ये ब्रेबर यांना याबाबतची गोष्ट सांगितली होती. त्यांच्याच शब्दांत ती जाणून घेऊ.

"एका मुलानं पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, पण नाझींनी त्याला पकडलं," असं ब्रिल सांगू लागले.

"त्यांनी त्याला एका रॅकवर ठेवलं. त्याला चाबकाचे 25 फटके मारले जाणार होते. त्यावेळी अचानक एक कमांडर ओरडला 'बॉक्सर पुढे या!"

"मला, त्या मुलाला चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा द्यावी लागणार होती. पण मी नकार दिला. कमांडर म्हणाला की, जर मी ते केलं नाही तर मलाच चाबकाचे 50 फटके मारले जातील. त्यामुळं मी चाबूक हाती घेतला आणि त्याला मारले. पण मी फार वरच्या बाजूला मारत होतो."

"त्यामुळं कमांडर जणू वेडा झाला होता. तो ओरडला, 'असं नाही!' त्यानं माझ्या हातातला चाबूक घेतला आणि तो मुलाला वेड्यासारखा मारू लागला. मी परत मागे सरकलो."

कमांडरचा आदेश मान्य करण्यास नकार देऊनही ब्रिल यांना त्याचे परिणाम का भोगावे लागले नाही, हे माहिती नाही. मात्र, ज्या लोकांनी हे सर्व पाहिलं होतं, त्यांना मात्र जे पाहिलं त्याबद्दल काहीही शंका नव्हती.

"छावणीतील अडीच वर्षांच्या काळात एसएस (SS) म्हणजे नाझींच्या एका अत्यंत खास लष्करी तुकडीचा आदेश नाकारण्याचा धोका पत्करणारे बेन ब्रिल हे एकमेक व्यक्ती मी पाहिले होते, किंवा त्याबाबत ऐकलं होतं," असं वूटमधील यहुदी प्रशासनाच्या प्रमुखांनी युद्धानंतर जबाब नोंदवताना सांगितलं होतं.

हे एक "अत्यंत धाडसी काम" होतं असं इतिहासकार ब्रेबर सांगतात.

पण ब्रिल यांना वूट आणि वेस्टरबोर्क दोन्ही ठिकाणी छावण्यांमध्येही लढावं (बॉक्सिंग फाईट) लागलं. एक प्रसिद्ध बॉक्सर असल्यामुळं ते लक्ष्य ठरले होते. कारण गार्ड्सला त्यांना फाईट करताना पाहण्याची इच्छा होती.

1988 मध्ये डच टीव्हीवर बोलताना ब्रिल यांनी त्यांच्या जीवन बदलून टाकणाऱ्या या क्षणाबद्दल सांगितलं होतं. "मी माझ्या मुलासाठी बॉक्सिंग केली होती, कारण तो तेव्हा मृत्यूच्या दाढेत होता," असं ते म्हणाले.

त्यांना एका 'कापो' बरोबर फाईट करावी लागणार होती. कापो हेदेखील कैदीच होते. पण नाझींनी त्यांची निवड करून त्यांना, छावणीमध्ये इतर कैद्यांचं संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त केलं होतं.

त्या व्यक्तीनं 'मला नॉक आऊट करू नका' अशी विनंती ब्रिल यांना केली. त्यावर ब्रिल यांनी एक अट ठेवली. औषधं मिळवून देण्यासाठी मदत आणि त्यांच्या ब्लॉकमधील इतर कैद्यांना मारायचं नाही, अशी ती अट होती.

त्या व्यक्तीनं अट मान्य केली आणि त्यामुळं ब्रिल यांचा मुलगा आजारातून बचावला, असं स्टिव्हन रोझनफेल्ड सांगतात.

ब्रिल हे छावणीमधील अधिकाऱ्यांच्या मनोरंजनासाठी फाईट आयोजित करण्यासाठीही मदत करायचे. ब्रेबर यांच्या मते, या फाईटमध्ये सहभागी होणाऱ्यांना अतिरिक्त अन्नधान्य किंवा इतर फायदे मिळत होते.

ग्रोंटमन यांनी ब्रिल यांच्यावर आधारित एक चांगला टीव्ही प्रोग्राम तयार केला. त्यांचे जुने सहकारी, आणि वेस्टरबोर्कमधील छावणीतील काही फाईटचे दस्तऐवज यांच्या सहाय्यानं त्यांनी जुन्या गोष्टींना उजाळा दिला.

"मला त्यात मी ओळखत असलेली अनेक नावं आढळली. मी त्यांच्या नातवंडांना ओळखतो," असं ते म्हणतात.

"या सर्वातली भयावह बाब म्हणजे, मी आता कार्यक्रमांसाठी जातो, तेव्हा चेंजिंग रूममध्ये असलेल्या शेड्यूल पेपरशी त्यांचं बरंचसं साम्य दिसतं. ते अत्यंत कठिण असतं."

ब्रिल यांच्या जवळपास सर्वच नातेवाईकांचा नरसंहारामध्ये मृत्यू झाला. केवळ ब्रिल, त्यांची पत्नी सेलिया आणि त्यांचा मुलगा अब्राहम यातून बचावले.

जानेवारी 1945 मध्ये त्यांच्या कुटुंबाला कैद्यांच्या देवाण-घेवाण कार्यक्रमांतर्गत बर्गन-बेल्सनमधून आधी स्वित्झरलँडला नेण्यात आलं. त्यानंतर त्यांना अल्जेरियातील संयुक्त राष्ट्रांच्या छावणीत आणि नंतर उट्रेचला पाठवण्यात आलं.

युद्धानंतर ते स्पर्धक म्हणून पुन्हा रिंगमध्ये उतरले नाहीत...

ब्रिल युद्धानंतर स्पर्धक म्हणून पुन्हा रिंगमध्ये उतरले नाहीत, मात्र त्यांनी बॉक्सिंग सोडलंही नाही.

ते बॉक्सिंग क्रीडा प्रकारातील एक वरिष्ठ अधिकारी बनले. 1970 च्या दशकात जगभरात झालेल्या स्पर्धांमध्ये रेफरी आणि जज म्हणून काम त्यांनी सांभाळलं.

ते 1964 मध्ये टोकियो (त्याठिकाणी एका स्पर्धाकानं रेफरीला पंच केल्यानंतर रिंगमध्ये प्रवेश करत त्यांनी पुन्हा एकदा जुन्या दिवसांची आठवण करून दिली), 1968 मध्ये मेक्सिको सिटी आणि 1976 मध्ये माँट्रेयल इथं झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्येही त्यांनी काम केलं.

1972 मधील म्युनिकमधील स्पर्धांना ते जाऊ शकले नाहीत. त्याचीही एक वेगळीच कहाणी आहे. नेदरलँड्समधील बॉक्सिंग क्षेत्रातील अधिकाऱ्यांशी असलेल्या वादामुळं त्यांना स्पर्धेला मुकावं लागलं होतं.

रिंगमध्ये असो वा इतर प्रकारे पण ब्रिल यांनी काही महान खेळाडुंच्या करिअरमध्येही महत्त्वाची भूमिका निभावली. वर्ल्ड चॅम्पियन जो फ्रेझर, जॉर्ज फोरमन आणि शुगर रे लिओनार्दो यांचा त्यात समावेश होता.

2003 मध्ये वयाच्या 91 व्या वर्षी ब्रिल यांचं निधन झालं. त्यानंतर चार वर्षांनी त्यांच्या स्मरणार्थ पहिल्यांचा मेमोरियल नाईट सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

ग्रोंटमन यांनी 2011 मध्ये या सोहळ्यात पहिल्यांदा सहभाग घेतला. त्याठिकाणी त्यांनी स्टार ऑफ द डेवीड असलेले शॉर्ट्स परिधान करून सामना खेळला. तरुणपणी ज्याच्याकडून प्रेरणा मिळाली त्या व्यक्तीप्रती आणि त्यांच्या कुटुंबाप्रती आदर व्यक्त करण्याचा ग्रोंटमन यांचा तो प्रयत्न होता.

"मला वाटतं तो सामना माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम सामना होता," असं ते म्हणाले.

"लोकांना त्यांचा धर्म, ध्यान, विचार किंवा त्यांचं मूळ स्थान अशा गोष्टींतून बळ मिळत असतं. पण मी जेव्हा बॉक्सिंग करायचो तेव्हा मला माझ्या शॉर्ट्सवर असलेल्या या स्टारमुळं बळ मिळतंय असं वाटायचं."

"आम्ही याच विचारावर वाढलो आहोत की, : 'मूळ ओळखीपासून किंवा अस्तित्वापासून तुम्ही कधीही दूर जाता कामा नये'. बेन ब्रिल जे होते, त्या ओळखीसाठी ते कायम उभे राहिले होते."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)