तिरुपतीमध्ये वैकुंठ एकादशीच्या टोकनसाठी चेंगराचेंगरी, सहा भाविकांचा मृत्यू

चेंगराचेंगरीचे दृश्य

फोटो स्रोत, screengrab

फोटो कॅप्शन, तिरुपती देवस्थान परिसरात वैकुंठ दर्शनाचे टोकन मिळवण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती.

आंध्रप्रदेशच्या तिरुपती देवस्थान परिसरात बुधवारी रात्री चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत सहा भाविकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती तिरुमला तिरुपती देवस्थानमचे अध्यक्ष बीआर नायडू यांनी दिली आहे.

तिरुपती देवस्थान परिसरात वैकुंठ दर्शनाचे टोकन मिळवण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. त्यावेळी भाविकांमध्ये झालेल्या धक्का बुक्कीनंतर ही चेंगराचेंगरी झाली आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी एक्सवर पोस्ट करत या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे.

दरम्यान, ज्या दर्शनाच्या तिकिट किंवा टोकनसाठी ही चेंगराचेंगरी झाली ते वैकुंठ एकादशीचे टोकन वाटपासाठी गुरुवारपासून तिरुपतीच्या 8 भागांत व्यवस्था केली जाणार असल्याचं देवस्थानच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

वैकुंठ एकादशी सोहळ्यासाठी गर्दी

तिरुपतीमध्ये वैकुंठ एकादशीनिमित्त शुक्रवारी म्हणजे 10 जानेवारीपासून वैकुंठ द्वार दर्शनाला सुरुवात होत आहे. त्यासाठी देशभरातील हजारो भाविक तिरुपतीला पोहोचले आहेत.

या वैकुंठ द्वार दर्शनाच्या तिकिटासाठी प्रचंड गर्दी होत असते. त्यामुळं भाविक दोन दिवस आधीपासूनच याठिकाणी आलेले होते. या भाविकांनी बुधवारी सायंकाळपासूनच तिकिटांसाठी रांगा लावल्या.

भाविक
फोटो कॅप्शन, भाविकांनी बुधवारी सायंकाळपासूनच तिकिटांसाठी रांगा लावल्या.

तिरुपतीमधील बैरागीपट्टेडामधील रामनायडू शाळा परिसर आणि विष्णू निवास केंद्रात तिकिटासाठी उभ्या असलेल्या भाविकांमध्ये आधी धक्काबुक्की आणि नंतर चेंगराचेंगरी झाली. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला. तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक?

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी याबाबत दुःख व्यक्त केलं आहे. "तिरुपतीमधील चेंगराचेंगरीत भाविकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनं धक्का बसला आहे," असं ते म्हणाले.

"तिरुमला श्रीवारी वैकुंठ द्वार दर्शनाच्या टोकनसाठी भाविक मोठ्या संख्येनं जमले होते. त्यावेळी ही घटना घडली. काही जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. तातडीने बचावकार्य आणि गरजूंना मदतीच्या सूचना दिल्या आहेत," असंही नायडू म्हणाले.

चंद्राबाबू नायडू.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी शोक व्यक्त केला आहे.

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनीही या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटूंबियांप्रती संवेदना असल्याचं ते म्हणाले.

घटना अत्यंत दुःखद असून जखमींना चांगले उपचार मिळावेत यासाठी सरकारने पावले उचलावीत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

तर या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची माहणी भाजप आंध्र प्रदेश अध्यक्ष दग्गुबती पुरंदेश्वरी यांनी केली आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.