मांढरदेवीची यात्रा : जेव्हा गर्दीत अचानक मोठा आवाज आला आणि चेंगराचेंगरीत शेकडोंचे बळी गेले

फोटो स्रोत, SEBASTIAN D'SOUZA/AFP via Getty Images
दक्षिण कोरियाची राजधानी सोल येथे शनिवारी (29 ऑक्टोबर) हॅलोविनचा सण साजरा करत असताना जमलेल्या गर्दीमुळे गुदमरून 153 जणांचा मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये बहुतांश तरुण आणि किशोरवयीन मुलांचा समावेश आहे. या दुर्घटनेनंतर हजारो जण बेपत्ता असल्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
एकेकाळी महाराष्ट्रातही देवीच्या उत्सवादरम्यान अशीच एक मोठी दुर्घटना घडली होती. यात जवळपास 300 जणांचा मृत्यू झाला होता. ही दुर्घटना नेमकी काय होती? जाणून घेऊया,
तारीख : 25 जानेवारी 2005.
वेळ : मंगळवारची दुपार.
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याजवळ मांढरदेवीचं मंदिर एका डोंगरावर वसलेलं आहे. याला काळुबाईचं मंदिर म्हणूनही ओळखलं जातं.
मांढरदेवीच्या मंदिरात जाण्यासाठी हा लहान डोंगर चढावा लागतो. त्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दुतर्फा पूजेच्या साहित्याची दुकानं आहेत.
दरवर्षी जानेवारी महिन्यात डोंगरावर मांढरदेवीची यात्रा असते. हा उत्सव जवळपास 15 दिवस चालतो.
'आपलं गाऱ्हाणं देवीसमोर मांडण्यासाठी, आपल्या इच्छापूर्तींसाठी आणि इच्छा पूर्ण झाली म्हणून दर्शनासाठी लाखो भाविक खासकरून यात्रेला हजेरी लावतात' अशी मान्यता आहे.

फोटो स्रोत, SEBASTIAN D'SOUZA/AFP via Getty Images
दरवर्षीप्रमाणे 'त्या' दिवशीही जवळपास 3 लाख भक्त उत्सवासाठी जमले होते. यात मोठ्या संख्येने महिला आणि त्यांच्यासोबत लहान मुलं होती.
उसळलेल्या गर्दीतून प्रत्येक जण जमेल तसं देवीचं दर्शन घेत होते. बोकड कापण्याची प्रथा सुद्धा त्यावेळी होती. त्यामुळे डोंगराच्या एकाबाजूला बोकड कापले जात होते.
दुपारच्यावेळी गर्दीत अचनाक गोंधळ उडाला. काही भाविक घसरून खाली पडले आणि गर्दी असल्याने चेंगराचेंगरी झाली.
यावेळी डोंगरावर काही तंबू लावले होते. या तंबूंनाही आग लागली. सिलेंडरचा स्फोट झाला आणि शेकडोंचा बळी गेला आणि अनेकजण जखमी झाले.
क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. शेकडोंचे जीव गेले, लहान मुलं गुदमरून गेली. पाहता पाहता मृतांचा आकडा शंभरी पार गेला आणि दिवसाअखेर जवळपास 300 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.
तर काही स्थानिक पत्रकारांनुसार, उत्सवाच्या मार्गावर असलेल्या दुकानांना आग लागली आणि धुराचे लोट दिसू लागले. तर काहींनी सांगितलं, काही दुकानांमध्ये ठेवलेल्या गॅस सिलेंडरचाही स्फोट झाला.

फोटो स्रोत, SEBASTIAN D'SOUZA/AFP via Getty Images
स्फोटाचा आवाज आल्याने आणि आग लागल्याने लोकांमध्ये खळबळ उडाली. चेंगराचेंगरी झाली आणि लोकांचा मृत्यू झाला.
ही दृश्य जवळूप पाहणारे पत्रकार सांगतात, 'मृतदेहांचे थर एकावर एकवर रचल्याप्रमाणे दृश्य दिसत होतं. गर्दी दुकानांमध्ये घुसल्याने पत्र्याची दुकानं कोलमडून पडली. शॉक बसल्याने अनेकांचा जीव तिथेच गेला. दुकानांना आग लागली. लूटमार सुरू झाली.'
लहान मुलं रडत होती. जखमी झालेली माणसं तळमळत होती. प्रेतांच्या भोवती जमा झालेली माणसं धायमोकलून रडत होती,'
मदतकार्यात अडथळे
दुर्घटना डोंगरावर झाल्याने आणि लाखोंची गर्दी असल्याने अग्निशमन दलाची मदत पोहचण्यासही विलंब झाल्याचं समोर आलं.
घटनास्थळी बीबीसीचे प्रतिनिधी जयश्री बजोरिया उपस्थित होत्या. त्यांच्यानुसार, रात्रीपर्यंत जवळपास सर्व जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
रात्रीपर्यंत कुटुंबीय सुद्धा घटनास्थळी पोहचले. कोणी आपल्या आईला शोधत होतं तर कोणी आपल्या वडिलांना.
जखमींमध्ये शोधाशोध सुरू होती. तिथे मृतदेहांचे ढीग पडले होते. त्यातही आपल्या माणसाचा चेहरा शोधण्याचा प्रयत्न नातेवाईक करत होते.
यात 300 जणांचा मृत्यू झाल्याचं त्यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं. यात महिला आणि लहान मुलांची संख्या सर्वाधिक होती.

फोटो स्रोत, SEBASTIAN D'SOUZA/AFP via Getty Images
आग लागल्यामुळे गोंधळ उडाला अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. गोंधळ उडाल्यानंतर चेंगराचेंगरी झाली आणि यामुळे लोकांचा मृत्यू झाला अशीही माहिती देण्यात आली. तसंच अनेकांचा मृत्यू आगीत जळल्यामुळे झाला.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 दिवसांच्या या यात्रेसाठी जवळपास 3 लाख लोक एकत्र जमले होते.
त्यावर्षी हवामान चांगलं असल्याने आणि पीक चांगलं आल्याने मोठ्या संख्येने भक्त यात्रेसाठी आले होते. तसंच पौर्णीमा असल्यानेही गर्दी जास्त होती.
घटनेनंतर त्यावेळचे पोलीस महानिरीक्षक केके पाठक यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं की, मंदिराजवळील दुकानांमध्ये आग लागली आणि लोकांमध्ये भीती पसरली. लोक इकडे-तिकडे पळू लागले.
दुर्घटनेनंतर काय बदल झाले?
या दुर्घटनेनंतर प्रशासनाने या यात्रेचा ताबा घेतला.
न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. आता गडावरील सोयी-सुविधा आणि अडचणींबाबत समितीच्या माध्यमातून निर्णय घेतला जातो.
दरवर्षी होणारा हा उत्सव सुद्धा प्रशासकीय समिती पार पाडते. तसंच, संपूर्ण मंदिराच्या आवारात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत.
सुरक्षा यंत्रणाही वाढवण्यात आली. तसंच, गडावरील अंधश्रद्धा संपुष्टात आणण्यासाठी पावलं उचलवण्यात आली.
दरम्यान, कोरोना आरोग्य संकट काळात दोन वर्षं ही यात्रेसाठी प्रशासनाकडून मनाई करण्यात आली. यात्रा कालावधीत मंदिरात केवळ ट्रस्ट आणि पुजाऱ्यांनाच प्रवेश देण्यात आला होता.
सोलची घटना जगातील सर्वाधिक दुर्दैवी घटनांपैकी एक
गेल्या दशकभरात जगभरात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या सर्वांत दुर्दैवी घटनांपैकी एक असल्याचे म्हटले जात आहे.
- 2015 साली सौदी अरेबियातील मक्का येथे हज यात्रेसाठी आलेल्या भाविकांची गर्दी जमली होती. यावेळी किमान 2000 जणांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त होते.
- गेल्या महिन्यातच इंडोनेशियातील पूर्व जावातील मलंग फुटबॉल मैदानावर झालेल्या चेंगराचेंगरीत 130 जणांचा मृत्यू झाला होता.
- 2013 साली मध्य प्रदेशात दातिया या ठिकाणी नवरात्रीच्या उत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 115 जणांचा मृत्यू झाला होता.
- 2005 साली सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली होती. त्यावेळी 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








