The Squid Game सीरिजमुळे दक्षिण कोरियाबद्दलच्या 'या' गोष्टी झाल्या उघड

फोटो स्रोत, Netflix
दक्षिण कोरियातील "द स्क्विड गेम" (The squid game) ही नेटफ्लिक्सवरची रक्तरंजित सीरिज आजवरची नेटफ्लिक्सवरची सर्वात लोकप्रिय सीरीज ठरली आहे.
ऑक्टोबरच्या सुरुवातीच्या दिवसांत 90 देशांमध्ये ही सीरीज सर्वाधिक पाहिली गेली. या सिरीजच्या यशामुळं जगाला आशियातील देशांमध्ये असलेल्या समाजातील काही जटील बाबींची माहिती मिळतेय.
या शोची कथा अत्यंत रहस्यमय आहे. यामध्ये काही स्पर्धक पैशाच्या मोबदल्यात जीवनमरणाचा संघर्ष असलेल्या एका गेममध्ये सहभागी झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. मात्र त्याबरोबरच दक्षिण कोरियातील नागरिकांना सामोरं जावं लागणाऱ्या प्रत्यक्ष जीवनातील अडचणीही याद्वारे मांडण्यात आल्यानं या सीरिजचं कौतुक होत आहे.
सोलमधील (Seoul) दोन कुटुंबांच्या विरोधाभासी जीवनाचं दर्शन घडवणाऱ्या पॅरासाइट या चित्रपटासारखीच ही सीरीज असल्याचं म्हटलं जात आहे.
2020 मध्ये इंग्रजी व्यतिरिक्त इतर भाषांमधून सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पटकावणारा पॅरासाईट हा चित्रपट होता.
पॅरासाईट चित्रपटानं सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्कारासह पाच ऑस्कर पुरस्कार पटकावले.
बहुतांश विदेशी प्रेक्षकांना दक्षिण कोरियातील सामाजिक समस्यांची जाणीव नसेल. मात्र "The Squid Game"च्या माध्यमातून हे चित्र बदलत आहे.
या सीरीजचं वेगळेपण दर्शवणारी काही वैशिष्ट्ये पुढीप्रमाणे आहेत.
इशारा : या लेखाद्वारे सीरीजच्या कथेचा काही अंश लक्षात येतो.
1. स्त्रीद्वेष
लिंग समानतेचा (स्त्री पुरुष समानता) विचार करता दक्षिण कोरियाची स्थिती फारशी चांगली नाही.
ग्लोबल इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल जेंडर गॅपच्या 2021 च्या आवृत्तीतील माहितीनुसार, स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टीनं चांगली स्थिती असलेल्या देशांच्या यादीत दक्षिण कोरियाचा 102 वा क्रमांक लागतो.
"The Squid Game" सीरिजमध्ये सदस्यांना दिल्या जाणाऱ्या कार्यामध्ये महिलांच्या क्षमतेबाबत झालेल्या चर्चेच्या माध्यमातून या सांस्कृतिक मुद्द्याचं प्रतिबिंब पाहायला मिळालं आहे.
यातील चो सँद-वू हा बँकर हा महिलांना कार्यांमध्ये सहभागी होण्यापासून रोखण्याचे अनेक प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं आहे.

फोटो स्रोत, Getty Image / NurPhoto
मात्र, मात्र महिलांच्या भूमिकांची ज्या पद्धतीनं मांडणी करण्यात आली आहे, त्यावरून या शोवरचं मोठ्या प्रमाणात टीका झालेली पाहायला मिळत आहे.
विशेषतः मी न्यो या महिला पात्राभोवती वाद निर्माण झाला आहे. डेओक-सू नावाच्या गँगस्टरच्या टीममध्ये सहभागी होण्यासाठी ती त्याच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करते, असं त्यात दाखवण्यात आलं आहे.
मात्र शोचे लेखक आणि दिग्दर्शक हाँग-डाँग ह्युक यांनी सोशल मीडियातून करण्यात आलेले स्त्रीद्वेषाचे आरोप फेटाळले आहेत.
ही पात्रं जेव्हा सर्वात वाईट परिस्थितीचा सामना करतील तेव्हा कसं वर्तन करतील, याबाबतचा विचार पात्रांबाबत केला असल्याचं त्यांनी हंकूक इल्बो या कोरियन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
2. उत्तर कोरिया सोडणाऱ्यांबाबतचं कटू सत्य
"The Squid Game" मध्ये उत्तर कोरियातील देश सोडून जाणाऱ्यांच्या समस्येचंही वर्णन करण्यात आलेलं आहे.
सिरिजमध्ये से ब्यॉक हा स्पर्धक (जुंग हो-इऑनचं पात्र) कुटुंबाबरोबर पुन्हा एकत्र होता यावं म्हणून पैसे मिळवण्याच्या आशेनं टीममध्ये सहभागी होतो. शेजारी देशांच्या आक्रमणांनंतर पळून जाताना कुटुंबापासून तो विभक्त झालेला असतो.
कोरोना साथीच्या आधी जवळपास 1 हजाराहून अधिक उत्तर कोरियन नागरिकांनी दरवर्षी दक्षिण कोरियात आश्रय घेतला होता.
सोलमध्ये निराश्रितांसाठी मोठ्या प्रमाणावर योजना आणि लाभ आहेत, मात्र याठिकाणी उत्तर कोरियातून म्हणजे शत्रूदेशातून आलेल्यांना दक्षिण कोरियातील नागरिकांकडून अपमान, भेदभाव आणि त्यांच्याबाबत संशयाचा सामना करावा लागतो.
"The Squid Game" सिरिजमध्ये या समस्येचे काही पैलू दाखवण्यात आले आहेत. त्यात भाषेच्या तपशीलाचाही समावेश आहे. से ब्यॉक हा त्याच्या उत्तर कोरियन भाषेचा लहजा बदलून दक्षिण कोरियातील लहजामध्ये बोलल्याचं दाखवण्यात आलं आहे. प्रत्यक्षातही उत्तर कोरियातून देश सोडून आलेले अनेक जण असं करतात.
तो सीरिजमध्ये केवळ एका दृश्यात त्याच्या मूळ लहजात बोलताना दाखवलं आहे. त्यात तो अनाथाश्रमात असलेल्या त्याच्या लहान भावाबरोबर बोलत असतो.
3. गरिबी
दक्षिण कोरियामधील गरिबी यावर चर्चा होत असेल तर स्वाभाविकपणे कुणाच्याही भुवया उंचावल्या जाऊ शकतात.
त्याचं कारण म्हणजे, संयुक्त राष्ट्रांच्या मानव विकास निर्देशांकाचा विचार करता हा देश 23 व्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे फ्रान्स, इटली आणि स्पेन असे काही देश यादीत दक्षिण कोरियाच्या खाली आहेत.
मात्र सीरिजमधील मुख्य पात्र असलेले गि-हून यांना ड्रॅगन मोटर्स या काल्पनिक कंपनीनं कामावरून काढलेलं आहे. तसंच त्यांचे दोन व्यवसाय असून तेही व्यवस्थित चालत नाही. ते आजारी आईबरोबर राहतात आणि मुलीसाठी चांगली भेटवस्तूही खरेदी करू शकत नाहीत, असं दाखवण्यात आलं आहे.
गरिबीतून डोकं वर काढण्यात अपयशी ठरणाऱ्या कामगारांचं ते प्रतिनिधित्व करतात.

फोटो स्रोत, Getty Images / GIUSEPPE CACACE
राष्ट्रीय संपत्तीचं वितरण दर्शवणाऱ्या गिनी इंडेक्सचा विचार करता दक्षिण कोरियाची कामगिरी काही नॉर्डिक (उत्तर युरोप आणि उत्तर अटलंटामधील देश) देशांबरोबरच अमेरिकेपेक्षाही चांगली आहे.
मग असं असताना गरिबी ही शोची संकल्पना का आहे?
देशातील गरीब आणि श्रीमंत यांच्यातील वाढत असलेली दरी हे यामागचं कारण असू शकतं. दक्षिण कोरियातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या 20% लोकांकडे असलेली संपत्ती ही सर्वात गरीब 20% लोकांच्या संपत्तीपेक्षा 166 पटीनं अधिक आहे.
बेघर असणं हीदेखील दक्षिण कोरियातील गरिबांना भेडसावणारी समस्या आहे.
दक्षिण कोरियातील पाच कोटी दहा लाखांपेक्षा जास्त नागरिकांपैकी जवळपास 17 टक्के लोक हे गरीब असल्याचं ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD)च्या आकड्यांवरून समोर आलं आहे. ही आकडेवारी कोव्हिड 19 पूर्वीची आहे.
गोशिटेल्स आणि गोशिवॉन अशी लहान आकाराची अंदाजे 2 मीटर रुंदीची लहान घरंही असू शकतात. याच घरांमध्ये एका कुटंबातील अनेक पिढ्या एकत्र राहू शकतील.
मात्र ज्यांच्याकडे आर्थिक साधनं भरपूर आहेत आहेत, त्यांच्याही समस्या आहेत. दक्षिण कोरियातील घरगुती कर्जाचं प्रमाण हे सध्या देशाच्या जीडीपीपेक्षा अधिक जास्त आहे. आशियातील सर्वाधिक प्रमाण हे आहे.
4. विस्थापितांचं शोषण
या सीरिजमधील लोकप्रिय पात्रांपैकी एक पात्र म्हणजे पाकिस्तानातून आलेला विस्थापित अली. तो एका कारखान्यात काम करत असतो आणि दक्षिण कोरियातील मालकानं अनेक महिन्यांचा पगार रोखल्यामुळं तो गेममध्ये सहभागी होतो. त्यामुळं त्याला पत्नी आणि लहान बाळाला सोडावं लागतं.
दक्षिण कोरियात आलेल्या स्थलांतरितांमध्ये पाकिस्तानमधून आलेल्यांचा आकडा मोठा नाही. मात्र अली याच्या कथेच्या माध्यमातून काही स्थलांतरीत मजुरांचं कशाप्रकारे शोषण होतं, हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
दक्षिण कोरियामध्ये गेल्या दोन दशकांमध्ये कामगार संरक्षण कायदे मंजूर करण्यात आले आहे. मात्र तरीही स्थलांतरित मजुरांची स्थिती भयावह असल्याचं मानवाधिकार संघटनांचं म्हणणं आहे.
5. व्यावसायिक आणि राजकीय भ्रष्टाचार
चाओ सांग वू हे सीरिजमधील मुख्य पात्रांपैकी एक आहे. तो काम करत असलेल्या कंपनीतून त्याला पैशाच्या अफरातफर प्रकरणी काढून टाकलं जातं. त्यानंतर तो या गेममध्ये सहभागी होतो.
गेल्या काही वर्षांत दक्षिण कोरियामध्ये व्यावसायिक आणि राजकीय भ्रष्टाचाराच्या प्रकरणांनी अनेक हादरे बसले आहेत. त्यात 2016 च्या भ्रष्टाचार प्रकरणाचा समावेश आहे. या प्रकरणी देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष पार्क-गेऊन हाय यांना पायउतार व्हावं लागलं होतं.
6. चीनबरोबरचे गुंतागुंतींचे संबंध
दक्षिण कोरियाच्या प्रमुख मित्रांपैकी एक असलेल्या चीनचा सीरिजमध्ये केवळ एकदा उल्लेख आला आहे. साय-बायोकची आई चीनमधून दक्षिण कोरियात प्रवेश करत असताना त्यांना अटक करण्यात आली, असा हा उल्लेख होता.
या सीरिजमुळं चीन आणि दक्षिण कोरियात ऑफस्क्रीन तणाव वाढला आहे. सीरिजमधील गेममध्ये स्पर्धकांनी परिधान केलेले गणवेश हे 2019 मध्ये आलेल्या ''टिचर लाइक'' या चिनी चित्रपटातील कपड्यांसारखे असल्याचा आरोप चीनमधील माध्यमांनी केला.
त्यावरून सोशल मीडियामध्ये वादाला सुरुवात झाली आहे. पण त्यामुळं "The Squid Game" सीरिजच्या यशावर फारसा परिणाम झाला नाही.

फोटो स्रोत, Getty Images / JAEHWAN GOH
चीनमध्ये नेटफ्लिक्सवर बंदी आहे तरीही इतर अवैध मार्गाने ही सीरिज चीनमध्ये प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आहे.
चीनमधील चित्रपट आणि पुस्तक समीक्षणाचं सर्वात मोठं व्यासपीठ असलेल्या डौबुनवर जवळपास 3 लाख लोकांनी यावर टीका केली. याला 10 पैकी 7.6 रेटिंग मिळालं.
विरोधाभास म्हणजे ई कॉमर्स वेबसाईटवर या सीरिजशी संबंधित उत्पादनं उपलब्ध आहेत. त्यात या हिरव्या गणवेशांचा समावेशही आहे. सीरिजमध्ये दाखवलेली डाल्गोना ही मिठाई विकणारं एक स्टोरही शांघायमध्ये आहे.
यात स्पर्धकांना बेकिंग सोडा आणि साखरेपासून तयार केलेल्या कँडीचे ठरावीक आकाराचे तुकडे तयार करावे लागतात.
तसंच ''कँडी चॅलेंड डाल्गोना" देखील यात आहे. टिकटॉक व्हीडिओच्या माध्यमातून त्याचा प्रसार झाला आहे. फॅन या माध्यमातून वारंवार त्याचा आनंद घेत आहेत.
"The Squid Game" मुळं या खाद्यपदार्थाबाबत कदाचित नकारात्मकता निर्माण झाली असेल. मात्र, या सीरिजची वाढती लोकप्रियता पाहता, जगभरात कोरियाच्या संस्कृतीबद्दल लोकांमध्ये आकर्षण निर्माण होत असल्याचं दिसून येत आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








