ठाकरे कुटुंबीयांच्या कथित बेहिशेबी मालमत्तेची चौकशी सुरू - राज्य सरकार

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, ANI

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..

1. ठाकरे कुटुंबीयांच्या कथित बेहिशेबी मालमत्तेची चौकशी सुरू - राज्य सरकार

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी गौरी भिडे यांनी याचिकेमार्फत मुंबई उच्च न्यायालयाके केलीय. या याचिकेवरची सुनावणी गुरुवारी (8 डिसेंबर) पार पडली.

सदर याचिकेची दखल घेत प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली आहे.

उद्धव ठाकरे आणि कुटुंबाने बेहिशोबी मालमत्ता जमवली असल्याचा आरोप करत गौरी भिडे यांनी आणि त्यांच्या वडिलांनी ही याचिका दाखल केली होती.

उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांची संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली होती.

त्यानुसार, आपण प्राथमिक चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती राज्य सरकारने हायकोर्टात दिली आहे. ही बातमी ई-सकाळने दिली.

सामना आणि मार्मिकच्या विक्रीतून एवढी संपत्ती जमा होणं, मातोश्री 2 सारखी इमारत, गाड्या, फार्महाऊसेस निव्वळ अशक्य आहे. आमचाही हाच व्यवसाय आहे. मग संपत्तीत जमीन अस्मानाचा फरक कसा? असा सवाल याचिकेतून उपस्थित करण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

2. कर्नाटक बँकेतून वेतनाचा निर्णय ठाकरे सरकारचा – देवेंद्र फडणवीस

राज्य शासनाच्या अखत्यारितील शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन ‘कर्नाटक बँके’तून करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्याच काळात झाल्याचा दावा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

शिवाय, सरकारी ठेवी खाजगी बँकामध्ये ठेवण्याचे धोरणही ठाकरे सरकारच्याच काळातील असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

काल (8 डिसेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून राज्यातील वातावरण तापलेलं असतानाच, सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन ‘कर्नाटक बँके’तून करण्याबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “कर्नाटक बँक, जम्मू अ‍ॅन्ड काश्मीर आणि उत्तर प्रदेशातील उत्कर्ष बँकेला सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची परवानगी देण्याचा निर्णय आमचे सरकार येण्यापूर्वीच वर्षभरापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाला आहे. अजित पवारांनी नीट माहिती घेतली असती तर त्यांनी सरकारवर आरोप केले नसते.” ही बातमी लोकसत्ताने दिली.

अजित पवार

फोटो स्रोत, Getty Images

3. सर्वात मोठ्या पक्षाच्या अध्यक्षांना आपलं राज्य टिकवता आलं नाही – अजित पवार

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला. मात्र, दुसरीकडे हिमाचल प्रदेशात मात्र त्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.

हिमाचल प्रदेश हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं गृहराज्य आहे. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपला टोला लगावला आहे.

जगातील सर्वात मोठ्या पक्षाच्या अध्यक्षांना आपलं राज्य टिकवता आलं नाही, अशी टीका अजित पवार यांनी यावेळी केली.

जे. पी. नड्डा यांची ही नामुष्की आणि कमीपणा नाही का, असा प्रश्नही पवार यांनी यावेळी विचारला. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.

भगतसिंह कोश्यारी

फोटो स्रोत, facebook

4. राज्यपालांविरोधातील संपाला व्यापारी महासंघाचा पाठिंबा

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शिवप्रेमी संघटनांनी 13 डिसेंबर रोजी पुणे बंदची हाक दिली आहे.

यामध्ये मुस्लीम, शीख आणि दलित संघटनांनीही सहभागी होण्याचं ठरवलं आहे. या बंदला पुणे व्यापारी महासंघही पाठिंबा देणार आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली.

तत्पूर्वी, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आर. पी. आय आदी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी रांका यांची भेट घेतली होती.

त्यांच्या आवाहनानुसार पुणे बंदला पाठिंबा देण्याबाबत चर्चा करण्यात आली. पुणे बंदमध्ये दुकाने दुपारी 3 वाजेपर्यंत बंद ठेवून पाठिंबा देऊ, असा निर्णय व्यापारी महासंघाकडून घेण्यात आला आहे. ही बातमी लोकमतने दिली.

5. महाराष्ट्रात येऊन माझ्यावर हल्ला करण्याची धमकी - संजय राऊत

कन्नड रक्षण वेदिके या संघटनेने आपल्याला महाराष्ट्रात येऊन हल्ला करण्याची धमकी दिली आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

ते गुरुवारी (8 डिसेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते म्हणाले, "हा माझ्यावरील हल्ला नसेल, हा महाराष्ट्रावरील हल्ला असेल. यावर भाजपा काही बोलणार आहे का की थंडपणे पाहणार आहे? शिवसेनेच्या नेत्यांना महाराष्ट्रात येऊन तिकडल्या संघटना धमक्या देतात, हल्ले करू सांगतात यावर भाजपाने बोलावं.” ही बातमी लोकसत्ताने दिली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)