केजरीवालांचा AAP आता राष्ट्रीय पक्ष, तर राष्ट्रवादीकडे आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा नाही

फोटो स्रोत, Facebook
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे.
आम आदमी पक्षाने गुजरात निवडणुकीत 5 जागा मिळवल्या होत्या. त्यानंतरच हे स्पष्ट झालं होतं की केजरीवालांच्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणार आहे. त्या वेळी लिहिण्यात आलेला हा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
गुजरात विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला 5 जागा मिळाल्या होत्या.
भाजप आणि काँग्रेसनंतर तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलेल्या ‘आप’ला मतांची टक्केवारी मात्र लाभदायक ठरलीय. कारण या मतांच्या टक्केवारीवरच ‘आप’चा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू होऊन दोन तास उलटत नाहीत, तोच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांनी ट्वीट करत म्हटलं – “गुजरातच्या जनतेनं आपल्या मतांनी आम आदमी पक्षाला आज राष्ट्रीय पक्ष बनवला. शिक्षण आणि आरोग्याचं राजकारण पहिल्यांदा राष्ट्रीय राजकारणात जागा घेतंय. संपूर्ण देशाचं अभिनंदन.”

एकूणच काँग्रेस आणि भाजपच्या रांगेत राष्ट्रीय स्तरावर आता अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचं स्थान निश्चित होणार आहे.
आम आदमी पक्षाला ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून मान्यता मिळाल्यास काय फायदा होईल, हे आपण समजून घेऊ. तसंच, ‘आप’च्या या यशाचं गमक काय आणि काँग्रेस की भाजप, नेमक्या कोणत्या पक्षाला ‘आप’ पर्याय ठरतोय, या प्रश्नांची उत्तरंही आपण या बातमीतून जाणून घेऊ.
‘आप’ गुजरातमार्गे ‘राष्ट्रीय पक्ष’
एखाद्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी निवडणूक आयोगानं घालून दिलेल्या तीन महत्त्वाच्या अटींची पूर्तता करावी लागते, तेव्हाच त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केला जातो.
- लोकसभेतील किमान 2 टक्के जागा पक्षानं तीन वेगवेगळ्या राज्यांमधून जिंकलेल्या असाव्यात.
- लोकसभेत 4 खासदार असावेत. शिवाय, 4 राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत किमान 6 टक्के मतं मिळेलेली असावीत.
- किमान 4 राज्यांमध्ये पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा असावा.
या तीनपैकी एका निकषाची पूर्तता केली, तरी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.

फोटो स्रोत, Facebook
यातलं दुसरा निकष म्हणजे किमान 6 टक्के मतांची अट आम आदमी पक्षांनी गुजरातमध्ये पूर्ण केलीय. त्यामुळे आम आदमी पक्षाचा ‘राष्ट्रीय पक्ष’ बनण्याचा मार्ग मोकळा झालाय.
दिल्ली, पंजाब, गोव्यानंतर आता गुजरात या चौथ्या राज्यात वैध मतांपैकी सहा टक्क्यांहून अधिक मते आम आदमी पक्षानं मिळविली असल्यानं राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निश्चित झालाय.
भारतीय जनता पार्टी, इंडियन नॅशनल काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया - मार्क्सिस्ट, नॅशनल पिपल्स पार्टी आणि नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी अशा सात पक्षांची 'राष्ट्रीय पक्ष' म्हणून नोंद आहे.
आता आम आदमी पक्षांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर यात त्यांचंही नाव जोडलं जाईल आणि ते भारतातील 8 वे राष्ट्रीय पक्षाचे मानकरी असतील.
राष्ट्रीय पक्ष झाल्यानं ‘आप’ला नेमका काय फायदा?
एखाद्या पक्षाला ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून दर्जा मिळाल्यानंतर त्याला काही फायदेसुद्धा मिळतात. सर्वात मोठा फायदा म्हणजे, ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून मान्यता असलेल्या पक्षाला देशभरात कुठेही निवडणूक लढवताना एकच चिन्ह राखीव मिळतं.
राष्ट्रीय दर्जा मिळालेल्या पक्षाला निवडणूक आयोग मतदारांची अपडेटेड यादी निवडणुकांपूर्वी पुरवतं, तसंच या पक्षाच्या नेत्यांना उमेदवारी अर्ज भरताना एकाच अनुमोदकाची आवश्यकता असते.
या पक्षाला रेडिओ आणि दूरदर्शनवर प्रक्षेपणाची सोय पुरवली जाते.
राष्ट्रीय पक्षाला स्टार प्रचारकांची यादी वेगळ्याने काढण्याची मुभा असते. या यादीत जास्तीत जास्त 40 नेत्यांचा समावेश केला जाऊ शकतो आणि या प्रचारकांच्या प्रवासाचा खर्च उमेदवारांच्या प्रचारासाठीच्या खर्चात मोजला जात नाही.
पक्षाच्या कार्यालयासाठी सरकारकडून सवलतीच्या दरात जमीन मिळवता येऊ शकते.
हे फायदे आम आदमी पक्षाला ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून मान्यता मिळाल्यानंतर होतील.

फोटो स्रोत, Facebook
मात्र, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित म्हणतात, “राष्ट्रीय पक्ष होणं म्हणजे तुम्ही राष्ट्रीय स्तरावर लगेच आव्हान उभं करू शकाल, असं काही नसतं. मुळात हिंदी पट्ट्यात 'आप' किती आपली ताकद दाखवून देऊ शकतं, तसंच ते महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेशात ताकद दाखवू शकतात का? अशावेळी 'आप'कडे एक टेक्निक आहे, ते म्हणजे जाहिरातीतून 'आपणच प्रामाणिक आहोत' असं भासवतात. ते पुरेसं नाहीय.”
तसंच, “राष्ट्रीय पक्ष म्हणवताना, तुमचं परराष्ट्र धोरण काय, तुमचं अर्थविषयक धोरण काय, तुम्ही पैसा कसा आणणार? या प्रश्नांची उत्तरं 'आप'ला सांगावी लागतील. कारण शाळा, हॉस्पिटल चांगली करणं हे कौतुकास्पदच, पण विचारधारा आणि धोरणांना महत्त्वं असतं. 'आप'कडे फक्त डिलिव्हरी आहे, पण आर्थिक धोरण, विचारधारा याबाबत ते अद्यापही सक्षम नाहीत,” असंही दीक्षित म्हणतात.
‘आप’चं गेल्या दहा वर्षातील यशापयश
आम आदमी पक्षानं गेल्या दहा वर्षांत उत्तरेतील महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणुका लढवल्या.
सुरुवात 2013 सालच्या डिसेंबरमध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतून झाली. तिथं 70 जागांच्या दिल्ली विधानसभेत ‘आप’ला 28 जागा मिळाल्या होत्या.
नंतर 2015 सालीच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला 70 पैकी 67 जागा मिळाल्या. यावेळी ‘आप’नं काँग्रेसला बाजूला सारून सत्ता मिळवली.
2021 मध्ये गुजरातच्या सुरत महापालिका निवडणुकीत 120 पैकी 27 जागा जिंक ‘आप’नं दुसरं स्थान पटकावलं होतं. भाजपला इथं 93 जागा मिळाल्या, तर काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. म्हणजेच, ‘आप’नं काँग्रेसला बाजूला सारलं.
त्यानंतर 2022 च्या सुरुवातीला पंजाबमधली निवडणूक विशेष गाजली. इथे काँग्रेसची सत्ता होती. मात्र, काँग्रेसला बाजूला सारत ‘आप’नं 117 पैकी 92 जागा मिळवल्या आणि सत्ता हस्तगत केली.

फोटो स्रोत, Facebook
त्याचवेळी गोव्यातही ‘आप’नं निवडणूक लढवली आणि 40 जागांच्या गोवा विधानसभेत 2 जागा मिळवल्या. इथं ‘आप’च्या मतांची टक्केवारी आधीपेक्षा वाढलेली पाहायला मिळाली.
त्यानंतर मोठी निवडणूक म्हणजे नुकतीच पार पडलेली दिल्ली महापालिकेची. या निवडणुकीत ‘आप’नं भाजपच्या 15 वर्षांच्या सत्तेला पराभूत करत, विजय पटकावला. इथेही काँग्रेस तिसऱ्या स्थानी फेकली गेली.
महाराष्ट्र, छत्तीसगड, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, नागालँड, ओडिसा, राजस्थान, तेलंगणा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या 12 राज्यांमध्येही आम आदमी पक्षानं गेल्या 10 वर्षांत झालेल्या विधानसभा निवडणुका लढवल्या, मात्र तिथे पक्षाला विजयी यश मिळालं नाही. तरी आपण इथल्या रिंगणातले स्पर्धक आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न ‘आप’नं केला.
‘आप’च्या यशाचं गमक काय आहे?
आम आदमी पक्ष एकामागोमाग एक निवडणूक जिंकत, तर काही ठिकाणी किमान दुसरं स्थान पटकावताना दिसतंय.
अवघ्या दहा वर्षांचा पक्ष असलेल्या ‘आप’च्या यशाचं नेमकं गमक काय, असाही अनेकांना प्रश्न पडतो. आम्ही हाच प्रश्न घेऊन राष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास असलेल्या पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांशी बातचित केली.
ज्येष्ठ पत्रकार अभिजित ब्रह्मनाथकर म्हणतात की, “अरविंद केजरीवाल हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अभ्यास केलेले उत्तम राजकीय अभ्यासक आहेत. भाजप-संघाच्या कार्यपद्धतीनुसार आम आदमी पक्षाची बांधणी केलीय. शिवाय, निवडणूक तंत्रही सारखंच आत्मसात केलंय. अगदी बुथनिहाय कमिट्या 'आप'नं तयार केलंय, जे भाजप करतं.
“गुजरातमध्ये 2017 साली आम आदमी पक्षाचे 29 उमेदवार उभे होते आणि 29905 मतं पडली. सगळ्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. पण अवघ्या पाच वर्षात क्रमांक तीनचा पक्ष, 12-13 टक्के मतं आणि पाच आमदार निवडून आणले. हे अतिशय कौतुकास्पद यश आहे. अरविंद केजरीवाल यांची कार्यशैली, बांधणी कारणीभूत आहे.”

फोटो स्रोत, Facebook
तर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक नितीन बिरमल म्हणतात की, “आम आदमी पक्षाची पाटी कोरी असल्यानं त्यांना मागचं विचारण्यासारखं काही नाहीय. त्यामुळे ते बिनधास्तपणे आश्वासनं देऊ शकतात आणि लोकांना बाजूला खेचू शकतात आणि हेच ‘आप’च्या सध्या पथ्थ्यावर पडतंय.
“हेच काँग्रेस किंवा भाजपला शक्य होत नाही, कारण ते बराच काळ राजकारणात आहेत. इथं भाजप एक चलाखी करतं, ते म्हणजे, विकासकामांवर कुणी विचारल्यास ते भावनेवर स्वार होऊ पाहतात.”
तसंच, नितीन बिरमल असंही पुढे म्हणतात की, “आम आदमी पक्ष लोकांना आकर्षित करण्यासाठी आश्वासनांचं शस्त्र वापरतं. मात्र, यापुढे त्यांना करता येणार नाही. कारण त्यांना आता लेखाजोखाही मांडावा लागेल. पंजाबमध्ये दिलेल्या आश्वासनांचं पुढे काय झालं, असं काही वर्षांनी विचारलं जाईलच.”
‘आप’ कुणाला पर्याय – भाजप की काँग्रेस?
आम आदमी पक्षाचा आजवरचा यश आणि अपयशाचा इतिहास पाहिल्यास आणि जिथं सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली, तिथं ‘आप’ काँग्रेसला बाजूला सारल्याचं विशेषत: दिसून येतं. मात्र, दिल्ली महापालिकेत ‘आप’नं भाजपला बाजूला केलंय.
पण एकूणच निश्चित असं विधान करता येत नाही. त्यामुळे आम्ही वरिष्ठ पत्रकार अभिजित ब्रह्मनाथकर यांच्याशी बातचित करून, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, ‘आप’ नेमका कुणाला पर्याय ठरतोय – काँग्रेस की भाजप?

फोटो स्रोत, Facebook
ज्येष्ठ पत्रकार अभिजित ब्रह्मनाथकर म्हणतात की, “आम आदमी पक्षाचा आतापर्यंत ज्या दोन राज्यात सामना झाला आणि ते जिंकले, ते म्हणजे दिल्ली आणि पंजाब. या दोन्ही राज्यात काँग्रेसची सत्ता होती. लोकांनी तिथं सत्तांतर घडवत आम आदमी पक्षाला सत्ता दिली. गुजरातमध्येही काँग्रेसलाच फटका 'आप'मुळे बसल्याचं दिसून येतं. म्हणजे, काँग्रेसलाच पर्याय म्हणून लोक 'आप'कडे पाहताना दिसतायेत.
“भाजप आणि 'आप'ची शक्तिस्थळं आणि कमकुवत घटक सारखेच असल्यानं ते एकमेकांचे पर्याय अद्याप होताना दिसत नाहीय. भाजपचा पर्याय होण्यासाठी केजरीवालांना भाजपच्या पुढे जाणारी तंत्र अवगत करावी लागतील.”
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








