गुजरात, हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल : हिमाचल प्रदेशचा कौल काँग्रेसला, गुजरातमध्ये भाजपचा विक्रमी विजय

गुजरात निवडणूक

फोटो स्रोत, Election commission

हे इंटरॲक्टिव्ह पाहायला जावास्क्रिप्ट असलेलं आधुनिक वेब ब्राऊझर आणि स्थिर इंटरनेट कनेक्शन लागेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गुजरात आणि हिमाचलच्या निवडणुकांवर प्रतिक्रिया व्यक्त केली. गुजरातच्या निकालांवर त्यांनी म्हटलं, "सगळ्या कार्यकर्त्यांना माझं एकच सांगणं आहे- तुम्ही सगळे चॅम्पियन आहात. या कार्यकर्त्यांच्या मेहनतीशिवाय हे शक्य नव्हते.

हे कार्यकर्ते पक्षाची खरी ताकद आहेत."

हिमाचलच्या निकालांवर त्यांनी म्हटलं, "भाजपबदद्ल जे प्रेम हिमाचल प्रदेशच्या लोकांनी दाखवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. येणाऱ्या काळात राज्यातील लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करत राहू."

गुजरातमध्ये भाजपची ऐतिहासिक विजयाच्या दृष्टिने वाटचाल सुरू आहे. 156 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे.

काँग्रेस 15 तर बहुचर्चित आम आदमी पक्ष 5 जागांवर विजयी झाले. इतर पक्षांना आणि अपक्षांना 3 जागांवर आघाडी मिळाली.

गुजरातमध्ये 1962 पासून विधानसभेच्या 14 निवडणुका झाल्या. आज (8 डिसेंबर) पंधराव्या विधानसभेसाठीचा निकाल जाहीर झाला

गुजरातसोबत हिमाचल प्रदेशमध्येही विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आहेत. हिमाचलमध्ये काँग्रेसनं विजय मिळवला आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपा 25, काँग्रेस 40 जागांवर विजयी झाले आहे तर इतर पक्षांना 3 जागा मिळाल्या आहेत.

मल्लिकार्जुन खरगे यांनी हिमाचली जनतेचे मानले आभार

मल्लिकार्जुन खरगे यांनी हिमाचल प्रदेशच्या जनतेचे आभार मानले आहेत. आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे आभार. लोकशाहीत जय-पराजय होतच असतो.

गुजरातच्या जनतेच्या जनादेश आम्ही स्वीकार करतो. विचारधारेत कोणतीही तडजोड न करता आम्ही लढत राहू आणि ज्या उणीवा आहेत त्या दूर करू असंही ते म्हणाले.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचा राजीनामा

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी विधानसभा निवडणुकीत पराभव मान्य केला असून ते राज्यपालांना राजीनामा देण्यासाठी जात आहेत.

ते म्हणाले, "मी जनादेशाचा आदर करतो आणि हिमाचल प्रदेशची सेवा करण्याची संधी दिली यासाठी मी तिथल्या जनतेचा आभारी आहे. पदोपदी त्यांचं सहकार्य आम्हाला लाभलं आहे."

जयराम ठाकूर

फोटो स्रोत, ANI

"विरोधी पक्षाला सत्ता मिळण्याची पूर्ण संधी आहे आणि त्याचं अभिनंदन करतो. मी हिमाचलच्या लोकांचं अभिनंदन करतो. विशेषत: मतदारांचं कारण निवडणुकीत त्यांचं मोठं सहकार्य आहे. काहीही अप्रिय घटना झालेली नाही. मतदानात सगळ्यांनी हिरिरीने सहभाग घेतला. यावेळी हिमाचल प्रदेशात विक्रमी मतदान झालं. मी राष्ट्रीय अध्यक्षांचे आभार मानतो. त्यांनीही मोठं सहकार्य केलं."

मोरबीमध्ये भाजपचा विजय

मोरबीमध्ये भाजपचा विजय झाला आहे. निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी तिथे 137 वर्षं जुना पूल पडून 135 लोकांना जीव गमवावा लागला होता. त्यात महिला आणि बालकांचा समावेश होता.

भाजपा उमेदवार कांती अमृतिया यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा 62 हजार मतांनी पराभव केला.

अमृतिया हे मोरबीचे हिरो म्हणून त्यांचा सर्वदूर गौरव झाला. या दुर्दैवी घटनेनंतर त्यांनी लोकांचा जीव वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली.

प्रचाराच्या वेळी विरोधी पक्षांनी भाजपवर ढिसाळपणाचा आरोप लावला होता. मोरबीचा पूल हा निवडणुकीचा मुद्दा होईल असंही विरोधकांना वाटलं होतं. मात्र आज निकालाच्या दिवशी अमृतिया यांना सलग सहाव्यांदा विजय मिळाला आहे.

गुजरातचा विजय ऐतिहासिक, मोदी आणि भाजपचं अभिनंदन- उद्धव ठाकरे

गुजरातच्या विजयाबदद्ल शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचं अभिनंदन केलं आहे.

'गुजरातचा विजय ऐतिहासिक आणि विक्रमी आहे. मी भाजप आणि मोदींचं अभिनंदन करतो." असं ते म्हणाले.

हिमाचल प्रदेशच्या विजयाबद्दल काँग्रेस आणि दिल्ली मनपात विजय मिळवल्याबद्दल त्यांन आपचं ही अभिनंदन केलं आहे.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, ANI

"गुजरातचा निकाल अपेक्षितच होता.गुजरात निवडणूक पुन्हा एकदा मोदींच्याच नेतृत्वाखाली लढवली गेली. त्यामुळे जनतेने भाजपला भरघोस मतदान केलं. या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले उद्योगही फळले असावेत," असा टोलाही त्यांनी लगावला.

आपने गुजरातमध्ये मतविभागणी करून भाजपचा फायदा घडवून आणला हेही स्पष्ट झालं. असो, ज्याचं त्याचं राजकारण सोयीनुसार चालत असतं, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

भाजपची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल

भाजप ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करताना दिसतेय.

गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण जागा 1962 साली 154, 1967 साली त्या वाढून 168 आणि 1975 पासून त्यात आणखी वाढ होऊन 182 झाल्या, त्या आजतागायत 182 च एकूण जागा आहेत.

गुजरात विधानसभेचा इतिहास पाहिल्यास आजवर म्हणजे 2017 पर्यंत कधीच कुठल्या पक्षाने 150 चा आकडा पार केला नाही.

1962 साली 154 पैकी 113 जागा काँग्रेसनं मिळवल्या होत्या, तर 1972 च्या निवडणुकीत 168 पैकी 142 जागा काँग्रेसनं मिळवल्या होत्या.

गुजरात निकाल: गुजरातमध्ये भाजपाला 156 जागांवर आघाडी

फोटो स्रोत, Getty Images

1972 साली विधानसभेच्या जागा वाढून 182 झाल्यानंतर, 1985 च्या निवडणुकीत काँग्रेसन 149 जागा मिळवत विक्रमाची नोंद केली होती.

यानंतर म्हणजे 1985 च्या निवडणुकीनंतर कुठलाच पक्ष 127 जागांच्या वर जाऊ शकला नाहीय.

हे मतदारसंघ भाजपसाठी होते आव्हानात्मक

गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील महुधा मतदारसंघ हा भाजपसाठी अत्यंत आव्हानात्मक असा आहे.

या मतदारसंघात काँग्रेस 1975 पासून सातत्याने विजय मिळवत आहे. भाजप किंवा जनता दल याठिकाणी आजपर्यंत कधीच विजय मिळवू शकला नाही.

बारडोली जिल्ह्यातील व्यारा मतदारसंघातही काँग्रेसशिवाय इतर कोणताही पक्ष विजय मिळवू शकला नाही.

भाजप

याठिकाणी 1990 आणि 1995 ला अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला होता. पण पक्ष म्हणून भाजप किंवा इतर कोणत्याही पक्षांना केवळ पराभवाचंच तोंड पाहावं लागलेलं आहे.

दाहोद जिल्ह्यातील झालोद विधानसभा मतदारसंघातही अनेक वर्षांपासून केवळ काँग्रेसचंच वर्चस्व आहे.

2002 मध्ये केवळ एकदा भाजप उमेदवाराने विजय मिळवला होता. त्याव्यतिरिक्त इथे भाजप कधीच जिंकू शकलेला नाही.

ऊना मतदारसंघातही भाजपने केवळ 2007 मध्ये एकदाच विजय मिळवला होता. 1967 पासून बोरसदमध्ये केवळ काँग्रेसच विजयी होत आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री असतानाही हे मतदारसंघ भाजपसाठी अवघड मानले जायचे. इतकंच नव्हे तर मोदी पंतप्रधान झाल्यानंतरही या ठिकाणी विजय मिळवणं भाजपला अद्याप शक्य झालेलं नाही.

किती टक्के झालं होतं मतदान?

गुजरातमध्ये 182 जागांसाठीचं मतदान दोन टप्प्यांत पार पडलं होतं. पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठीचं मतदान गुरुवार, 1 डिसेंबर रोजी, तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठीचं मतदान 5 डिसेंबर रोजी घेण्यात आलं. याठिकाणी एकूण 64.34 टक्के मतदान झालं.

तर हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत एकूण 68 जागांसाठीचं मतदान 12 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलं होतं. एकाच टप्प्यात घेण्यात आलेल्या या मतदानाची टक्केवारी 75.6 टक्के अशी विक्रमी होती.

या दोन्ही निवडणुकांचा निकाल आज एकाच दिवशी जाहीर केला जात आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

गुजरात विधानसभा २०२२

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचं गृहराज्य म्हणून गुजरात तर केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं गृहराज्य म्हणून हिमाचल प्रदेशमधील निवडणुकांना महत्त्व आहे.

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेची मतमोजणी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होईल. या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)