गुजरातमध्ये काँग्रेस 77 वरून 17 जागांवर, पक्षाचं नेमकं चुकलं कुठे?

फोटो स्रोत, ANI
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Reporting from, अहमदाबादहून, गुजरात
अहमदाबादमध्ये गुजरात कॉंग्रेसचं मुख्यालय आहे. त्याचं नाव आहे 'राजीव गांधी भवन'. गुजरात विधानसभेची निवडणूक लागली आणि कॉंग्रेसच्या या मुख्यालयावर एक काऊंटडाऊन करणारं रिव्हर्स क्लॉक लागलं.
त्याखाली लिहिलं होतं 'गुजरातमध्ये परिवर्तनासाठी उरलेला वेळ'. अर्थ स्पष्ट होता, कॉंग्रेसला म्हणायचं होतं की भाजपाची सत्ता गुजरातमधून जात आहे. निकालांअगोदर सगळेच दाखवतात तसा आत्मविश्वास होता.
बुधवारी मतमोजणी सुरु होण्याच्या पहिल्या काही तासांतच कल स्पष्ट झाले. कॉंग्रेसची पुरती वाताहत झाली. 'राजीव गांधी भवन' मध्ये शुकशुकाट झाला. आणि लगेचच हे रिव्हर्स क्लॉक बंद करण्यात आलं. आत्मविश्वास फोल ठरला.
भाजपानं गुजरातमध्ये अभूतपूर्व असा विक्रम रचला. त्याबद्दल चर्चा होतेच आहे. पण कॉंग्रेसची अवस्था त्यांची पाळमुळं पसरलेल्या गुजरातमध्ये इतकी बिकट का झाली हा प्रश्न अधिक चर्चिला जातो आहे. भाजपाचा विजय जरी अपेक्षित असला, तरी कॉंग्रेसची अशी बिकट अवस्था अपेक्षित नव्हती, असं म्हणावं लागेल. पण तरीही कॉंग्रेसची ही अवस्था का झाली?
2017 च्या निवडणुकीत 77 जागा निवडून आणून सत्तांतराच्या घडवण्याच्या जवळ पोहोचलेला हा पक्ष केवळ 5 वर्षांमध्ये 17 आमदारांवर आटोपला का जावा? 2017 मध्ये तब्बल 42 टक्के मतं घेणारा पक्ष 27 वर्षं राज्य करणा-या सत्ताधारी पक्षाविरुद्ध काही मुद्द्यांवर नाराजी असतांना या निवडणुकीत केवळ 27टक्केच मतं का घेऊ शकला?
"आम्ही गुजरातच्या लोकांनी दिलेल्या जनादेशाचा विनम्रपणे स्वीकार करतो. आम्ही पुनर्बांधणी करु, मेहनत घेऊ आणि देशाच्या आदर्शांसाठी आणि नागरिकांच्या हक्कांची लढाई चालूच ठेवू," असं राहुल गांधींनी ट्विट करत म्हटलं आहे.
पण कॉंग्रेसच्या दारुण पराभवाची मिमांसा सुरु झाली आहे. राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे'पासून ते 'आम आदमी पक्षा'च्या मुसंडीपर्यंत अनेक कारणं त्यात आहेत. येत्या काही दिवसांत त्यांची संख्या विश्लेषणातून अजून समोर येत राहतील. पण जी प्रामुख्यानं चर्चिली जात आहेत ती कारणं पाहूयात.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC
1) कॉंग्रेसनं गुजरात निवडणूक लढण्याआधीच सोडून दिली होती का?
कॉंग्रेसचा गुजरातच्या निवडणुकीच्या मैदानावरची अनुपस्थिती ही प्रचारादरम्यान कायमच सगळ्यांच्या नजरेत येत होती. हा प्रश्न कॉंग्रेसच्या नेत्यांनाही वारंवार विचारला गेला. पण त्यांनी आमचा प्रचार योग्य रणनीतिसहित सुरु असल्याचं उत्तर सातत्यानं दिलं.
पण जशा भव्य सभा नरेंद्र मोदी-अमित शाहांनी केल्या, जेवढे रोड शोज 'आप'च्या अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांनी केले, जसा गुजरात त्यांनी पिंजून काढला, तसं कॉंग्रेसच्या कोणत्याच नेत्यानं केलं नाही. कॉंग्रेस म्हणत राहिली की आमचे स्थानिक नेते प्रचार करत आहेत, पण चित्र हेच राहिलं की कॉंग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांनी गुजरातची निवडणूक सोडूनच दिली आहे.
त्याला पुरावेही तसेच आहेत. राहुल गांधी स्वत: दोन सभाच गुजरातमध्ये घेऊ शकले. बाकी त्यांनी त्यांच्या फोकस केवळ 'भारज जोडो यात्रा'कडेच ठेवला. प्रियंका गांधींनी हिमाचल प्रदेशची जबाबदारी घेतली आणि तिथं त्यांनी अनेक सभा घेतल्या. कॉंग्रेसला तिथं त्याचं फळही मिळालं. मग प्रियंका गुजरातमध्ये का आल्या नाहीत?
सोनिया गांधींची तब्येत हा विषय कॉंग्रेससाठी चिंतेचा विषय असल्यानं त्याही प्रचारासाठी आल्या नाहीत. मल्लिकार्जुन खरगे या दरम्यान कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले, पण गुजरातची निवडणूक तोपर्यंत बरीच पुढे निघून गेली होती.
त्यामुळे कॉंग्रेसची निवडणूक लढण्याअगोदरच हरली होती असा प्रचार गुजरातमध्ये झाला. भाजपासहित विरोधकांनी तो केला. तो कॉंग्रेसच्याच अनुत्साहावर आधारलेला होता. पण त्याचा परिणाम कॉंग्रेसच्या पारंपारिक मतदारावरही झाला असं आता म्हटलं जातं आहे.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही 'बीबीसी मराठी'च्या विश्लेषणात्मक कार्यक्रमात बोलतांना या नकारात्मक प्रचाराचा कॉंग्रेसच्या प्रदर्शावर परिणाम झाला असं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"गुजरातमध्ये प्रचारातली तफावत स्पष्टपणे जाणवली. 2017 च्या निवडणुकीमध्ये पक्ष ताकदीनं उतरला होता. अनेक वर्षं तिथं राजीव सातव हे प्रभारी म्हणून काम करत होते. यावेळेला प्रभारी अन्य असले तरीही अशोक गेहलोत तिथ ही जबाबदारी घेतील असं चित्र रंगवण्यात आलं होतं. गेहलोत यांच्या राज्यस्थानमध्ये थोडी संभ्रमात्मक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कदाचित ते गुजरातमध्ये पूर्ण लक्ष देऊ शकले नाहीत. एकंदरीतच, गुजरातच्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस ताकदीनं लढत नाही, असा एक मेसेज गेला," पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
"वास्तविक तशी परिस्थिती नव्हती कारण प्रत्येक उमेदवार आपापली निवडणूक लढत होता, गुजरातचे सगळे ज्येष्ठ नेते प्रचार करत होते आणि काही बाहेरचे नेतेही नंतर प्रचारात गेले होते. पण तुलना झाली ती राहुल गांधींच्या 2017 च्या प्रचाराशी जेव्हा त्यांनी तीसहून अधिक सभा घेतल्या होत्या. यावेळेस मात्र राहुल गांधींच्या जेमतेम दोन सभा झाल्या. त्या तुलनेलाही काही प्रभावीपणे उत्तर देता आलं नाही. त्यामुळे भाजपा एक प्रचार करण्यात यशस्वी झाला की कॉंग्रेस यंदा निवडणुकीच्या रिंगणात नाहीच आहे किंवा कॉंग्रेस ही निवडणूक गांभीर्यानं घेत नाही," चव्हाण पुढे म्हणाले.
त्यामुळेच कॉंग्रेस ही निवडणूक जिंकण्यासाठी कधी लढलीच नाही, त्यामुळेच त्यांचं पानिपत झालं, हे बोललं जाणं स्वाभाविक आहे. कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा, जे गुजरातमध्ये निवडणुकांच्या काळात बहुतांश वेळ ठाण मांडून होते, त्यांना मात्र हे विश्लेषण मान्य नाही.
"आम्ही असं म्हणणार नाही आम्ही आवश्यक प्रयत्न केले नाहीत. 2017 मधला प्रचार यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीचा होता. यंदाचा 2022चा त्यापेक्षा वेगळा होता. यंदा आम्ही प्रत्येक बूथ पातळीवर काम करत होतो. पण आम्ही हे शोधू की कुठं नक्की चुकलं. त्यांनी आमच्यापेक्षा काय जास्त चांगलं केलं हेही पाहू," खेरा 'बीबीसी'शी बोलतांना म्हणाले.

फोटो स्रोत, RAHUL GANDHI/FACEBOOK
2) कॉंग्रेससाठी 'भारत जोडो यात्रे'पेक्षा गुजरात निवडणूक महत्वाची नव्हती?
कॉंग्रेसच्या, मुख्यत: राहुल गांधींच्या, राजकीय आयुष्यातला आजपर्यंतचा सर्वात महत्वाचा प्रयोग आणि महत्व आहे 'भारत जोडो यात्रा'. दक्षिण आणि मध्य भारत ओलांडून ही यात्रा आता राजस्थानात पोहोचली आहे. आपल्या राजकीय विरोधकाच्या विचारसणीला विरोध करत, मोदी सरकारच्या नीतिवर टीका करत आणि कॉंग्रेसची विचारसरणी सांगत ही यात्रा पुढे चालली आहे.
राजकीय पक्षाच्या राजकीय नेत्याचा राजकीय हेतू या यात्रेतून लपला नाही आहे. पण मग कॉंग्रेसनं सर्वस्व लावलेली ही यात्रा गुजरातमध्ये का आली नाही हा प्रश्न वारंवार विचारला गेला, पण त्याचं उत्तर स्पष्ट मिळालं नाही. ही यात्रा महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशमधून गुजरातला केवळ स्पर्श करत राजस्थानमध्ये गेली, पण ती निवडणुका असतांनाही गुजरातमध्ये गेली नाही, हा संभ्रम मतदारांमध्येही राहिला.
कॉंग्रेसला गुजरातमध्ये पराभव दिसत होता आणि त्याचं खापर 'भारत जोडो यात्रेयात्रे'वर फुटायला नको, म्हणून कॉंग्रेसनी ती गुजरातमध्ये आणण्याची 'रिस्क' घेतली नाही का, असा प्रश्न वारंवार विचारला गेला. बुधवारी निकालानंतरही तो परत विचारला गेला. तेव्हा पवन खेरा 'बीबीसी'शी बोलतांना म्हणाले:
"भारत जोडो यात्रेचा हेतू यापेक्षा कैक पटीनं मोठा आहे. तुम्हाला जर वाटत असेल की यात्रा ही या राज्यांच्या निवडणुकांकडे पाहून काढली गेली होती, तर तसं नाही आहे. या यात्रेचा परिणाम येणा-या कित्येक पिढ्यांना जाणवेल कारण आम्ही या देशाला एकत्र ठेवणा-या विचारधारेला जागृत करत आहोत. त्या विचारधारेलाच सुरुंग लावण्याचा प्रयत्न होतो आहे. आम्ही त्या मूल्यांना वाचण्याचा प्रयत्न करतो आहोत ज्यावर आधारित घटना या देशाच्या निर्मात्यांनी रचली. त्यामुळे भारज जोडो यात्रेला केवळ निवडणुकांसाठी पाहू नका."
पण त्यानं ही यात्रा कॉंग्रेसच्या पराभवाच्या कारणमिमांसेत येणं थांबणार नाही. ती गुजरातमध्ये न आणण्याची एक निवडणुकीपलिकडची रणनीति असेलही, पण तिनं निवडणुकीतल्या कॉंग्रेसच्या प्रयत्नांवर परिणाम केला असंही म्हटलं जातं आहे. राहुल गांधींसह सगळ्या कॉंग्रेसनं 'भारत जोडो यात्रे'लाच महत्व दिलं, त्यामुळे मतदारांमध्ये मेसेज गेला की कॉंग्रेस निवडणुकीला महत्व देत नाही आहे.
2017 मध्ये तीसहून अधिक सभा करणारे, अनेक मंदिरांना भेटी देत 'टेम्पल रन' करणारे राहुल हिमाचलमध्ये गेलेच नाहीत आणि गुजरातमध्ये दोन सभाच घेऊ शकले. ते 'भारत जोडो यात्रे'मुळे झालं. त्यामुळे निवडणुकांवर फोकस आलाच नाही असं पृथ्वीराज चव्हाणांनाही वाटतं.
"राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे'वर सगळा फोकस होता. मुख्य माध्यमांचा होता, सोशल मीडियाचा होता. त्यामुळं कॉंग्रेस निवडणूक गंभीरपणे लढत नाही ही भावना द्विगुणित झाली. त्याचा परिणाम मतदारांवर नक्की झाला," चव्हाण म्हणाले.

फोटो स्रोत, FACEBOOK
3) 'आप'मुळे कॉंग्रेसचा डाव फिसकटला?
'आम आदमी पक्षा'ची गुजरातमधली एन्ट्री दिल्ली, पंजाब आणि गोव्याप्रमाणे गुजरातमध्येही कॉंग्रेसची डोकेदुखी ठरणार असा कयास पहिल्या दिवसापासूनच लावला जात होता. तो खरा ठरला.
जर आकड्यांमध्ये बघायचं झालं तर जेवढ्या जागा गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कॉंग्रेसच्या कमी झाला, तेवढ्या काही 'आप'ला मिळाल्या नाहीत. 'आप' 5 जागा मिळवून तिस-या क्रमांकावरच राहिली. पण गेल्या वेळेच्या तुलनेत जी 12-13 टक्के मतं कॉंग्रेसची मतं कमी झाली, तेवढीच मतं 'आप' ला मिळाली. 'आप' ला 12.92 टक्के मतं मिळाली आहेत. म्हणजे 'आप'नं कॉंग्रेसची मतं खेचली हे या टक्केवारीवरुन दिसतं आहे.
पण तरीही दोष केवळ 'आप' ला देता येईल का असा प्रश्नही आहेच. सरकारबद्दल जी नाराजी होती त्यामुळं काही मतं भाजपापासून दूर चालली होती. ती मतं आपल्याकडे खेचण्यासाठी कॉंग्रेसनं काय केलं असा प्रश्न सगळेच पक्ष विचारतात. त्याचाच फायदा 'आप'ला गेल्या वर्षी सुरत महापालिकेच्या निवडणुकीत झाला होता. पाटीदार आंदोलनामुळं कॉंग्रेसकडे आलेली मतं त्यांनी काहीच न केल्यान 'आप'कडे गेली आणि त्यांना 27 जागा मिळाल्या असं विश्लेषण केलं गेलं.
त्यामुळे केवळ 'आप'नं कॉंग्रेसची मतं खेचली हे वरवरचं विश्लेषण ठरेल. ती मतं 'आप'कडे का गेली याचं चिंतन कॉंग्रेसला करावं लागेल.
4) स्थानिक नेतृत्वाला कॉंग्रेसनं पाठबळ का दिलं नाही?
एकिकडे राष्ट्रीय नेतृत्व गुजरात निवडणुकीकडे लक्ष देत नाही आहे असं चित्रं, पण दुसरीकडे कॉंग्रेसनं स्थानिक नेतृत्वाला पुरेसं पाठवळ दिलं, नवीन चेहरा तयार केला, असंही गुजरातमध्ये झालं नाही. तेसुद्धा कॉंग्रेसच्या पराभवाचं महत्चाचं कारण मानलं जातं आहे. तीन दशकं या राज्यात सत्ता गाजवलेल्या कॉंग्रेसकडे कायम मोठे स्थानिक चेहरे असायचे. आता तसे नाही असं नाही, पण त्यांना रणनीति ठरवून मोठं केलं गेलं नाही असंही म्हटलं जातं आहे.
स्थानिक चेहरा पुढे आणणी ही कॉंग्रेसची रणनीति असू शकली असती असं पृथ्वीराज चव्हाण म्हणतात. "जेव्हा खूप दिवस एका पक्षाचं सरकार असतं, तेव्हा त्या वेळेला कोणीतरी प्रभावी चेहरा समोर लागतो. आपल्याला पश्चिम बंगालचं उदाहरण घेता येईल. तिथं तीसेक वर्षं कम्युनिस्ट पक्षाचं राज्य होतं. त्यांना तोंड देण्यासाठी जो चेहरा हवा होता तो ममता बॅनर्जींनी दिला," ते म्हणाले.
"कॉंग्रेसमध्ये बहुतेककरुन असा नेता अगोदर जाहीर करत नाहीत कारण आपापसातच वाद निर्माण होतात. पण मला वाटत की त्याला अपवाद करुन कोणी नेता म्हणून प्रोजेक्ट करणं आवश्यक होतं आणि ते पाच वर्षांपूर्वीच करायला पाहिजे होतं. विधानसभेतला विरोधी पक्षनेता असेल किंवा प्रदेशाध्यक्ष असेल, त्याला ताकद देऊन पाच वर्षं प्रोजेक्ट करायला हवं होतं. तेव्हाच एवढी प्रदीर्घ सत्ता हलवता येते. पण तसं झालं नाही," चव्हाण पुढे म्हणाले.
कॉंग्रेसनं स्थानिक चेहरा मोठा केलाच नाही, पण निवडणुकीसाठी आवश्यक असणारे महत्वाचे चेहरे ती स्वत:कडे राखूही शकली नाही. त्यामुळे नेहमी कॉंग्रेसचा गड मानले जाणारे आदिवासी आणि ग्रामीण भाग यंदा कॉंग्रेसचा हातून पहिल्यांदा सुटले.
"2017 मध्ये कॉंग्रेसला आदिवासीबहुल भागातल्या एकूण 27 जागांपैकी 15 जागा मिळाल्या होत्या. पण यावेळेस त्यांना तसं यश मिळालं नाही. कॉंग्रेसकडे आदिवासी नेते होते. पण यावेळेस महत्वाचे नेते भाजपात गेले होते. त्यामुळे कॉंग्रेसचं मोठं नुकसान झालं," 'बीबीसी गुजराती'चे प्रतिनिधी रॉक्सी गागडेकर म्हणाले.
"ग्रामीण भागात कॉंग्रेसचा पराभव होण्याचं कारण म्हणजे त्या भागात ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, तिथं भाजपाचं वर्चस्व आहे. 2019 च्या तिथल्या निवडणुकांमध्ये भाजपानं मोठा विजय मिळवला होता. त्याचा सरळसरळ भाजपाला भाजपाला झाला आहे. उदाहरणार्थ मोरबीमध्ये बराच ग्रामीण भाग आहे आणि तिथून सगळे 52 नगरसेवक भाजपाचे आहेत. त्याचा त्यांना या विधानसभेतही फायदा झाला," रॉक्सी पुढे म्हणाले.
ग्रामीण भागातील काही जागांमधून मोदीही कॉंग्रेसला हलवू शकले नाहीत असं म्हणणा-या कॉंग्रेसला यंदा धक्का बसला. अनेक वर्षं कॉंग्रेसची गुजरातची रणनीति ठरवणारे अहमद पटेल आणि 2017 मध्ये गुजरात प्रभारी असणारे राजीव सातव, यांची कमतरता कॉंग्रेसला नक्की जाणवली. त्यांच्या पराभवाचं त्यांच्या हातात नसलेलं तेही एक कारण मानावं लागेल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








