नरेंद्र मोदी गुजरातमध्ये सतत अजेय ठरत आहेत, कारण...

@narendramodi

फोटो स्रोत, @narendramodi

    • Author, नीलेश धोत्रे
    • Role, बीबीसी मराठी
    • Reporting from, नवी दिल्ली

“पाणी नथी, नथी आयु पाणी, नर्मदानू पाणी नथी... शेतीवाडीनू पाणी नय, पिवाणू पाणी नय, पाणी नय नर्मदानू, हमारी पाणीनी जरुर छे खास...”

स्थळ – साणंद

तारीख – 1 डिसेंबर 2022

वेळ – दुपारी 3 वाजताची

निमित्त – अमित शाह यांची भाजपच्या उमेदवारासाठी प्रचार रॅली.

हातात भाजपचा झेंडा, गळ्यात भाजपचं उपर्ण आणि डोक्यावर भाजपची भगवी टोपी घातलेल्या महिलांची ही तक्रार आहे.

मग तुम्ही भाजपच्या रॅलीसाठी का आलात असा सवाल बीबीसी प्रतिनिधी सागर पटेल यांनी या महिलांना विचारला तर त्यांनी भाजपचा प्रचार करण्यासाठी आलो आहोत असं उत्तर दिलं.

गुजरातमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या कशी आहे आणि महिलांना कशी पायपीट करावी लागते, याचं सविस्तर वार्तांकन बीबीसी गुजरातीनं केलं आहे.

हे वाचून किंवा हे रिपोर्ट्स पाहून एकाक्षणी महिला यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या विरोधात जातील की काय अशी शंका येऊन जाते.

पण प्रत्यक्षात 2022 च्या गुजरात निवडणुकांमध्ये भाजपचा फक्त विजयच झालेल नाही तर ऐतिहासिक विजय झालाय.

गुजरातमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय

भाजपच्या 156 जागा निवडून आल्यात. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानासुद्धा त्यांना हे यश संपादन झालं नव्हतं. भाजपचा हा गुजरातमधला आतापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक विजय आहे.

गुजरातमध्ये 1962 पासून आतापर्यंत विधानसभेच्या 15 निवडणुका झाल्यात. ही 15वी निवडणूक. गुजरातमध्ये विधानसभेच्या 1962 मध्ये एकूण154 जागा होत्या. 1967 साली त्या वाढून 168 आणि 1975 पासून त्यात आणखी वाढ होऊन 182 झाल्या, त्या आजतागायत 182च आहेत.

गुजरात विधानसभेचा इतिहास पाहिल्यास 2017 पर्यंत कधीच कुठल्या पक्षाने 150 चा आकडा पार केला नव्हता.

@narendramodi

फोटो स्रोत, @narendramodi

1962 साली 154 पैकी 113 जागा काँग्रेसनं मिळवल्या होत्या, तर 1972 च्या निवडणुकीत 168 पैकी 142 जागा काँग्रेसनं मिळवल्या होत्या.

1972 साली विधानसभेच्या जागा वाढून 182 झाल्यानंतर, 1985 च्या निवडणुकीत काँग्रेसन 149 जागा मिळवत विक्रमाची नोंद केली होती.

यानंतर म्हणजे 1985 च्या निवडणुकीनंतर कुठलाच पक्ष 127 जागांच्या वर जाऊ शकला नाहीय. यंदा मात्र भाजपन ती किमया केली आहे. यंदा भाजपनं तब्बल 156 जागा जिंकल्या आहेत.

यंदा भाजपच्या मतांच्या टक्केवारीतसुद्धा वाढ झालीय. 2017 मध्ये 49 टक्क्यांवर असलेली मतांची टक्केवारी यंदा 52 टक्क्यांवर पोहोचली आहे. हेसुद्धा ऐतिहासिकच आहे.

27 वर्षांच्या अॅन्टी इन्कबन्सीनंतर एखाद्या पक्षानं एवढं मोठं ऐतिहासिक यश संपादन करण्यामागे नेमकी काय कारणं आहेत? वेगवेगळ्या तक्रारींनंतरही लोकांनी भाजपलाच मतदान का केलं? ब्रँड नरेंद्र मोदी आता गुजरातच्या राजकारणात अजेय झाला आहे का?

@narendramodi

फोटो स्रोत, @narendramodi

या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण शोधण्याचा प्रयत्न करू या.

ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांनी निवडणूक काळात गुजरातचा दौरा केला होता. त्यांना मी हा प्रश्न विचारला.

“गुजरातमध्ये लोकांना बदल नको होता असं नाहीये. 2017 पेक्षा यंदा लोक जास्त बोलत होते, त्यांच्या समस्या मांडत होते. पण तरीही लोकांनी मोदींनाच मतदान केलंय. याचा आता आणखी खोलात जाऊन अभ्यास करणं गरजेचं आहे,” असं त्या म्हणतात.

पण एक मात्र नक्की की मोदी गुजरातमध्ये आता अजेय होऊन बसले आहेत. त्यांच्या या विजयाची त्यांना 2024 मध्ये मदतच होईल, असा अंदाज चौधरी व्यक्त करतात.

पण मग लोकांनी त्यांच्या समस्या मांडल्या, लोक 2017 पेक्षा यंदा जास्त बोलत होते, तरीही त्यांनी भाजपच्या बाजूने मतदान कसं केलं? याचं विश्लेषण करताना चौधरी सांगतात, “मोदींनी भारतीय लोकांच्या आकाक्षांची नस ओळखली आहे. त्या आकांक्षा पूर्ण करण्यसाठी लागणाऱ्या योजनांवर मोदींनी भर दिलेला आहे."

@narendramodi

फोटो स्रोत, @narendramodi

"नव्या मतदारांमध्ये जी-20च्या अध्यक्षतेची चर्चा दिसून आली, देशाचं जागतिक पातळीवर नाव होतंय. मोदी आपल्या आकांक्षा पूर्ण करू शकतात असा विश्वास त्यांच्या दिसून आला. त्याचं प्रतिबिंब या निवडणूक निकालांमध्ये दिसतं.”

यंदाची निवडणूक वेगळी

2017 च्या गुजरातमधल्या विधानसभा निवडणुका पाटीदार आंदोलन, ओबीसी समाज आणि दलितांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर झाल्या होत्या. त्यावेळी गुजरातमध्ये अल्पेश ठाकोर, जिग्नेश मेवाणी आणि हार्दीक पटेल सारखे तरुण नेते पुढे आहे होते. एक प्रकारे गुजरातच्या राजकारणात काही प्रमाणात घुसळण झाली होती.

तसंच 2017 ला काँग्रेसने आणि राहुल गांधींनीसुद्धा मोठा जोर लावला होता. मुख्य म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्या गुजरातच्या पहिल्याच विधानसभा निवडणुका होत्या. तरीसुद्धा भाजपने त्यांची सत्ता टिकवून ठेवली होती.

यंदा मोठं आव्हान नसलं तरी तब्बल 27 वर्षांच्या अॅन्टी इन्कबन्सीनंतर, मोरबीची दुर्घटना, त्रिकोणीय सामना शिवाय काँग्रेस आणि आपने दिलेल्या मोफत सुविधांच्या आश्वासनांचं आव्हान होतं.

@narendramodi

फोटो स्रोत, @narendramodi

आम आदमी पार्टीनं त्यांची संपूर्ण ताकद या निवडणुकांमध्ये लावली. पण काँग्रेसनं मात्र त्यांची शस्त्र आधीच म्यान केल्याची स्थिती होती. काहीही केलं कुठलाही मुद्दा चर्चेला आणला तरी ‘हिंदू मतदार नाराज होतील’ याच भीतीमध्ये काँग्रेसचे सर्व स्तरातले नेते दिसून येत होते.

बीबीसी हिंदीचे प्रतिनिधी रजनीश यांनी यांच्या रिपोर्टमध्ये तर त्याचा सविस्तर आढावा घेतला आहे.

त्याउलट भाजप आणि भाजपचे नेते मात्र कमालीचे आक्रमक आणि तयारीत होते. भाजपनं त्यांच्या 30 पेक्षा जास्त विद्यमान आमदारांची तिकिटं कापली. काँग्रेस आणि बाहेरून आलेल्या 17 पेक्षा जास्त उमेदवारांना तिकिटं दिली. सौराष्ट्रमध्ये तर भाजपनं काँग्रेसकडून उमेदवार आयात केले.

आता असं झाल्यावर बंडखोरी तर होणारच तब्बल 19 ठिकाणी भाजपच्या विरोधात बंडखोरी झाली. काही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी भाजप मुख्यलायत गोंधळ घातला. पण, भाजप त्यांना पुरून उरली.

नरेंद्र मोदीच सर्वेसर्वा

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

नेहमी प्रमाणे यंदाही नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी प्रचाराची सर्व धुरा त्यांच्या खांद्यावर घेतली होती. एका रिपोर्टनुसार मोदींनी यंदा 30 पेक्षा जास्त रॅली आणि रोड शो केले. त्यांचा अहमदाबादमधला रोड शो यंदाचा सर्वांत मोठा रोड शो ठरला. ज्याला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

भाजपच्या सर्व उमेदवारंचा प्रचार हा मोदींच्या नावानेच सुरू होता. त्यांनी मतंसुद्धा मोदीसाठीच मागितली.

बीबीसी गुजरातीचे संपादक दीपक चुडासमा भाजपच्या या विजयाचं विश्लेषण करताना मोदींची तुलना इंदिरा गांधींशी करतात.

जसं इंदिरा गांधींच्या काळात ‘इंदिरा इज इंडिया’ म्हटलं जायचं तसंच आता ‘मोदी इज गुजरात’ झाल्याचं ते सांगतात.

“गुजरातमधले लोक अजूनही मोदींच्या प्रभावातून बाहेर आलेले नसल्याचं या निवडणुकांच्या निकालातून दिसून येतंय. राज्यात आणि केंद्रात मोदीचं असणं आपल्यासाठी फायद्याचं राहील असं त्यांना वाटतं. गुजरातमध्ये मुख्यमंत्री कुणीही असलं तरी गुजरातचे नेते नेरेंद्र मोदीच आहेत हे लोकांच्या डोक्यात पक्क आहे,” असं चुडासमा सांगतात.

मोदी म्हणजेच गुजरात ही प्रतिमा तयार करण्यात मोदींना यश आल्याचं बीबीसी प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांनासुद्धा वाटतं.

मयुरेश यांनी या निवडणुकीच्या काळात गुजरातच्या वेगवेगळ्या भागांचा दौरा केला.

@narendramodi

फोटो स्रोत, @narendramodi

फोटो कॅप्शन, G-20 बैठकी दरम्यान नरेंद्र मोदी

“भाजपनंसुद्धा मोदींच्या पश्चात इथं कुणी दुसरा मोठा नेता उदयाला येणार नाही याची काळजी घेतली आहे. त्यांच्या पश्चात सतत गुजरातमध्ये मुख्यमंत्री बदलता ठेवला आहे. पक्षानं मोदींचा ब्रँड तयार केला आहे आणि तो जपलासुद्धा आहे. अगदी पक्षातसुद्धा आणि पक्षाच्या बाहेरसुद्धा,” असं विश्लेषण कोण्णूर करतात.

मोदींच्या पश्चात गुजरातमध्ये कुठलं नेतृत्व तयार झालं तर त्याचे पडसाद फक्त गुजरातमध्येच नाही तर देशभरात पडतील. म्हणूनच नितीन पटेलसारखे जनाधार असलेले नेतृत्व अस्थिर ठेवलं जातं, असं निरीक्षण कोण्णूर नोंदवतात.

@narendramodi

फोटो स्रोत, @narendramodi

ते पुढे सांगतात, “27 वर्षांनंतरच्या ऍन्टी इंकबन्सीची जाणीव भाजपला होती. त्याशिवाय कोव्हिडच्या काळातली नाराजी, स्थानिक मुद्दे आणि महागाईसारखा राष्ट्रीय मुद्दा आपल्या विरोधात जाईल याची जाणीव भाजपला होती. त्यामुळे त्यांनी कॅबिनेट बदलासारखे प्रयोगुसद्धा केले. नवं नेतृत्व आणलं. तरीसुद्धा नरेंद्र मोदींसोबत जोडली गेलेली गुजराती अस्मिता आणल्याशिवाय विजयश्री खेचून आणता येणार नाही हे भाजपला माहिती होतं. म्हणून मग शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक मोदींभोवती केंद्रित झाली.”

या निवडणुकांमध्ये बीबीसीच्या वेगवेगळ्या प्रतिनिधींनी लोकांशी संवाद साधला. अनेकदा लोकांनी चर्चा करताना नरेंद्र मोदीच त्यांचे मुख्यमंत्री असल्याचं सांगितलं होतं.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजकोठमधल्या एका रॅलीसाठी जमलेल्या महिलांशी चर्चा करताना त्या कुणासाठी आल्या आहेत, असा प्रश्न त्यांना करण्यात आला तेव्हा त्यांना अरविंद केजरीवाल यांच नाव नीट सांगता आलं नाही.

पण गुजरातचे मुख्यमंत्री कोण आहेत असा सावल केल्यानंतर मात्र सर्व महिलांनी तात्काळ एकच उत्तर दिलं – नरेंद्र मोदी.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)