You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आदित्य L-1 सूर्याच्या दिशेनं झेपावलं, 'हा' आहे या मिशनचा उद्देश
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगच्या एका आठवड्यानंतर भारत सूर्याचा अभ्यास करण्यासाठी 'आदित्य एल-1' मिशन लॉंच केलं आहे.
आज (2 सप्टेंबर) सकाळी 11.50 वाजता आदित्य एल-1 यान सूर्याच्या दिशेनं झेपावलं.
भारताची सूर्याकडे जाणारी ही पहिली मोहीम असून याद्वारे अवकाशात एक वेधशाळा उभारण्यात येणार आहे, जी पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेल्या या ताऱ्याचं निरीक्षण करेलं आणि 'सोलर विंड'सारख्या अवकाशातील हवामानाच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करेल.
पण सूर्याचा अभ्यास करणारी ही पहिली मोहीम नाही.
यापूर्वी नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) यांनीही याच उद्देशानं सूर्य मिशन केलं आहे. जाणून घेऊया आदित्य L1 मिशनशी संबंधित प्रत्येक माहिती.
श्रीहरिकोटातून 'आदित्य L1' झेपावलं
आदित्य म्हणजे संस्कृत आणि मराठीत सूर्य असा अर्थ होतो.
श्रीहरिकोटा येथून आज (2 सप्टेंबर) भारतीय वेळेनुसार सकाळी 11.50 वाजता उड्डाण केलं.
श्रीहरिकोटा हे देशाचे मुख्य उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे आणि चेन्नईच्या उत्तरेस 100 किलोमीटर अंतरावर आहे.
सूर्यापर्यंत पोहोचायला किती वेळ लागेल?
हे यान प्रत्यक्षात सूर्याजवळ जाणार नाही.
आदित्य L1 ला पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतर गाठायचं आहे. हे अंतर पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतराच्या चौपट आहे परंतु ते फारच किरकोळ आहे. सूर्य आणि पृथ्वीमधील अंतराच्या फक्त 1% आहे.
पृथ्वीपासून सूर्याचं अंतर 15.1 कोटी किलोमीटर आहे.
एका आठवड्यापूर्वी शुक्र ग्रहावरून गेलेल्या नासाच्या पार्कर अंतराळयानाशी तुलना केल्यास पार्कर सूर्याच्या पृष्ठभागाच्या जवळून 61 लाख किलोमीटर अंतरावरून जाईल.
पण आदित्य L1 ला त्याच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी अजून वेळ लागेल.
इस्रोनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर माहिती दिली आहे, "आदित्य एल-1 ला प्रक्षेपणापासून L1 (लॅग्रेंज पॉइंट) पर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे चार महिने लागतील."
त्यामुळे प्रश्न पडतो की सूर्य तिथून इतका दूर आहे तर मग एवढा प्रयत्न का केला जात आहे?
लॅग्रेंज पॉइंट म्हणजे काय?
मिशनमध्ये ज्या L1 ला नाव देण्यात आले आहे ते 'लॅग्रेंज पॉइंट' आहे.
हे अंतराळातील एक ठिकाण आहे जेथे सूर्य आणि पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती संतुलित आहे. येथे एक प्रकारचा 'न्यूट्रल पॉइंट' विकसित होतो जिथं अंतराळयाना साठी इंधन कमीत कमी वापरलं जातं.
18 व्या शतकात या बिंदूचा शोध लावणाऱ्या फ्रेंच गणितज्ञ जोसेफ लुई लॅग्रेंजच्या नावावरून या ठिकाणाला नाव देण्यात आलं आहे.
आदित्य L1 मिशनचा उद्देश काय आहे?
भारतीय अंतराळयान एकूण सात पेलोड वाहून नेईल आणि सूर्याच्या सर्वात बाह्य पृष्ठभागाचा अभ्यास करेल ज्याला फोटोस्फेयर आणि क्रोमोस्फेयर म्हणतात.
आदित्य L1 इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि पार्टिकल फील्ड डिटेक्टर द्वारे पृष्ठभागावरील ऊर्जा आणि अंतराळ हालचाली रेकॉर्ड करेल.
हे अवकाशातील हवामान आणि अवकाशातील हालचालींचा अभ्यास करेल आणि त्यांच्या घटनेची कारणं जसं की 'सोलर विंड' म्हणजेच सौर प्रवाह समजून घेण्याचा प्रयत्न करेल. या 'सोलर विंड'मुळं पृथ्वीवर उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील प्रकाशाच्या सुंदर घटना दिसतात. याशिवाय, ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक विचलनाचा देखील अभ्यास करेल.
एकदा अंतिम कक्षेत पोहचल्यानंतर ही वेधशाळा सूर्य स्पष्टपणे आणि सतत पाहू शकेल.
इस्रोच्या म्हणण्यानुसार, "यामुळे सौर हालचालींचा बारकाईनं अभ्यास करण्यात आणि 'रिअल टाइम'मध्ये अवकाशातील हवामानावर त्याचा काय परिणाम होतो हे जाणून घेण्यात मदत होईल."
याद्वारे, रेडिएशनचा देखील अभ्यास केला जाऊ शकतो जो पृथ्वीवर पोहोचल्यानंतर वातावरणामुळं फिल्टर होतो.
त्यांच्या विशेष स्थानांवरून, वेधशाळेतील चार उपकरणं थेट सूर्याकडे पाहतील आणि उर्वरित तीन लॅग्रेंज पॉइंट L1 च्या आजूबाजूच्या भागाचा आणि कणांचा अभ्यास करतील, ज्यामुळे आपल्याला आंतरग्रहीय अवकाशातील सौर हालचालींबद्दल अधिक माहिती मिळेल.
इस्रोला आशा आहे की हे मिशन काही महत्त्वाची माहिती प्रदान करेल ज्यामुळे सूर्याविषयीची आपली समज सुधारेल, जसं की कोराना हीटिंग, कोरोनल मास इजेक्शन, सोलर फ्लेअर आणि या सर्वांची वैशिष्ट्ये.
आदित्य L1 मिशनची किंमत किती आहे?
भारत सरकारनं 2019 मध्ये या प्रकल्पाला मंजुरी दिली, ज्याची किंमत सुमारे 4.6 कोटी डॉलरआहे.
भारतीय अंतराळ संस्थेनं एकूण खर्चाची तपशीलवार माहिती अद्याप जाहीर केलेली नाही. हे प्रोब पाच वर्षे अंतराळात राहण्यास सक्षम करण्यात आलं आहे.
'डीप स्पेस मिशन'साठी इस्रो कमी शक्तिशाली रॉकेट वापरतं, आणि पुढील प्रवासासाठी गुरुत्वाकर्षण शक्तीची मदत घेतं.
त्यामुळे चंद्र, मंगळ इत्यादी स्थळी पोहोचायला जास्त वेळ लागतो, पण जड रॉकेटसाठी जो खर्च होतो, तो कमी शक्तिशाली रॉकेटमूळं बराच कमी होतो.
या कारणास्तव, भारतीय अंतराळ संस्थेनं अलीकडे तुलनेने कमी बजेटमध्ये काही मोठे यश मिळवलं आहे.
मानवरहित चांद्रयान-3 हे गेल्या आठवड्यातच चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं होतं, ज्यामूळं चंद्रावर आपली मोहीम यशस्वीपणे करणारा अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत हा चौथा देश बनला आहे.
2014 मध्ये, मंगळाच्या कक्षेत अंतराळयान पाठवणारा भारत हा पहिला आशियाई देश बनला आणि पुढील वर्षी पृथ्वीच्या कक्षेत तीन दिवसांची मानवयुक्त मोहीम राबविण्याची योजना आखत आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)