‘2 सेकंदही उशीर झाला असता तर लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळलं असतं, निष्काळजीपणा संपूर्ण मिशन नष्ट करू शकतो’

    • Author, रिचर्ड हॉलिंघम
    • Role, बीबीसी फ्युचर

नासाच्या चंद्र मोहिमेला तत्कालिन अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी मान्यता दिली होती. पण अंतराळ मोहिमेबाबत ते फारसे उत्साही नव्हते.

1962 मध्ये जेव्हा केनेडी नासाचे तत्कालीन प्रमुख जेम्स वेब यांना भेटले तेव्हा त्यांनी वेब यांना सांगितलं, "मला अंतराळात अजिबात रस नाही. मला वाटतं की ही चांगली गोष्ट आहे."

"मला वाटतं आम्हाला अंतराळाची माहिती असायला हवी. यासाठी आम्ही काही रक्कम खर्च करण्यासही तयार आहोत. पण, तुम्ही जेवढे पैसे मागत आहात त्यामुळं आमचं बजेट कोलमडेलं."

केनेडी आणि नासाचे प्रमुख यांच्यातील हा संवाद जॉन एफ केनेडी प्रेसिडेन्शिअल लायब्ररी या केनेडी यांच्या अध्यक्षपदाच्या काळातील कागदपत्रांच्या लायब्ररीतून प्रसिद्ध केला आहे.

या संभाषणात केनेडी यांचा चंद्रावर पोहोचण्यामागचा खरा हेतू स्पष्ट होतो.

केनेडी यांनी पुढे जेम्स वेब यांना सांगितले, "मला वाटतं की आपण हा कार्यक्रम अशा कालमर्यादेमध्ये तयार केला पाहिजे की आपण त्यांना पराभूत करू शकू. आम्ही त्यांना दाखवू शकतो की आम्ही अंतराळ तंत्रज्ञानात अनेक वर्षे मागे असूनही आम्ही त्यांना हरवू शकतो."

म्हणजेच केनेडींनी जेव्हा नासाला चंद्र मोहिमेवर जाण्यासाठी हिरवा कंदील दिला तेव्हा या क्षेत्रात सोव्हिएत युनियनला मात देण्याचा त्यांचा उद्देश होता.

पण, अमेरिकेला ही शर्यत जिंकणं महाग पडलं होतं.

त्यावेळी अपोलो मोहिमेचा एकूण अंदाजे खर्च अंदाजे 25 अब्ज डॉलर इतका होता. आजच्या नुसार, ही रक्कम सुमारे 175 अब्ज डॉलर आहे. 1965 मध्ये अमेरिकेच्या एकूण बजेटमध्ये नासाचा वाटा 5 टक्के होता. आज ते केवळ अर्धा टक्के आहे.

अमेरिकेने ते अब्जावधी डॉलर रॉकेट्स, स्पेसक्राफ्ट, कॉम्प्युटर, मिशन कंट्रोल रूम आणि चार लाख लोकांचे पगार यासाठी खर्च केले होते. आणि यामध्ये केवळ 12 लोकांना चंद्रावर नेण्यात आलं.

तो खर्च योग्य होता का?

चंद्रावर माणूस पाठवण्यासाठी नासाने खर्च केलेला पैसा योग्य होता का? या प्रश्नावर अमेरिकन नागरिकांचे उत्तर नकारार्थी होते. 1967 मध्ये झालेल्या सर्वेक्षणाचा संदर्भ घेऊन आम्ही हे सांगत आहोत.

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथील नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियमचे रॉजर लॉनियस यांनी ही आकडेवारी गोळा केली.

जी स्पेस पॉलिसी जर्नल नावाच्या मासिकात प्रकाशित झाली होती. यानुसार, अमेरिकन लोकांचा असा विश्वास होता की आपल्या देशाचं प्राधान्य अंतराळ शर्यतीत भाग घेण्यास नसावं.

1961 मध्ये, जेव्हा सोव्हिएत युनियन अंतराळ शर्यतीत अमेरिकेपेक्षा खूप पुढे होतं, तेव्हाही अमेरिकन जनतेला अवकाश मोहिमेवर इतका पैसा खर्च करण्यात रस नव्हता.

जून 1961च्या सर्वेमध्ये, अर्ध्या अमेरिकन लोकांनी सोव्हिएत युनियनला पराभूत करण्यासाठी चंद्र मोहिमेचे समर्थन केलं, तर उर्वरित अर्ध्या लोकांनी याला पैशाचा अपव्यय म्हटलं.

जानेवारी 1967 मध्ये अपोलो 1 च्या दुर्घटनेत तीन अंतराळवीरांचा मृत्यू झाल्यानंतर, अर्ध्याहून अधिक अमेरिकन चंद्र मोहिमेच्या विरोधात होते.

1969 मध्ये मानव चंद्रावर पोहोचू शकल्यानंतर सर्वसामान्य अमेरिकन नागरिकांमध्ये अपोलो मोहिमेला पाठिंबा वाढला. पण 9 महिन्यांनंतर अपोलो-13 चा अपघाता झाला आणि पुन्हा एकदा अमेरिकन जनमत त्याच्या विरोधात गेलं.

जीन सर्नन आणि हॅरिसन श्मिट जेव्हा अपोलो 17 मोहिमेद्वारे चंद्रावर चालत होते, तेव्हा सुमारे 60 टक्के अमेरिकन लोकांचा असा विश्वास होता की त्यांचं सरकार अंतराळ क्षेत्रात खूप पैसा खर्च करत आहे.

तोपर्यंत यूएस सरकारनं नासाचं बजेट खूप कमी केलं होतं आणि उर्वरित चंद्र मोहिमाही रद्द केल्या होत्या.

नासाच्या अपोलो मोहिमेला राष्ट्रीय अभिमान मानलं जात होतं आणि त्याला अमेरिकन जनतेचा पूर्ण पाठिंबा होता हे एक मिथक आहे.

त्या काळातील या सर्वेक्षणांवर विश्वास ठेवला, तर आपण या निष्कर्षाप्रत पोहोचतो की, अवकाश मोहिमेऐवजी आपल्या कराचा पैसा इतर महत्त्वाच्या कामांवर खर्च व्हावा, अशी सरासरी अमेरिकन नागरिकांची इच्छा होती.

चंद्रावर जाणाऱ्या अंतराळवीरांचे सूट

जेव्हा नासा चंद्रावर मानवाला पाठवण्याच्या योजनेवर काम करत होता, तेव्हा तेथे जाणाऱ्यांसाठी खास कपडे डिझाइन करणं हे एक मोठं आव्हान होतं. त्यांना स्पेस सूट म्हणतात.

नासाच्या अभियंत्यांना मजबूत आणि आरामदायी स्पेस सूट बनवायचे होते. नासानं स्पेससूट बनवण्याची जबाबदारी ब्रा बनवणाऱ्या इंटरनॅशनल लेटेक्स कॉर्पोरेशनवर सोपवली होती.

प्रत्येक स्पेससूटमध्ये प्लास्टिकचे तंतू, रबर आणि धातूच्या तारांचे अनेक स्तर होते. या सगळ्याच्या वर 'टेफ्लॉन'च्या कापडाचा थर लावला होता. हे स्पेस सूट खास टेलर कडून हातानं शिवलेले होते.

यामध्ये लाइफ सपोर्ट सिस्टिम जोडण्यात आली. त्यामुळे प्रत्येक स्पेस सूट अंतराळयाना सारखा झाला होता. यामध्ये प्रत्येक जॉइंट इतका लवचिक बनवण्यात आला होता की अंतराळवीरांना त्यांचे हात आणि पाय हलवण्यास कोणतीही अडचण येणार नाही. अपोलो मोहिमांसाठी डिझाइन केलेले स्पेस सूट नासाच्या जेमिनी मोहिमे पेक्षा कितीतरी पटीने चांगले होते.

अपोलो 9 अंतराळवीर रस्टी श्वीकार्ट म्हणतात, "जेमिनी मोहिमेसाठी डिझाइन केलेले स्पेस सूट आरामदायक नव्हते. ते परिधान केल्यानं अंतराळ यानाच्या बाहेर काहीही करता येत नव्हतं."

मार्च 1969 मध्ये, जेव्हा रस्टी यांनी त्यांच्या अंतराळ यानाच्या बाहेर अवकाशात काही काळ घालवला तेव्हा त्यांनी या नवीन स्पेससूटचे फायदे आणि तोटे तपासले. त्यावेळी ते पृथ्वीच्या कक्षेत होते.

त्या दिवसाची आठवण करून देताना रस्टी सांगतात, "स्पेसवॉकच्या वेळी मला अंतराळयानापासून दूर जाता आलं. मी माझ्या अंतराळ यानाशी फक्त तारेद्वारे संपर्कात होतो, जेणेकरून मी हरवून जाऊ नये."

"माझ्या मित्रांना चंद्रावर लांब अंतर चालायचं होतं. अशा परिस्थितीत, जर त्यांनी जुने स्पेससूट घातले असते तर ते त्यांच्या लूनर मॉड्यूलपासून लांब जाऊ शकत नव्हते. म्हणूनच नवीन स्पेस सूटमध्ये स्वतंत्र बॅकपॅक होते जेणेकरून अंतराळवीर काही अंतर चालू शकतील. यानापासून मैल दूर गेले तरी त्यांना कोणतीही अडचण येणार नाही."

नंतरच्या स्पेससूटमध्ये आणखी सुधारणा करण्यात आली, ज्यामुळे चंद्रावर चालणाऱ्या रोव्हरमध्ये बसून तो ऑपरेट करता येईल.

चंद्रावर उतरणाऱ्या लँडरची मोठी किंमत

अपोलो 11 मिशन रवाना होण्यापूर्वी तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी दोन भाषणे तयार केली होती. एक मोहीम यशस्वी होण्यासाठी आणि दुसरं, जर काही कारणास्तव चंद्रावर गेलेले अंतराळवीर पृथ्वीवर परत येऊ शकले नाहीत तर ते वाचता येईल.

या भाषणात लिहिले होते की, 'जे लोक चंद्रावर शोधासाठी गेले, ते कायम तिथेच राहतील, हा नशिबाचा खेळ आहे. त्यांचे आत्मा नेहमी चंद्रावर राहतील. नील आर्मस्ट्राँग आणि एडविन एल्ड्रिन या शूर पुरुषांना माहित आहे की त्यांच्या परत येण्याची कोणतीही आशा नाही. पण त्याच्या बलिदानात मानवतेसाठी आशा दडलेली आहे हेही त्यांना माहीत आहे.'

अपोलो 11 च्या आधी, इतर कोणत्याही खगोलीय स्थानावर मानवांना उतरवण्यासाठी कोणीही मशीन बनवले नव्हते आणि चंद्रावर उतरल्यानंतर त्यांच्या सुरक्षित परतीची व्यवस्था होती अशी कल्पना करणं अशक्य होतं.

म्हणूनच, चंद्रावर उतरण्यासाठी नासाने बनवलेले लुनर मॉड्यूल, त्याच्या पातळ भिंती आणि हलक्या फ्रेममध्ये स्पायडरचे पाय असलेले काहीतरी दिसत होतं, जे केवळ अंतराळात काम करू शकते.

चंद्र लँडरमध्ये दोन भाग होते. लँडिंग भाग, ज्यामध्ये चंद्रावर उतरण्यासाठी पॅड बनवले गेले होते आणि एक वरचा भाग होता. त्यात फक्त एक इंजिन होतं, जे अंतराळवीरांना चंद्राच्या कक्षेत तरंगणाऱ्या अवकाशयानाने जोडत होतं. म्हणजेच हे इंजिन कोणत्याही कारणाने बिघडले तर चंद्रावर गेलेल्या लोकांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नव्हता.

अपोलो 11 फ्लाइट डायरेक्टर गेरी ग्रिफिन म्हणतात, "चंद्र लँडर संपूर्ण मोहिमेतील एकमेव दुवा होता, ज्याला पर्याय नव्हता. त्या इंजिनला काम करावं लागणार होतं. ते अयशस्वी झालं असतं तर खेळ संपला असता. दुसरा कोणता मार्ग नव्हता."

नासानं ग्रुमन कॉर्पोरेशन नावाच्या कंपनीला लूनर लँडर बनवण्याचे कंत्राट दिलं होतं. त्याची किंमत सुमारे 38.8 कोटी डॉलर्स होती. पण, ते होण्यासाठी बराच वेळ लागला आणि त्याची चाचणी अनेक वेळा पुढे ढकलावी लागली. लूनर लँडरची पहिली चाचणी जानेवारी 1968 मध्ये झाली.

एका वर्षाच्या आत, अपोलो 9 अंतराळवीर जिम मॅकडिव्हिट आणि रस्टी श्वीकार्ट यांनी यानाला पृथ्वीच्या कक्षेत नेण्याचा पराक्रम केला. त्यानंतर, अपोलो 10 मोहिमेदरम्यान, टॉम स्टॅफोर्ड आणि जीन सेर्नन यांनी लँडरला 47,000 फूट म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागाजवळ सुमारे 14 किलोमीटरवर नेलं. कमांड मॉड्यूलकडे परत येताना, सर्नन आणि स्टॅफोर्ड गंभीर संकटात सापडले.

जेव्हा सर्नन आणि स्टॅफोर्डनं लँडरची नेव्हिगेशन प्रणाली चालू केली आणि वरच्या भागाला लँडिंगवाल्या भागापासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एक स्विच चुकीच्या ठिकाणी होता. यानंतर जेव्हा त्यांनी इंजिन सुरू केले तेव्हा अंतराळयान अनियंत्रित झालं.

सर्नन मोठ्या आवाजात एक शिवी दिली. त्या प्रसंगाचे स्मरण करून, सर्ननने नंतर सांगितले की त्याने 15 सेकंदात चंद्राचा पृष्ठभाग आठ वेगवेगळ्या प्रकारे पाहिला. पण सर्नन म्हणाला की ती घाबरायची वेळ नव्हती.

सुदैवाने, स्टॅफर्डने लुनर लँडरला हातानं नियंत्रित करून स्थिर केलं. नंतर, अभियंत्यांनी अंदाज लावला की जर दोन सेकंदही उशीर झाला असता तर लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळलं असतं.

सर्नन म्हणाले, "ही हार्डवेअरची समस्या नाही. ही चूक माणसाची होती. तुम्ही कितीही सक्षम असलात तरी. कितीही सराव केला तरी थोडासा निष्काळजीपणा संपूर्ण मिशन नष्ट करू शकतो."

त्या घटना दरम्यान जीन सर्नन जवळजवळ मृत्यूच्या दाढेत होते. त्यांनी शिवी दिल्याबद्दल नंतर अमेरिकन जनतेची माफी मागितली.

जेव्हा चंद्रावर गेलेल्यांनी जाहिरातीतून पैसे कमावले

जेव्हा नील आर्मस्ट्राँग, एडविन एल्ड्रिन आणि माईक कॉलिन्स पृथ्वीवर परतले तेव्हा ते ग्रहावरील सर्वात प्रसिद्ध व्यक्ती होते. मात्र, यामुळे त्यांच्या पगारात वाढ झाली नाही.

त्यांच्या ज्येष्ठतेनुसार, नासाच्या अपोलो मोहिमेशी संबंधित अंतराळवीरांना दरवर्षी 17 ते 20 हजार डॉलर्स मिळत होते. आजच्या तारखेला ही रक्कम एक लाख वीस हजार डॉलर आहे. ही घटना कव्हर करणारे टीव्ही अँकर अंतराळवीरांपेक्षा अधिक कमाई करत होते.

चंद्रावर जाण्याचा धोका पत्करल्याच्या बदल्यात अंतराळवीराला वेगळे पैसे मिळाले नाहीत. होय, ते प्रवासाचे बिल नक्कीच वसूल करू शकतील. म्हणून एडविन एल्ड्रिन यांनी त्यांच्या घरातून फ्लोरिडा मार्गे ह्यूस्टन मधील स्पेसक्राफ्ट सेंटरमध्ये जाण्यासाठी 33.31 डॉलर आकारले होते.

याशिवाय नासा आणि लाईफ मॅगझिन यांच्यात झालेल्या करारातून अंतराळवीरांना मिळणाऱ्या उत्पन्नाचा वाटा मिळाला.

अंतराळ कार्यक्रमापासून वेगळे झाल्यानंतर अनेक अंतराळवीरांना मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या पगारावर नोकरी मिळाली. अनेकजण टीव्हीवर गेस्ट म्हणून जाऊ लागले. याशिवाय त्यांना अनेक जाहिरातीही करायला मिळाल्या.

उदाहरणार्थ, अपोलो 7 मोहिमेदरम्यान सर्दी झालेल्या वॅली शिरा नंतर सर्दीमूळ बंद झालेलं नाक मोकळं करणाऱ्या औषधाची ब्रँड अॅम्बेसेडर बनल्या. अशा प्रकारे बझ एल्ड्रिन यांनी विमा, कार आणि ओट्सच्या जाहिराती केल्या. आजही त्यांचं उत्पन्न त्यांनी 1969 मध्ये कमावलेल्या कमाईपेक्षा जास्त आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)