फॅक्ट चेक : चंद्रयान-3 संदर्भात बीबीसीच्या 4 वर्षं जुन्या व्हीडिओचा चुकीचा वापर

चार वर्षांपूर्वी बीबीसी वर्ल्ड न्यूजवर प्रसारित करण्यात आलेल्या एका जुन्या व्हीडिओसोबत छेडछाड करून हा व्हीडिओ नवीन रुपात चुकीच्या पद्धतीने सादर केल्याचा प्रकार समोर आलाय.

बुधवारी (23 ऑगस्ट 2023) रोजी भारताच्या चांद्रयान-3 उपग्रहाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडर उतरवून इतिहास रचला आहे.

भारताच्या चंद्रयान-3 मोहिमेमुळे जगभरातील माध्यमांची नजर भारतीय अंतराळ संस्था म्हणजेच इस्रोवर होती. देशविदेशातील प्रसारमाध्यमांनी प्राध्यान्य देऊन या भारतीय मोहिमेचं वार्तांकनही केलं होतं.

यामध्ये बीबीसीच्या भारतीय भाषा आणि बीबीसीतर्फे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसारणाचं काम करणाऱ्या माध्यमांचादेखील समावेश होता.

बीबीसी न्यूजने चंद्रयान-3 मोहिमेचं केलेलं वार्तांकन तुम्ही इथे क्लिक करून पाहू शकता.

विक्रम लँडर चंद्रावर उतरल्यानंतर काहीच वेळात भारतीय सोशल मीडियावर, विशेषतः पूर्वी ट्विटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'X' प्लॅटफॉर्मवर बीबीसीने 2019 मध्ये प्रसारित केलेला एक व्हाडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होऊ लागला. शेअर केला गेलेला हा व्हाडिओ एडिट करण्यात आलेला होता.

खरंतर जो व्हाडिओ कापून, त्याच्याशी छेडछाड करून शेअर करण्यात आला हे ती एका कार्यक्रमात केली गेलेली चर्चा होती.

बीबीसी वर्ल्ड टेलिव्हिजनवरील एक वृत्तनिवेदक आणि भारतीय पत्रकार यांच्यामधील तो संवाद होता. 2019 मध्ये चांद्रयान-2चे प्रक्षेपण होण्याआधी ही चर्चा करण्यात आलेली होती.

त्यामुळे आता चंद्रयान-3 चा संदर्भ देऊन जो व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला जातोय, त्या व्हीडिओचा आणि या मोहिमेचा काहीही संबंध नाही.

एडिट करण्यात आलेल्या या व्हीडिओमध्ये फक्त निवेदकाने विचारलेला प्रश्न ठेवण्यात आलेला आहे आणि एकाच वाक्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर मात्र काढून टाकण्यात आलेलं आहे.

याशिवाय हे स्पष्टपणे दिसतंय की हा व्हीडिओ जुना आहे. तसेच, या व्हीडिओमध्ये बीबीसी वर्ल्ड न्यूजचा लोगोदेखील दिसतोय. वास्तविक पाहता हे चॅनल आता प्रसारित होत नाही.

सोशल मीडियावरील अनेक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वांनी चुकीची माहिती देणारा हा शेअर केला. अनेकांनी यामुळे या व्हीडिओवर प्रचंड टीकाही केली. हे करत असतांना या व्हीडिओसोबत छेडछाड केली असल्याचं मात्र त्यांना माहिती नव्हतं.

बुधवारी रात्री भारतातील आघाडीची वृत्तवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आजतकने देखील त्यांच्या एक्स खात्यावरून या व्हीडिओच्या संदर्भात एक पोस्ट केली आहे.

हा व्हीडिओ जुना आणि एडिटेड असल्याची माहिती आज तकला मिळाल्यानंतर, मात्र त्यांनी ही पोस्ट एक्सवरून डिलीट केली आहे.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)