You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चंद्रयान-3 : चंद्रावर उतरलेली 'ही' 6 चाकी गाडी तिथे काय-काय करणार?
चंद्रयान-3चं यशस्वी लँडिंग झालं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत पहिलाच देश ठरला आहे.
चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर चांद्रयान-3 नेमकं काय काय करणार याविषयी इस्रोने त्यांच्या वेबसाईटवर माहिती दिली आहे.
चंद्राचा एक लूनार डे म्हणजेच चंद्रावरील एक दिवस पृथ्वीवरील 14 दिवसांच्या बरोबरीचा असतो. रोव्हरच्या माध्यमातून चंद्रासंबंधित जी माहिती पाठवली जाईल त्याचं विश्लेषण करण्याचं काम शास्त्रज्ञ करतील.
हा डेटा लँडरद्वारे पाठवला जाणार आहे.
चंद्रावर उतरताच...
चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताच विक्रम लँडरचा एक साईड पॅनल दुमडला जाईल, ज्यामुळे रोव्हरला चंद्रावर उतरण्यासाठी रस्ता मोकळा होईल.
रोव्हर खराब होऊ नये याच दृष्टीने लँडरची निर्मिती करण्यात आली आहे जेणेकरून तो चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल.
हे रोव्हर सहा चाकी रोबोटिक वाहन आहे, जे चंद्रावर फिरून त्याची छायाचित्रे गोळा करेल.
या रोव्हरवर इस्रोचा लोगो आणि तिरंगा लावण्यात आला आहे. ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर चार तासांनी लँडरमधून बाहेर पडेल.
रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर एक सेंटीमीटर प्रति सेकंद या वेगाने फिरेल. यादरम्यान कॅमेऱ्यांच्या मदतीने रोव्हर चंद्रावर असलेल्या गोष्टी स्कॅन करेल.
रोव्हर चंद्राच्या हवामानाची माहिती घेईल. त्यात असे पेलोड्स बसवण्यात आले आहेत, ज्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागाची चांगली माहिती मिळू शकेल. चंद्राच्या भूपृष्ठाखाली इयॉन्स आणि इलेक्ट्रॉनचं प्रमाण देखील शोधण्याचं काम तो करेल.
जसजसं रोव्हर पुढे सरकेल तसं चंद्राच्या पृष्ठभागावर भारतीय तिरंगा आणि इस्रोचा लोगो तयार होईल.
रोव्हर अशा पद्धतीने बनविण्यात आलाय की तो चंद्राच्या पृष्ठभागाची माहिती गोळा करू शकेल. रोव्हर ही माहिती गोळा करून लँडरला पाठवेल.
चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी लँडरकडे दोन आठवड्यांचा वेळ असणार आहे.
रोव्हर फक्त लँडरशीच संवाद साधू शकतो. त्यामुळे शास्त्रज्ञांपर्यंत ही माहिती केवळ लँडर मार्फतच पोहचू शकते.
यावर इस्रोने काय म्हटलंय ?
इस्रोचं म्हणणं आहे की, चंद्रयान-2 ऑर्बिटरचा वापर संवादासाठीही केला जाऊ शकतो. सोमवारी (21 ऑगस्ट) चंद्रयान-2 च्या ऑर्बिटरने लँडरशी यशस्वीपणे संवाद साधला होता.
इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं होतं की, पृथ्वीवरील 14 दिवसांत प्रज्ञान किती अंतर पार करेल याचा अंदाज लावता येत नाही कारण यासाठी बऱ्याच गोष्टींचा आधार आहे.
लँडर आणि रोव्हर यांना चंद्रावरील एक दिवस म्हणजेच पृथ्वीवरील 14 दिवस काम करावं लागेल. जर चांद्रयान-3 ला या कालावधीपेक्षा जास्त काळ तग धरायचा असेल तर त्याला चंद्राच्या थंड रात्री म्हणजेच उणे 238 अंश सेल्सिअस तापमानातही सुरक्षित राहावं लागेल.
इस्रो प्रमुखांनी सांगितलं की लँडर आणि रोव्हर या दोघांजवळही एक अतिरिक्त चांद्र दिवस असण्याची शक्यता आहे.
सोमवारी (21 ऑगस्ट) इस्रो प्रमुखांनी चंद्रयान-3 शी संबंधित अपडेट केंद्र सरकारला दिले आहेत. इस्रोने सांगितलं की, चंद्रयान-3 चा आतापर्यंतचा प्रवास यशस्वी झाला आहे.
पुढचे दोन दिवस चंद्रयान-3 च्या स्थितीवर सातत्याने लक्ष ठेवलं जाईल.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, या चंद्र मोहिमेचे एकूण तीन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग. दुसऱ्या टप्प्यात प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या भूमीवर उतरवणं आणि तिसरा टप्पा म्हणजे माहिती गोळा करून ती पृथ्वीच्या दिशेने पाठवणं.
जर चंद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं तर असं करणारा भारत जगातील चौथा देश असेल.
यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीनने ही कामगिरी केली आहे. मात्र, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश असेल.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, "भारताला दक्षिण ध्रुवावर उतरायचं आहे कारण तिथे अशा गोष्टींचा शोध घ्यायचा आहे ज्यांचा आतापर्यंत कोणीच शोध घेतलेला नाही. आम्हाला डार्क क्रेटर्सची जी छायाचित्रं मिळाली आहेत ते बघता तिथे पाणी असण्याची शक्यता आहे. चांद्रयान-3 ला चंद्रावर पाण्याचे आणखीन पुरावे मिळाल्यास वैज्ञानिकदृष्ट्या शोधाचे आणखीन नवे मार्ग खुले होतील.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)