चंद्रयान-3 : भारताचा अंतराळ उद्योग 82 लाख कोटींचा होणार...पण नेमका कसा?

    • Author, शुभज्योती घोष
    • Role, बीबीसी बांग्ला प्रतिनिधी

20 जुलै 1969. अमेरिकेच्या नॅशनल एअरोनॉटिक्स अँड स्पेस अडमिनिस्ट्रेशन (NASA) या संस्थेने पाठवलेला अंतराळवीर निल आर्मस्ट्राँग याच दिवशी चंद्रावर उतरला होता. या निमित्ताने मानवी इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या माणसाने चंद्रावर पाऊल ठेवलं.

निल आर्मस्ट्राँगने चंद्रावर ठेवलेल्या पहिल्या पावलाचं वर्णनही अगदी योग्य प्रकारे केलेलं आहे.

निल आर्मस्ट्राँग त्यावेळी म्हणाला होता, “चंद्रावर मानवाने ठेवलेलं हे छोटंसं पाऊल आहे. पण संपूर्ण मानवजातीसाठी ही खूप मोठी झेप आहे.”

त्याच्या जवळपास 50 वर्षांनंतर भारताच्या राष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) पाठवलेलं चंद्रयान-3 बुधवारी (23 ऑगस्ट) चंद्रावर उतरलं. चंद्रावरील दक्षिम ध्रुवावर पहिल्यांदाच एखादं यान उतरण्याची कामगिरी या मोहिमेत करण्यात आली आहे.

चंद्रयानाच्या मदतीने चंद्रावर पाठवलेलं विक्रम लँडर पृष्ठभागावर उतरल्यानंतर काही वेळाने प्रज्ञान रोव्हर त्यामधून बाहेर पडलं. सद्य स्थितीत प्रज्ञान हे चंद्राच्या पृष्ठभागावर फिरून तेथील विविध माहिती पृथ्वीवर पाठवत आहे.

प्रज्ञान रोव्हरचा वेग केवळ एक सेंटीमीटर प्रतिसेकंद इतकाच आहे. पण शास्त्रज्ञांच्या मते, भारताच्या या यशाने जगभरातील अंतराळ क्षेत्रात अनेक मोठे बदल अत्यंत वेगाने घडताना दिसतील.

इंटरनॅशनल करंट अफेअर्स फॉरेन पॉलिसीने याविषयी बोलताना म्हटलं, “भारताच्या चंद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगमुळे जागतिक राजकारणात मोठा परिणाम होणार आहे.”

सध्या जगभरातील अनेक देशांनी अंतराळ संशोधनावर आपलं लक्ष केंद्रीत केल्याचं दिसून येतं. याच्याशी संबंधित प्रकल्पांवर ते मोठा पैसा गुंतवत आहेत.

फक्त भारतच नव्हे, तर रशिया, चीन आणि अमेरिका यांच्यासारख्या मोठ्या देशांव्यतिरिक्त इतर अनेक देशांना चंद्रावर पोहोचायचं आहे. त्यातही चंद्रावरच्या दक्षिण ध्रुवाबाबत त्यांना प्रचंड उत्सुकता आहे.

चंद्रयान-3 ने मिळवलेल्या यशानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याचे त्यांचेही प्रयत्न असू शकतील.

एक लाख कोटी डॉलर्सचा अंतराळ उद्योग

आगामी काळात भारताच्या अंतराळ उद्योगाचं बजेट एक लाख कोटी डॉलरपर्यंत (82 लाख कोटी रुपये) पोहोचू शकतो, अशी शक्यता भारताचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी वर्तवली आहे.

चंद्रयान-3 च्या यशानंतर हे लक्ष्य गाठणं भारतासाठी फारसं अवघड नसेल. या यशामुळे भविष्यात भारताचा युवा वर्ग अंतराळ क्षेत्राकडे नक्कीच आकर्षित होणार आहे, अशा स्थितीत अंतराळ क्षेत्रातील संधी आपल्यासाठी खुल्या झाल्या आहेत.

तक्षशिला इन्स्टिट्यूट येथे अंतराळ आणि जागतिक राजकारण या विषयाचं शिक्षण घेत असलेल्या आदित्य रामनाथन यांच्या मते, तरुण वर्ग भविष्यात मोठ्या प्रमाणावर अंतराळाशी संबंधित मोहिमांमध्ये सहभागी होताना दिसतील.

चंद्रावर मोठ्या प्रमाणात खनिजे आणि इंधन साठा असण्याची अंदाज वर्तवण्यात येत असतो. त्यामुळेच अनेक देशांना चंद्राने नेहमीच आकर्षित केलेलं आहे.

इस्रोच्या चंद्रयान-3 मोहिमेच्या यशामुळे भारताने या मोहिमांमध्ये आघाडी घेतल्याचं म्हणता येईल.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याची स्पर्धा

चंद्रावर पोहोचण्याच्या संदर्भात रशिया आणि अमेरिका या दोन देशांमध्ये साठ वर्षांपासून स्पर्धा आहे. तर आता या स्पर्धेत आणखी एक देश उतरलेला आहे.

सध्या सर्वच देशांची नजर ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडे आहे. या भागात पाणी आढळून येण्याच्या शक्यतेमुळे शास्त्रज्ञांना या विषयात रस आहे.

रशियाने नुकतेच चंद्रावरची आपली मोहीम 47 वर्षांनी पुन्हा सुरू केली. पण दक्षिण ध्रुवावर पोहोचण्यासाठीची त्यांची Luna-25 ही मोहीम 20 ऑगस्ट रोजी अयशस्वी ठरली.

यानंतर तीनच दिवसांत भारताच्या चंद्रयान-3 ला मात्र दक्षिण ध्रुवावरच्या मोहिमेत यश मिळालं.

या व्यतिरिक्त रशियाची चंद्रावर 2025 साली अंतराळवीर पाठवण्यासाठीही एक मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

याशिवाय, 2030 पर्यंत चीनचंही अशा प्रकारच्या मोहिमां सुरू करण्याचं नियोजन आहे.

याव्यतिरिक्त इस्रायल, जपान, संयुक्त अरब अमिरात यांच्यासारख्या देशांनाही चंद्रावर जायचं आहे. पण त्यासाठीचे त्यांचे प्रयत्न आजवर यशस्वी ठरलेले नाहीत.

चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर पाण्याची उपलब्धता आहे का, याकडे सर्वांची नजर आहे. कारण त्याचा वापर रॉकेटमध्ये इंधन म्हणून करता येऊ शकतो.

अमेरिकेला चीनची भीती

चंद्रावर पाणी सापडल्यास तिथे एक कायमचं अंतराळ केंद्र उघडता येऊ शकतं, असं शास्त्रज्ञांना वाटतं. या केंद्राचा वापर भविष्यात मंगळावरील संशोधनासाठी करण्यात येऊ शकतो.

नुकतेच एका मुलाखतीत नासाचे बिल नेल्सन यांनी म्हटलं होतं, “चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर खरंच पाणी असल्याचे पुरावे सापडले तर भविष्यात अंतराळवीरांसाठी तसंय अंतराळयानांसाठी त्याची खूप मदत होईल.”

पण त्यांच्या मते, जर चीन तिथे आधी पोहोचला तर तो भूभाग आपला आहे, असा दावा तो करू शकतो, अशी भीतीही त्यांना आहे.

2020 मध्ये अमेरिकेने आर्टेमिस नामक एक करार केला होता. या करारावर अनेक देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या करारानुसार, अंतराळातील संसाधनांचं समान वाटप करण्याचं निश्चित करण्यात आलं आहे.

जून महिन्यात भारताचे पंतप्रधान अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते, त्यावेळी त्यांनीही या करारावर स्वाक्षरी केली. पण चीन आणि रशिया यांनी या करारावर स्वाक्षरी केलेली नाही.

तज्ज्ञांच्या मते, चंद्रयान-3 च्या यशाने चंद्रावरच्या मोहिमांसंदर्भात स्पर्धा वाढली आहे. पण ही स्पर्धा भारतासाठीही फायद्याची ठरू शकते, असंही त्यांना वाटतं.

अंतराळ क्षेत्रात भारत करणार नेतृत्व

विल्सन सेंटर येथील साऊथ एशिया सेंटरमध्ये संचालकपदावर कार्यरत असलेल्या माईक कुगलमन यांच्या मते, “भारताच्या चंद्रयान-3 मोहिमेला यश मिळणं हे केवळ भारताचंच यश नाही, तर संपूर्ण जगाचं यश आहे.”

भारताच्या आधीच्या अंतराळ मोहिमांबाबत बोलताना ते म्हणतात, “पूर्वी पाठवलेले उपग्रह जमिनीतील पाण्याची पातळी, हवामानाचे अंदाज यांच्यासाठी उपयुक्त होते. हवामान बदलाचे परिणाम भोगत असलेल्या देशांच्या दृष्टिकोनातून ही माहिती खूपच महत्त्वाची आहे.”

भारताची एक थिंक टँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑबझर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे डॉ. राजी राजगोपालन याबाबत बोलताना म्हणतात, “चंद्रयानाचं यश हे जगभरातील अंतराळ क्षेत्रावर परिणाम करेल. भारताचं अंतराळ तंत्रज्ञान हे अत्यंत आधुनिक आहे. भारत याबाबत खूपच पुढे आहे, तो या मोहिमांमध्ये नेतृत्व करू शकतो, हे यातून दिसलं आहे.”

चंद्रावरचं हेलियम

डॉ. राजी राजगोपालन पुढे सांगतात, “भारताने ही मोहीम अत्यंत कमी खर्चात पूर्ण केली आहे. त्यामुळेही याला महत्त्व आहे.”

प्रिन्सवॉटर हाऊस कूपर्सने नुकतेच लुनार इकोनॉमी नामक एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यानुसार चंद्रावर उपलब्ध असलेल्या संसाधनांचा चंद्र आणि पृथ्वीसाठी वापर केला जाऊ शकतो. त्याला लुनार एकोनॉमी असं संबोधलं जाऊ शकतं.

उदाहरणार्थ चंद्रावर हेलियम-3 मुबलक प्रमाणात आढळून येतं. नवीकरणीय ऊर्जा (रिन्यूएबल एनर्जी) संदर्भात संसाधन म्हणून त्याचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे लुनार इकोनॉमीमध्ये हेलियमला महत्त्व आहे.

तसंच या अहवालात त्यांनी विविध देशांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेबाबतही उल्लेख केला आहे. त्यामुळे स्पर्धेत चंद्रावरील जागेवर दावा करायचा झाला तरी भारत त्यात पुढे असेल, कारण दक्षिण ध्रुवावर भारतच पहिल्यांदा पोहोचला आहे, असं तज्ज्ञांना वाटतं.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)