IND vs SL : भारताचा सेमीफायनलमध्ये प्रवेश, श्रीलंकेचा 55 धावांमध्ये धुव्वा

टीम इंडियानं श्रीलंकेचा 302 धावांनी पराभव करत विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. भारतानं दिलेलं 358 धावांचं आव्हान श्रीलंकेला पेलवलं नाही. त्यांचा संपूर्ण संघ 55 धावांवर बाद झाला.

आयसीसी वन-डे विश्वचषक 2023 मधील भारताचा हा सलग सातवा विजय आहे. या विजयासह टीम इंडियाचे 14 पॉईंट्स झाले आहेत.

विजयाचे शिल्पकार

जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी हे भारतीय वेगवान गोलंदाजाचं त्रिकूट या विजयाचं शिल्पकार ठरलं.

मोहम्मद शमीनं या स्पर्धेतील जबरदस्त फॉर्म कायम ठेवत 5 विकेट्स घेतल्या. वन-डे विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात एकाच सामन्यात पाच विकेट्स घेण्याची कामगिरी शमीनं तिसऱ्यांदा केलीय. ही कामगिरी करणारा शमी एकमेव भारतीय गोलंदाज आहे.

शमी त्याचबरोबर वन-डे विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा (45) गोलंदाज ठरलाय. त्यानं ही कामगिरी फक्त 14 सामन्यात ही कामगिरी केलीय.

मोहम्मद शमी या विश्वचषक स्पर्धेत फक्त तीन सामने खेळलाय. त्यामध्ये त्यानं 14 विकेट्स घेतल्या आहेत.

शमीनं यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध 54 धावांमध्ये 5, इंग्लंडविरुद्ध 22 धावांमध्ये 4 विकेट्स घेतल्या. त्यानं श्रीलंकेविरुद्ध ही कामगिरी आणखी उंचावली. त्यानं फक्त 18 धावांमध्ये 5 विकेट्स घेतल्या.

या जबरदस्त कामगिरीसाठी शमीचा सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

बुमरा- सिराजचा स्पेल

जसप्रीत बुमरानं टीम इंडियाला गोलंदाजीतही दमदार सुरूवात करून दिली. बुमरानं श्रीलंकेच्या इनिंगमधील पहिल्याच बॉलवर पथुम निशांकाला शून्यावर बाद केलं.

बुमरापाठोपाठ मोहम्मद सिराजनंही पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. त्यानं करुणारत्नेला शून्यावर बाद करत श्रीलंकेला दुसरा धक्का दिला.

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात यापूर्वी झालेल्या आशिया कप फायनलमध्ये सिराजनं 21 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या. सिराजनं हाच फॉर्म कायम ठेवला. श्रीलंकेनं 2 धावांमध्येच पहिल्या 2 विकेट्स गमावल्या आहेत.

सिराजनं त्यानंतर लगेच श्रीलंकेला तिसरा धक्का दिला. सदिरा समरविक्रमाला त्यानं शून्यावर बाद केलं. श्रेयस अय्यरनं त्याचा झेल घेतला.

पहिल्या ओव्हरमध्ये दोन विकेट्स घेतलेल्या सिराजचा धडाका दुसऱ्या ओव्हरमध्येही सुरूच आहे. त्यानं दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर श्रीलंकेचा कर्णधार कुशल मेंडिसची दांडी उडवली. मेंडिस 1 धाव काढून बाद झाला.

श्रीलंकेची पहिले चार फलंदाज 3 धावांवर बाद झाले.

मोहम्मद शमीनं बुमरा आणि सिराजप्रमाणे पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेतली. शमीनं चरिथ अशलंकाला बाद करत श्रीलंकेला पाचवा धक्का दिला. अशलंकानं तब्बल 24 बॉल खेळून फक्त 1 धाव काढली.

श्रीलंकेचा निम्मा संघ 10 ओव्हरच्या 14 धावांवर परतला आहे.

श्रीलंकेच्या टॉप ऑर्डरमधील फलंदाजाप्रमाणे दुशान हेमंताही फक्त हजेरी लावून परतला. शमीनं त्याला पहिल्याच बॉलवर शून्यावर बाद केलं.

श्रीलंकेनं फक्त 14 धावांवर 6 विकेट्स गमावल्या आहेत.

मोहम्मद शमीनं श्रीलंकेला सातवा धक्का दिला. त्यानं दुष्मंता चमीराला शून्यावर बाद केलं. के.एल. राहुलनं त्याचा चांगला झेल घेतला. श्रीलंकेनं फक्त 22 धावांमध्ये 7 विकेट्स गमावल्या आहेत.

श्रीलंकेची आठवी विकेटही झटपट गेली. मोहम्मद शमीनं अँजलो मॅथ्यूजला बाद करत भारताला आठवं यश मिळवून दिलं.

या वर्ल्ड कपमध्ये मोहम्मद शमी जबरदस्त फॉर्मात आहे. त्यानं श्रीलंकेविरुद्धही तो फॉर्म कायम ठेवलाय. या सामन्यात त्यानं आत्तापर्यंत फक्त 13 बॉलमध्ये 4 विकेट्स घेतल्या आहेत.

मोहम्मद शमीनं त्याची पाचवी विकेटही झटपट घेतली. त्यानं कसुन रजिथाला 14 धावांवर बाद केलं.

वन-डे विश्वचषक स्पर्धेतील एकाच सामन्यात पाच विकेट्स घेण्याचा विक्रम शमीनं तिसऱ्यांदा केलाय. ही कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय आहे.

कशी होती भारताची पहिली इनिंग?

श्रीलंकेने टॉस जिंकून भारताला पहिल्यांदा फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. त्यानंतर भारताने 50 ओव्हरमध्ये 8 बाद 357 धावा केल्या.

त्यानंतर भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेचा डाव कोसळत गेला.

डावाच्या सुरुवातीलाच कर्णधार रोहित शर्मा बाद झाला आणि विराट कोहली आणि शुबमन गिल यांनी भारताचा डाव सावरत अर्धशतकं झळकावली.

सचिन तेंडुलकरच्या नावावर असलेला एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतकांच्या विक्रमाची विराट कोहली बरोबरी करणार असं वाटत असतानाच विराट कोहली 88 धावांवर बाद झाला.

त्याआधी शतकाच्या उंबरठ्यावर आलेला शुबमन गिलही चुकीचा फटका मारून 92 धावांवर तंबूत परतला. एकापाठोपाठ एक विकेट गेल्याने भारताचा डाव संकटात आलेला असताना उपकर्णधार के. एल. राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी भारताचा डाव सावरला.

धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात के. एल. राहुल बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने 82 धावांची खेळी करत भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात मदत केली. डावाच्या शेवटी रवींद्र जडेजाने फटकेबाजी करत 24 बॉलमध्ये 35 धावा केल्या.

भारत विरुद्ध श्रीलंका सामन्याचा लाईव्ह स्कोअर :

तत्पूर्वी रोहित शर्मा बाद झाल्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या विराट कोहलीनं श्रीलंकेविरुद्ध वन-डे कारकिर्दीमधील 70 वं अर्धशतक पूर्ण केलं. वन-डे क्रिकेटमधील गिलचं हे 11 वं अर्धशतक होतं. त्यानं 55 बॉलमध्ये 8 चौकारांसह हा टप्पा गाठला.

गिल-विराटची भागीदारी

शुबमन गिल आणि विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेली 189 धावांची भागिदारी हे भारतीय इनिंगचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं.

या सामन्यात टीम इंडियाची सुरूवात खराब झाली. या स्पर्धेत फॉर्मात असलेला रोहित शर्मा फक्त 4 धावांवर बाद झाल्यानंतर शुबमन आणि विराट जोडीनं भारताची इनिंग सावरली.

भारतीय फलंदाजीचं भविष्य समजल्या जाणाऱ्या शुबमननं विराच्या बरोबरीनं खेळ केला. त्यानं 55 बॉलमध्ये या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक पूर्ण केलं.

अर्धशतकानंतर शुबमन अधिक आक्रमक बनला. त्यानं दोन षटकार लगावत शतकाच्या दिशेनं दिमाखात वाटचाल सुरू केली होती. पण, त्याचं शतक फक्त 8 धावांनी हुकलं. तो 92 धावांवर बाद झाला.

विराटची प्रतीक्षा कायम

वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांच्या सचिनच्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी विराट कोहलीला आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. विराटला मुंबईतील सामन्यात सचिनची बरोबरी करण्यासाठी 12 धावा कमी पडल्या.

मदुशंकाच्या ऑफ कटरवर विराट कोहली फसला. कव्हरला फिल्डिंग करत असलेल्या पथुम निशांकानं त्याचा झेल घेतला.

विराट कोहलीचं या स्पर्धेतील हे चौथं अर्धशतक आहे. यापैकी तीन वेळा तो 80 ते 100 धावांच्या दरम्यान बाद झाला आहे. यापूर्वी तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध 85 आणि न्यूझीलंड विरुद्ध 95 धावांवर बाद झाला होता.

गिल आणि विराट एकापाठोपाठ बाद झाल्यानंतर श्रेयस-राहुल जोडीनं धावगती कायम ठेवली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 47 बॉलमध्ये 60 धावांची भागिदारी केली.

दुष्मंता चामीरानं ही जोडी फोडली. त्यानं राहुलला 21 धावांवर बाद केलं.

सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या सूर्यकुमार यादवनं चौकार लगावत चांगली सुरूवात केली होती. पण, त्याला फार काळ फटकेबाजी करता आली नाही. मदुशंकानं त्याला 12 धावांवर बाद करत भारताला पाचवा धक्का दिला.

विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा आणखीन एक विक्रम मोडला

विराट कोहलीनं श्रीलंकेविरुद्ध 34 धावा करताच 2023 या कॅलेंडर वर्षात वन-डे क्रिकेटमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या. विराटनं ही कामगिरी आठव्यांदा केली.

त्यानं सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. सचिननं एका कॅलेंडर वर्षात हजार धावा करण्याची कामगिरी सातवेळा केली होती.

दोन्ही संघाचा प्रवास?

यजमान टीम इंडियानं या विश्वचषकात अद्याप एकही सामना गमावलेला नाही. सर्व सहा सामने जिंकून भारतीय टीम मोठ्या आत्मविश्वासानं मुंबईत दाखल झाली.

दुसरीकडे श्रीलंकेची या स्पर्धेतील सुरूवात निराशाजनक झाली.

भारत आणि श्रीलंका यांच्यात आत्तापर्यंत 167 एकदिवसीय सामने झालेत. भारतानं त्यापैकी 98 सामने जिंकले असून श्रीलंकेनं 57 सामन्यात विजय मिळवलाय.

दोन्ही संघात वन-डे विश्वचषक स्पर्धेत आत्तापर्यंत 9 सामने झालेत. यामध्ये भारत आणि श्रीलंका या दोघांनीही प्रत्येकी चार सामने जिंकले असून एक सामना पावसानं रद्द झालाय.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील वन-डे विश्वचषकातील इतिहास सम-समान असला तरी 2007 नंतर या स्पर्धेतील सर्व सामने टीम इंडियानं जिंकले आहेत.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)