क्रिकेट वर्ल्ड कप : पाकिस्तानी संघाच्या जेवणाची सोशल मीडियावर तुफान चर्चा

    • Author, मिर्ज़ा एबी बेग़
    • Role, बीबीसी उर्दू, दिल्ली

27 सप्टेंबरच्या पूर्वसंध्येला पाकिस्तानी क्रिकेट संघाने तब्बल सात वर्षांनंतर भारतीय भूमीवर पाय ठेवला आहे. यावेळी त्यांचं भव्य असं स्वागत करण्यात आलं. पण न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात संघाला अपेक्षेप्रमाणे विजय मिळवता आला नाही.

पाकिस्तानने 50 षटकांत 5 गडी गमावून 345 धावा काढल्या. यात रिजवान अहमदने शतक ठोकलं तर बाबर आझम आणि सौद शकीलने अर्धशतक झळकावलं.

न्यूझीलंडने 44 व्या षटकातच धावांचा हा पल्ला गाठला. न्यूझीलंडकडून रोचन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल आणि मार्क चॅपमन यांनी अर्धशतकं झळकावली.

आता न्यूझीलंड आणि पाकिस्तानच्या सराव सामन्याबाबत सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत असल्या तरी, दोन दिवसांपासून पाकिस्तानी संघाच्या स्वागत आणि जेवणाबाबतही जोरदार चर्चा सुरू आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या ट्विटर हँडलनेही याबाबत ट्विट करत, भारतात पाकिस्तानी संघाला जेवणासाठी कोणता मेनू असणार आहे याबाबत माहिती दिली आहे.

पाकिस्तानी संघाच्या मेन्यूमध्ये काय असणार?

विश्वचषकासाठी भारतात येणाऱ्या कोणत्याही संघाला गोमांस किंवा मोठ्या प्राण्यांचं मांस दिलं जात नाही.

प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय) या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मेनूमध्ये बीफ नसलं तरी सर्व संघांसाठी विविध प्रकारचे मेन्यू तयार करण्यात आले होते.

'पाकिस्तान संघ आपली दैनंदिन प्रथिनांची गरज चिकन, मटण आणि मासे यांपासून भागवेल. या मांसापासून संघासाठी वैविध्यपूर्ण मेन्यू तयार करण्यात येतील.'

यात रसरशीत ग्रील्ड लँब, मटणाचा रस्सा, बटर चिकन आणि आवश्यक प्रथिने मिळविण्यासाठी ग्रील्ड केलेले मासे यांचा समावेश आहे.

पाकिस्तानी संघाच्या मेनूमध्ये बासमती तांदळाचाही समावेश करण्यात आल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलंय. जर खेळाडूंना हलकं जेवण हवं असेल तर त्यांच्यासाठी स्पेगेटी आणि व्हेजिटेबल पुलावचा मेन्यू असेल.

याशिवाय हैदराबादची लज्जतदार बिर्याणीही खेळाडूंना देण्यात येणार आहे.

यावर लोक काय म्हणतात?

भारतीयांसाठी गाय पवित्र आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे देशाच्या अनेक भागांमध्ये गोहत्येवर बंदी आहे. मात्र भारताच्या काही भागात गोमांस खाण्याची प्रथा असून ते बाजारातही उपलब्ध आहे.

पाकिस्तानी संघाच्या मेनूवर टीका करताना हैदराबादमधील मास्टर व्ही जे एन नावाचे युजर लिहितात, "पाकिस्तानी संस्कृतीमध्ये आजही मोठ्या प्रमाणावर बीफ खाल्लं जातं. भारतातूनही सर्वाधिक निर्यात बीफचीच होते आणि भारतातही ते खाल्लं जातं. इतर संघातील खेळाडूंच्या मेन्यूमधून हा पदार्थ काढून टाकणं म्हणजे असुरक्षिततेची पराकाष्ठाच म्हणावी लागेल."

याच्या उत्तरात एका यूजरने लिहिलंय, "या लॉजिकनुसार तुम्ही केरळमध्ये गेल्यावर तेथील संस्कृती आणि परंपरेनुसार पराठे बीफ खायला हवं."

याला उत्तर देताना दुसर्‍या यूजरने लिहिलंत की, हे सत्य केवळ केरळसाठीच नाही तर संपूर्ण दक्षिण भारतासाठी लागू आहे.

पण पत्रकार फरीद खान लिहितात की, "भारतात विश्वचषकादरम्यान गोमांस दिलं जात नसेल, तर त्यात विनोद करण्यासारखं काही नाही. हे सर्व संघांसाठी आहे, एकट्या पाकिस्तान संघासाठी नाही."

अंशुमन सिंग नामक भारतीय यूजर लिहितो, "मला खात्री आहे की पाकिस्तानी संघाचे स्वतःचे पोषण तज्ञ असतील जे जेवणाचा मेन्यू ठरविण्यात मोठी भूमिका बजावतात. मला खात्री आहे की हॉटेल पाहुण्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल."

2016 च्या टी-20 विश्वचषकानंतर पाकिस्तान क्रिकेट संघ प्रथमच भारतात आला आहे. संघातील दोन खेळाडू वगळता सर्व खेळाडू पहिल्यांदाच भारतात आले आहेत.

3 ऑक्टोबरला पाकिस्तान ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला पुढचा सराव सामना खेळणार आहे. तर 6 ऑक्टोबरला विश्वचषकातील पहिला सामना नेदरलँड्सविरुद्ध खेळला जाईल. 10 ऑक्टोबरला त्यांचा श्रीलंकेविरुद्धचा दुसरा सामनाही हैदराबादमध्ये होणार आहे.

पाकिस्तानचा संघ 14 ऑक्टोबरला भारताविरुद्धच्या सामन्यासाठी हैदराबादहून अहमदाबादला रवाना होईल. अशाप्रकारे, पाकिस्तानी संघ दोन आठवडे हैदराबादमध्ये राहून त्यांचं आदरातिथ्य स्वीकारेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)