You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईचा वडापाव, हैदराबादची बिर्याणी एका क्लिकवर उपलब्ध होतेय तरीही....
- Author, झोया मतीन आणि मेरिल सबॅस्टियन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
माणसाच्या हौसेला मोल नाही असं म्हणतात.
अन् त्यात जर बिर्याणीची हौस असेल तर विषयच संपला.
याच हौसेपायी अनिरुद्ध सुरसेन या दिल्लीत राहणाऱ्या व्यक्तीने हजारो किलोमीटर दूर असलेल्या हैदराबादमधून बिर्याणी मागवली. हैदराबादची बिर्याणी किती प्रसिद्ध आहे हे आम्ही तुम्हाला वेगळं सांगायला नकोच.
याचबरोबर त्यांनी लखनौमधून टुंडे कबाब, आणि आणि कोलकातामधून बंगाली मिठाई मागवली.
मात्र त्यांचा अनुभव तितकासा चांगला नव्हता.
“बिर्याणी अतिशय खराब होती. बिर्याणीची ओळखच मिटल्या गेली होती,” ते बीबीसीशी बोलत होते. “चुलीवर गरम करून जे कबाब मिळतात त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही तसंच कोलकात्याची मिठाई दिल्लीत खाण्याची मजा नाहीच,” ते पुढे सांगतात.
सुरेसन यांच्यासारखेच हजारो लोक वेगळ्या शहरातून पदार्थ मागवण्याच्या सेवेचा वापर करतात. कचोरी, रसगुल्ला, बिर्याणी यासारख्या पदार्थांची चव जिभेवर रेंगाळावी म्हणून लोक हा अट्टहास करतात.
झोमॅटोने दहा शहरातील 120 प्रसिद्ध हॉटेल्सबरोबर करार केला आहे. या दुकानातून 24 तासाच्या आत मागवलेला पदार्थ दारात हजर होतो.
“भारताच्या कानाकोपऱ्यातून लोकांच्या आवडीचे पदार्थ त्यांच्या प्लेटमध्ये मिळावे असा आमचा उद्देश होता.” असं कामयानी साधवानी म्हणतात. त्या या सर्व्हिसच्या प्रमुख आहेत.
झोमॅटोने ऑगस्टमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू केली होती. त्यांनी दक्षिण दिल्ली आमि गुरुग्राममध्ये या दोन शहरादरम्यानच्या हॉटेलमध्ये ही सेवा सुरू केली. तेव्हापासून सहा शहरात ही सेवा सुरू झाली आङे. मुंबई आणि बंगळुरूचाही समवेश आहे. आता ही सेवा प्रत्येक शहरात सुरू करण्याचा कंपनीचा मानस आहे.
साधवानी म्हणतात की नॉस्टेलजिया आणि आवडीचा विस्तार हे या सेवेमागचं उद्दिष्ट आहे असं त्या सांगतात.
“आम्ही ग्राहकांच्या दोन गरजा भागवू इच्छितो – पहिलं म्हणजे लोकांना त्यांच्या मूळ गावातला पदार्थ चाखायला मिळेल आणि पुन्हा एकदा त्यांच्या राज्याशी जोडले गेल्याचा फील आला पाहिजे. दुसरं म्हणजे आपल्या देशात असलेल्या विविधांगी खाद्य संस्कृतीचा आस्वाद घरच्या घरी घेता आला पाहिजे.”
सुरेशन यांच्याप्रमाणेच आणखी आठ दहा ग्राहकांशी आम्ही बोललो. मात्र ही सेवा अत्यंत विस्कळीत असल्याचं सांगितलं.
साधवानी म्हणतात, की ग्राहकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद या सेवेला मिळाला आहे. आकडेवारी मात्र त्यांनी सांगण्यास नकार दिला.
“जेव्हा आम्ही ही सेवा सुरू केली तेव्हा आम्हाला वाटलं की ही फार महागडी सेवा आहे. मात्र तसं नसल्याचं आम्हाला लवकरच लक्षात आलं.” झोमॅटोचे उपाध्यक्ष सिद्धार्थ झवर यांनी बिझनेस स्टँडर्डशी बोलताना सांगितलं.
कधी डिलिव्हरीचे पैसे कमी करणं, कधी किराणामाल काही मिनिटात घरी पाठवणं असे अनेक प्रयोग झोमॅटो नेहमीच करत असतं. कंपनीची स्थापना 2008 मध्ये झाली. भारतासारखी गुंतागुंतीची फुड इंडस्ट्री असताना त्यांनी सुरुवातीपासूनच नीट पाया रोवला.
तज्ज्ञांच्या मते या मॉडेलमुळे अनेक हॉटेल्सला त्यांचा व्यवसाय ऑनलाईन घेऊन जावा लागला. झोमॅटोसारख्या अॅपवर त्यांचं अवलंबित्व वाढलं.
“लॉकडाऊनच्या महिन्यात फुड डिलिव्हरी हा एक मोठा पर्याय उपलब्ध झाला. त्यामुळे एरवी ऑनलाईन डिलिव्हरीकडे फारसे न फिरकणारे हॉटेलसुद्धा त्यांचे पदार्थ नीट पॅक करायला शिकले आणि झोमॅटोवर आले.” असं सोनम वेद म्हणाल्या. त्या डिजिटल संपादक आणि लेखक आहेत.
“झोमॅटो इंटरसिटी हे त्याचंच पुढचं स्वरुप आहे.” त्या पुढे म्हणाल्या.
मात्र हजारो किलोमीटर बिर्याणी पोचवणं सोपं नाही आणि पदार्थ ग्राहकांपर्यंत नीट पोहोचावा यासाठी झोमॅटोकडून अतिशय जास्त काळजी घेतली जाते.
अनेक हॉटेल्सचा आता कुरिअर कंपन्यांबरोबर करार आहे आणि ते वेगवेगळ्या शहरात पदार्थ पोहोचवण्याचं काम करतात. त्यामुळे या योजनेला आधीच यश आलं आहे.
झोमॅटो इंटरसिटी मुळे एक वातावरणनिर्मिती झाली आहे आणि त्यामुळे आमच्या उत्पादनांना प्रसिद्धी मिळाली आहे. आम्हाला संपूर्ण भारतातून ऑर्डर्स येत आहेत. असं कोलकात्यातील बलराम मलीक स्वीट शॉपचे संचालक सुदीप मलीक म्हणाले.
झोमॅटोवर ते बेक्ड रसगुल्ला आणि संदेश हे त्यांचे खास पदार्थ विकतात. योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी विशेष पॅकिंग करण्यात येतं.
हिवाळ्यात या पदार्थाच्या ऑर्डर वेगाने वाढतात असं ते सांगतात. “एक वेळ अशी आली की आम्हाला लोकांच्या ऑर्डर पूर्ण करणं कठीण झालं आणि आम्ही ऑर्डर घेणं बंद केलं.” ते म्हणाले.
सेवा किती चालेल याबद्दल शंका
इतर रेस्टॉरंटलासुदधा त्यांच्या ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
“आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला,” असं हैदराबादच्या पिस्ता हाऊसचे संचालक शोएब मोहम्मद सांगतात. त्यांचं दुकान बिर्याणी आणि हलिमसाठी प्रसिद्ध आहे.
ते दर दिवसाला 100 डिलिव्हरीज करतात. वीकेंडला दिल्ली आणि मुंबईत जास्त वाढ झाली आहे. “आम्ही आता 800 बॉक्सेस डिलिव्हर केले.” ते म्हणाले.
पिस्ता हाऊस सप्टेंबरमध्ये चर्चेत आलं होतं. गुरुग्राममधल्या एका युझर ने ट्विट करून सांगितलं की त्यांना बिर्याणीमध्ये फक्त सालनच मिळालं. मोहम्मद म्हणाले की झोमॅटोने त्यांची चूक सुधारली आणि त्यांनी फुकटात बिर्याणी पाठवली.
“या सगळ्या प्रकारामुळे आमची चांगली जाहिरात झाली,” ते म्हणाले.
हॉटेलची मजाच न्यारी
तज्ज्ञांच्या मते ही सेवा किती काळ चालेल याबाबत शंका आहे. कारण सगळ्या शहरात तितक्याच दर्जाचा माल जाईल याबाबत त्यांना शंका आहे.
“ही संकल्पना कागदावर छान वाटते. भारतीय लोकांना नोस्टॅलजिया छान वाटतो. मात्र आधीच गजबजलेल्या शीत पदार्थच्या वाहतुकीच्या मार्केटमध्ये ही सेवा महाग झाली आहे.” असं पत्रकार सोहिनी मिट्टर म्हणाल्या.
त्याहीपेक्षा महत्त्वाचं असं की खाण्याच्या प्रसिद्ध ठिकाणांची मजा आपल्या घरी बसून एका बॉक्समध्ये येईल का? हा प्रश्न ग्राहकांना पडतो.
“मला वाटतं त्या जागेची मजा त्या प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये येऊ शकत नाही. ते पदार्थ खाऊ शकतो पण त्यांची चव वगैरे सगळं गेलेलं असतं.” असं मिट्टर म्हणतात.
सुरेशन हेही या मुद्द्याशी सहमत आहेत. ते म्हणतात, “प्रत्येक जागेची एक मजा असते. उदा. हॉटेल शादाबची एक वेगळी मजा आहे. तिथल्या मसाल्याचा, मांसाचा सुगंध तुमच्या नाकात कितीतरी दुरूनच यायला सुरुवात होते.”
“तुम्ही तिथे बसलेले असता, मस्त बिर्याणी तुमच्या ताटात येते, घासागणिक ती चव रेंगाळत राहते. एक वेटर असतो, जो तुम्हाला कितीही वाट्या सालन आणि रायता देतो.”
वेद यांच्या मते त्यासुद्धा बिर्य़ाणी त्या विशिष्ट ठिकाणी जाऊन खाणंच पसंत करतील. “मात्र AI आणि लॉजिस्टिक्स तुम्हाला घरबसल्या हा अनुभव देत असेल तर व्यापारासाठी चांगलंच आहे की.”
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)