न्याय मागण्यासाठी दलित महिलांचा पुणे ते मंत्रालय पायी प्रवास, पाण्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप

न्याय मागण्यासाठी निघालेलं कुटुंब.
    • Author, अल्पेश करकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"चवदार तळ्याच्या संघर्षाला 98 वर्षं झाली आहेत. पण आम्हाला मात्र पुन्हा पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. आमचं पाणी बंद केलं, शौचालय तोडलं, मारहाण करत जातीवाचक शिव्या दिल्या. यावर आम्हाला न्याय मिळावा."

पिंपरी चिंचवडमधील महिलेच्या डोळ्यात ही साद घालताना अश्रू तराळले होते. सध्या या महिला त्यांच्या संपूर्ण कुटुंबाबरोबर पायी चालत मुंबईहून पुण्याकडे निघाल्या आहेत.

जुन्या मुंबई-पुणे हायवेवरून जाणारं हे कुटुंब पिंपरी चिंचवडच्या थेरगावचं आहे. महत्त्वाचं म्हणजे या कुटुंबामध्ये कोणीही कर्ता पुरुष नाही.

तीन बहिणी आणि एक लहान मुलगा-मुलगी असे पाच जण हातात बॅनर घेऊन सकाळपासून रात्रीपर्यंत पायपीट करत आहेत. अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी पिंपरी चिंचवडहून मंत्रालयापर्यंत जे जाणार आहेत.

त्यांच्यावर अनेक प्रकारचा अन्याय झाल्याचं हे कुटुंबीय सांगत आहेत. पोलीस, प्रशासनावर त्यांनी आरोप केले आहेत. तर प्रशासन आणि पोलिसांनी मात्र त्यांचे आरोप फेटाळले आहेत. उलट या कुटुंबानं अतिक्रमण केल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे.

हाती असलेल्या बॅनरद्वारे त्यांच्यावर झालेला अन्याय मांडण्याचा प्रयत्न या कुटुंबानं केला आहे. ते पाहून लोकही हळहळ व्यक्त करत आहेत.

दोन वर्षांत झालेली मारहाण, शेजाऱ्यांकडून झालेली शिवीगाळ आणि जागेबाबत न्याय मिळण्याची त्यांची मागणी आहे.

पोलीस आणि पालिकेकडून दोन वर्षांपासून न्याय मिळत नसल्यानं मुख्यमंत्र्यांकडं न्यायाची मागणी करण्यासाठी या महिला पायी निघाल्या आहेत.

या प्रवासादरम्यान बीबीसी मराठीच्या प्रतिनिधीनं त्यांच्याशी संपर्क साधला आणि हे संपूर्ण प्रकरण जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

प्रकरण काय आहे?

सोनम लोंढे त्यांच्या दोन मोठ्या बहिणी आणि दोन मुलांसह काही वर्षांपासून थेरगावमधील बापूजी बुवा नगर इथं राहतात. आई-वडील होते तेव्हापासून म्हणजे 50 ते 60 वर्षापासून हे त्यांचं घर असल्याचं त्या सांगतात.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील या घराच्या आजुबाजूची काही जमीन नखाते कुटुंबीयांची आहे. ती नखाते यांनी काही वर्षांपूर्वी विकासकांना विकली होती.

लोंढे कुटुंबीय.

त्याठिकाणी असलेल्या इमारतीतील रहिवाशांच्या येण्या जाण्याचा रस्ता त्या जागेवर तयार केला होता. एका नाल्यावरून जाणारा हा रस्ता असून तो लोंढे कुटुंबाच्या घराशेजारून जातो.

याच जागेवर लोंढे कुटुंबीयांनी शौचालय बांधलं होतं. त्यावरून वाद झाला. हे शौचालय अतिक्रमण विभागाकडून नंतर पाडण्यातही आलं.

सोनम लोंढे यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, "दोन वर्षापासून आम्हाला घरात घुसून मारहाण, जातीवरून शिव्या असा त्रास दिला जातो. आम्ही वाकड पोलीस स्टेशनमध्ये गेलो तरी आमची तक्रार घेत नाहीत."

ग्राफिक्स
ग्राफिक्स

"पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं आमचं पिण्याचं पाणी बंद केलं. शौचालय तोडलं, पोलिसांनी मारहाण केली. कोणीच आमची तक्रार घेतली नाही. त्यामुळं मुख्यमंत्र्यांकडे जाऊन म्हणणं मांडणार आहोत आणि न्यायची मागणी करणार आहोत," असंही त्या म्हणाल्या.

मात्र, स्थानिकांनी याप्रकरणी त्यांच्यावरच आरोप केले आहेत. याठिकाणी लोंढे कुटुंबीयांनी नुकतचं शौचालय बांधल होतं. ते अनधिकृत होतं, असा आरोप आहे.

हे प्रकरण महापालिकेसमोर गेलं. त्याठिकाणी यावरील तक्रारींवर सुनावणी झाली पण त्यावेळी नोटीस देऊनही लोंढे कुटुंबीय उपस्थित राहिले नाहीत, असं महापालिकेनं सांगितलं.

त्यानंतर हे अतिक्रमण हटवण्यात आलं. त्यानंतर हा वाद सुरू झाल्याचं स्थानिक पोलिस आणि महापालिकेनं म्हटलं.

'आता पाण्यासाठीही संघर्ष'

या कुटुंबातील सदस्य असलेल्या रेश्मा चव्हाण यांनी त्यांच्या कुटुंबावर आणखी अन्याय झाल्याचाही आरोप केला.

त्यांचं पाण्याचं कनेक्शन बंद केल्यामुळं सहा महिन्यांपासून त्यांना पाण्यासाठीही संघर्ष करावा लागत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

रस्त्याने चालताना हातात असलेल्या बॅनरवर व पोस्टर्सवर गेल्या दोन वर्षात आपल्यावर झालेला अन्याय या महिलांनी मांडलाय.
फोटो कॅप्शन, रस्त्याने चालताना हातात असलेल्या बॅनरवर व पोस्टर्सवर गेल्या दोन वर्षात आपल्यावर झालेला अन्याय या महिलांनी मांडलाय.

मुंबईला पायी जाताना त्यांच्या हाती असलेल्या बॅनरवर, "बाबासाहेबांनी दलितांसाठी चवदार तळे खुले केले. पण प्रशासनाने दलित कुटुंबाला 6 महिने पाण्यापासून वंचित ठेवले," अस आरोपही केला आहे.

"दहा वीस रुपयांचे हार बनवून आम्ही आमचा उदरनिर्वाह करतो. आमची परिस्थिती फार बिकट आहे. त्यात या लोकांनी आमचे असे हाल केले आहेत. आम्हाला पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे," असं रेश्मा म्हणाल्या.

सोनम लोंढे
फोटो कॅप्शन, सोनम लोंढे

या कुटुंबीयांनी पोलिस आणि प्रशासनावरही अनेक आरोप केले आहेत. पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप त्यात प्रामुख्यानं करण्यात आला आहे.

तसंच तक्रार दाखल करून न घेता रात्री 12 पर्यंत त्यांनाच पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

तसंच या वादातून त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रकार झाला होता, असा आरोपही करण्यात आला आहे.

हार फुले विकून करतात उदरनिर्वाह

जयराम लोंढे हे पिंपरी चिंचवड मधील थेरगाव इथं गेल्या 50-60 वर्षापासून राहतात. पत्नीसह तीन मुली असा लोंढे यांचा परिवार आहे.

लोंढे हे सध्या आजारी असल्याने संपूर्ण घर तिन्ही मुलीच चालवतात. सोनम लोंढे, रेश्मा चव्हाण आणि रतन नवगिरे या तीन बहिणी आहेत. तर रतन नवगिरे आणि नूतन नवगिरे हे दोन मुलं आहेत.

न्याय मागण्यासाठी निघालेलं कुटुंब.

मिळेल ते काम करून ते उदरनिर्वाह चालवतात. जवळच असलेल्या रस्त्यावर हार फुले विक्रीचे काम ते करतात.

आई-वडील, तीन मुली आणि मोठ्या मुलीचे मुलं असे हे सगळे याच लहानशा घरात राहतात.

कारवाईबाबत महापालिकेचे स्पष्टीकरण

यासंदर्भात बीबीसी मराठीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी किशोर नन्नवरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी महानगरपालिकेनं अतिक्रमाणाविरोधात कारवाई केली असल्याचं म्हटलं आहे.

"या कुटुंबीयांकडं पूर्वीपासून शौचालय आहे. तरी वादामुळं जागा अडवण्यासाठी घराशेजारील जागेवर त्यांनी शौचालय बांधलं. ते अतिक्रमण होतं त्यामुळं तोडण्यात आलं.

रेश्मा चव्हाण
फोटो कॅप्शन, रेश्मा चव्हाण

कारवाईपूर्वी विचारणा करण्यासाठी त्यांना बोलावण्यात आलं होतं. पण ते चौकशीला उपस्थित राहिले नाहीत. मूळ जागा मालक, आक्षेप असलेले फिर्यादी, आणि पालिकेचे विविध खात्यातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. पण ते सुनावणीला आले नसल्याचं अधिकारी सांगतात.

तसंच त्यांची पाण्याची लाईनही अनधिकृत होती. त्यामुळं त्यावर कारवाई केल्याचं सांगतात. अनेकांनी जागा आणि याबाबत तक्रार केली होती, असं महापालिकेचं म्हणणं आहे.

या कुटुंबाला वारंवार सांगूनही त्यांनी कागदपत्रं दाखल केली नाहीत. त्यांच्या मालकीची जागा असेल तर त्यांना दिली जाईल, असं महापालिकेचं म्हणणं आहे.

लोंढे कुटुंबावरही आरोप

ज्या जागेवरून वाद आहे, त्याचे मूळ मालक नंदकुमार नखाते यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळत लोंढे कुटुंबावरच आरोप केले आहेत.

"लोंढे कुटुंबीयांनी आम्हाला आणि शेजाऱ्यांना खूप त्रास दिला आहे. ही जागा आम्ही लोकांना रस्ता बनवण्यासाठी विकली होती. पण त्यावर यांनी अतिक्रमण केलं. पालिकेने आणि संबंधित प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करायला हवी. अनेकदा बोलावूनही ते चौकशीला आले नाही," असं ते म्हणाले.

कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीहरी बहिरत यांनी पोलिसांवर केलेल्या आरोपांत तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. चौकशीत अतिक्रमण केल्याचं समोर आल्यानं महापालिकेने अतिक्रमण हटवलं. तेव्हापासून वाद सुरू झाल्याचं ते म्हणाले.

गेल्या दोन वर्षापासून लोंढे कुटुंबीय आणि पोलीस महानगरपालिका आणि स्थानिक असा संघर्ष सुरू आहे.
फोटो कॅप्शन, गेल्या दोन वर्षापासून लोंढे कुटुंबीय आणि पोलीस महानगरपालिका आणि स्थानिक असा संघर्ष सुरू आहे.

कुटुंब 30 वर्षांपासून तिथं राहतं तेव्हा वाद नव्हता. पण नव्या बांधकामानंतर हा वाद सुरू झाला. अनेकदा बोलवूनही या महिला जबाब नोंदवायला आल्या नाहीत, असंही पोलीस म्हणाले.

"एका वरिष्ठ महिली पोलीस निरीक्षकांनी चौकशी करून याबाबत जिल्हाधिकारी आणि समाज कल्याण विभागाला अहवाल दिला आहे. त्यांना आरोपांबाबत तक्रार द्यायला सांगितलं पण ते तक्रार देत नाहीत. पोलिसांनी मुंबईकडे निघाल्यानंतरही तक्रार घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ऐकलं नाही," असं पोलीस म्हणत आहेत.

'..तर मुंडन करून पंतप्रधानांना भेटणार'

लोंढे कुटुंबातील पाच जण सध्या थेरगाव ते मंत्रालय अशा पायी प्रवासावर निघाले आहेत. हे कुटुंब प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सुखरूप पुढे जावं यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. तसंच त्यांना समजावण्याचा देखील प्रयत्न करत आहे, असं सांगितलं जातंय.

मंत्रालयाकडे पायी प्रवास करण्यापूर्वी पोलीस आयुक्तांना पत्र लिहत, न्याय मागण्यासाठी पायी मंत्रालयाकडे जातोय असं निवेदन दिल्याचं, सोनम म्हणाल्या.

दाखल केलेली तक्रार
फोटो कॅप्शन, दाखल केलेली तक्रार

पण, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला न्याय द्यावा अशी या कुटुंबाची मागणी आहे.

"मुख्यमंत्र्यांकडूनही न्याय मिळाला नाही, तर कुटुंबातील महिलांसह सगळे मुंडन करून पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी जाणार आहोत," असं सोनम लोंढे यांनी सांगितलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)