स्टॅन्डअप कॉमेडीतलं 'ब्लू मटेरियल' काय आहे? ते सादर करणारे दलित कलाकार काय सांगतात?

फोटो स्रोत, nehathombare/ankurtangde/bluematerial/instagram
- Author, आशय येडगे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
राजधानी दिल्लीतल्या नवीन संसदेच्या इमारतीसमोर पत्रकारांचा एक प्रेस क्लब आहे. आघाडीच्या माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांसाठी, संध्याकाळचा वेळ घालवण्याची ही एक जागा.
या प्रेस क्लबमध्ये पत्रकार आणि त्यांच्यासोबत आलेल्या पाहुण्यांचं मनोरंजन व्हावं म्हणून अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.
2023च्या डिसेंबर महिन्यात एका कार्यक्रमाची जाहिरात पाहून, मीही तिथे पोहोचलो होतो. प्रेस क्लबच्या आवारात स्टॅन्डअप कॉमेडीचा एक कार्यक्रम आयोजित केला होता.
रवी गायकवाड, मनाल पाटील, अंकुर तांगडे आणि राधे हे सगळे स्टॅन्डअप कॉमेडियन त्यादिवशी त्यांची कला सादर करणार होते.
आपल्या देशात मागच्या काही वर्षांमध्ये स्टॅन्डअप कॉमेडी हा प्रकार प्रचंड लोकप्रिय झालाय.
सोशल मीडिया, ओटीटी आणि इतर बऱ्याच माध्यमांवर स्टॅन्डअप कॉमेडी करणाऱ्या कलाकारांची चलती आहे.
मुंबई, दिल्ली, बंगळुरूसारख्या महानगरांमध्ये स्टॅन्डअप कॉमेडीचे वेगवेगळे क्लब्सदेखील तयार झालेत.
त्यादिवशी दिल्लीतल्या प्रेस क्लबमध्ये 'ब्लू मटेरियल' नावाचा एक कार्यक्रम आयोजित केलेला होता.
ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार होता तिथे शंभरेक पत्रकार बसलेले असतील. त्यापैकी काहीजण कार्यक्रम बघायला जमले होते, तर अनेक लोक योगायोगाने उपस्थित होते.


ब्लू मटेरियलच्या टीमचा सदस्य असणाऱ्या राधे नावाच्या कलाकाराने त्याचं सादरीकरण सुरू केलं.
सुरुवातीला तो नेमकं काय म्हणतोय हे लक्षात येत नव्हतं पण हळूहळू त्याचे विनोद श्रोत्यांच्या कानावर पडू लागले.
सुरुवातीच्या एकदोन विनोदांना प्रेक्षकांनी हसून दादही दिली. पण हळूहळू तिथलं वातावरण गंभीर होत गेलं, काही विनोदांनंतर काही ठराविक लोक अवघडू लागले आणि अवघ्या दहाच मिनिटांनी राधेच्या समोर असलेला माईक ओढून घेतला गेला.
कॉमेडी सादर करायला आलेल्या त्या तीन तरुण पोरांचा कार्यक्रम लोकांनी थांबवायला सांगितला.
"तुमचे विनोद अश्लील आहेत, तुमचे विनोद प्रक्षोभक आहेत, तुमचे विनोद असभ्य आहेत," असं म्हणून त्यांना अडवण्यात आलं. आयुष्यात पहिल्यांदाच माईकसमोर उभा असलेला राधे त्यामुळे घाबरला होता.
नंतर या कार्यक्रमाच्या आयोजनावरून प्रेस क्लब ऑफ इंडिया आणि ब्लू मटेरियलच्या टीममध्ये काही वाद झाले. पण तो कार्यक्रम काही होऊ शकला नाही.
नेमकं काय होतं या 'ब्लू मटेरियल'मध्ये? अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर नेहमी लिहिणाऱ्या, बोलणाऱ्या बऱ्याच पत्रकारांना ते विनोद का आवडले नाहीत? ब्लू मटेरियल सादर करणारी ही मुलं नेमकी कोण होती? त्यांचे विनोद का वेगळे होते?.
त्यादिवशी या आणि अशा अनेक प्रश्नांनी मनात काहूर माजवलं. या प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या प्रवासात रवी गायकवाड, अंकुर तांगडे, नेहा ठोंबरे अशा कलाकारांसोबत आम्हाला संवाद साधता आला.
स्टॅन्डअप कॉमेडीच्या परंपरागत भाषा, विषय आणि आशयाला धडका घेणाऱ्या या बहुजन कलाकारांचं म्हणणं नेमकं काय आहे? हे जाणून घेता आलं.
काय आहे ब्लु मटेरियल?
स्टॅन्डअप कॉमेडी हा तसा पाश्चात्य देशांकडून आपल्याकडे आलेला प्रकार. भारतापुरता विचार केला तर सोशल मीडियावर शेकडो स्टॅन्डअप कॉमेडीयन्सचे असंख्य व्हीडिओ उपलब्ध आहेत.
यातल्या बहुतांश सादरीकरणांमध्ये मोठ्या शहरांमधले ट्राफिक जाम, कॉर्पोरेट नोकऱ्या, ऑनलाईन डेटिंग, रिक्षावाले, टॅक्सिवाले, डॉक्टर, नर्स, बॉलिवूड आणि हॉलिवूड असेच विषय हाताळले जातात.
काही कलाकारांनी सध्याचं राजकारण, धार्मिक ध्रुवीकरण अशा विषयांवही भाष्य करण्याचा प्रयत्न केलाय. असा प्रयत्न केलेल्या काहींना अटकही केली गेलीय.
आजवर स्टॅन्डअप कॉमेडीयन्सनी अनेक विषय हाताळले असले, तरी भारतीय समाजाचं वास्तव असणाऱ्या जातिव्यवस्थेवर मात्र फारच कमी कलाकारांनी भाष्य केलं आहे. 'ब्लू मटेरियल' हा कार्यक्रम नेमका इथेच वेगळा ठरतो.

फोटो स्रोत, ankurtangade/instagram
जातव्यवस्था, श्रमप्रतिष्ठा, आरक्षण, संविधान अशा विषयांवर महत्त्वाची मांडणी करणारे विनोद सादर करण्यासाठी मनाल पाटील, रवी गायकवाड आणि त्यांच्या सहकारी कलाकारांनी ब्लू मटेरियलचा घाट घातला.
ब्लू मटेरियलबाबत बोलताना मुंबईत राहणार रवी गायकवाड म्हणाला की, "लॉकडाऊनच्या काळात माझ्याकडे करायला काही नव्हतं. आणि त्यातच मोबाईलवर जगभरातली स्टॅन्ड अप कॉमेडी बघायचा नाद लागला.
एकेदिवशी अमेरिकेतले काही 'ब्लॅक कॉमिक्स' (कृष्णवर्णीय विनोदी कलाकार) पाहिले. या व्हीडिओमध्ये त्या कलाकारांनी अमेरिकेतल्या वर्णभेदावर भाष्य केलं होतं, तिथला वर्णभेद आणि इथला जातीभेद या दोन्ही गोष्टी मला सारख्याच वाटल्या."
रवीने सांगितलं की, "लॉकडाऊननंतर मी स्वतःच स्टॅन्डअप करायला सुरुवात केली. तिथे मी आरक्षणावरचा पहिलाच विनोद लोकांना ऐकवला. माझ्या सादरीकरणानंतर मला माझ्यासारखे विनोद करणाऱ्या मनाल पाटील आणि मयूर कांबळे यांची नावं माहिती झाली.
मनाल आणि मयूर माझ्या आधीपासून वेगवेगळ्या स्टॅन्डअप्समध्ये जाऊन जातींवर आधारित विनोद सादर करत होते. त्यावेळी स्टॅन्डअपच्या प्रेक्षकांना जातींवर आधारित विनोद ऐकण्याची सवय नव्हती पण मी, मनाल आणि मयूर आमच्या कार्यक्रमांमधून स्टॅन्डअपमध्ये जातिव्यवस्थेवर विनोद निर्माण करत होतो, कुठेतरी याची सुरुवात होणं महत्त्वाचं होतं."

फोटो स्रोत, Ravi Gaikwad
रवी म्हणतो की, सुरुवातीला त्यांनी अमेरिकेतल्या कृष्णवर्णीय कलाकारांसारखे विनोद लिहिण्याचा आणि सादर करण्याचा प्रयत्न केला. पण हळूहळू आम्हाला आमचं म्हणणं स्वतंत्रपणे मांडण्याची गरज वाटू लागली.
"सुरुवातीला 'ब्लू मटेरियल' हा फक्त एक कार्यक्रम होता पण हळूहळू आमच्यासारख्या गोष्टी, विनोद सांगणाऱ्या बऱ्याच कलाकारांसाठी हे हक्काचं व्यासपीठ बनू शकतं याची जाणीव आम्हाला झाली," असं रवी सांगतो.
जातव्यवस्थेवर बोट ठेवणाऱ्या, श्रमजीवी वर्गाचा कळत नकळत होणारा अपमान दाखवून समाजाला चिमटा काढणारे, हे कलाकार हरहुन्नरी तर आहेतच पण त्यांची मांडणी एका विशिष्ट सांस्कृतिक वर्चस्वाला आव्हान देऊ पाहते आहे.
ब्लू मटेरियलचा भाग असणारी अंकुर तांगडे म्हणते की, "आपण ज्या ज्या वेळेस जात आणि जातिव्यवस्थेवर बोलतो त्या त्या वेळेस त्या संवादाचं वादातच रूपांतर होतं.
कॉमेडीमध्ये मात्र तसं होत नाही, तिथे माईक फक्त तुमच्याकडे असतो आणि प्रेक्षक फक्त तुम्हाला ऐकायलाच आलेला असतो. त्यामुळे तुम्ही विनोदाच्या माध्यमातून प्रेक्षकांवर हल्ला न करता, वैयक्तिक अनुभव सांगून तुमचं म्हणणं पोहोचवू शकता."
कॉमेडीच्या जगातही जातीभेद होतोच
अंकुर तांगडे महाराष्ट्रातल्या बीडमध्ये राहते. तिचे आई-वडील सामाजिक कार्यकर्ते आहेत. ती स्वतः क्वीअर आहे आणि मागच्या चार-पाच वर्षांपासून ती स्टॅन्डअप कॉमेडी करत आहे.
स्टॅन्डअप कॉमेडीच्या जगाबद्दल सांगताना अंकुर म्हणाली की, "आम्ही आता स्थानिक दलित कलाकारांना मंच मिळावा म्हणून एक 'ब्लू जॅम ' म्हणून एक मंच तयार करतोय. त्यासाठी प्रायोजक शोधतोय पण आम्ही हे करत असताना स्टॅन्डअप कॉमेडीच्या जगात आमच्यासोबत बऱ्याचदा भेदभाव केला जातो."
दलित असल्यामुळे संधी नाकारली गेल्याचा अनुभव सांगताना अंकुर म्हणते की, "लहान शहरांमध्ये राहणाऱ्या आणि वंचित घटकातल्या कलाकारांना प्रोत्साहन मिळावं म्हणून एका मोठ्या प्रोडक्शन कंपनीने आमच्या मुलाखती घेतल्या होत्या.
त्यामध्ये आम्ही 10-12 दलित कलाकार होतो. शेवटी आमच्यातल्या एकाच सवर्ण कलाकाराची निवड केली गेली. त्यावेळी मला असं वाटलं होतं की, कदाचित ज्याची निवड झाली तो कलाकार अधिक चांगला असेल म्हणून त्याची निवड झाली असेल."

फोटो स्रोत, ankurtangde/instagram
अंकुर म्हणते की, "एका वरिष्ठ दलित कलाकाराने मला याची जाणीव करून दिली की, त्या कंपनीत काम करणारे बहुतांश स्टॅन्डअप कॉमेडियन हे सवर्ण जातीचेच आहेत.
माझा असा विश्वास होता की, कलेला आणि कलाकाराला जात नसते, पण शेवटी माझ्या जातीमुळेच मला तिथे संधी नाकारली गेली असं वाटतं."
रवी गायकवाड त्याचा अनुभव सांगताना म्हणतो की, "आम्हाला मुख्य प्रवाहात यायचंच आहे. आम्ही अनेकदा ब्लू मटेरियल नेमकं काय आहे याची चर्चा करत असतो. त्यात अनेकदा असा प्रश्न पडतो की आम्ही 'दलित विनोद' सादर करणारे स्टॅन्डअप कॉमेडीयन्स आहोत की, विनोद सादर करणारे 'दलित कॉमेडीयन्स' आहोत? या दोन्हींमध्ये एक मोठा फरक आहे. आम्हाला विनोद करणारे दलित कॉमेडियन व्हायचं आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय.
आम्ही सर्वसमावेशक होण्याचा प्रयत्न करतो. उद्या एखादा आमच्याच समूहातला कलाकार ब्लू मटेरियलमध्ये हत्ती आणि मुंगीचे विनोद सांगणार असेल तर आम्हाला त्याची काहीच हरकत नाही.
आमच्याकडे नेहमी असंच बघितलं जातं की, हे कॉमेडियन फक्त दलितांचे विनोद सांगत असतात. पण आम्हाला हे सांगायचंय की, आम्ही दलित कलाकार आहोत पण आमचे विषय मर्यादित नाहीत. आम्हाला प्रत्येक विषयावरचे विनोद लिहायचे आहेत, लोकांना हसवायचं आहे."
ब्लू मटेरियल हे नाव वाचून अनेकदा कार्यक्रम रद्द केले गेल्याचं ही अंकुरने सांगितलं. "नागपूरमध्ये आमचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी 'ब्लू मटेरियल' हे नाव वाचून आयोजकांनी ऐनवेळी कार्यक्रम रद्द केला. त्याचं कारण देताना ते म्हणाले होते की, "आम्हाला इथे कसलाही लफडा नकोय."
भाषेची आणि विषयाची मक्तेदारी
नागपुरात राहणाऱ्या नेहा ठोंबरेचे इंस्टाग्रामवर दीड लाख फॉलोअर्स आहेत. युट्युबवर नेहाच्या फॉलोअर्सचा आकडा 95 हजारांच्या घरात आहे.
नेहाचे व्हीडिओ जगभर बघितले जातात आणि विदर्भातली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून तिने नाव कमावलं आहे. नेहा स्वतः इंजिनिअर आहे, तिने नाटकांमध्ये कामं केलीयत आणि ती एक स्टॅन्डअप कॉमेडियन देखील आहे.
विदर्भातल्या एका छोट्याशा गावात जन्माला आलेल्या नेहासाठी हा प्रवास सोपा नव्हता.
पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये अचानक येण्याची संधी मिळाल्यानंतर तिथल्या गर्दीत हरवलेल्या हजारो वैदर्भीय मुलांमध्ये नेहा कधीच हरवली असती. पण तिला तिच्या मायबोलीने वाचवलं.
नेहाने तिच्या अस्सल वऱ्हाडी भाषेत आजवर हजारो व्हीडीओ बनवले आहेत.
तिच्या लाखो चाहत्यांनी नेहाच्या कलेवर, तिच्या वैशिष्ट्यपूर्ण भाषेवर भरभरून प्रेम केलंय. पण सुरुवातीच्या आठवणी सांगताना नेहा म्हणते की, "मी पुण्यात आले तेव्हा मला माझ्या भाषेचा न्यूनगंड होता. माझ्या वऱ्हाडी भाषेमुळे लोक मला ट्रोल करायचे. तेव्हा असं होतं की पुण्याची मराठी म्हणजेच प्रमाण मराठी, गावाकडची मराठी म्हणजे 'गावठी मराठी.'
कलाक्षेत्रातसुद्धा शुद्ध मराठीलाच मानाचं स्थान होतं. माझ्यातल्या कलेला आणि भाषेला वावच नव्हता. त्यामुळे माझ्या भाषेचा आणि परिस्थितीचा न्यूनगंड वाटायचा."

फोटो स्रोत, nehathombare/instagram
नेहा म्हणते की, "मला नाटकांची आणि अभिनयाची आवड असल्यामुळे अचानक एका कंपनीमध्ये स्टॅन्डअप कॉमेडी शिकण्याची संधी मिळाली. मात्र आमची भाषा, आमचं दिसणं हे सगळंच स्टॅन्डअपच्या प्रेक्षकांसाठी नवीन होतं. त्यांनी अशा प्रकारचे कॉमेडियन कधी पाहिलेच नव्हते.
या सगळ्या प्रेक्षकांना शहरांमध्ये जन्माला आलेल्या, सुखवस्तू कुटुंबातल्या कलाकारांनाच ऐकण्याची सवय होती. त्यामुळे आमच्यासारख्या कलाकारांना स्वीकारायला वेळ गेला."
नेहा सांगते की, "अनेकजण मला विचारतात की स्टॅन्डअप मध्ये जातीवर बोलायची काय गरज आहे? त्याची सामाजिक गरज आपण थोडावेळ बाजूला ठेवूया. पण तुमच्या कलेमध्ये वैविध्य असायला नको? युट्युब चाळलंत तर तुमच्या लक्षात येईल की भारतीय स्टॅन्डअप कॉमेडीच्या जगात एकसुरीपणा आलेला आहे. तेच तेच विषय त्याच त्याच पद्धतीने मांडले जातायत."
नेहाने तिच्या स्टॅन्डअप कॉमेडीमधून केवळ जातींवरच नाही तर समाजातल्या वेगवेगळ्या घटकांवर विनोद लिहिले आहेत. नेहा म्हणते की, "आपण सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे लोक आहोत, त्यामुळे कलेच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी पुढे आल्या पाहिजेत. अनेकदा स्टॅन्डअप मधून गोष्टी मांडणं अवघड असतं.
उदाहरणार्थ शेतकऱ्यांच्या आयुष्याची कैफियत तुम्ही तुमच्या सेटमध्ये कशी उतरवाल? ते एक आव्हान असतं पण तुम्ही जर ते करू शकलात तर ते सादरीकरण अजरामर ठरतं."
नेहाच्या वऱ्हाडी भाषेवर असणाऱ्या प्रेमाबद्दल बोलताना ती सांगते की, "मला माझी भाषा खूप आवडते, माझ्या बोलीवर माझं प्रेम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या भाषेवरून मला हिणवलं गेलं होतं त्यामुळे याच भाषेत काहीतरी करण्याची जिद्द माझ्या मनात होती आणि मी ते करून दाखवलं आहे."
नेहा ठोंबरे, अंकुर तांगडे, रवी गायकवाड, मनाल पाटील, मयूर कांबळे, मनजीत सरकार यासारख्या दलित स्टॅन्डअप कॉमेडीयन्सनी सध्या एक नवीन मुहूर्तमेढ रोवली आहे.
मुख्य प्रवाहातल्या स्टॅन्डअप मध्ये कधीच न हाताळले जाणारे विषय विनोदाच्या माध्यमातून सांगून, जातीभेदाचा घट्ट विळखा ढिला करण्याचा प्रयत्न ही सगळी मुलं करत आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











