'जोपर्यंत आम्हाला न्याय नाही मिळणार तोपर्यंत मदत नाही स्वीकारणार', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा निर्धार

सोमनाथ सूर्यवंशीची आई विजया सूर्यवंशी

फोटो स्रोत, shrikant bangale

फोटो कॅप्शन, सोमनाथ सूर्यवंशीची आई विजया सूर्यवंशी
    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांनी 10 लाख रुपयांची शासकीय मदत नाकारली आहे. सोमनाथच्या मृत्यूस जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत आर्थिक मदत स्वीकारणार नाही, असं सूर्यवंशी कुटुंबीयाचं म्हणणं आहे.

तर, याप्रकरणात ज्यांची भूमिका आढळून येईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा 15 डिसेंबर 2024 रोजी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता.

परभणी हिंसाचार प्रकरणाची विधीमंडळाला माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 20 डिसेंबर 2024 रोजी राज्य सरकारतर्फे सूर्यवंशी कुटुंबीयांना 10 लाखांची मदत जाहीर केली होती.

सूर्यवंशी कुटुंबीयांनं मात्र ही मदत नाकारली आहे.

कुटुंबीयांचं म्हणणं काय?

प्रेमनाथ सूर्यवंशी हा सोमनाथ सूर्यवंशीचा लहान भाऊ आहे.

बीबीसी मराठीशी बोलताना प्रेमनाथ म्हणाला, "तलाठी आणि मंडळ अधिकारी मुख्यमंत्र्यांनी पाठवलेली आर्थिक मदत घेऊन आले होते. ते 10 लाख रुपयांचा चेक घेऊन आले होते. पण जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही, तोपर्यंत आर्थिक मदत स्वीकारणार नाही, अशी आमची भूमिका आहे."

"आम्ही 18 डिसेंबरला परभणीच्या मोंढा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केलीय की, सोमनाथच्या मृत्यूसाठी जे पोलीस कर्मचारी कारणीभूत आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे. पण, सध्या या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू असल्यामुळे फिर्यादीवर नंतर कारवाई होणार असं म्हणताहेत," प्रेमनाथ पुढे म्हणाला.

सोमनाथचा भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी

फोटो स्रोत, kiran sakale

फोटो कॅप्शन, सोमनाथचा भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी

आतापर्यंतच्या कारवाईबाबत विचारल्यावर प्रेमनाथ म्हणाला, "पोलीस अधिकारी घोरबांड यांना फक्त निलंबित केलं म्हणतात. बाकी काही कारवाई केल्याचं दिसत नाही. पोलीस प्रशासनातील ज्या कर्मचाऱ्यांनी माझ्या भावाचा खून केला त्यांना शिक्षा झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे."

सोमनाथच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सोमनाथच्या आईनं केली आहे.

सोमनाथची आई विजया सूर्यवंशी यांनी म्हटलं की, "मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला आर्थिक मदत पाठवली आहे, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. पण जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत आर्थिक मदत स्वीकारणार नाही."

'कारवाईबाबत प्रशासनाकडून माहिती मिळत नाही'

डिसेंबर महिन्यात परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील प्रतिकृतीची नासधूस करण्यात आल्यानंतर हिंसाचार झाला. शहरातील काही दुकाने आणि वाहनांवर दगडफेकीच्या घटना घडल्या. या घटनांनंतर पोलिसांनी काही जणांची धरपकड केली.

यावेळी आंबेडकरी यांनी बौद्ध वस्त्यांमध्ये पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करत मारहाण केल्याचा आंबेडकरी कार्यकर्त्यांचा आरोप आहे. स्थानिक प्रशासनानं मात्र हा आरोप फेटाळला आहे.

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते राहुल प्रधान म्हणाले, "ज्या दोषी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोम्बिंग ऑपरेशन करुन निष्पाप नागरिकांना मारलं त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन त्यांना पोलीस खात्यातून कायमस्वरुपी बडतर्फ केलं पाहिजे. या घटनेतील पीडितांची मदत आणि पुनर्वसन यासाठीच केवळ आमचं आंदोलन चालू नाहीये. पोलिसांनी निष्पाप लोकांना का मारलं यासाठी आमचं आंदोलन आहे. याप्रकरणातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होणार तेव्हाच आम्हाला न्याय मिळेल."

आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून परभणीतील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ गेल्या जवळपास महिनाभरापासून धरणे आंदोलन सुरू आहे.

राहुल प्रधान

फोटो स्रोत, kiran sakale

फोटो कॅप्शन, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते राहुल प्रधान

राहुल प्रधान पुढे म्हणाले, "आतापर्यंत या प्रकरणात शून्य कारवाई करण्यात आली आहे. तपासाला गती लागलेली दिसत नाहीये. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या न्यायालयीन चौकशीचं पुढे काय झालं हेही आम्हाला कळालेलं नाहीये."

परभणी हिंसाचार प्रकरणाची विधिमंडळाला माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाईल, असंही जाहीर केलं होतं.

दोषी पोलीस अधिकाऱ्यांना सरकार पाठीशी घालणार असेल तर मोठ्या आंदोलनाची हाक देणार असल्याचं आंबेडकरी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

आतापर्यंत काय कारवाई झाली?

या प्रकरणाविषयी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 20 डिसेंबरला विधीमंडळात म्हटलं, "यामध्ये एक तक्रार आलेली आहे की, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी वाजवीपेक्षा जास्त बळाचा वापर केला आहे. निश्चितपणे याची चौकशी केली जाईल आणि चौकशी होईपर्यंत त्यांचं निलंबन केलं जाईल."

पण, याप्रकरणात पुढे काय चौकशी झाली, तपास चालू आहे की नाही, हेही प्रशासनाकडून सांगितलं जात नसल्याचं आंबेडकरी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

मृत सोमनाथ सूर्यवंशी
फोटो कॅप्शन, मृत सोमनाथ सूर्यवंशी

दरम्यान, सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी पुढे काय कारवाई करण्यात आली, याविषयी बोलताना परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यांनी वाजवीपेक्षा अधिक बळ वापरलं का? याबाबत डिपार्टमेंटल चौकशी सुरू आहे."

"बाकीच्या लोकांचा काही रोल आढळला तर त्यांच्यावर कारवाई होईल. सध्या चौकशी सुरू आहे," गावडे पुढे म्हणाले.

प्रकरण काय?

10 डिसेंबर रोजी परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतिकृतीची नासधूस करण्यात आली.

ज्याने ही नासधूस केली ती व्यक्ती मनोरुग्ण आहे आणि त्याच्यावर कारवाई केल्याचं सांगण्यात आलं.

पण, संविधानाच्या प्रतीचं नुकसान केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायांनी 11 डिसेंबरला शहरात बंद पुकारला. या बंदला हिंसक वळण लागलं.

शहरातील काही दुकाने आणि वाहनांवर दगडफेकीच्या घटना घडल्या. या घटनांनंतर पोलिसांनी काही जणांची धरपकड केली. सोमनाथ सूर्यवंशी यापैकी एक होता.

परभणीतल्या या चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची नासधूस करण्यात आली होती.

फोटो स्रोत, shrikant bangale

फोटो कॅप्शन, परभणीतल्या या चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची नासधूस करण्यात आली होती.

सोमनाथ दोन दिवस पोलीस कोठडीत होता. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 15 डिसेंबरच्या सकाळी छातीत कळ येत असल्याची तक्रार सोमनाथनं केली. त्यानंतर त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्याठिकाणी त्याला मयत घोषित करण्यात आलं. पण, सोमनाथचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचा सूर्यवंशी कुटुंबीयांचा दावा आहे.

सोमनाथच्या मृतदेहाचं छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात 16 डिसेंबरला शवविच्छेदन करण्यात आलं. शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवालात सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूचे कारण 'Shock following multiple injuries' असं नमूद करण्यात आलं.

परभणी हिंसाचार प्रकरणाची माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी 20 डिसेंबर 2024 रोजी, राज्य सरकार तर्फे सूर्यवंशी कुटुंबीयांना 10 लाखांची मदत जाहीर केली. तसंच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाईल, असं जाहीर केलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)