India vs Australia : डे-नाईट कसोटी सामन्यांत पिंक बॉलचाच वापर करण्याचा निर्णय का घेण्यात आला?

फोटो स्रोत, Getty Images
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅडलेडमध्ये आजपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होत आहे. पर्थमध्ये मिळालेल्या विजयानंतर या सामन्याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत.
पण हा डे नाईट कसोटी सामना असून तो पिंक (गुलाबी) बॉलने खेळला जाईल. या प्रकारात ऑस्ट्रेलिया संघाचा वरचष्मा राहिलेला आहे.
कसोटी क्रिकेटची लोकप्रियता कायम राहावी म्हणून आयसीसीकडून करण्यात येणाऱ्या प्रयोगांपैकी एक म्हणजे डे नाईट कसोटी सामना.
या सामन्यांसाठी पिंक बॉलचा वापर केला जातो, हेही या सामन्यांचं एक महत्त्वाचं वेगळेपण आहे. कारण या चेंडूचा खेळावर, सामन्यावर आणि निकालावर मोठा परिणाम झालेला आतापर्यंत तरी पाहायला मिळालं आहे.
दिवसाच्या नैसर्गिक प्रकाशात या पिंक बॉलची मुव्हमेंट ही वेगळी असते. पण रात्रीच्या वेळी फ्लड लाईटच्या प्रकाशात मात्र, त्याचं वर्तन वेगळं असतं. त्यामुळं या चेंडूने खेळणं हे मोठं आव्हान क्रिकेटपटूंसमोर असतं.
डे नाईट कसोटीत हा पिंक बॉल वापरण्याचाच निर्णय का घेण्यात आला? त्याची वैशिष्ट्ये किंवा सामन्याच्या निकालावर त्याचा कसा परिणाम होतो, हे पाहणंही गरजेचं आहे.


पिंक रंगाचाच बॉल का?
दिवसाउजेडी होणाऱ्या टेस्ट मॅचमध्ये लाल रंगाचा बॉल वापरला जातो तर वनडे आणि ट्वेन्टी-20 मध्ये पांढऱ्या बॉलचा वापर केला जातो.
पण डे-नाईट टेस्ट काही वेळ सूर्यप्रकाशात आणि बराच वेळ कृत्रिम प्रकाशात खेळवली जाते. कसोटीत खेळाडूंचे कपडे पांढऱ्या रंगाचे असतात. त्यामुळं पांढरे कपडे आणि पांढरा बॉल असं होऊ शकत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
लाल बॉल रात्रीच्या वेळी कृत्रिम प्रकाशात दिसण्यात अडचण असते. यावर उपाय म्हणून ऑप्टिक यलो आणि नारिंगी रंगाच्या बॉलचा वापर करण्यात आला.
मात्र या दोन रंगांच्या तुलनेत पिंक बॉलची दृश्यमानता अधिक आहे. गवतावर हा बॉल नीट दिसू शकतो तसंच कृत्रिम प्रकाशात बॅट्समनला हा बॉल सहजतेने दिसू शकतो.
त्यामुळं डे नाईट कसोटीसाठी पिंक बॉलच्या वापराचा प्रयोग करण्यात आला. त्यानंतर याच बॉलचा वापर आता अशा सामन्यांमध्ये आयसीसीकडून केला जातो.
पिंक बॉल वेगळ्या पद्धतीने बनवला जातो का?
लाल, पांढरा आणि गुलाबी- प्रत्येक क्रिकेट बॉल रबरने बनलेला असतो. डायचा रंग बदलतो आणि फॉरमॅटनुसार फिनिशिंग बदलतं.
टेस्ट मॅचमध्ये वापरला जाणारा लाल बॉल ग्रीसमध्ये ठेऊन मग वापरण्यासाठी सज्ज होतो. जेणेकरून पाणी बॉलमधल्या लेदरमध्ये शिरू नये.
मात्र डे-नाईट टेस्टसाठी वापरण्यात येणारा पिंक बॉल ग्रिसमध्ये ठेवला जाऊ शकत नाही कारण तसं केलं तर पिंक बॉलची झळाळी निघून जाईल.

फोटो स्रोत, Getty Images
पिंक बॉलवर गुलाबी रंगाचा अतिरिक्त मुलामा दिला जातो. जेणेकरून कृत्रिम प्रकाशात हा बॉल चमकेल.
फिल्डर, बॅट्समन ,स्टेडियममधील प्रेक्षक तसंच टीव्हीवर मॅच पाहणारे चाहते यांना हा चेंडू नीट दिसत राहतो.
मात्र चेंडू पिंक ठेवण्यासाठी एवढा खटाटोप करावा लागत असल्याने टेस्ट मॅच पाच दिवस चालली तर हा बॉल टिकू शकेल का असा प्रश्न निर्माण होतो.
त्यामुळं या सगळ्याचा विचार करूनच पिंक बॉल तयार केला जातो. टेस्ट खेळणाऱ्या विविध देशांमध्ये तीन कंपन्या बॉल पुरवतात.
भारतात होणाऱ्या टेस्ट मॅचेसवेळी एसजी कंपनीने तयार केलेले बॉल वापरले जातात. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये ड्यूक्स कंपनीच्या बॉलचा वापर केला जातो.
अन्य टेस्ट खेळणाऱ्या देशांमध्ये कुकाबुरा कंपनीने तयार केलेले बॉल वापरले जातात.
पिंक बॉलचे गुणधर्म?
वनडे आणि ट्वेन्टी-20मध्ये वापरल्या जाणाऱ्या पांढऱ्या बॉलप्रमाणे पिंक बॉलही सपाट होतो.
लाल बॉलपेक्षा पिंक बॉल हलका असतो आणि सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये अधिक प्रमाणात स्विंग होतो.
पिंक बॉल सॉफ्ट होऊ लागतो तसा स्विंग होणं कमी होत जातं. पिंक बॉल रिव्हर्स स्विंग करणं बॉलर्सला कठीण जातं असा अनुभव आहे.
पिंक बॉल खूप वळत नाही असं स्पिनर्सचं म्हणणं आहे. बॉलर्सना मिळणारी मदत कमी होत असल्याने खेळ कंटाळवाणा आणि रटाळ होतो.
मॅचच्या निकालावर परिणाम?
पिंक बॉलचा वापर होणारे बहुतांश डे-नाईट मॅचेस निकाली होतात असं आकडेवारी सांगते.
बॉलर आणि बॅट्समन दोन्ही आघाड्यांवर खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. डे-नाईट टेस्टमध्ये स्थित्यंतराचा काळ खेळाडूंसाठी परीक्षा पाहणारा असतो.
नैसर्गिक सूर्याचा प्रकाश कमी होत जातो आणि त्याचवेळी मैदानातील कृत्रिम प्रकाश सुरू होतो. त्यावेळी चेंडूचा सामना करणं अवघड असतं.

फोटो स्रोत, Getty Images
दिवसाचं तापमान आणि रात्रीचं तापमान यात फरक पडतो. तापमान कमी झालं तर बॉल स्विंग होण्याची शक्यता असते. काही शहरांमध्ये रात्र झाल्यावर मैदानावर दव पसरतं.
दवामुळे बॉलर्सना बॉल ग्रिप करायला त्रास होतो. पिंक बॉलची स्थिती नीट राहावी यासाठी खेळपट्टीवर गवत ठेवावं लागतं. गवत असेल तर फास्ट बॉलर्सना साहाय्य मिळू शकतं.
डे-नाईट टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व
ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 12 डे-नाईट टेस्ट खेळल्या असून, सगळ्या जिंकल्या आहेत. पहिलीवहिली डे-नाईट टेस्ट अॅडलेड इथंच झाली होती. तसंच याच मैदानावर आधी झालेल्या एका डे नाईट कसोटीत ऑस्ट्रेलियानं भारतालाही पराभूत केलं आहे.
तर भारतानं आतापर्यंतच्या चारपैकी तीन डे नाईट कसोटी सामन्यांत विजय मिळवला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
दिवसभर चालणारी टेस्ट सकाळी साडेनऊला सुरू होते. दोन तासांनंतर लंच होतो. मग दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होतो. दोन तासांनंतर चहापानाचं सत्र असतं आणि त्यानंतर दोन तास खेळ होतो.
डे-नाईट टेस्ट दुपारी 1 ते 1.30च्या दरम्यान सुरू होते. दोन तासानंतर 20 मिनिटांचं चहापानाचं सत्र असतं. त्यानंतर दोन तासांच्या खेळानंतर सपर म्हणजेच रात्रीच्या भोजनाचं 40 मिनिटांचं सत्र असतं.
त्यानंतर दोन तासांचा खेळ होतो आणि साधारण 9 ते 9.30च्या बेतात खेळ थांबतो. 90 ओव्हर्सचा खेळ होणं अपेक्षित आहे.
डे-नाईट टेस्टचं प्रस्थ का वाढतं आहे?
वनडे आणि ट्वेन्टी-20 फॉरमॅटच्या आक्रमणानंतर टेस्ट मॅचेसची लोकप्रियता घसरणीला लागली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजदरम्यान याचा प्रत्यय आला.

फोटो स्रोत, Getty Images
टेस्ट मॅच सकाळी 9.30 ते संध्याकाळी 4.45 या वेळेत पाच दिवस सुरू राहत असल्याने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार वर्ग, उद्योजक, महिला वर्ग यांना टेस्ट मॅच स्टेडियममध्ये जाऊन बघणं किंवा टीव्हीवर बघणं कठीण असतं.
मात्र डे-नाईट टेस्ट दुपार ते रात्र अशी चालत असल्याने किमान दोन सत्रं अनुभवण्याची संधी क्रिकेट रसिकांना मिळते.
भारतात पहिली डे-नाईट वनडे 1984 मध्ये झाली होती. पहिली डे-नाईट रणजी मॅच ग्वाल्हेर इथं 1996-97 मध्ये झाली होती. पहिली पिंक बॉल मॅच 2016 मध्ये कॅब सुपर लीग स्पर्धेची फायनल झाली होती.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











