भारताचा पहिला ऑस्ट्रेलिया दौरा, एकीकडे फाळणी अन् दुसरीकडे पुण्यात संघाचा सराव

क्रिकेट

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, गुलू इझकिल
    • Role, क्रीडा पत्रकार

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघामध्ये असलेली स्पर्धा अगदी 1947-48 या काळापासून असलेली दिसून येतं.

अ‍ॅशेस स्पर्धेची जशी वाट पाहिली जाते तशीच या दोन्ही संघातील सामन्यांचीही वाट पाहिली जाते.

मात्र, या दोन्ही संघांमधील सामन्यांची सुरुवात जेव्हा झाली होती, तेव्हा दुसरीकडं भारताचं स्वातंत्र्य आणि फाळणीचा रक्तरंजित इतिहास घडत होता.

त्यामुळं तेव्हाचे भारतीय खेळाडू एका बाजूला आपल्या मायदेशातील जातीय दंगली आणि हिंसक तणावाशी लढा देत होते; तर दुसऱ्या बाजूला ते ऑस्ट्रेलियातील दिग्गज आणि अजिंक्य असलेल्या खेळाडूंशी लढण्याची तयारीही करत होते. काय आहे हा इतिहास, पाहूयात.

1947 साली, जेव्हा भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्याची तयारी करत होते तेव्हा भारतात अभूतपूर्व उलथापालथ घडत होती. ही उलथापालथ ऐतिहासिक आणि निर्णायक होती.

भारताला स्वातंत्र्य तर मिळालं होतं पण त्याचबरोबर देशाची फाळणी होऊन पाकिस्तान नावाच्या नव्या देशाचीही निर्मिती झाली होती.

ही फाळणी म्हणजे इतिहासातील अतिशय रक्तरंजित आणि द्वेष, सूड आणि बदल्याच्या भावनेनी भारलेली कहाणी होती.

लाखो लोक देशाच्या सीमा ओलांडून जात होते. एका बाजूला हिंदू आणि शीखांमध्ये तर दुसरीकडे मुस्लिमांमध्ये धार्मिक तेढ कमालीची वाढली होती.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

एकीकडे, अशा प्रकारचे घटनाक्रम सुरू होते. पण त्याच्या काही महिन्यांआधीच 16 खेळाडूंचा भारतीय संघ निवडण्यात आला होता. हा संघ ऑस्ट्रेलियाच्या विरोधात क्रिकेट स्पर्धेत उतरणार होता.

या महत्त्वाच्या मालिकेची तयारी करत असताना हे खेळाडू वैयक्तिक आणि राष्ट्रीय पातळीवर अशा दुहेरी वादळाला तोंड देण्याची तयारी करत होते.

त्यावेळी अँथनी डी मेलो हे बीसीसीआयचे अध्यक्ष होते. त्यांनी फाळणीपूर्व अखंड भारताचा नकाशा समोर ठेवून भारतीय संघाची घोषणा केली होती.

संपूर्ण भारतातील लोक या संघाचे प्रतिनिधित्व करतील, अशा पद्धतीनेच या संघाची घोषणा करण्यात आली होती.

लाल रेष

या बातम्याही वाचा:

लाल रेष

तेव्हा भारतीय क्रिकेट टीम ‘ऑल इंडिया’ म्हणजे अखिल भारतीय या नावाने ओळखली जायची. 1932 ते 1946 या काळात या संघाने अधिकृत कसोटी सामन्यांसाठी तीन ते चारवेळा दौरा केला होता. प्रत्येक दौऱ्यातील मालिकेत त्यांचा पराभव झाला होता.

1946 मध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार लिंडसे हॅसेट यांनी दुसऱ्या महायुद्धात ऑस्ट्रेलियाच्या मित्र देशांनी विजय मिळवल्याबद्दल ऑस्ट्रेलियन सर्व्हिसेस टीमला भारतात आणलं होतं.

या अनधिकृत तीन सामन्यांच्या मालिकेत भारताला 1-0 असा विजय मिळाला होता. भारताच्या याच विजयानंतर मग हॅसेट यांनी ऑस्ट्रेलियात जाऊन सांगितलं की, भारतीय संघामध्ये देखील आपल्याबरोबर अधिकृत मालिका खेळण्याची क्षमता आहे.

फाळणीच्या वेळचे छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

भारतीय संघ बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा सामना करणार असल्यामुळे अतिशय उत्साहात होता. दिग्गज फलंदाज डोनाल्ड ब्रॅडमन हे ऑस्ट्रेलियन संघाचं नेतृत्व करत होते.

1948 मध्ये जेव्हा ते इंग्लंडच्या दौऱ्यातून अपराजित होऊन आले तेव्हापासून त्या संघाला 'ब्रॅडमनचे अजिंक्य खेळाडू' असं संबोधण्यात आलं होतं.

डी मेलो यांनी निवड केलेल्या भारतीय संघाचं नेतृत्व सलामीचा फलंदाज असलेल्या विजय मर्चंट यांनी केलं होतं. उपकर्णधार म्हणून मुश्ताक अली यांनी त्यांना भक्कम साथ दिली.

1936 आणि 1946 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या मालिकेत दोघांनीही दमदार कामगिरी केली होती आणि नेतृत्वाला बळकटी दिली होती.

या संघात श्रेष्ठ फलंदाज रुसी मोदी यांचा समावेश होता आणि वेगवान गोलंदाज फझल महमूद यांनीही पदार्पण केलं होतं. त्यामुळे अनुभवी आणि नवोदित अशा दोन्ही खेळाडूंचं मिश्रण या संघात होतं.

मात्र, वैद्यकीय कारणांमुळे मोदी आणि मर्चंट यांनी या दौऱ्यातून माघार घेतली होती. मोठ्या भावाचा मृत्यू झाल्यामुळे अली यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली होती. त्यामुळे त्यांनीही माघार घेतली होती.

याचा परिणाम म्हणून लाला अमरनाथ यांची कर्णधार म्हणून आणि विजय हजारे यांची उपकर्णधार म्हणून नियुक्ती झाली.

मात्र, फाळणीमुळे उद्भवलेल्या हिंसाचारामुळे अमरनाथ ऑस्ट्रेलियाला पोहोचू शकले नाही. 2004 मध्ये रजिंदर अमरनाथ यांनी त्यांच्या वडिलांचं चरित्र लिहिलं. त्यात त्यांनी सांगितलं की, त्यावेळी पंजाबमध्ये पटियाला येथे झालेल्या बॉम्ब हल्ल्यात ते थोडक्यात बचावले.

त्यांचं घर सध्याच्या पाकिस्तानातील लाहोरमध्ये होतं. त्यांच्या घरी महागड्या कलात्मक वस्तू होत्या. ते घर हिंसाचारादरम्यान उद्धवस्त झालं होतं.

दिल्लीपर्यंत केलेल्या प्रवासातही त्यांना धोका निर्माण झाला होता.

पंजाबमध्ये एका स्टेशनवर एका पोलीस अधिकाऱ्याने त्यांना ओळखलं आणि त्यांना हातात घालण्यासाठी कडं दिला.

कडं शीख धर्मियांची धार्मिक निशाणी म्हणून ओळखली जाते. ते कडं पाहूनच जमावाने त्यांना सोडून दिलं. ते आपल्याच धर्माचे आहेत असा त्यांचा समज झाला असावा.

तर दुसऱ्या बाजूला वेगवान गोलंदाज महमूद यांनाही हिंसक जमावाचा रेल्वेत सामना करावा लागला.

त्यावेळी या संघाचं 15 ऑगस्टपासून पुण्यात (तत्कालीन पुना) दोन आठवडे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. मात्र, त्याच दिवशी भारताची फाळणी होईल, याची कोणी कल्पनाही केली नव्हती.

अनेक बंधनं असूनही महमूद पुण्याला प्रशिक्षणासाठी पोहोचले. त्यानंतर ते मुंबईला (तत्कालीन बॉम्बे) गेले आणि तिथून लाहोरला गेले.

2003 मध्ये प्रकाशित झालेल्या आत्मचरित्रात ते सांगतात की, ट्रेनमध्ये दोन माणसांनी त्यांना धमकावलं. मात्र, भारताचे माजी कर्णधार सी. के. नायडू यांनी बॅट हाती घेत, त्यांना पिटाळून लावलं.

माजी क्रिकेटपटू

फोटो स्रोत, Gulu Ezekiel

ते जेव्हा लाहोरला गेले तेव्हा लाहोरमध्ये संचारबंदी लागू होती. तिथे झालेला रक्तपात पाहून त्यांनी ऑस्ट्रेलिया दौरा रद्द करून पाकिस्तानमध्येच राहण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर ते पाकिस्तान क्रिकेट संघाचा भाग झाले. 1952-53 या काळात त्यांनी भारतीय संघाविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केलं.

त्यावेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारतीय संघातील आणखी दोन सदस्य गुल मोहम्मद आणि अमीर इलाही सुद्धा पाकिस्तानात गेले आणि 1952-53 मध्ये भारताविरुद्ध झालेल्या मालिकेचा भाग बनले.

इतक्या अडचणी येऊनसुद्धा भारताचा दौरा पार पडला. कमकुवत झालेल्या भारतीय संघाने चार आघाडीच्या खेळाडूंविना ऑस्ट्रेलियाचा सामना केला. या मालिकेत त्यांचा 4-0 ने पराभव झाला.

आता हे दोन संघ दर दोन वर्षांनी एकमेकांविरुद्ध खेळतात. मात्र, 1947-48 या काळात भारतात इतकी वादळी परिस्थिती असताना हा दौरा होऊ शकला, हाच एक चमत्कार होता.

गुलू इझिकिल यांनी खेळाशी निगडीत 17 पुस्तकं लिहिली आहेत. 'सलीम दुरानी: द प्रिंस ऑफ इंडियन क्रिकेट' हे त्यांचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)