'विराट-रोहित' युगाचा अंत झालाय का? कसोटी जगज्जेते होण्याचं त्यांचं स्वप्न अजूनही पूर्ण होऊ शकतं?

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली

फोटो स्रोत, Abhishek Chinnappa/Getty Images

फोटो कॅप्शन, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली
    • Author, विमल कुमार
    • Role, वरिष्ठ क्रीडा पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

नैराश्याच्या काळात नेहमी असं बोललं जातं की, 'आपल्या संकटांचा कधीच अंत होणार नाही'.

भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा न्यूझीलंडने केलेला दारुण पराभव पाहून आता अनेकांना क्रिकेट संघाच्या सिनिअर खेळाडूंच्या कसोटीतील भविष्याबाबत चिंता वाटू लागलेली आहे.

न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवानंतर क्रिकेट चाहत्यांना भारतीय संघाचं भविष्य अंधःकारमय दिसू लागलं आहे.

निदान पुढच्या वर्षी जानेवारीपर्यंत, भारतीय क्रिकेट संघाबाबत आता काही नवीन घडू शकेल असं वाटत नाहीये.

न्यूझीलंडचा अनुभवी खेळाडू केन विल्यम्सनच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या किवी संघाने भारतीय संघाला निव्वळ 'व्हाईटवॉश'च दिला नाही, तर भारतीय संघाचा सलग 18 मालिका विजयाचा रथ देखील त्यांनी यशस्वीरीत्या रोखला आहे.

खरंतर घरच्या मैदानावर भारतीय संघ बलाढ्य मानला जायचा, भारतीय संघाला त्यांच्या मैदानावर हरवणं हे अनेक मातब्बर संघाला सहज जमलेलं नव्हतं, घरच्या मैदानात सलग तीन कसोटी सामने हरण्याची नामुष्की भारतीय संघावर कधी आलेली नव्हती पण हे सगळं करून दाखवलं आहे. न्यूझीलंडने मात्र ही सगळी मिथकं धुळीस मिळवली आहेत.

आणखी एक गोष्ट म्हणजे पुण्यात न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला अनुभवी डावखुरा फिरकीपटू मिचेल सँटनर हा मुंबईत खेळलासुद्धा नाही.

पण तरीही भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं. कसोटी क्रिकेटमध्ये मागच्या 25 वर्षांच्या इतिहासात भारतीय संघाने एवढी निराशाजनक कामगिरी कधीच केलेली नव्हती.

लाल रेष
लाल रेष

20व्या शतकाला निरोप देताना 1999-2000 मध्ये सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत असंच चिरडलं होतं.

हा पराभव एवढा मोठा होता की त्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिनने पुन्हा कधी भारतीय संघाचा नियमित कर्णधार होण्याचं धाडसच केलं नाही.

हा तोच काळ होता जेव्हा भारतीय क्रिकेट मॅच फिक्सिंगच्या आरोपांमधून बाहेर पडण्यासाठी धडपडत होतं. त्यानंतर सौरभ गांगुलीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेटमध्ये एका नव्या युगाची सुरुवात झाली.

त्यावेळी घरच्या मैदानावर झालेल्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट व्यवस्थापनात अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाने मायदेशातील कामगिरीचा आलेख तर उंचावलाच पण, परदेशी दौऱ्यांमध्ये देखील भारतीय संघ नियमित अंतराने यशस्वी होऊ लागला.

भारतीय क्रिकेट आता कोणत्या दिशेने जाईल?

आता प्रश्न असा आहे की, भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा व्यापक पातळीवर आत्मपरीक्षण होईल का? संघातील अनुभवी खेळाडूंचं योगदान आणि त्यांच्या भविष्याबाबत प्रामाणिकपणे निर्णय घेतले जातील का? त्यासाठी प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर तयार आहेत का?

या महिन्यात सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा त्यांचा हरवलेला फॉर्म पुन्हा मिळवू शकतात. टीम इंडिया सलग तीन वेळा ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकण्याची अद्भुत किमया देखील करू शकते.

मात्र, अशी कामगिरी करूनही भारतीय संघ एका कटू वास्तवापासून दूर राहू शकत नाही आणि ते म्हणजे रोहित-विराट युगाच्या शेवटाचा हा काळ आहे.

भारतीय क्रिकेट संघातील या दोन महान खेळाडूंचा करिष्मा असा रातोरात संपू शकत नाही मात्र तरीही भारतीय क्रिकेट संघ याच दोघांच्या भरवशावर पुढे जाऊ शकत नाही हेही तेवढंच खरं आहे.

2011 मध्ये केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटीत दिवसाचा खेळ संपवून पॅव्हेलियनमध्ये परतताना गौतम गंभीर आणि सचिन तेंडुलकर.

फोटो स्रोत, Duif du Toit/Gallo Images/Getty Images

फोटो कॅप्शन, 2011 मध्ये केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटीत दिवसाचा खेळ संपवून पॅव्हेलियनमध्ये परतताना गौतम गंभीर आणि सचिन तेंडुलकर.

क्रिकेट हा एक निर्दयी खेळ आहे. क्रिकेटचा इतिहास माहिती असणाऱ्यांना हे पक्कं ठाऊक आहे की एकेकाळी क्रिकेटवर अधिराज्य गाजवलेल्या महान खेळाडूंच्या कारकिर्दीचा शेवट हा त्रासदायकच असतो.

या खेळाने क्रिकेटच्या इतिहासातील महान खेळाडू डॉन ब्रॅडमन यांनाही सोडलं नाही, त्यांच्या अखेरच्या सामन्यांत ते भोपळा फोडू शकले नाहीत.

त्या डावात डॉन ब्रॅडमन यांना 100ची सरासरी गाठण्यासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता होती आणि क्रिकेटने ते होऊ दिलं नाही.

व्हीव्हीयन रिचर्ड्स, रिकी पॉन्टिंग आणि अनेकांसाठी क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकर यांसारख्या खेळाडूंनाही क्रिकेटने त्यांच्या वाढत्या वयाची जाणीव करून दिली.

या खेळाडूंनी धावांचे कितीही मोठे डोंगर रचले तरी त्यांच्या वाढलेल्या वयाच्या आकड्याचा विसर या खेळाने त्यांना कधीच पडू दिला नाही.

विराट कोहली आणि रोहित शर्मा

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचाही तोच काळ सुरु झालाय का?

या सामन्यात झालेल्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने हे मान्य केलं की एक कर्णधार म्हणून आणि एक फलंदाज म्हणून त्याला त्याचा सूर गवसलाच नाही.

पराभवानंतर संघाच्या कर्णधाराने पराभवाची जबाबदारी स्वीकारणं ही गोष्ट भारतीय क्रिकेटमध्ये सहसा घडत नाही. मात्र यावेळी रोहितकडे दुसरा पर्यायही नव्हता का? कारण ज्या मातीतून त्याने खेळाची सुरुवात केली त्याच मातीतून घडलेल्या दिग्गज माजी खेळाडूंनी कर्णधाराची कामगिरी, रणनीती आणि तंत्रावर कठोर टीका केल्या आहेत.

टीका करणाऱ्यांमध्ये मुंबईचे दिग्गज खेळाडू सुनील गावसकर, रवी शास्त्री आणि संजय मांजरेकर यांचा समावेश होतो.

जून 2024 मध्ये बार्बाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर भारतीय संघ ICC T20 विश्वचषक चॅम्पियन बनला.

फोटो स्रोत, Philip Brown/Getty Images

फोटो कॅप्शन, जून 2024 मध्ये बार्बाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर भारतीय संघ ICC T20 विश्वचषक चॅम्पियन बनला.

दुसरीकडे विराट कोहलीसाठी हा काळ 2014 च्या इंग्लंड दौऱ्यासारखा असू शकतो. त्या दौऱ्यात उजव्या यष्टीबाहेर जाणाऱ्या चेंडूशी छेडछाड करण्याच्या प्रयत्नात विराट वारंवार तंबूत परतत होता. मागच्या 5 वर्षांमध्ये विराटची सरासरी 55 वरून घसरून 30 पर्यंत खाली आली आहे.

सध्या विराटसाठी त्याच्या सवयीच्या 'विराट' धावसंख्या दुरापास्त झाल्या आहेत. एवढंच काय एकेकाळी शतकांचा शहंशाह अशी उपाधी मिळालेल्या विराटकडून आता शतकही होत नाहीये. दुसरीकडे 'फॅब फोर'मध्ये विराटसोबत गणला जाणारा इंग्लंडचा जो रूट शतकांमागून शतकं झळकावतो आहे. (4 वर्षात 18 शतक)

विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामान्यातल्या सहा डावांमध्ये मिळून 100 धावाही केलेल्या नाहीत. ही कामगिरी विराटच्या नावाला साजेशी नक्कीच नाहीये.

नेमकी चूक कुणाची?

विराट आणि रोहितचा समकालीन समजला जाणाऱ्या रवींद्र जडेजाने मुंबईच्या दोन्ही डावात 5-5 विकेट्स घेऊन टीकाकारांना शांत केले असले तरी, नाण्याची दुसरी बाजू अशी आहे की या सामन्यापूर्वी मागच्या 24 डावांत जडेजाने केवळ एकदाच 5 विकेट घेतल्या आहेत.

रविचंद्रन अश्विनच्या या मालिकेतील साधारण कामगिरीबाबत बोलणं योग्य ठरणार नाही कारण नुकत्याच झालेल्या बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत तो मालिकावीर ठरला होता.

आता याचा अर्थ असा होतो का? की यावर्षी भारताकडून कसोटीमध्ये सर्वाधिक धावा केलेल्या यशस्वी जैस्वालवर टीका केली जावी? किंवा मग मुंबईतील सामन्यात दोन्ही डावात अपयशी ठरलेल्या तरुण सरफराज खानला या पराभवासाठी जबाबदार धरलं जावं ज्याने बंगळुरूमध्ये 151 धावांची तडफदार खेळी केली होती?

किंवा मग सतत प्रभावी खेळ करणाऱ्या आणि स्वतःच्या खेळात सुधारणा करणाऱ्या शुबमन गिलला या पराभवासाठी जबाबदार ठरवलं जाणं योग्य असेल का? कारण शुबमन गिलने त्याच्या क्षमतेला न्याय देणारी कामगिरी आजवर केल्याचं दिसत नाही.

बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत रवींद्र जडेजाने नझमुल हुसेन शांतोची विकेट घेतल्यानंतर.

फोटो स्रोत, Prakash Singh/Getty Images

फोटो कॅप्शन, बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत रवींद्र जडेजाने नझमुल हुसेन शांतोची विकेट घेतल्यानंतर.

अशा प्रसंगामध्ये सोशल मीडियावर सतत बळीचा बकरा बनवला जाणारा के.एल. राहुल मागच्या दोन सामन्यात अंतिम अकरा खेळाडूंमध्ये नव्हता म्हणून तो कदाचित या टिकेपासून वाचला आहे.

भारतासाठी या संपूर्ण मालिकेत ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर या दोन खेळाडूंची कामगिरी हीच एक सकारात्मक बाब घडली आहे. योगायोग असा की याआधीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात हेच दोन खेळाडू भारतीय संघाचे संकटमोचक ठरले आहेत.

न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमची विकेट घेतल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर.

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE/AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमची विकेट घेतल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर.

असं असलं तरी या दोघांच्याच भरोशावर भारतीय संघ ऑस्ट्रेलियात विजयी होऊ शकेल असं म्हणता येणार नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या एकदिवसीय वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात अपयशी ठरल्यानंतरही रोहित शर्मा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी संघातील अनुभवी खेळाडूंवरील विश्वास कमी केला नाही आणि त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनी झालेल्या टी-20 विश्वचषकात भारताने संस्मरणीय विजय मिळवला होता.

पण, न्यूझीलंडविरुद्धच्या या दारुण पराभवानंतर मात्र भारतीय संघाला कसोटी क्रिकेटमध्ये सहा महिन्यांचा अवधी मिळणार नाही आणि संघातल्या खेळाडूंना सहा आठवड्यांपेक्षा जास्त वेळही राहणार नाही.

या सहा आठवड्यांत रोहित-विराट-अश्विन-जडेजा आणि बुमराह यांनी आपली लय साधली, तर 29 जून 2024 रोजी बार्बाडोसमध्ये जे घडलं ते 7 जानेवारी 2025 रोजी सिडनीमध्येही घडू शकतं.

असं झालं तर आणखीन एका मोठ्या विजयासोबतच सध्याच्या पिढीतील या चॅम्पियन चौकडीला सन्मानाने निरोप देणं देखील शक्य होईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)