कामिन्दु मेंडिस : विनोद कांबळीचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या रेकॉर्डशीही बरोबरी

कामिन्दु मेंडिस
फोटो कॅप्शन, कामिन्दु मेंडिसने आठ कसोटी सामन्यांत आठ वेळा 50 धावांचा टप्पा पार केला
    • Author, मिर्झा एबी बेग
    • Role, बीबीसी उर्दू

श्रीलंकेचा कसोटी फलंदाज कामिन्दु मेंडिसने शुक्रवारी नाबाद 182 धावांच्या खेळीसह अनेक विक्रम मोडले तर अनेक विक्रमांची बरोबरी केली आहे.

त्याच्या या कामगिरीवर त्याचा सहकारी खेळाडू अँजेलो मॅथ्यूज म्हणाला, "ही तर त्याची सुरूवात आहे, पुढे बघा काय होतं."

कामिन्दु मेंडिस शुक्रवारपासून सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहे.

कामिन्दु मेंडिसने आठव्या कसोटी सामन्यात 8 वं अर्धशतक पूर्ण केलं, तेव्हा त्यानं पाकिस्तानी फलंदाज सऊद शकीलचा लागोपाठ 7 कसोटी सामन्यात 7 अर्धशतकं झळकावण्याच्या विक्रम मोडला.

सऊद शकील याचा हा विक्रम त्याच्या चाहत्यांना आणि कसोटी क्रिकेटच्या आकडेवारीवर लक्ष ठेवून असणाऱ्यांना चांगलाच लक्षात असेल.

आता शतक झळकावल्यानंतर हा 25 वर्षीय फलंदाज पहिल्या आठ कसोटी सामन्यांत 5 शतकं झळकवणारा पहिला आशियाई खेळाडू ठरला.

तसंच त्यानं महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमॅन यांच्या विक्रमाची बरोबरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या 13 डावांमध्ये 5 शतकं झळकावण्याचा हा विक्रम आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

पहिल्या पाच शतकांचा विचार केला तर वेस्ट इंडीजचे एव्हर्टन विक्स सर्वांत पुढं आहेत. त्यांनी कारकिर्दीत पहिल्या 10 डावांमध्ये 5 शतकं ठोकली होती. मात्र या तरुण खेळाडूचा विक्रमही महत्त्वाचा आहे.

विक्स यांच्या व्यतिरिक्त हर्बर्ट सटक्लिफ आणि रॉबर्ट हार्वी यांनी 12 डावांमध्ये हा पराक्रम केलेला आहे. तर सर डॉन ब्रॅडमन आणि कामिन्दु मेंडिसने 13 सामन्यांमध्ये ही कामगिरी बजावली आहे.

सर्वांत कमी डावांत पाच शतकांचा विक्रम

आशियापुरता विचार केल्यास कामिन्दु मेंडिस याने सर्वांत कमी डावांमध्ये पाच शतकं झळकावण्याचा विक्रम मोडला आहे.

हा विक्रम यापूर्वी पाकिस्तानी फलंदाज फवाद आलमच्या नावावर होता. त्यानं 22 डावांमध्ये हा पराक्रम केला.

कामिन्दु मेंडिस यानं षटकार खेचत 1000 धावा पूर्ण केल्या तेव्हा त्याने एक नवा इतिहास रचला.

भारतीय फलंदाज विनोद कांबळीचा विक्रम मोडत 13 डावांमध्ये 1000 पेक्षा अधिक धावा करणारा तो आशियातील पहिला फलंदाज बनला.

कामिन्दु मेंडिस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कामिन्दु मेंडिसने षटकार ठोकत आपल्या 1000 धावा पूर्ण केल्या.

विनोद कांबळीने हा पराक्रम 14 डावांमध्ये केला होता.

याचबरोबर सर डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाचीही बरोबरी केली. त्यांनी 13 डावांमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या होत्या. मात्र त्यावेळी ते केवळ सातच कसोटी सामने खेळले होते.

डावांनुसार विचार करता सटफ्लिक आणि विक्स यांनी 1000 धावा 12 डावांमध्येच बनवल्या होत्या. त्यांनी हा पराक्रम 9 कसोटी सामन्यांमध्ये केला होता.

कामिन्दु मेंडिसचे इतर विक्रम

30 सप्टेंबर 1998 रोजी श्रीलंकेच्या गॉल शहरात जन्मलेल्या कामिन्दु मेंडिसने 8 जुलै 2022 ला ऑस्ट्रेलिया विरोधात घरच्या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आणि त्याने 61 धावा काढल्या.

तेव्हापासून त्यानं मागं फिरून पाहिलंच नाही. त्यानं बांगलादेशविरोधात सिलहट येथे खेळल्या गेलेल्या कसोटीच्या दोन खेळींमध्ये शतक (102 आणि 164) झळकावले होते. त्यानंतर चटगावमध्ये बांगलादेशविरोधात पुढील सामन्यात नाबाद 92 आणि 9 धावा केल्या.

त्याचा पुढील सामना मँचेस्टरमध्ये इंग्लंडविरोधात होता. तिथं त्यानं पहिल्या डावात 12 धावा तर दुसऱ्या डावात शतक झळकावलं.

लॉर्ड्सवरील सामन्यात 74 आणि 4 तर ओव्हल मैदानावर 64 धावा फटकावल्या होत्या. त्यानंतर त्यानं न्यूझिलंडविरोधात देशांतर्गत मालिकेत पहिल्या कसोटीच्या पहिल्याच डावात 114 धावा चोपल्या. तर दुसऱ्या डावात 13 धावा काढल्या. त्यानंतर आठव्या कसोटीत नाबाद 182 धावा केल्या.

कामिन्दु मेंडिस

फोटो स्रोत, @OFFICIALSLC

फोटो कॅप्शन, कामिन्दु मेंडिस हा सर्वांत जलद 1000 धावा करणारा पहिला श्रीलंकेचा आणि पहिला आशियाई खेळाडू ठरला आहे.

अँजेलो मॅथ्यूज म्हणाला, "कामिन्दु मेंडिसचे द्विशतक हुकले. कारण लंचब्रेकनंतर डाव घोषित करण्याचा निर्णय आधीच झाला होता."

सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना मॅथ्यूज म्हणाला, "कामिन्दुच्या कारकिर्दीची ही सुरुवात आहे. त्यानं आतापर्यंत खेळलेल्या आठ सामन्यांमध्ये अविश्वसनीय कामगिरी केली आहे."

"आमच्यातील एक जण सर्व विक्रम मोडत असल्याचे पाहून खूप आनंद होत आहे. त्याचा खेळ अविश्वसनीय आहे, त्याच्याजवळ कौशल्य आहे, तसचे त्याच्याकडे खेळण्याची एक विशिष्ट शैली आहे, त्याच्यात धाडस आहे, एका फलंदाजाजवळ असायला हवं, ते सर्व त्याकडं आहे."

"त्याची परिपक्वता त्याच्या वयावरून कळते. आमच्यापैकी कुणीही त्याच्यासारखी कामगिरी करू शकला नाही. जी त्याने कारकिर्दीच्या या सुरूवातीच्याच टप्प्यात केली आहे."

निश्चितच मी गेल्या काही वर्षांमध्ये जेवढे चांगले फलंदाज पाहिले त्यापैकी एक हा आहे.

लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत?

सोशल मीडियावर लोक कामिन्दुचं कौतुक करत आहेत. त्याने केलेले विक्रम पोस्ट करत आहे. कुणी त्याची तुलना सर डॉन ब्रॅडमन यांच्यासोबत करत आहे, तर कुणी सुनिल गावसकर यांच्यासोबत. गावसकर यांनी पहिल्या 8 कसोटी सामन्यात 4 शतकं आणि 5 अर्धशतकं झळकावली होती.

यापूर्वीच्या विक्रमांशी कुणी तुलना करत आहे, तर कुणी त्याला महान म्हणत आहे.

क्रिकेटच्या इतिहासात कोहली आणि रोहितलाही हा विक्रम करता आला नाही, असंही काहीजण सोशल मीडियावर म्हणत आहेत.

कामिन्दु मेंडिस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वयाची 16 वर्षे पूर्ण होण्याआधीच मेंडिसने श्रीलंकेच्या अंडर-19 संघात आपली जागा बनवली होती.

कामिन्दु मेंडिस एक फलंदाज आहे, मात्र तो गोलंदाजीसाठीसुद्धा चर्चेत आहे. कारण तो दोन्ही हातांनी उत्तम गोलंदाजी करतो.

वयाची 16 वर्ष पूर्ण करण्याआधीच त्यानं श्रीलंकेच्या 19 वर्षाखालील संघात स्थान मिळवलं होतं. तसंच 2018 च्या 19 वर्षाखालील विश्वचषकात तो श्रीलंकेचा कर्णधार होता.

2018 मध्ये त्याची श्रीलंकेच्या टी-20 संघात निवड झाली. तर 2019 च्या एकदिवसीय संघातही त्याला संधी देण्यात आली होती. त्यानंतर 2022 साली त्याने कसोटी क्रिकेटमध्ये स्थान मिळवलं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.