ऋषभ पंतचं कसोटी क्रिकेटमध्ये दिमाखदार पुनरागमन

फोटो स्रोत, ANI
- Author, विमल कुमार
- Role, बीबीसी हिंदीसाठी
भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीमचा बॅट्समन-वीकेट कीपर ऋषभ पंतनं दीर्घ काळानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर तो पुन्हा चर्चेत आला आहे.
बांगलादेश विरुद्ध खेळल्या गेलेल्या चेन्नई कसोटी सामन्यात ऋषभ पंतनं धडाकेबाज फलंदाजी करत भारतीय संघासाठी तो किती उपयुक्त खेळाडू आहे हेच सिद्ध केलं आहे.
ऋषभ पंतच्या फॉर्ममुळे आणि चांगल्या खेळीमुळे सर्वांत जास्त आनंद झाला आहे तो भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला.
एकदा एका मुलाखतीत बोलताना रोहित शर्मानं ऋषभ पंतच्या फलंदाजीबद्दल त्याचं मत व्यक्त केलं होतं.
रोहित म्हणाला होता की त्याची इच्छा आहे की ऋषभ पंत जसा खेळतो, तसंच त्यानं खेळत राहिलं पाहिजे.
या मुलाखतीत रोहितनं हे देखील मान्य केलं होतं की ऋषभ ज्या प्रकारे फलंदाजी करतो, त्यामुळे त्याला अपयश देखील येऊ शकलं असतं. मात्र त्यानं स्वत:च्या खेळावर, शैलीवर विश्वास ठेवला.
ऋषभ पंतला या गोष्टीची जाणीव होती की त्याच्या फलंदाजीच्या शैलीत एक प्रकारची जोखीम आहे. मात्र त्याला स्वत:ची फलंदाजीची शैली बदलायची नव्हती. रोहित शर्माच्या मते, त्या त्या वेळची संघाची गरज लक्षात घेऊन ऋषभ पंत खेळत असतो.


मुलाखतीत रोहित शर्मा म्हणाला होता, "फलंदाजी करत असताना ऋषभ पंतला सामन्याची स्थिती माहीत असते. फलंदाजीच्या वेळेस सामना दोन्हीपैकी कोणत्याही संघाच्या बाजूनं जाऊ शकतो."
"त्यावेळेस ऋषभचा प्रयत्न असतो की सामन्यात आपण वरचढ कसं ठरावं आणि प्रतिस्पर्धी संघाची सरशी होता कामा नये. त्याच्या खेळामुळे संघाला फायदा देखील झाला आहे."
"फलंदाजीला आल्यावर पहिल्याच बॉलपासून समोरच्या संघाच्या बॉलर्सवर दबाव निर्माण करण्याचा ऋषभचा प्रयत्न असतो. या डावपेचाचा त्याला स्वत:ला आणि संघाला देखील फायदा झाला आहे. त्यामध्ये त्याला यश देखील मिळालं आहे. त्याचबरोबर संघाला देखील यश मिळालं आहे."
बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात अप्रतिम खेळी
ऋषभ पंत 629 दिवस कसोटी सामन्यांपासून दूर होता. इतक्या दिवसांनंतर त्यानं बांगलादेशविरुद्धच्या चेन्नईतील सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं.
चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात ऋषभ पंतनं सुरूवात तर चांगली केली होती. मात्र त्याला जास्त मोठी खेळी उभारता आली नाही. तो अर्धशतक देखील करू शकला नाही.
तर दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजीची सुरूवात डळमळीत झाली होती. फक्त 67 धावांवर भारताचे तीन फलंदाज बाद झाले होते.

फोटो स्रोत, ANI
त्यावेळेस ऋषभ पंत खेळपट्टीवर आला. दबाव झुगारून ऋषभ पंतनं दणक्यात फलंदाजी केली. त्याने शुभमन गिल बरोबर संघाचा डाव सावरला. या दोघांनी 167 धावांची जबरदस्त भागीदारी केली. या भागीदारीमुळे सामन्याच्या निकाल निश्चित झाला होता.
आपल्या शतकी खेळी दरम्यान ऋषभ पंतनं भारतीय क्रिकेटवर मोठा ठसा उमटवणाऱ्या महेंद्र सिंह धोनीबरोबर होणाऱ्या तुलनेत स्वत:ला पुढे नेलं आहे. महेंद्र सिंह धोनी हा ऋषभचा आदर्श आहे.
एक वाक्प्रचार आहे की 'गुरुपेक्षा शिष्य वरचढ'.
ऋषभ पंतच्या या खेळीचा बहुधा त्याचा गुरू महेंद्र सिंह धोनीला देखील अभिमान वाटला असेल.
त्यामागचं कारण देखील तसंच आहे. धोनीला 6 कसोटी शतकं करण्यासाठी 144 डाव खेळावे लागले होते. त्याउलट ऋषभ पंतने फक्त 58 डावांमध्ये हे साध्य करण्याची किमया करून दाखवली आहे.
ऋषभ पंतची ही शतकं देखील चांगल्या खेळपट्ट्यांवर आणि तगड्या प्रतिस्पर्ध्यांसमोर झाली आहेत. या 6 शतकांपैकी दोन शतकं इंग्लंड, एक शतक ऑस्ट्रेलिया आणि एक शतक दक्षिण आफ्रिकेत करण्यात आलं आहे.
दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात 4 शतकं झळकावण्याव्यतिरिक्त ऋषभनं 2021 मध्ये प्रसिद्ध गाबा कसोटी सामन्यात 89 धावांची एक नाबाद खेळी देखील केली होती. ऋषभची ही खेळीदेखील एखाद्या कसोटी शतकापेक्षा कमी नव्हती.
ऋषभबद्दलचा विश्वास
ऋषभ पंतच्या कारकिर्दीतील आकडेवारी पाहता, आतापर्यंतच्या करियरमध्ये ऋषभनं 6 वेळा 90 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. मात्र दुर्दैवानं तेव्हा त्याला शतक झळकावता आलं नाही.
म्हणजेच जर त्याने सर्वांना परिचित असलेल्या त्याच्या बिनधास्त शैलीत फलंदाजी न करता शतकाजवळ आल्यावर थोडं संयमानं फलंदाजी केली असती तर त्याच्या नावावर 12 शतकं राहिली असती.
रोहित शर्माने देखील कसोटी सामन्यांमध्ये 12 शतकं केली आहेत. याचा अर्थ ऋषभनं रोहितची बरोबरी केली असती.
बहुधा म्हणूनच ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार, महान खेळाडू आणि क्रिकेटच्या उत्तम जाणकारांपैकी एक असलेल्या इयान चॅपल यांनी ऋषभ पंतचं कौतुक केलं आहे.
काही महिन्यांनी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर चॅपल यांनी ऋषभ पंत आणि बुमराह या दोघांना 'इस्पीकचा एक्का' म्हटलं आहे.

फोटो स्रोत, ANI
महत्त्वाचं म्हणजे त्यांनी विराट कोहली किंवा रोहित शर्मा यांचं नाव न घेता पंत आणि बुमराहचं नाव घेतलं आहे.
एरवी भारताचे माजी खेळाडू कोणत्याही दौऱ्याआधी विराट किंवा रोहितचं नाव प्रामुख्यानं घेत असतात. मात्र त्याउलट चॅपल यांनी पंत आणि बुमराहकडे लक्ष वेधलं आहे.
खरंतर ऋषभ हा कसोटी सामन्यांमधील एक वैशिष्ट्यपूर्ण खेळाडू आहे. असा खेळाडू ज्यानं पांढऱ्या चेंडूनं खेळल्या जाणाऱ्या सामन्यात किमया केलेली नाही.
असं असतानाही कर्णधार रोहित शर्माचा ऋषभच्या गुणवत्तेवर, त्याच्या क्षमतेवर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळेच रोहितनं टी20 विश्वचषकाच्या संघात ऋषभचा समावेश केला. खरंतर कार अपघातामुळे ऋषभला भारतीय क्रिकेट संघातील स्थान गमवावं लागलं होतं.
यानंतर तो फक्त आयपीएल 2024 मध्येच खेळला होता. कदाचित खेळाडू म्हणून रोहित जसा करियरच्या सुरुवातीच्या टप्प्यात होता तसाच खेळाडू तो ऋषभ मध्ये पाहत असेल.

क्रिकेटसंदर्भातील इतर काही महत्त्वाच्या बातम्या :

रोहितचा भक्कम पाठिंबा
रोहित हा भारतीय क्रिकेटमधील अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहे. मात्र त्याला देखील मागील दशकभरात अनेक चढउतारांना तोंड द्यावं लागलं आहे. सर्व यश आणि अपयशाला तोंड देत तो कणखर झाला आहे. तो आता अधिक परिपक्व खेळाडू झाला आहे.
त्यामुळेच त्याचा स्वत:च्या खेळाकडे, संघाकडे आणि इतर खेळाडूंकडे पाहण्याचा दृष्टीकोन देखील अधिक व्यापक, परिपक्व झाला आहे.
कदाचित त्यामुळेच ऋषभ पंतसारख्या गुणी खेळाडूला भारतीय क्रिकेटनं कसं सांभाळावं आणि त्याच्या खेळाला कसं बहरू द्यावं याची अधिक चांगली समज रोहितमध्ये आहे.
कार अपघाताचा ऋषभला मोठा फटका बसला. जवळपास दीड वर्ष तो क्रिकेटपासून दूर गेला होता. जर हा अपघात झाला नसता आणि ऋषभ क्रिकेट खेळतच राहिला असता तर तो आज भारतीय संघातील प्रमुख खेळाडू म्हणून नावारूपाला आला असता.
भविष्यातील भारतीय संघाचा कर्णधार म्हणून आज सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, के एल राहुल, जसप्रीत बुमराह आणि शुभमन गिल या खेळाडूंची नावं घेतली जातात.
कदाचित भविष्यातील कर्णधार म्हणून ऋषभचं नाव या सर्वांच्या पुढे राहिलं असतं.

फोटो स्रोत, ANI
पांढऱ्या चेंडूनं खेळल्या जाणाऱ्या सामन्यांमध्ये ऋषभला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. कसोटी सामन्यांप्रमाणेच त्याचं या फॉरमॅटमधील सामन्यांमध्ये देखील संघातील स्थान पक्कं व्हायचं बाकी आहे.
मात्र लाल चेंडूनं खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यांमध्ये एका दिग्गज खेळाडूचा दर्जा त्यानं फार थोड्या कालावधीतच मिळवला आहे. हे त्याच्या फलंदाजीचं आणि त्याच्या गुणवत्तेचं यश आहे.
ज्याप्रमाणे चेन्नई कसोटीत ऋषभनं जबरदस्त फलंदाजी केली तशीच फलंदाजी त्याने इतर उर्वरित 4 कसोटी सामन्यांमध्ये (न्यूझीलंड विरुद्धचे तीन सामने) देखील केली.
या सामन्यांसारखाच फॉर्म त्याने कायम राखला तर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात तो टीम इंडियाचा उप-कर्णधार म्हणून देखील निवडला जाण्याची शक्यता आहे.
न जाणो तिथून पुन्हा एकदा त्याच्या करियरला कलाटणी मिळेल आणि भविष्यातील कसोटी सामन्यांसाठीचा भारतीय संघाचा कर्णधार म्हणून त्याचं नाव पुढे येऊ लागेल.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











