अजय जडेजा 'वारसदार' झालेल्या नवानगर संस्थानाची स्थापना कशी झाली होती?

फोटो स्रोत, GETTY IMAGES/JAMNAGAR.NIC.IN
- Author, जयदीप वसंत
- Role, बीबीसी गुजराती
भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा यांना गुजरातच्या नवानगर संस्थानचा 'वारसदार' जाहीर करण्यात आलं आहे. ते शत्रूशल्य सिंह जडेजा यांची जागा घेतील.
शत्रूशल्य सिंह हे नवानगर संस्थानचे माजी शासक आहेत. या भागाला आता जामनगर म्हणून ओळखलं जातं. शत्रूशल्य सिंह यांनी एक निवेदन जारी करून यासंदर्भातील घोषणा केली आहे.
अजय जडेजा हे त्यांचे थेट वारस नाहीत.
अजय जडेजा यांच्या आधी रणजीत सिंह आणि दुलीप सिंह हे या घराण्यातील प्रसिद्ध क्रिकेटपटू आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये रणजी आणि दुलीप ट्रॉफी स्पर्धा प्रसिद्ध आहेत. या दोन ट्रॉफींना याच दोन्ही क्रिकेटपटूंची नावं देण्यात आली आहेत.
याशिवाय या घराण्यातील काही सदस्यांनी ब्रिटिश राजवटीत आणि भारत स्वतंत्र झाल्यावर लष्करात देखील सेवा बजावली आहे.
1540 साली नवानगर संस्थानची राजधानी म्हणून जामनगरची स्थापना झाली होती. हा संस्थानची कहाणी कच्छपासून सुरू होते.


कधीकाळी जडेजा हे कच्छचे राजे होते. मात्र, राजघराण्यातील राजकारण आणि अंतर्गत कलहामुळे त्यांनी त्यांचा प्रदेश सोडला होता.
जवळपास 480 वर्षांपूर्वी त्यांनी गुजरातच्या सौराष्ट्र भागात नवीन राजवटीची स्थापना केली होती.
राजघराण्यातील अंतर्गत राजकारणाची सुरुवात
कच्छमध्ये जामरावाल आणि जमहमिर यांच्यात त्यांच्या पूर्वजांच्या काळापासून सीमेबद्दलचा वाद होता. हा वाद सोडवण्यासाठी जामरावालांनी पुढाकार घेतला. ते हबाई इथं आले.
हबाई ही जमाहमिर यांची राजधानी होती. त्यानंतर जमहमिरांनी त्यांची राजधानी लखियारविरा इथं हलवली आणि तिथे त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला.
दरम्यान रावल यांनी त्यांच्या भावाचा, हमिर यांचा विश्वास संपादन केला. मात्र, त्यांच्या मनात वेगळीच योजना होती. त्यांनी जमहमिर यांना स्वत: तिथे येण्याचं आमंत्रण दिलं.
'कॉम्प्रेहेन्सिव्ह हिस्ट्री ऑफ कच्छ' या पुस्तकात (भाग पहिला, पान क्रमांक 120-130) बापालाल जडेजा लिहिलं आहे की "हामिरजी यांचा विश्वास संपादन करण्यात रावल यशस्वी झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून जाम हामिरजी यांनी तिथे जाण्याचा निर्णय घेतला."
त्यावेळेस त्यांचे मेहुणे रायबजी पारकर वीरगाव इथं गेलेले होते. खेंगरजी आणि साहेबजी त्यांच्याबरोबर होते.

फोटो स्रोत, Getty Images
जामरावालजी यांच्या मावशी विंझाना इथं राहत होत्या. त्या जामखेंगरजी यांच्या नातेवाईक होत्या. त्यांना यात कटाचा वास आला. त्यामुळे त्यांनी या दोन राजपुत्रांना रात्रभर मुक्काम करण्यासाठी बोलावलं.
'श्रीयदूवंशप्रकाश'मध्ये दिलेल्या माहितीनुसार (भाग दोन, पान क्रमांक 163-169), जामरावाल यांनी विश्वासघातानं जमहमिरजी यांची हत्या केली.
तिकडे मावशीनं एका विश्वासू सेवकाबरोबर खेंगरजी आणि साहेबजी या दोन कुंवरना अहमदाबादला पाठवलं.
त्यानंतर अहमहदाबादला त्यांनी त्यावेळेसचा गुजरातचा सुलतान मुहम्मद बेगदा याची मदत घेतली. तो या दोन राजपुत्रांचा सावत्र भाऊ होणार होता.
राव खेंगरला सुलतानचा पाठिंबा आणि मदत मिळाल्यानंतर त्यानं हळूहळू जामरावालचा प्रदेश ताब्यात घेण्यात सुरुवात केली.
एका टप्प्यावर जामरावालनं सौराष्ट्र-हलार वत काबीज केलं आणि कच्छ कायमचं सोडलं.
'श्रीयदूवंशप्रकाश' मध्ये दिलेल्या माहितीनुसार (भाग दोन, पान क्रमांक 167-168), 'जमखेंगरशी लढाई करण्यास जाण्यापूर्वी जमरावाल आशापुरा मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी गेले.'
त्यावेळेस त्यांना असा आभास झाला की "तू माझी खोटी शपथ घेऊन हमिरजींचा विश्वासघात केला आहेत. तू कच्छ सोडून दुसरीकडे जाशील, तेव्हाच मी तुला मदत करेन." त्यामुळे जामरावाल यांनी इसर बारोट यांच्याशी तह केला.
नवानगरची स्थापना
जामरावाल यांनी एक नवीन शहर वसवलं. पुढे हेच शहर नवानगर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. या प्रदेशात राज्य करणाऱ्या 'जाम' राजांमुळे या प्रदेश पुढे 'जामनगर' म्हणून प्रसिद्ध झाला.
गुजराती एनसायक्लोपीडियामधील या शहराबद्दलच्या माहितीनुसार, जामरावाल यांनी मानता जमतमाची यांच्याकडून सैन्यासाठी धान्य मागितलं. जमतमाची हा जामरावाल यांचे वडील जामलखा यांच्या हत्येच्या सूत्रधारांपैकी एक होता.
जमतमाचीनं त्याला धूळ पाठवली. जामरावाल यांनी त्याला शुभशकून मानत तमाचीवर चढाई केली आणि आमरनला पकडलं. 1535 मध्ये जामरावाल यांनी दक्षिण कच्छमधील नवलखी बंदराजवळ असणाऱ्या दहिंसरा गावात स्वत:ची सत्ता स्थापन केली.
तिथे राज्य करताना जामरवाल आणि त्यांचा भाऊ हरधोल यांनी एकापाठोपाठ एक प्रदेश ताब्यात घेण्यास सुरूवात केली. हरधोलजी यांनी चवडांचा पराभव केला आणि सध्याचा जोदिया आणि ध्रोल हा भाग स्वत:च्या ताब्यात घेतला.
तर जामरावाल यांनी वाधेलोजवळचं खंबालिया ताब्यात घेतलं. 1540 मध्ये जामरावालनं बेड इथं स्वतंत्र राज्याची स्थापना केली. त्यानंतर जेठवांच्या ताब्यातून रंगमती नदीच्या काठावरील नागमती आणि नागनेस ताब्यात घेतलं आणि 'नवानगर' वसवलं.

फोटो स्रोत, JAMNAGAR.NIC.IN
घुमली हून जेठवांनी काठी आणि वधेल हस्ताचा प्रदेश ताब्यात घेऊन हलारमध्ये सार्वभौम राज्य निर्माण केलं.
गुजराती एनसायक्लोपीडियामध्ये दिलेल्या माहितीनुसार, जामनगरमधून राजकोट, ध्रोल आणि गोंडलच्या शाखांचा विस्तार झाला. याव्यतिरिक्त भानवड, खिरसरा, जालिया, दिवाणी, विरपूर आणि खरेडी इत्यादी ठिकाणी देखील शाखा स्थापन झाल्या.
सौराष्ट्रमधील मोरबी येथील जडेजा राजघराणं हे कच्छमधील मूळ राजघराण्याचीच एक शाखा होती. याशिवाय मालिया-मियाना आणि कोटडा सांगानी इथंही जाडेजा वंशाची संस्थानं होती.
नवानगरचा इतिहास
मुघल काळातील काही वर्षांमध्ये (सन 1663-1709) त्यांचा नवानगरमध्ये तळ होता आणि तो इस्लामाबाद या नावानं ओळखला जायचा. नंतरच्या वर्षांमध्ये तिथल्या नियोजनबद्ध इमारती, घरं, बागा आणि सुविधांमुळे ते 'सौराष्ट्रचं पॅरिस' म्हणून ओळखलं जात होतं.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, नवानगर आणि सौराष्ट्रातील संस्थानांचं भारतात विलीनीकरण करण्यामध्ये नवानगरचे तत्कालीन शासक जामदिग्विजयजी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
नंतर स्थापन झालेल्या गुजरात राज्यात नवानगरला 'जामनगर' हे नाव मिळालं.

फोटो स्रोत, DARSHAN THAKKAR
लाखोटा तळं, सोलारियम, भुजिओ कोठो, खिजदिया पक्षी अभयारण्य, सागरी राष्ट्रीय उद्यान, दरबारगड, रणजीत सागर, आयुर्वेद विद्यापीठ आणि स्मशानभूमी इत्यादी ठिकाणं या परिसराचं आकर्षण आहेत.
जामनगरमध्ये भूदल, हवाई दल आणि नौदलाचे तळ आहेत. संपूर्ण भारतात अशी फार मोजकी ठिकाणं आहेत जिथे सैन्याच्या तिन्ही दलांचे तळ आहेत. जामनगर त्यातीलच एक आहे.
अजय जडेजा कोण आहेत?
नवानगर संस्थानचे माजी राजे शत्रशल्यजी यांनी दसऱ्याच्या दिवशी एक निवेदन जाहीर केलं की, अजय जडेजा यांनी नवानगर संस्थानचा वारसदार होण्याचं मान्य केलं आहे.
त्यांनी या गोष्टीची तुलना 14 वर्षांनी वनवासातून परतणाऱ्या पांडवांशी केली. ते म्हणाले की, अजय जडेजांचं 'जामसाहेब' होणं जामनगरच्या लोकांसाठी एक आशीर्वाद असणार आहे.
अजय जडेजा यांचे वडील दौलतसिंह जामनगर मतदारसंघातून खासदार होते. ते आणि शत्रूशल्य सिंह हे भावंडे होते.

फोटो स्रोत, ANI
दौलतसिंह यांच्या लोकसभा प्रोफाईलनुसार, 1971, 1980 आणि 1984 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर इथून खासदार म्हणून निवडून आले होते.
याआधी ते तालुका आणि जिल्हा पातळीवर पदाधिकारी होते. 1989 मध्ये दौलतसिंह यांचा भाजपा नेत्यानं पराभव केला होता.
1977 ते 1980 मध्ये दोलत सिंह गुजरात विधानसभेत आमदार होते. दौलतसिंह स्वत: एक क्रिकेटपटू होते. ते सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील होते.
क्रिकइन्फो (Cricinfo)या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, 1 फेब्रुवारी 1971 ला जामनगर इथे अजय जडेजा यांचा जन्म झाला आहे.
1983 मध्ये भारताला क्रिकेटचा विश्वचषक जिंकून देणारे भारताचे ख्यातनाम क्रिकेटपटू कपिल देव यांनी अजय जडेजाला क्रिकेटचे धडे दिले होते.
अजय जडेजानं आपल्या आक्रमक फलंदाजी, चपळ क्षेत्ररक्षण आणि चपळाईनं धावा घेण्याच्या कौशल्यामुळे क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली होती.
अजय जडेजा उजव्या हातानं फलंदाजी करायचे त्याचबरोबर मध्यमगती गोलंदाज देखील होते. 28 फेब्रुवारी 1992 ला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून त्यांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये पदार्पण केलं होतं.
तर नोव्हेंबर 1992 मध्ये दरबन इथं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्यात आलेला सामना हा त्यांचा पहिला कसोटी सामना होता.
2000 मध्ये अजय जडेजा पाकिस्तानविरुद्ध अखेरचा एकदिवसीय सामना आणि त्याचवर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळले होते.
वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2000 मध्ये त्यांच्यावर बूकीज बरोबर संबंध असल्याचा आणि सट्टेबाजीत सहभागी असल्याचा आरोप झाला होता. याचा त्यांच्या करियरला फटका बसला होता.
या आरोपामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) अजय जडेजा यांच्यावर क्रिकेट खेळण्यास पाच वर्षांची बंदी घातली होती. बीसीसीआयच्या या निर्णयाला अजय जडेजानं दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
याचा निकाल आल्यानंतर अजय जडेजा यांनी पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं होतं. त्यांनी दिल्ली आणि राजस्थान संघाचं कर्णधारपद सांभाळलं होतं.
याच दरम्यान अजय जडेजा यांनी चित्रपटांमध्ये देखील पदार्पण केलं होतं. सनी देओलबरोबर त्यांनी 'खेल' या चित्रपटात काम केलं होतं.
याशिवाय त्यांनी 'पल पल दिल के साथ'मध्येही भूमिका केली होती. याव्यतिरिक्त ते 'कपिल शर्मा' यांचा कॉमेडी शो आणि 'झलक दिखला जा' सारख्या शो मध्येही दिसले होते.
अजय जडेजा यांनी क्रिकेट समालोचकाची भूमिका बजावली. ते दिल्ली क्रिकेट संघाचे प्रशिक्षक देखील होते.
याचबरोबर 2023 मध्ये ते अफगाणिस्तानच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघानं चांगली कामगिरी करून दाखवली होती.
अजय जडेजा 'अ' श्रेणीचे 291 सामने खेळले आणि त्यात त्यांनी 8304 धावा केल्या. याशिवाय त्यांनी 196 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमधून 5359 धावा केल्या तर 111 प्रथम श्रेणी कसोटी सामन्यांमधून 8100 धावा केल्या.
याशिवाय 15 कसोटी सामन्यांमधील 24 डावांमधून त्यांनी 576 धावा केल्या.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना अजय जडेजानं 20 गडी बाद केले. तर प्रथम श्रेणी कसोटी सामन्यांमध्ये 54 गडी बाद केले. तर प्रथम श्रेणी सामन्यांमधून 49 गडी बाद केले.
नोव्हेंबर 2013 मध्ये नागपूर इथे ते शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळले. आता ते नवानगर राजघराण्याचा वारसदार म्हणून त्यांची नवी कारकीर्द सुरू करणार आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











