भारतात जेव्हा हिंदू, मुस्लिम, पारसी धर्मांचे क्रिकेट संघ होते आणि त्यांच्यात सामने खेळवले जायचे...

फोटो स्रोत, Getty Images
भारतात क्रिकेटच्या बाबतीत लोकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतो. भारतीय संघ जगात कुठेही खेळत असला, तरी लाखो क्रिकेटप्रेमी त्यांचा खेळ बघत असतात.
भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे, परंतु भारतात हॉकीपेक्षाही किक्रेटची लोकप्रियता अधिक आहे.
या खेळाच्या इतिहासातही अनेक रंजक टप्पे आले आहेत.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासाचा एक पैलू असाही आहे की, भारतात पूर्वी अशा प्रकारच्या क्रिकेट स्पर्धा होत असत ज्यामध्ये संघांची निर्मिती राज्य किंवा प्रदेशाच्या आधारावर नाही तर धर्माच्या आधारावर केली जात असे.
आज या गोष्टीवर विश्वास ठेवणं कठीण असलं, तरी एक काळ होता जेव्हा हिंदू संघाचा सामना मुस्लीम संघाशी होत असे, मुस्लिम संघाचा सामना पारसी संघाशी होई आणि पारसी संघ हा हिंदू संघाशी स्पर्धा करत असे.
अनेक वर्ष या स्पर्धा खेळवल्या जात होत्या. त्या पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी होत असे.
त्यावेळी वर्तमानपत्रे या स्पर्धांच्या बातम्यांना प्राधान्याने जागा देत असत.
या लेखात आम्ही तुम्हाला 'द बॉम्बे पेंटँग्युलर' या नावाच्या प्रसिद्ध असलेल्या स्पर्धेबद्दल सांगणार आहोत.
या स्पर्धेची सुरूवात कशी झाली, त्याच्याशी संबंधित विवाद कोणते आणि नंतर ही स्पर्धा कशी बंद पडली याची कहाणी खूप रंजक आहे.
भारतातील क्रिकेटची सुरुवात
भारतात क्रिकेटचा सर्वात जुना उल्लेख 18 व्या शतकातील तिसऱ्या दशकाच्या सुरुवातीला सापडतो.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात ‘बीसीसीआय’च्या अधिकृत वेबसाईटनुसार, त्या काळात गुजरातमधील कच्छमध्ये एका ब्रिटिश जहाजाने बस्तान बसवलं होतं.
त्या काळातील खलाशांच्या संदर्भावरून असं दिसून येतं की, वेळ घालवण्यासाठी ते इतर उपक्रमांबरोबरच क्रिकेटही खेळायचे.
त्यानंतर हळूहळू भारतात क्रिकेट खेळायला सुरूवात झाली. कलकत्ता क्रिकेट क्लबची स्थापना 1792 मध्ये झालेली.
लंडनच्या एमसीसी क्लबनंतर हा जगातला सर्वात जुना क्रिकेट क्लब आहे.
त्यावेळी भारतात सर्वप्रथम पारसी समाजानेच क्रिकेटला आपलसं केलं होतं.
1848 मध्ये पारसी समाजाने ओरिएंटल क्रिकेट क्लब सुरू केला. त्यानंतर पारसी समाजाने इतर अनेक क्रिकेट क्लब स्थापन केले.
त्याकाळी पारसी समाजाकडे साधनसंपत्तीची कमतरता नव्हती, याच कारणामुळे त्यांनी आपल्या संघाला ब्रिटनला पाठवण्याची परवानगी दिली.

फोटो स्रोत, Getty Images
1889-90 मध्ये इंग्लंडच्या जीएफ वर्नोन यांच्या नेतृत्वाखाली भारत दौर्यावर आलेल्या एका संघाचा पारशी समुदायाच्या संघाने चार विकेट्सने पराभव केला होता.
कोणत्याही भारतीय क्रिकेट संघासाठी हा मोठा विजय होता.
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, इतिहासकार आणि सचिन तेंडुलकरच्या ‘प्लेइंग इट माय वे’ या आत्मचरित्राचे सहलेखक बोरिया मजुमदार यांनी ‘द बॉम्बे पेंटँग्युलर’बद्दल लिहिलंय.
'द इंटरनॅशनल जर्नल ऑफ द हिस्ट्री ऑफ स्पोर्ट्स’ने ते प्रकाशित केलं आहे.
बोरिया मजुमदार आपल्या लेखात लिहितात, "पारशांनी अनेक क्रिकेट क्लब स्थापन केले. त्यावेळी मुंबईतील व्यापारी जगतात हिंदू समाज पारशी समाजाशी स्पर्धा करत असे. पारसी समाजानंतर हिंदूनी देखील क्रिकेट खेळायला सुरूवात करण्याचं हेदेखील एक कारण होतं."
1866 साली 'बॉम्बे युनियन' या नावाने पहिल्या हिंदू क्रिकेट क्लबची स्थापना झाली. एका बाजूला पारसी समाजाचे क्लब प्रदेशांच्या नावाने तयार झाले होते, तर दुसरीकडे हिंदूंचे क्लब जात आणि धर्मानुसार स्थापन करण्यात आले होते.”
1890 च्या दशकात 'द बॉम्बे पेंटँग्युलर' सुरू होण्यापूर्वी भारतात युरोपियन क्लब आणि पारसी समुदायांमध्ये दरवर्षी सामन्यांचं आयोजन केलं जात असे.
1907 मध्ये हे सामने तिरंगी झाले आणि हिंदू समाजाचा संघही त्यामध्ये सामील झाला.
1912 मध्ये मुस्लिम समाजाचा एक संघही सामील झाला आणि 1937 साली 'रेस्ट' या नावाने एक संघ तयार केला गेला, ज्यामध्ये अँग्लो-इंडियन आणि ख्रिश्चन समाजाचे खेळाडू होते.
पेंटँग्युलर टूर्नामेंट या नावाने ही स्पर्धा ओळखली जात असली तरी त्यात फक्त चार संघच भाग घेत असत.

फोटो स्रोत, Getty Images
कौशिक बंधोपाध्याय यांनी 'महात्मा ऑन पिच' नावाचं पुस्तक लिहिलं आहे, ज्यामध्ये त्यांनी 'द बॉम्बे पेंटँग्युलर' स्पर्धेबद्दल सविस्तरपणे लिहिलंय.
कौशिक लिहितात की, 1912 पर्यंत या स्पर्धेमुळे कोणत्याही प्रकारची मोठी जातीय घटना घडली नव्हती.
अशाप्रकारच्या स्पर्धा देशाच्या अन्य भागात म्हणजेच सिंध, लाहोर, दिल्ली आणि मध्य प्रांतांत आयोजित केल्या जात असत.
कौशिक लिहितात की, त्यावेळी भारतातील विविध समुदायांच्या आपापसातील स्पर्धात्मक भावनेमुळे क्रिकेटची लोकप्रियता झपाट्याने वाढत होती.
कौशिक सांगतात की, सामने पाहायला आलेली लोकं आपापल्या समाजाला पाठिंबा देण्यासाठी सामने पाहायला मैदानावर येत असत.
1930 च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत स्पर्धेमध्ये खिलाडूवृत्तीची भावना कायम असल्याचं पाहायला मिळायचं.
कौशिक लिहितात, "जेव्हा मुस्लिम संघाने 1924 मध्ये स्पर्धा जिंकली, तेव्हा हिंदू त्यांच्या विजयाचा आनंदात सामिल झालेले. मोहम्मद अली जिना यांनी देखील त्यांच्या चांगल्या खेळाचं कौतुक केलेलं.”
समाजांमधील स्पर्धेला जातीय स्वरूप कसं प्राप्त झालं?
प्रसिद्ध इतिहासकार ज्ञानेंद्र पांडे यांचा संदर्भ देत कौशिक यांनी लिहिलंय की, 1920 च्या दशकापूर्वी भारताकडे विविध समाजांचा समूह म्हणून पाहिलं जात असे, ज्याच्या चौकटीत 'द बॉम्बे पेंटँग्युलर' सारख्या स्पर्धा अगदी चपखलपणे बसायच्या.
1920 च्या दशकात भारताबद्दलचा हा दृष्टिकोन बदलण्यास सुरूवात झाली.

फोटो स्रोत, Getty Images
कौशिक लिहितात, “एक राष्ट्र म्हणून उदयास येणा-या भारतात या स्पर्धेने धर्मावर आधारित सांघिक स्पर्धांच्या आवश्यकतेबाबतच्या वादाला तोंड फोडलं.
वादात दोन गट पडले, त्यापैकी एकाने असं म्हटलं की, स्पर्धेद्वारे क्रिकेटच्या माध्यमातून समाजांना एकत्र आणण्याचा प्रयत्न होता, तर दुस-या गटाचं म्हणणं होतं की, अशा स्पर्धेमुळे चुकीची भावना निर्माण होत असून समाज एकमेकांपासून दूरावले जातायत."
कौशिक यांच्या म्हणण्यानुसार, 1928 मध्ये बीसीसीआयची स्थापना झाल्यानंतर या स्पर्धांविरोधात आवाज उठवला गेला, परंतु अनेक लोकांचा अशा स्पर्धांना पाठिंबा होता.
ते सांगतात, "1936 च्या बॉम्बे क्वाड्रँग्युलरच्या आधी हिंदू-मुस्लिम दंगली झाल्या होत्या. त्या वेळी 'द बॉम्बे क्रॉनिकल'ने म्हटलं होतं की ही स्पर्धा थांबवण्याची वेळ आलेली आहे. अन्यथा यामुळे समाजांमधील कटुता वाढेल.
1937 साली जेव्हा इतर बाजूंना स्पर्धेमध्ये सामिल केलं जात होतं तेव्हा जेसी मित्रा आणि जेएम गांगुली सारख्या मोठ्या व्यक्तींनी असं सुचवलं की, देशाच्या हितासाठी ही स्पर्धा बंद केली गेली पाहिजे.”
गांधींचे विधान
डिसेंबर 1940 पर्यंत या स्पर्धेवरून बराच वादंग माजला होता.
त्यावेळी हिंदू जिमखान्याचं एक शिष्टमंडळ गांधीजींचा सल्ला घेण्यासाठी आलं होतं.
त्यांचे विचार 'द कलेक्टिव वर्क्स ऑफ़ महात्मा गांधी' च्या 79 व्या खंडात छापलेले आहेत.
युरोपात सुरू असलेले दुसरे महायुद्ध आणि भारतातील अनेक नेत्यांच्या तुरुंगवासामुळे गांधीजींनी हे सामने थांबवण्याचं आवाहन केलं.
या स्पर्धेच्या जातीय स्वरूपावरही त्यांनी आपली मतं मांडली.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणाले, "मला बॉम्बेच्या लोकांना सांगायचंय की त्यांनी आपल्या खेळण्याची पद्धत बदलून हे जातीय सामने थांबवायला हवेत. मी महाविद्यालयांमधील खेळाचे सामने समजू शकतो, परंतु मला हे कळत नाही की हिंदू, मुस्लिम आणि पारशांमध्ये सामने का खेळवले जातात?"
गांधीजींच्या विधानानंतरही 1941 साली ही स्पर्धा खेळवली गेली. 1942 चा अपवाद वगळता 1946 पर्यंत एक स्पर्धा सुरूच होती. परंतु या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात विरोध होत होता.
कौशिक बंधोपाध्याय लिहितात, "पटियाला, नवानगर आणि विजयनगरम सारख्या संस्थानांनी स्पर्धेच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. नवानगरच्या जाम साहेबांनी आपल्या राज्यातील सर्व खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होण्यास बंदी घातलेली.
या गोष्टीचं पटियाला संस्थानानेही स्वागत केलं. पटियालाच्या महाराजांनीही असं जाहीर केलं की त्यांचा कोणताही खेळाडू सांप्रदायिकतेच्या आधारावर खेळल्या जाणार्या सामन्यांमध्ये सहभागी होणार नाही.”
या स्पर्धा कशा बंद पडल्या?
1943 ते 1945 पर्यंत या स्पर्धा योग्य पद्धतीने खेळल्या गेल्या.
कौशिक यांच्या मते, त्यावेळच्या प्रसारमाध्यमांतील वृत्तांकनामधून या स्पर्धेबाबत लोकांमध्ये किती उत्साह होता हे दिसून येतं.
कौशिक यांच्या मते, "शेवटची पेंटँग्युलर स्पर्धा फेब्रुवारी 1946 मध्ये खेळली गेलेली. त्या वर्षी भारतात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जातीय हिंसाचार झालेला. अशा परिस्थितीत क्रिकेट खेळणं अशक्य वाटत होतं. एवढंच नव्हे तर विविध समुदायांमधील वाढत्या तणावामुळे स्पर्धेचे मुख्य समर्थकसुद्धा ती रद्द करण्याच्या मताचे होते. बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष अँथनी डिमेलो यांनी त्यावेळी म्हटलेलं की, या स्पर्धेमुळे देशातील शांतता भंग होऊ शकते.
नंतर ती पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न झाले, पण त्याला यश आलं नाही.
बोरिया मजुमदार यांचं म्हणणे आहे की, या पेंटँग्युलर स्पर्धेकडे सुरुवातीपासून शेवटपर्यंत एका राजकीय आणि आर्थिक दृष्टिकोनातूनही पाहिलं पाहिजे.
ते म्हणतात, “आपण जर या स्पर्धेचा अभ्यास केला तर लक्षात येतं की, ही स्पर्धा बंद करण्यासाठी धर्मनिरपेक्षतेची जी प्रतिमा तयार केली गेली त्याला राजकीय आणि आर्थिक घटकही कारणीभूत होते.
पेंटँग्युलर स्पर्धेच्या खचाखच भरलेल्या स्टेडियमच्या तुलनेत बीसीसीआयच्या रणजी ट्रॉफीचे स्टँड रिकामी असत. त्यामुळे बोर्डाचं आणि पेंटँग्युलर चा विरोध करणाऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं.”
मात्र, 1946 मध्ये पेंटँग्युलर स्पर्धा बंद पडल्यानंतरही लोकांमध्ये रणजी ट्रॉफीबाबत विशेष उत्साह पाहायला मिळाला नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








