टीम इंडिया क्रिकेटमधली नवीन 'चोकर्स' बनलीय का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नवीन नेगी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
तिसरा वर्ल्डकप जिंकण्याचं भारतीय संघाचं स्वप्न पुन्हा एकदा धुळीस मिळालंय.
स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच वाघासारखा खेळ केलेला भारतीय संघ फायनलमध्ये मात्र अगदीच हतबल झालेला दिसला.
ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये भारताला उभं राहण्याची संधीही दिली नाही आणि आक्रमक खेळ करून सहाव्यांदा वर्ल्डकप त्यांच्या नावे केला.
फायनल आटोपल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा, मालिकावीर ठरलेला विराट कोहली, सर्वाधिक विकेट घेतलेला मोहम्मद शमी आणि सगळेच भारतीय खेळाडू अतिशय हताश होऊन ड्रेसिंग रूमच्या पायऱ्या चढताना दिसले.
लाखो चाहत्यांची निराशा
एकीकडे भारतीय संघातल्या खेळाडूंचं स्वप्न भंगलं होतं, तर दुसरीकडे प्रत्येक मैदानावर निळ्या रंगाचा महापूर घेऊन येणाऱ्या लाखो चाहत्यांच्या पदरातही घोर निराशा आली होती.
पण हे काही पहिल्यांदाच घडत नव्हतं, याआधी देखील भारतीय चाहत्यांना असं दुःखी व्हावं लागलेलं आहे. टीम इंडियाला सेमीफायनल, फायनल आणि ऐन मोक्याच्या क्षणी पराभव स्वीकारण्याची एक वाईट सवय लागलीय.

फोटो स्रोत, Getty Images
एकेकाळी जगभरातील मोठमोठया स्पर्धांमध्ये विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाबद्दल नाना तऱ्हेच्या चर्चा होत आहेत. नॉकआउट सामन्यांमध्ये भारताचा संघ हाराकिरी करतो असं म्हटलं जातंय.
जागतिक क्रिकेटच्या पटलावर टीम इंडियाला पहिल्यांदाच 'चोकर' म्हणून हिणवलं जातंय.
चोकर्स कुणाला म्हणतात?
चोकर्स या शब्दाचा अर्थ खूप सोपा आहे. निर्णायक क्षणी माती खाणाऱ्या संघाला क्रिकेटमध्ये चोकर्स म्हणतात. दबावात विस्कळीत होणाऱ्या आणि हाती आलेल्या संधीला वाया जाऊ देणाऱ्या संघावर हा शिक्का बसतो.
खरंतर भारतीय संघाबाबत बोलताना हा शब्द कुणीही वापरत नव्हतं पण मागच्या 10 वर्षात तब्बल 9 वेळा सेमीफायनल आणि फायनलमध्ये भारतीय संघ पराभूत झालेला असल्यामुळे, आता भारतीय संघाची ही एक नवीन ओळख बनत चालली आहे की काय असं वाटतंय.

फोटो स्रोत, Getty Images
2013 मध्ये भारताने इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंडला हरवून जिंकलेली चॅम्पियन्स ट्रॉफी ही शेवटची, त्यानंतर भारताने एकही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाहीये. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या त्या संघाने तेंव्हा ही कामगिरी केलेली होती.
टीम इंडियाने जिंकलेली ती शेवटची ट्रॉफी. त्यानंतर भारतीय कर्णधाराच्या हातात एकही आयसीसीचा चषक दिसला नाही.
निर्णायक सामन्यांमध्ये पराभूत होत आहे टीम इंडिया
1- इंग्लंडच्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 2014 मध्ये झालेल्या टी-20 वर्ल्डकप मध्ये भारतीय संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानलं जात होतं.
त्याही स्पर्धेत भारताने अपेक्षेप्रमाणे खेळ करत अगदी सहज फायनल गाठली होती. पण फायनलमध्ये श्रीलंकेने भारताला सहा विकेटने हरवलं.
युवराज सिंगने त्यावेळी भारतीय संघात पुनरागमन केलं होतं आणि त्याच्यासह इतर भारतीय फलंदाजांनी संथ खेळ केल्यामुळं तो सामना गमावल्याचं अनेकांनी म्हटलं होतं. युवराजने 21 बॉलमध्ये फक्त 11 रन काढले होते.
एकापेक्षा एक सरस फलंदाजांचा भरणा असलेल्या टीम इंडियाला 20 ओव्हर्समध्ये 130 धावा करता आलेल्या होत्या. श्रीलंकेच्या संघाने 13 बॉल राखून अगदी सहज तो विजय मिळवला आणि भारताच्या दुसऱ्या टी-20 वर्ल्डकप विजयाचं स्वप्न त्याहीवेळी अपूर्णच राहिलं.
2 - 2015 च्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ मोठ्या आत्मविश्वासाने मैदानात उतरला होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात 2011 ला जिंकलेला भारतीय संघ गतविजेत्यांचं वलय घेऊन ऑस्ट्रेलियाला गेला होता.
त्याही स्पर्धेत भारताने दमदार सुरुवात केली होती. साखळी स्पर्धेतील सामने जिंकून अगदी सहज सेमीफायनलही गाठली होती.
पण सेमीफायनलमध्ये यजमान ऑस्ट्रेलियाचा भारताला सामना करावा लागला आणि तिथे पुन्हा एकदा भारताचा पराभव झाला.
पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने 328 धावांचा डोंगर उभा केला आणि तो डोंगर चढताना दमछाक झालेल्या भारतीय फलंदाजांना फक्त 233 धावा करता आल्या. पुन्हा एकदा भारतीय संघ कांगारूंच्या देशातून रिकाम्या हाताने मायदेशी परतला.
3 - पुढच्याच वर्षी भारतात झालेल्या टी-20 वर्ल्डकप मध्ये टीम इंडियाला विजयाचा प्रबळ दावेदार मानलं जात होतं.
2016 मध्ये झालेल्या याही वर्ल्डकप मध्ये भारतीय संघ मजबूत होता आणि अपेक्षेप्रमाणे तो सेमीफायनलपर्यंत पोहोचला.

फोटो स्रोत, Getty Images
सेमीफायनलमध्ये आयपीएल स्टार्सचा भरणा असलेल्या वेस्ट इंडिज संघाशी भारतीय संघाचा सामना होणार होता. पहिल्या डावात भारताने 192 धावा केल्या.
धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजने अगदी सुरुवातीला काही विकेट्स गमावल्या. फायनलमध्ये आता जवळपास आपण पोहोचलोच आहोत अशा अविर्भावात भारतीय गोलंदाजांनी खेळ करायला सुरुवात केली होती.
पण अत्यंत बेभरवशी समजल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजच्या दोन फलंदाजांनी भारताला फायनलमध्ये जाण्यापासून रोखलं. लेंडल सिमेन्स आणि आंद्रे रसेलने आक्रमक बॅटिंग करत दोन बॉल बाकी असतानाच वेस्ट इंडिजला विजय मिळवून दिला.
4 - यानंतर भारतीय संघाच्या नेतृत्वात बदल झाला. धोनीने कर्णधारपदाची धुरा तरुण विराट कोहलीच्या खांद्यावर दिली.
धोनी कोहलीच्या नेतृत्वामध्ये खेळू लागला. 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारताने अतिशय सुरेख खेळ करत फायनलपर्यंत मजल मारली.
त्याआधी आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पाकिस्तानला भारताविरुद्ध विजयाचा 'मौका' कधीही मिळाला नव्हता. त्यामुळे सगळ्यांना असच वाटत होतं की भारत अगदी सहज हा चषक जिंकेल.
पण पाकिस्तानच्या डावखुऱ्या फखर झमानने भारताचं हे स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही. भारताविरुद्ध नेहमीच चांगली फलंदाजी करणाऱ्या फखरने तडाखेबंद शतक केलं आणि पाकिस्तानने पहिल्या डावात 358 धावा केल्या.
359 धावा करण्याचं लक्ष्य घेऊन मैदानात आलेल्या भारतीय फलंदाजांना काहीही करता आलं नाही आणि भारताचा संपूर्ण डाव फक्त 158 धावांमध्ये आटोपला.

फोटो स्रोत, Getty Images
5 - 2019ला इंग्लंडमध्ये झालेल्या वन-डे वर्ल्डकप मध्येही भारताने सेमीफायनल गाठली होती. त्या सामन्यात भारताचा सामना केन विलियम्सनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या न्यूझीलंडशी होणार होता.
मार्टिन गप्टिलने थेट स्टम्पवर बॉल मारून धोनीला रनआउट केलं आणि पुन्हा एकदा भारतीय संघाच्या हातातून वर्ल्डकप जिंकण्याची संधी निसटली.
भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची सवय लावलेल्या धोनीचा तो अंतिम सामना होता, त्यानंतर तो कधीही टीम इंडियाच्या 'निळ्या जर्सी'मध्ये खेळताना दिसला नाही.
दोन दिवस चाललेली ती सेमीफायनल भारतीय संघाने गमावली आणि टीम इंडियाला धोनीला साजेसा निरोप काही देता आला नाही.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही पराभव
6 - ज्याप्रमाणे एकदिवसीय सामन्यांमध्ये वर्ल्डकप होत होता अगदी त्याच पद्धतीची स्पर्धा कसोटी क्रिकेटमध्ये एव्हाना सुरु झालेली होती.
2021 मध्ये या स्पर्धेचा अंतिम सामना होणार होता. विराटच्या नेतृत्वात भारतीय संघाने जगभरात झालेले कसोटी सामने जिंकून फायनलही गाठली पण निर्णायक क्षणी दबावात येण्याची भारतीय संघाची परंपरा मात्र तिथेही कायम राहिली.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंडचे संघ एकमेकांशी भिडले. संयमी विलियम्सनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या न्यूझीलंडने आक्रमक विराट कोहलीच्या टीम इंडियाला रोखलं आणि आठ विकेट राखून कसोटी चॅम्पियनशिपची गदा हातात घेतली.
7 - त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 2022 मध्ये झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला पण इंग्लंडने त्या सामन्यात भारताचा तब्बल 10 विकेट राखून दारुण पराभव केला.

फोटो स्रोत, X@BCCI
8 - त्यानंतर भारतीय कसोटी संघाने पुन्हा एकदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठली. पण तिथेही ऑस्ट्रेलियाने भारताला 209 धावांनी हरवलं. ही फायनल गाठण्याआधीही भारताने अतिशय चांगला खेळ केलेला होता पण फायनलमध्ये त्याचा काहीही फायदा मात्र झाला नाही.
9 - नुकत्याच पार पडलेल्या क्रिकेट वर्ल्डकप बद्दल तर काही बोलायलाच नको. राउंड रॉबिन प्रकारात भारतीय संघाने स्वप्नवत खेळ केला होता. सेमीफायनलपर्यंत भारतीय संघाच्या जवळपासही कोणता संघ आहे असं वाटत नव्हतं. घरच्या मैदानावर खेळून, लाखो भारतीय पाठिराख्यांच्या पाठबळावर भारताला तिसऱ्यांदा वर्ल्डकप मिळेल असं वाटत असताना पॅट कमिन्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कांगारूंच्या संघाने पुन्हा एकदा भारतीय संघाला नमवत सहाव्यांदा वर्ल्डकप पटकावला.
फायनलमध्ये पुन्हा एकदा भारतीय संघाला कोंडीत पकडलं गेलं आणि सहा विकेट राखून ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला.
कोणकोणते संघ चोकर्स म्हणून ओळखले जातात?
भारतीय संघाच्या आधी चोकर्सचा शिक्का दक्षिण आफ्रिकेवर बसलेला आहे.
प्रत्येक स्पर्धेत तगडा संघ घेऊन येणारी दक्षिण आफ्रिका अंतिम टप्प्यात जाऊन कच खाते आणि त्या स्पर्धेतून बाहेर पडते. एवढंच काय मागच्या काही दशकांमध्ये अनेक दिग्गजांची मांदियाळी लाभलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आजपर्यंत एकदाही फायनल गाठली नाही.
न्यूझीलंडलाही अशीच काहीशी ओळख मिळालेली आहे आणि त्यामुळेच त्यांनी आजवर एकदाची वन-डे वर्ल्डकप जिंकलेला नाही.

फोटो स्रोत, Getty Images
हो पण न्यूझीलंडने भारताला वर्ल्डटेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताला हरवल्यामुळे चोकर्सची माळ न्यूझीलंडने स्वतःच्या गळ्यातून काढून भारतीय संघाच्या गळ्यात घातल्याच्या चर्चा त्यावेळी केल्या गेल्या होत्या.
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








