जेव्हा भारतीय आणि पाकिस्तानी क्रिकेटर्स एकत्र होळी खेळले आणि फाईव्ह स्टार हॉटेलने 50 हजाराचा दंड आकारला

फोटो स्रोत, twitter/gbhimani
- Author, वंदना विजय
- Role, बीबीसी प्रतिनिधी
जेव्हा भारत पाकिस्तान मॅच येते तेव्हा त्याचे अनेक रंग असतात. ही सगळ्यांत मोठी लढाई असल्याचं दाखवलं जातं.
दोन्ही देशात यापूर्वी अनेक उत्कंठावर्धक सामने झाले आहेत आणि खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली आहे.
मात्र मैदानाच्या पलीकडे पाहायचं झाल्यास भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये मधूर संबंधांच्या अनेक सुरस कथा आहेत.
1947 च्या आधी जेव्हा भारत पाकिस्तान फाळणी झाली नव्हती तेव्हापासून नात्यांचा हा सिलसिला सुरू आहे.
स्वातंत्र्यापूर्वी एक टीम अशी होती जी भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायची. त्यात लाला अमरनाथ, सीके नायडू, अब्दुल हफीज कारदार, फजल महमूद, अमीर इलाही आणि गुल मोहम्मद सारखे खेळाडू होते.
अब्दुल हाफीज कारदार, अमीर इलाही आणि गुल मोहम्मद हे लोक तर भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघासाठी खेळले.
इथे लाहौरचे वेगवान गोलंदाज फजल महमूद यांचा उल्लेख महत्त्वाचा आहे. पाकिस्तान क्रिकेटच्या आधी त्यांना पोस्टरबॉय म्हणून ओळखलं जातं.
1947 च्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड होणार होती. राय सिंह, लाला अमरनाथ, फजल महमूद अशा सर्व धर्माचे लोक होते. 19 वर्षांच्या फजल महमूद यांचीही टीमममध्ये निवड झाली होती.
पुढे जे झालं ते ऐतिहासिक होतं. डॉन द टस्क या त्यांच्या आत्मचरित्रात ते म्हणतात, “मला काही महिन्यांआधी सांगण्यात आलं की 15 ऑगस्ट 1947 ला लाहौर ते पुणे ट्रेनिंग कँपसाठी यायचं आहे. 14 ऑगस्ट 1947 ला जे झाले ते ऐतिहासिक होतं. तेव्हापर्यंत फाळणी झाली होती. अशा वेळी जेव्हा लोक इकडून तिकडे पलायन करत होते त्यावेळी मी लाहौरहून पुण्याला जात होतो. पंजाबमध्ये दंगली होत होत्या. तो फारच भीषण प्रवास होता.”

फोटो स्रोत, Getty Images
खरंतर सुरुवातीच्या योजनेनुसार भारताला नंतर स्वातंत्र्य मिळणार होतं. म्हणून भारतातील निवड समिती नवीन परिस्थितीशी जुळवून घ्यायला तयार नव्हती.
फजल महमूद त्यांच्या चरित्रात लिहितात, “शेवटी 1947 मध्ये भारताचा कँप उद्धवस्त केला गेला. माझ्यासमोर हे आव्हान होतं की दंगलीत पुण्याहून परत येताना लाहौरला कसा जाऊ कारण ते आता पाकिस्तानात गेलं होतं. मी पुण्याहून मुंबईला ट्रेनने आलो आणि माझ्या बरोबर सीके नायडूही होते. काही कट्टरवाद्यांची दृष्टी माझ्यावर पडली. त्यांना माझं नुकसान करायचं होतं. मात्र सीके नायडूंनी मला वाचवलं. ते आपली बॅट घेऊन समोर उभे राहिले आणि सगळ्यांना सांगितलं की माझ्यापासून दूर रहा.”
सीके नायडू अविभाजित भारताचे पहिले कर्णधार होते आणि दिग्गज खेळाडूंपैकी एक होते. त्यांच्या नावाने कर्नल सीके नायडू लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड दिला जातो.
फाळणीनंतर 1952 मध्ये पहिल्यांदा पाकिस्तानचा संघ भारतात आला होता. असं म्हणतात की पाकिस्तानचा संघ भारतात आला तेव्हा लाला अमरनाथ स्वत: त्यांना घ्यायला गेले होते.
त्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंचं येणं जाणं सुरू राहिलं आणि त्यांच्या मैत्रीचे किस्से तयार होत राहिले. मग ते इमरान खान आणि सुनील गावस्करचे असो किंवा मग जावेद मियांदाद आणि दिलीप वेंगसरकरांचे असो.
जेव्हा पाकिस्तान आणि भारतीय खेळाडू एकत्र होळी खेळले होते
जेव्हा भारत पाकिस्तान मॅच बद्दल बोलतोच आहोत तर 1986-87 च्या काळाबद्दल बोलूया. जेव्हा पाकिस्तानची टीम भारतात आली होती. बंगळुरूमध्ये टेस्ट मॅच सुरू होती. हा तो काळ होता जेव्हा टेस्ट मॅचमध्ये एक दिवसाचा रेस्ट डे असायचा.
मॅचचा तिसरा दिवस रेस्ट डे होता आणि त्यावेळी होळी होती. होळी भारतात अर्थातच मोठ्या प्रमाणात साजरी होते. पाकिस्तान गटात खेळाडू सकाळी सकाळी त्यांच्या खोलीत होते. अब्दुल कादिर, इमरान खान, वसीम अक्रम, रमीज राजा, जावेद मियांदाद, सलीम मलीक यांच्यासारखे अनेक खेळाडू तेव्हा हॉटेलमध्ये थांबले होते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
दिवसाची सुरुवात व्हायच्या आधीच भारतीय खेळाडूंनी रंग घेऊन त्यांच्यावर हल्ला केला. तेव्हाचे विकेटकीपर किरण मोरेही त्यांच्याबरोबर होते.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, “1987 मध्ये बंगळुरूमध्ये टेस्ट मॅच होती. होळीच्या दिवशी दोन्ही टीम्सने पूर्ण हॉटेल लाल केलं होतं. स्विमिंग पूलही लाल झाला होता.
पाकिस्तानी खेळाडू अतिशय उत्साहात होते. आम्हाला हॉटेलवाल्यांनी बोलावलं आणि आम्हाला दंडही भरावा लागला. बहुदा 50 हजाराचा दंड झाला होता. ती त्यावेळी मोठी रक्कम होती. आम्ही दुसऱ्या दिवशी मस्त मॅच खेळलो. मजा आली.
खेळामुळे लोक एकत्र येतात आणि हे अतिशय गरजेचं आहे. जावेद मियांदादच्या घरी 2004 मध्ये दिलीप वेंगसरकर आणि दुसरे खेळाडू गेले होते. तेव्हा मी निवड समितीत होते. त्यांनी मला जेवायला बोलावलं होतं. त्यांच्याबरोबर खेळायला मजा यायची. आम्ही स्लेजिंगही करायचो. विशेषत: भारत- पाकिस्तानचे खेळाडू. मैदानात आम्ही कट्टर प्रतिस्पर्धी असायचो. मात्र मैदानाच्या बाहेर भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू मिळून मिसळून राहतात, गाणी म्हणतात आणि भरपूर दंगा करतात.”
मणिंदर सिंह आणि सलीम मलिक यांची मैत्री
तज्ज्ञ सांगतात की होळीच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ पाहिला तर तुम्हाला अनेक खेळाडूंचे हात रंगलेले दिसतील. 1987 मध्ये झालेली ही टेस्ट सीरिज पाकिस्तानने 1-0 ने जिंकली होती. मात्र ही सीरिज होळीच्या निमित्ताने जास्त लक्षात राहिली होती.
भारताचे माजी विकेटकीपर मणिंदर सिंहसुद्धा या टीमचा भाग होते.
आदेश कुमार यांच्याशी बोलताना बीबीसी आर्काईव्ह इंटरव्ह्यूमध्ये ते म्हणाले होते, “जेव्हा पाकिस्तानची टीम 1987 मध्ये भारतात आली होती तेव्हा सलीम मलिक पाकिस्तानसाठी फलंदाजी करत होते आणि मी गोलंदाजी करत होतो.

फोटो स्रोत, Getty Images
सलीम मलिक माझ्यावर अटॅक करण्याच्या प्रयत्नात होते आणि मी त्यांना चकवा देण्याच्या. माझी त्यांच्याशी चांगली मैत्री होती. संध्याकाळी आम्ही भेटायचो तेव्हा मजेमजेत एकमेकांना चॅलेंज करायचो. ते म्हणायचे की उद्या मी तुला पिचवर पाहून घेईन आणि मी म्हणायचो की मी पाहीन तू कसा रन काढतो. त्या दिवशीच्या संध्याकाळी ते मला म्हणाले की पिच कशीही असली तरी मी रन्स करणार आणि आमच्यात हे सुरू रहायचं. त्या टेस्ट मॅचमध्ये मी त्यांची विकेट घेतली होती.”
जसे जसे भारत पाकिस्तानचे संबंध बिघडत गेले तसंतसं एकमेकांकडे येणं कमी झालं.
इम्रान खान आणि गावस्कर यांचं नातं
आदेश कुमार गुप्ता गेल्या अनेक दशकांपासून क्रिकेट कव्हर करत आहेत. ते सांगतात, “मी एका कार्यक्रमात होतो जेव्हा पाकिस्तानचे माजी क्रिकेटर रमीज राजा यांनी हा किस्सा सांगितला.
भारताविरुद्ध सामन्यात इम्रान खान यांनी रमीज राजा यांना म्हटलं की जर तुम्हाला बॅटिंग शिकायची असेल तर इथे या. तेव्हा गावस्कर बॅटिंग करायचे. त्यांनी रमीज राजा यांना फॉर्वर्ड शॉर्ट लेगला उभं केलं. अर्ध्या तासानंतर रमीज राजा इम्रान खान यांना म्हणाले की तुम्ही मला कुठे उभं केलं. गावस्कर तर काहीच खेळत नाहीये. सगळे बॉल सोडले आहेत. इम्रान खान म्हणाले हेच तुला शिकायचं आहे.”
2018 मध्ये सुनील गावस्कर यांनी इम्रान खान यांच्यासाठी टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक लेख लिहिला होता.
गावस्कर यांच्या मते त्यांनी जेव्हा इम्रान खान यांना सांगितलं की ते रिटायर होत आहे, तेव्हा ते म्हणाले, “तू आता रिटायर होऊ शकत नाही. पाकिस्तान पुढच्या वर्षी भारतात येत आहे. मी भारताचा भारतात पराभव करू इच्छितो. जर तू टीम मध्ये नसलास तर विजय तसा होणार नाही. कम ऑन एकदा शेवटचं एकमेकांसमोर येऊ या. 1986 ची ही गोष्ट आहे. आम्ही लंडनमध्ये एकत्र जेवत होतो. आम्ही एकमेकांना 1971 पासून ओळखत होतो. तेव्हा इम्रान काऊंटी क्रिकेटमध्यं आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते."
पाकिस्तान क्रिकेटर आणि बॉलिवूड
पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार रशीद शकूर 'द सेकंड इनिंग' या नावाने एक युट्यूब चॅनल चालवतात. त्यांच्या चॅनलवर पाकिस्तानी बॉलर सिकंदर बख्त यांनी भारताशी निगडीत आठवणी सांगितल्या. ते 1979-80 मध्ये भारतात आले होते.
सिकंदर बख्त म्हणतात, “आमची अभिनेत्री रीना राय आणि तिच्या कुटुंबियांशी मैत्री झाली होती. एकदा रीना रॉय म्हणाल्या की त्या पाकिस्तानच्या टीमला जेवायला बोलावू इच्छितात.

फोटो स्रोत, Getty Images
अमिताभ, फिरोज, रेखा,लक्ष्मीकांत प्यारेलाल सगळे त्या पार्टीत आले होते. यांच्यापैकी लक्ष्मीकांत यांच्याशी माझी चांगली मैत्री झाली होती. मी त्यांना सांगितलं की तुमचं ‘चल चल मेरे भाई’हे गाणं पाकिस्तानच्या स्कुलबसमध्ये मोठ्या प्रमाणात वाजवलं जातं. तेव्हा हा पिक्चर रिलीज झाला नव्हता आणि हे गाणंही बाहेर आलं नव्हतं. लक्ष्मीकांत यांना धक्का बसला. ते मला किशोर कुमार यांच्या रेकॉर्डिंगमध्ये घेऊन गले. मी त्यांना जुनून पिक्चर पाहायचा असल्याचं सांगितलं तेव्हा माझ्यासाठी स्पेशल शो ठेवला होता. माझी प्रेम चोप्रा यांच्याशी मैत्री होती. आम्ही एकमेकांना पत्रं लिहायचो. असं आमचं नातं होतं.”
डिप्लोमसी आणि क्रिकेट
भारताच्या आणि पाकिस्तानच्या नात्यांच्या उतार चढावात क्रिकेटचा राजनैतिक म्हणूनही वापर केला गेला. 2004 मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वात जेव्हा भारतीय टीम पाकिस्तानला गेली तेव्हा तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी म्हणाले होते की फक्त स्पर्धाच नाही तर मनंही जिंका.
एप्रिल 2005 मध्ये परवेज मुशर्रफ क्रिकेट मॅच पाहायला आले होते. नंतर 2011 मध्ये सेमीफायनल मॅचमध्ये भारतीय पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी तत्कालीन पंतप्रधान युसुफ रजा गिलानी यांना बोलावलं गेलं होतं.
याआधी 1987 मध्ये पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जिया उल हक ही मॅच पाहायला भारतात आले होते. तेव्हा दोन देशांच्यामध्ये जबरदस्त तणाव होता.

फोटो स्रोत, Getty Images
क्रिकेट डिप्लोमसीच्या या जुन्या प्रयत्नांच्यामध्ये आता भारत आणि पाकिस्तानचे सामने न्युट्रल मैदानांवर होतात. म्हणजे भारतातही नाही आणि पाकिस्तानमध्येही नाही तर तिसऱ्याच जागी होतात. दोन्ही टीममध्ये आता सामने तर होतात. हारजीतही होतेच मात्र एकमेकांच्या घरी आधी ज्या मैफिली व्हायच्या त्या आता एक जुनी आठवण म्हणून राहिल्या आहे.
तरी काही फोटो अध्येमध्ये मैत्रीच्या आठवणी सांगत राहतात. आजारातून उठून बिशन सिंह बेदी 2022 मध्ये कर्तारपूर साहिबला गेले होते. तिथे गुरुद्वारामध्ये त्यांचे पाकिस्तानी क्रिकेटर मित्र इंतिखाब आलम आणि शफकत राणा त्यांना भेटायला आले. तीन मित्र कितीतरी वर्षांनी भेटले. जुनी गाणी म्हटली, एकत्र जेवले आणि नवीन आठवणी विणल्या.
हे तेच इंतिखाब आलम आहेत जे पाकिस्तान कडून खेळले आणि 2004 मध्ये पंजाबच्या रणजी टीमचे कोच झाले. त्यांचा जन्म पंजाबच्या होशियारपूर मध्ये 1941 ला झाला होता. म्हणजे भारत आणि पाकिस्तानमध्ये त्यांचं आयुष्य जिथे सुरू झालं होतं तिथेच येऊन ते संपलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








