वर्ल्ड कपआधी ज्या संघाला माघार घेण्याचा सल्ला मिळालेला, त्याने 183 धावांत इतिहास कसा रचला?

कपील देव

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कपील देव
    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

25 जून 1983 रोजी सकाळी कपिल देव जागे झाले तेव्हा त्यांची पत्नी रोमी अजूनही झोपलेली होती. त्यांनी हॉटेलच्या खिडकीचे पडदे बाजूला सारले आणि बाहेर सूर्य तळपत असल्याचे पाहून सुटकेचा नि:श्वास सोडला.

त्यांनी बायकोला उठवले नाही, कोणताही आवाज न करता चहा केला आणि जवळच्या लॉर्ड्स मैदानाचे दृश्य पाहत खिडकीपाशी बसले.

सामना सुरू होण्यापूर्वी कपिल यांनी संघाला उद्देशून म्हटले की, "फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. पुढील सहा तासांनंतर आपले आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे.

काहीही झाले तरी आपल्याला आपली सर्वोत्तम कामगिरी करायची आहे. करा किंवा मरा. नंतर आम्ही हे करू शकलो असतो किंवा ते करू शकलो असतो याची कोणतीही खंत असता कामा नये."

नाणेफेक झाल्यानंतर क्लाइव्ह लॉईडने भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले तेव्हा कपिलने सुटकेचा नि:श्वास सोडला. कारण त्यांनी ठरवून ठेवले होते की नाणेफेक जिंकली तर प्रथम फलंदाजी करायची कारण वेस्ट इंडिजवर तेव्हाच विजय मिळवता येऊ शकतो जेव्हा त्यांच्यावर धावा करण्याचे दडपण असेल.

भारताचा डाव 183 धावांवर आटोपला

जगातील सर्वोत्तम सलामीवीर सुनील गावस्करला अवघ्या 2 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद करत वेस्ट इंडिजने भारतावर सामन्याच्या सुरूवातीलाच दडपण आणले.

श्रीकांत आणि काही प्रमाणात मोहिंदर अमरनाथ वगळता एकही भारतीय फलंदाज त्या डावात चमक दाखवू शकले नाहीत.

दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 57 धावा काढल्या आणि 90 धावांच्या एकूण धावसंख्येवर दोघे बाद झाले.

सामन्याचा संस्मरणीय क्षण तेव्हा आला जेव्हा श्रीकांतने गुडघ्यावर बसून अँडी रॉबर्ट्सचा चेंडू सीमेपलिकडे टोलवला. भारताची शेवटची जोडी सय्यद किरमाणी आणि बलविंदर संधू यांनी धावसंख्या कशीतरी 183 पर्यंत नेली.

विश्वचषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यात श्रीकांतने सर्वाधिक धावा केल्या.

या भागीदारीमुळे वेगवान गोलंदाज माल्कम मार्शल इतके नाराज झाले की त्यांनी 11व्या क्रमांकाच्या संधूवर बाउन्सर टाकला जो त्यांच्या हेल्मेटला लागला.

संधूंना दिवसा चांदण्या दिसल्या. सय्यद किरमणी सांगतात, "तो ठीक आहे का, हे विचारण्यासाठी मी त्याच्याकडे धावलो. मी पाहिलं की बल्लू हाताने हेल्मेट घासत होता. मी विचारलं, तु हेल्मेट का घासतोय, तुला लागलं आहे का?"

तेव्हा पंच डिकी बर्ड यांनी मार्शलला तळाच्या फलंदाजाला बाऊन्सर टाकल्याबद्दल चांगलेच फटकारले. त्यांनी मार्शलना संधूंची माफी मागण्यास सांगितले.

 वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज माल्कम मार्शल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज माल्कम मार्शल

मार्शल त्याच्याकडे आला आणि म्हणाला, 'मॅन आय डिड नॉट मीन टू हर्ट यू. आय ॲम सॉरी.' (तुला दुखापत करण्याचा माझा हेतू नव्हता. मला माफ कर).

संधू म्हणाला, 'माल्कम, डू यू थिंक माय ब्रेन इज इन माय हेड, नो इट इज इन माय नी.' (माल्कम तुला वाटतं, माझा मेंदू माझ्या डोक्यात आहे? नाही, तो माझ्या गुडघ्यात आहे).

हे ऐकून मार्शल हसू लागले आणि वातावरण हलके झाले.

कपिल देवचा शानदार झेल

कपिलने पुन्हा ड्रेसिंग रूममध्ये आपल्या संघातील सदस्यांना संबोधित केले आणि त्यांनी म्हटलं, "आपण 183 धावा केल्या आहेत. दुसऱ्या संघाला अजून 183 धावा करायच्या आहेत. आपल्याला त्यांना प्रत्येक धाव मिळवण्यासाठी हवालदिल करायचंय.

तुमच्या पूर्ण शक्तीनिशी खेळा आणि सर्वोतोपरी प्रयत्न करा. बॉल जिथे जाईल तिथे त्याच्यावर तुटून पडा. जरी आपण हरलो तरी संघर्ष करत हरूया. तुम्हाला फक्त तीन तास तुमचं सर्वोत्तम क्रिकेट खेळायचं आहे."

बलविंदर संधूंचा एक चेंडू बाहेरून आला आणि त्याने गॉर्डन ग्रीनिजचा ऑफ स्टंप उडवला, तेव्हा वेस्ट इंडिजने अवघ्या 5 धावा केल्या होत्या. त्याला 'बॉल ऑफ द टूर्नामेंट' म्हटले गेले.

विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा टर्निंग पॉइंट तेव्हा आला जेव्हा कपिलने मदनलाल यांच्या चेंडूवर सुमारे 25 यार्ड उलट धावत डीप मिड-विकेटवर व्हिव्हियन रिचर्ड्सचा झेल घेतला.

व्हिव्हियन रिचर्ड्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लॉर्ड्सवर आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनकडे चालत जाणारे व्हिव्हियन रिचर्ड्स.

मोहिंदर अमरनाथ यांचे चरित्र 'जिमी द फिनिक्स ऑफ 1983' मध्ये अरुप सैकिया लिहितात, "हा झेल जवळपास चुकलाच होता. मदनलालने तिरप्या डोळयाने पाहिले की यशपाल शर्माही तो झेल पकडण्यासाठी धावत आहे.

त्यांनी ओरडून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला की कपिल तो झेल घेत आहेत, पण गर्दीच्या गोंगाटात यशपालला काहीच ऐकू आले नाही. तेही चेंडूकडे धावत राहिले. बरं झालं की ते आणि कपिल देव एकमेकांवर आपटले नाहीत.

मदनलाल यांनी मागितलेले षटक

नियमाप्रमाणे ते षटक टाकलेच जाणार नव्हते. रिचर्ड्सने मदनलाल यांच्या चेंडूंवर तीन चौकार मारले तेव्हा कपिलला त्यांना विश्रांती द्यायची होती.

पण मदनलालने त्यांच्या कर्णधाराला आणखी एक षटक देण्याची विनंती केली आणि कपिलने नाइलाजाने त्यांची विनंती मान्य केली.

मदनलाल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मदनलालच्या चेंडूवर विव्हियर रिचर्ड्स बाद झाले होते.

मदनलाल यांनी कपिलला निराश केले नाही. मदनलाल यांनी नंतर एक आठवण सांगितली की, "आम्हाला माहित होते की जर व्हिव्हियन रिचर्ड्स आणखी 10 षटके टिकला तर सामना आमच्या आवाक्याबाहेर जाईल. कपिल जेव्हा रिचर्ड्सचा उंच फटका पकडण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा ती तीन-चार सेकंद माझ्या आयुष्यातील सर्वात दीर्घ तीन-चार सेकंद होती. जेव्हा त्यांनी तो झेल घेतला, मला कळले की आज काहीतरी विशेष घडणार आहे."

भारताने 43 धावांनी विजय मिळवला

हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. एकेकाळी 1 विकेटवर 50 धावा करणाऱ्या वेस्ट इंडिजने अवघ्या 76 धावांत 6 विकेट गमावल्या. जेफ डुजो आणि माल्कम मार्शल यांनी प्रयत्न केला पण अमरनाथ यांनी दोघांनाही बाद केले.

कपिलने अँडी रॉबर्ट्सना पायचीत करताच धावसंख्या 9 विकेट्सवर 126 धावा झाली. होल्डिंग आणि गार्नर यांनी शेवटच्या विकेटसाठी आणखी 14 धावा जोडल्या. पण अमरनाथने गार्नरना पायचीत केले तेव्हा वेस्ट इंडिज भारताच्या धावसंख्येपेक्षा 43 धावांनी पिछाडीवर होता.

विश्वचषक जिंकल्यानंतर स्टंप घेऊन धावणारे भारतीय खेळाडू

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विश्वचषक जिंकल्यानंतर स्टंप घेऊन धावणारे भारतीय खेळाडू

दुसर्‍या दिवशी टाईम्सचा मथळा होता, 'कपिल्स मेन टर्न द वर्ल्ड अपसाइड डाउन.' एका ब्रिटिश वृत्तपत्रातील लेखाचे शीर्षक होते, 'टाइगर्स फाइंड देअर क्लॉज़' (सिंहांनी आपले पंजे काढले).

भारताचा विजय ही क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठी उलथापालथ होती.

'पहाटे तीनपर्यंत सेलिब्रेशन सुरू होते'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या विजयानंतर भारतीय समर्थक इतके उत्साहित झाले की भारतीय संघाचे हॉटेल लॉर्ड्स मैदानाच्या अगदी शेजारी असूनही त्यांना हॉटेलमध्ये पोहोचण्यास तीन तास लागले.

सरफराज नवाज आणि अब्दुल कादिर हे दोन पाकिस्तानी खेळाडूही त्यांच्या सेलिब्रेशनमध्ये सामील झाले.

कपिल त्यांचे आत्मचरित्र 'स्ट्रेट फ्रॉम द हार्ट'मध्ये लिहितात, "आम्ही ड्रेसिंग रूममधून बाहेर पडताच साउथॉलच्या पंजाबी लोकांच्या एका गटाने आम्हाला घेरले. ते ढोल-ताशे घेऊन आले होते. त्यांनी नाचायला सुरुवात केली.

हॉटेलवर पोहोचल्यानंतर आम्हीही पहाटे तीनपर्यंत नाचत राहिलो. आधी त्यांनी अमरनाथला 'मॅन ऑफ द मॅच' म्हणून दिलेली शॅम्पेनची बाटली संपवली. नंतर इतकी दारू प्यायलो की बारमधील दारू संपली."

कपिल पुढे लिहितात, "मी क्वचितच दारू पितो हे माहीत असूनही लोकांनी मला शॅम्पेन पिण्यास भाग पाडले. पण यावेळी मी त्यांची विनंती नाकारली नाही. रात्री उशिरा सर्व रेस्टॉरंट बंद असल्याने आम्ही रिकाम्या पोटी झोपलो. आम्हाला नंतर कळले की, साउथॉलमधील रेस्टॉरंट्सच्या समोरून जाणा-या सर्व लोकांनी मोफत जेवण आणि मिठाईचे वाटप केले."

विजयाने क्रिकेटपटूंची नवी फळी तयार केली

दुसरीकडे, भारतात दिल्ली, कलकत्ता आणि मुंबईच्या रस्त्यावर लोक आनंदाने नाचू लागले.

मिहीर बोस त्यांच्या 'द नाइन वेव्हज' या पुस्तकात लिहितात, "भारतातील लाखो लोकांनी त्यांच्या टीव्हीवर हे दृश्य पाहिले. त्यापैकी क्रिकेटची आवड असलेली चार मुलं होती, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण, जे नंतर भारतीय क्रिकेट संघाचा कणा झाले. द्रविडने नंतर मला सांगितले की त्यावेळी तो 10 वर्षांचा होता. त्याने टीव्हीवर पाहिलेला हा पहिला सामना होता."

या विजयावर पहिली प्रतिक्रिया इंग्लंडचा माजी कर्णधार टोनी लुईस यांची आली.

ते म्हणाले, "दुपारच्या जेवणाच्या वेळी जेव्हा भारताने 4 विकेटच्या मोबदल्यात 100 धावा केल्या होत्या, तेव्हा मी म्हणालो होतो की भारत आज जिंकेल. खरंतर, चेंडू इतका स्विंग होत होता की गोलंदाजांना त्यांच्या रेषेवर नियंत्रण ठेवता येत नव्हते आणि ते पुन्हा पुन्हा वाइड बॉल टाकत होते.

खेळपट्टीचा बाऊन्स असमान होता. एका षटकात, 6 फूट 8 इंच उंच जोएल गार्नरचा एक चेंडू गावस्करच्या नाकाजवळ जात होता तर त्याचा पुढचा चेंडू त्याच्या गुडघ्याखाली आदळत होता."

वर्ल्ड कप विजयाने क्रिकेटपटूंची नवी फळी तयार केली

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वर्ल्ड कप विजयाने क्रिकेटपटूंची नवी फळी तयार केली

गुंडप्पा विश्वनाथ म्हणाले, "मदनलाल आणि रॉजर बिन्नी या दोघांनाही वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांपेक्षा चेंडूला जास्त वेग मिळाला. मोहिंदर अमरनाथनेही सामन्याच्या अंतिम टप्प्यात चांगली गोलंदाजी केली."

सर्वात कठोर टीका डेव्हिड फ्रिथ या इंग्रजी समीक्षकाची होती. टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी त्याने लिहिले होते की, भारतीय संघ इतका कमकुवत आहे की त्याने स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले पाहिजे.

मुंबईमध्ये अभूतपूर्व स्वागत

एका आठवड्यानंतर भारतीय संघ लंडनहून मुंबईला रवाना झाला. एअर इंडियाने विमान प्रवासादरम्यान केक कापण्याची व्यवस्था केली. भारतीय संघ मुंबई विमानतळावर उतरला तेव्हा तिथे लोकांची मोठी गर्दी होती.

तिथे मुसळधार पाऊस पडत होता. त्यानंतरही सुमारे तीस हजार लोक संघाच्या स्वागतासाठी विमानतळावर पोहोचले होते.

भारतीय संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर विमानतळावर संघाचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. विमानतळ ते वानखेडे स्टेडियमपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा हजारो लोक उभे होते. लोकांना विश्वचषक पाहता यावा म्हणून खेळाडूंच्या प्रशिक्षकासमोरील एका वाहनावर त्याला ठेवण्यात आले होते.

फिरता चषक असल्यामुळे तो विशेष परवानगीने तो भारतात आणला गेला होता, त्यामुळेच त्याला इंग्लंडमधून बाहेर नेण्याची परवानगी नव्हती. त्याला भारतात आणण्यासाठी भारतीय संघाला एक बाँड भरावा लागला होता.

भारतीय संघ वानखेडे स्टेडियमवर पोहोचला तेव्हा पन्नास हजार लोक त्यांच्या स्वागतासाठी उभे होते. विशेष म्हणजे त्यावेळी भारतीय क्रिकेट बोर्डाकडे संघाला चांगला पुरस्कार देण्यासाठी पुरेसे पैसेदेखील नव्हते.

त्यानंतर बोर्डाचे अध्यक्ष एन. के. पी. साळवे यांच्या मदतीने दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर लता मंगेशकर यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आणि मिळालेल्या रकमेतून प्रत्येक खेळाडूला एक लाख रुपये देण्यात आले.

राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी स्वागत केले

संघ यानंतर दिल्लीला पोहोचला, जिथे इंदिरा गांधी यांनी हैदराबाद हाऊसमध्ये त्यांच्यासाठी स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. त्यांनी प्रत्येक खेळाडूसोबत हस्तांदोलन केले. प्रथम त्यानी इंग्रजीमध्ये भाषण केले आणि नंतर हिंदीत. त्‍यानंतर राष्‍ट्रपती ग्यानी झैलसिंग यांनी संपूर्ण संघाला चहासाठी राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले.

कपिल देव यांनी विश्वचषक त्यांच्या हाती दिला आणि म्हणाले, 'हा तुमच्यासाठी आहे. कपिल देव त्यांच्या आत्मचरित्रात लिहितात, 'ग्यानीजींनी गंमतीच्या स्वरात विचारले, 'अच्छा ऐ हुण साड्डा हो गया’ (अच्छा, तर

 पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतीय क्रिकेट संघाचा गौरव केला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतीय क्रिकेट संघाचा गौरव केला.

आता तो आपला झाला). मी उत्तर दिले, ‘आपण तीन ते सहा महिने तो ठेवू शकतो. मग आपल्याला तो परत करावा लागेल.

यावर झैलसिंग म्हणाले, ‘अगर असी वापिस ना करिए ते जंग हो जाएगी?’ (जर आम्ही तो परत केला नाही, तर युद्ध होईल का?). मी 'नाही' म्हणालो आणि संपूर्ण संघ हसायला लागला.

इंदिरा गांधींनी आमच्याकडे रोखून पाहिलं आणि राष्ट्रपतींसमोर असं हसू नका, असं सूचित केलं. पण मला त्यांचा इशारा समजला नाही आणि मी हसतच राहिलो. थोड्या वेळाने मला वाटले की राष्ट्रपतींना आमच्या विजयाचा इतका अभिमान आहे की त्यांना समजत नाहीए की हा चषक का परत केला जातोय?

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)