शेवटची ओव्हर, 6 बॉल 6 विकेट घेत गॅरेथ मॉर्गननं रचला इतिहास

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
ऑस्ट्रेलियातल्या एका गोलंदाजानं एकाच ओव्हरमध्ये सहा विकेट्स घेण्याची करामत केली आहे. ते सुद्धा सामन्याच्या अखेरच्या ओव्हरमध्ये.
गॅरेथ मॉर्गननं असं त्या गोलंदाजाचं नाव. गॅरेथ ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक क्रिकेटमध्ये मुदगीरागा टीमचं नेतृत्व करतो.
गोल्ड कोस्ट प्रीमियर लीग डिव्हिजन थ्री मध्ये या मुदगीराबा टीमनं सर्फर्स पॅरेडाईझ टीमला विजयासाठी 179 रन्सचं आव्हान दिलं होतं.
या 40 ओव्हर्सच्या वन डे सामन्यात अखेरच्या षटकात सर्फर्स पॅरेडाईजला विजयासाठी केवळ पाच रन्स हव्या होत्या आणि त्यांचे सहा फलंदाज बाकी होते.
अशात मुदगीराबा टीमचा कर्णधार गॅरेथ मॉर्गननं स्वतःच गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
त्यानं सहा चेंडूंमध्ये सहा फलंदाजांना बाद केलं आणि आपल्या टीमला जिंकून दिलं. त्याची ही कामगिरी पाहून मैदानात उपस्थित सगळेचजण थक्क झाले.
अशी साधली डबल हॅटट्रिक
“गंमत म्हणजे, त्या ओव्हरच्या आधी अंपायरनं मला सांगितलं की मला जिंकायचं असेल तर एखादी हॅटट्रिक घ्यावी लागेल. माझी हॅटट्रिक झाली तेव्हा तो (अंपायर) माझ्याकडे पाहातच राहिला,” सामन्यानंतर गोल्ड कोस्ट बुलेटिन’ला दिलेल्या प्रतिक्रियेत मॉर्गन हे म्हणाला.
मॉर्गनच्या बोलिंगवर आधी सर्फर्सचा सलामीवीर आणि् गोल्ड कोस्ट बुलेटिनचा वार्ताहर जेक गारलँडचा कॅच टिपला गेला. पुढच्या दोन बॉल्सवर आणखी दोन फलंदाजांना झेलबाद केलं
"हॅटट्रिक झाल्यावर मी ठरवलं, की आता हा सामना गमवायचा नाही. मग पुढे सगळा वेडेपणाच घडला," अशा शब्दांत मॉर्गननं वर्णन केलं आहे.
चौथ्या बॉलवर त्यानं आणखी एका फलंदाजाला झेलबाद केलं. अखेरच्या दोन चेंडूंवर त्यानं प्रतिस्पर्ध्यांना क्लीन बोल्ड केलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
सामन्यानंतर प्रतिस्पर्धी गारलँडनं म्हटलं आहे की, “आता फक्त जे घडलं त्याविषयी हसू येतं. मला इतिहासात नावं नोंदवायचं होतं, पण ते हे असं नोंदवलं जाईल असं वाटलं नव्हतं.”
विशेष म्हणजे मॉर्गननं असा काही करिष्मा करण्याची ही पहिलीच वेळ नाही.
या सामन्यानंतर त्याच्या क्लबच्या फेसबुक पेजवर त्याच्या वडिलांनीच प्रतिक्रिया दिली आहे की, “मला खूप अभिमान वाटतो आहे. गॅरेथ तुम्हाला सांगणार नाही, पण लहानपणी त्यानं एकदा एकाच ओव्हरमध्ये पाच विकेट्स काढल्या होत्या. त्याला सहावी विकेट काढता आली नाही, कारण पाचच फलंदाज उरले होते.”
याआधीचे विक्रम
गॅरेथची कामगिरी हा कुठल्याही स्तरावरच्या अधिकृत किंवा व्यावसायिक क्रिकेटमधला एक विश्वविक्रम ठरली आहे. कारण त्यानं इनिंगच्या अखेरच्या ओव्हरमध्ये आणि सामन्यातल्या अखेरच्या सहा बॉल्समध्ये ही कमाल केली आहे.
2017 साली ऑस्ट्रेलियाच्याच अलेड कॅरे नामक क्रिकेटरनं क्लब क्रिकेटमध्ये एका दोन-दिवसीय सामन्यात एका ओव्हरमध्ये सहा विकेट्स काढल्या होत्या.
व्हिक्टोरिया राज्यात गोल्डन पॉइंट क्रिकेट क्लबकडून खेळताना ईस्ट बालारात संघाविरुद्ध त्यानं ही कमाल केली होती.
त्याआधी केवळ तीन फलंदाजांनी एकाच ओव्हरमध्ये पाच विकेट्स काढल्या होत्या.
2011 साली न्यूझीलंडच्या नील वॅग्नरनं ओटागोकडून खेळताना एका प्रथमश्रेणी सामन्यात एकाच ओव्हरमध्ये पाच फलंदाजांना माघारी धाडलं होतं. विशेष म्हणजे त्यानं यात चार फलंदाजांना क्लीन बोल्ड केलं होतं.
बांगलादेशच्या अल अमिन हुसेननं 2013 साली स्थानिक ट्वेन्टी 20 सामन्यात एकाच ओव्हरमध्ये पाच विकेट्स काढल्या होत्या. त्यानं सलग पाच विकेट्स काढल्या होत्या.
भारताच्या अभिमन्यू मिथूननं 2019 साली कर्नाटककडून खेळताना सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये उपांत्य फेरीत हरयाणाविरुद्धच्या ट्वेन्टी20 सामन्यात एकाच ओव्हरमध्ये पाच विकेट्स काढल्या होत्या.
विशेष म्हणजे त्या सामन्यात मिथूननं शेवटच्या ओव्हरमध्येच ही करामत साधली. त्यानं हिमांशु राणा, राहुल तेवातिया, सुमित कुमार, अमित मिश्रा आणि जयंत यादवला बाद केलं होतं.
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








