ग्लेन मॅक्सवेल AUS vs AFG : तो पडला, विव्हळला पण त्यानं द्विशतक ठोकलं आणि ऑस्ट्रेलियाला जिंकून दिलं

ग्लेन मॅक्सवेल

फोटो स्रोत, ANI

ग्लेन मॅक्सवेलच्या नाबाद 201 जोरावर ऑस्ट्रेलियानं अफगाणिस्तानच्या तोंडातून विजयाचा घास पळवला. अनुभवी फिरकी मारा आणि दुखावलेला पाय यावर मात करत मॅक्सवेलनं हा सामना जिद्दीनं खेचून आणला.

ग्लेन मॅक्सवेलनं 128 बॉलमध्ये 21 फोर आणि 10 सिक्सच्या जोरावर नाबाद 201 धावा केल्या. वन-डे क्रिकेटच्या इतिहासात धावांचा पाठलाग करताना झळकावलेलं हे पहिलं द्विशतक आहे.

त्या द्विशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 3 विकेट्सनी विजय साजरा केला.

मी वन-डे क्रिकेटमध्ये आजवर पाहिलेली सर्वोत्तम खेळी – सचिन तेंडुलकर

या सामन्यानंतर सचिन तेंडुलकर म्हणाला, "इब्राहिम झादरानच्या सुंदर खेळीमुळे अफगाणिस्तान चांगल्या स्थितीमध्ये होते. त्यांनी सेकंड हाफमध्येही चांगली सुरूवात केली. 70 ओव्हर्समध्ये चांगला खेळ केला. पण ग्लेन मॅक्सवेलनं शेवटच्या 25 ओव्हर्समध्ये केलेला खेळ त्यांचं नशीब बदलण्यास पुरेसा ठरलं."

"मॅक्स प्रेशरमध्ये मॅक्स परफॉर्मन्स! मी वन-डे क्रिकेटमध्ये आजवर पाहिलेली ही सर्वोत्तम खेळी आहे," असंही तेंडुलकर म्हणाला.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

मॅक्सवेलनं एकहाती फिरवली मॅच

अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाला 292 धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची 7 बाद 91 अशी बिकट अवस्था झाली होती.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम धक्कादायक पराभवाच्या उंबरठ्यावर उभी होती. पण, मॅक्सवेलनं हार मानली नव्हती.

नजीब उर रहमाननं 33 धावांवर त्याला जीवदान दिलं. अफगाणिस्तानला हे जीवदान चांगलंच महाग पडलं. नजीबनं सोडलेल्या झेलमुळे त्यांना सामना गमवावा लागला.

ग्लेन मॅक्सवेल

फोटो स्रोत, Getty Images

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला जोडीला घेत त्यानं अफगाणिस्तानच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. अफगाणिस्ताननं या सामन्यात 4 फिरकी गोलंदाज खेळवले. त्यापैकी कुणालाही मॅक्सवेलनं दाद दिली नाही.

मॅक्सवेलनं फक्त 76 बॉलमध्ये 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं शतक पूर्ण केलं. या स्पर्धेतील त्याचं हे दुसरं शतक आहे. त्यानं यापूर्वी नेदरलँड्सविरुद्ध विश्वचषकातील सर्वात आक्रमक शतकाचा विक्रम केला होता.

मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स यांनी आठव्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली तेव्हा त्यामध्ये कमिन्सचा वाटा फक्त 8 धावांचा होता.

मैदानात पडला मॅक्सवेल!

ग्लेन मॅक्सवेलच्या शतकानंतरही ऑस्ट्रेलियावरील पराभवाचं संकट टळलं नव्हतं. त्यातच त्याच्या पायात गोळे आल्यानं त्याला पळताही येत नव्हतं.

मॅक्सवेल एक धाव काढताना मैदानातच कोसळला. त्याला काही काळ उभारताही येत नव्हतं. अ‍ॅडम झम्पा मैदानात येण्यासाठी सज्ज होता. पण मॅक्सवेलनं मैदान सोडलं नाही .

तो पुन्हा खेळायला तयार झाला. त्यानं पळणं बंद केलं. पण लढणं नाही. त्यानंतर मॅक्सवेलनं फक्त चौकार आणि षटकार लगावण्यास सुरूवात केली.

ग्लेन मॅक्सवेल

मॅक्सवेलच्या हल्ल्यापुढे अफगाणिस्तानची संपूर्ण टीम निष्प्रभ ठरली. त्यांनी सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही मॅक्सवेलनं त्यांना दाद दिली नाही. पायाचं दुखणं त्याला रोखू शकलं नाही.

ज्या मुजीब उर रहमाननं मॅक्सवेलला जीवदान दिलं होतं त्याच्याच बॉलवर षटकार खेचत मॅक्सवेलनं ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

ग्लेन मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स या जोडीनं आठव्या विकेटसाठी नाबाद 202 धावांची भागिदारी केली. वन-डे क्रिकेटच्या इतिहासात आठव्या विकेटसाठी ही सर्वोच्च भागिदारी आहे.

या भागिदारीत कमिन्सचा वाटा फक्त 12 धावांचा होता. या विजयासह ऑस्ट्रेलियानं उपांत्य फेरीतील जागा निश्चित केली आहे.

मॅक्सवेल-कमिन्सनं भागीदारीचा विक्रम मोडला

मॅक्सवेलनं पॅट कमिन्ससह आठव्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. दोघांनी वन डे क्रिकेटमध्ये आठव्या विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारीचा विक्रमही मोडला.

याआधी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या जस्टिन केम्प आणि अँड्र्यू हॉलच्या नावावर होता. दोघांनी 2006 साली भारताविरुद्ध केप टाऊन वन डेत नाबाद 138 रन्सची भागीदारी रचली होती.

खरंतर मॅक्सवेलला या खेळीदरम्यान दुखापतही झाली. शतक पूर्ण झाल्यानंतर मॅक्सवेल वेदनेनं विव्हळताना दिसला. मैदानावरच फिजियोंनी त्याच्यावर उपचारही केले.

नीट धावता येईनासं झाल्‌यावर चौकार आणि षटकारांमध्ये धावा जमा करत त्यानं धावफलक हालता ठेवला.

वानखेडे स्टेडियमवरचे क्रिकेट चाहतेही मॅक्सवेलच्या धाडसाला दाद देताना दिसले. तो वेदनेनं मैदानात कोसळला, तेव्हा चाहते मॅक्सवेलच्या नावाचा जप करू लागले.

maxwell

फोटो स्रोत, Getty Images

गोल्फ खेळताना झालेली दुखापत

आठवडाभरापूर्वीच मॅक्सवेलनं नेदरलँड्सविरुद्ध 40 बॉल्समध्ये शतक ठोकलं होतं. न्यूझीलंडविरुद्धही 41 रन्सची खेळी केली.

पण त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये तो खेळू शकला नाही. कारण अहमदाबादमध्ये त्याला दुखापत झाली. ऑस्ट्रेलियन टीम गोल्फ खेळत असताना मॅक्सवेल गोल्फ बग्गीतून पडला आणि त्याच्या डोक्याला इजा झाली.

पण तीनच दिवसांनी त्यानं जणू सगळी भरपाई केली.

अफगाणिस्तानची झुंज अपयशी

या सामन्यात अफगाणिस्तानच्या नवीन उल हकनं आधी ट्रॅव्हिस हेडला शून्यावर बाद केलं. मग धोकादायक ठरु पाहात असलेल्या मिच मार्शला 24 धावांवर बाद केलं.

अझमत ओमारझाईनं ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. त्यानं एका अप्रतिम बॉलवर डेव्हिड वॉर्नरला बोल्ड केलं. वॉर्नर 18 धावांवर बाद झाला.

ओमरझाईनं पुढच्याच बॉलवर जॉस इंग्लिसला बाद केलं. या सामन्यात शतक झळकावणाऱ्या इब्राहिम झादराननं कोणतीही चूक न करता त्याचा झेल घेतला.

मग रहमत शाहच्या थेट थ्रो वर लबुशेन 14 धावांवर रन आऊट झाला.

मार्कस स्टॉईनिसला रशीद खाननं झटपट बाद करत ऑस्ट्रेलियाला आणखी अडचणीत आणलं. स्टॉईनसनं 6 धावा केल्या. रशीद खाननं मिचेल स्टार्कलाही मैदानात स्थिरावू दिलं नाही. तो 3 धावांवर बाद झाला.

अफगाणिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अफगाणिस्तान

त्याआधी इब्राहिम झादरानचं ऐतिहासिक शतक आणि रशीद खानच्या झंझावती फलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 291 धावा केल्या.

वन-डे विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील अफगाणिस्तानची ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

झादरानची ऐतिहासिक खेळी

इब्राहिम झादराननं नाबाद 129 धावा केल्या. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात शतक झळकावणारा तो अफगाणिस्तानचा पहिला क्रिकेटर ठरला.

अफगाणिस्तानच्या इब्राहिम झादराननं विश्वचषकातील त्याचा सर्वोत्तम खेळ या सामन्यात केला. सलामीला आलेला झादराननं संपूर्ण 50 ओव्हर फलंदाजी केली.

इब्राहिम झादरान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इब्राहिम झादरान विश्वचषकात शतक ठोकणारा पहिला अफगाण खेळाडू आहे.

झादराननं रहमानउल्ला गुरबाझसोबत पहिल्या विकेटसाठी 38 धावांची भागिदारी केली. गुरबाझ बाद झाल्यानंतर रहमत शाहसोबत दुसऱ्या विकेटसाठी 83 धावा जोडल्या.

या स्पर्धेत फॉर्मात असलेला अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतउल्ला शाहिदी 26 धावांवर बाद झाला. अझमत ओमरझाईलाही 20 धावाच करता आल्या.

झादराननं या अवघड परिस्थितीमध्ये एक बाजू लावून धरत त्याचं शतक 131 बॉलमध्ये 7 चौकारांच्या मदतीनं पूर्ण केलं.

झादरान आणि रशीद खान या जोडीनं सहाव्या विकेटसाठी 28 बॉलमध्ये नाबाद 58 धावांची भागिदारी केली. या भागिदारीच्या जोरावर अफगाणिस्ताननं त्यांची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली.

रशीद खान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रशीद खान

रशीद खाननं केवळ 18 चेंडूंत 2 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 35 धावांची खेळी केली.

ऑस्ट्रेलियाकडून जॉश हेझलवूडनं 2 तर मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल आणि अ‍ॅडं झम्पा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

आधी अफगाणिस्तान, मग मॅक्सवेलचा जयघोष

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

टीम इंडिया असो वा मुंबई इंडियन्स. वानखेडे स्टेडियमवरचे चाहते कायम निळ्या जर्सीतल्या खेळाडूंच्या मागे उभे राहताना दिसतात.

आज अफगाणिस्तानला तो मान मिळाला. अफगाण खेळाडूंच्या प्रत्येक चौकार, षटकारावर आणि प्रत्येक चांगल्या खेळीवर चाहते भरभरून दाद देताना दिसले.

इब्राहिम झारदाननं शतक ठोकलं तेव्हा अख्ख स्टेडियम उभं राहिलं.

एरवी ज्या स्टँड्‌समध्ये ‘सचिन, सचिन’ असा जल्लोष व्हायचा किंवा जिथे रोहित-विराटचा जयघोष होतो, तिथे आज ‘रशीद रशीद’ अशा आरोळ्‌या गरजल्या.

रशीद खान आयपीएलमुळे इथल्या चाहत्यांच्या ओळखीचा आहे, पण तो किती लोकप्रिय आहे, तेच दिसून आलं.

जे प्रेम एरवी भारतीय खेळाडूंसाठी राखीव असतं, ते इथे अफगाण खेळाडूंवरही उधळलं गेलं.

अपवाद केवळ ग्लेन मॅक्सवेलचा. वेदनेनं विव्हळत असतानाही मॅक्सवेलनं झुंजार शतक ठोकलं. चाहते मॅक्सवेलच्या धाडसाला दाद देताना दिसले. तो वेदनेनं मैदानात कोसळला, तेव्हा ते मॅक्सवेलच्या नावाचा जप करू लागले. त्याला उभं राहण्यासाठी प्रोत्साहन देऊ लागले.

त्यानं द्विशतक ठोकलं, ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला आणि वानखेडेचं नाव पुन्हा इतिहासात नोंदवलं गेलं.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)