अफगाणिस्तान : 'मी शिकले नसते, तर माझं लग्न लावलं असतं', मुलींच्या गुप्त शाळांच्या जगात

- Author, सना साफी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अफगाणिस्तानात सध्या सत्तेत असलेल्या तालिबान सरकारच्या विरोधात त्या देशातल्या महिलांनी कंबर कसली आहे.
अतिशय गोपनीय पद्धतीने शिक्षण घेत महिला आणि मुलींच्या शिक्षणावर तालिबानने लादलेली बंधनं अफगाणिस्तानल्या महिला वर्गाने झुगारून दिलीयत.
तालिबानच्या नाकाखालून या महिलांतर्फे चालवल्या जाणाऱ्या शाळा आता काम करू लागल्या आहेत आणि ज्या मुलींची शिकण्याची हिंमत आणि इच्छा आहे अशा मुलींना ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष भेटून शिक्षण दिलं जातंय.
बीबीसी अफगाणच्या सना सफी यांनी आम्हाला अशा अनेक गुप्त शाळांची सफर घडवली. हा प्रवास केवळ त्या शाळांचा नसून शिक्षणावर लादलेली बंधनं नाकारू पाहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मेंदू आणि हृदयाचा ठाव घेणारा हा एक अनुभव होता.
"मला असं वाटतंय मी केवळ चोरून शिकण्याचा प्रयत्न करत नाहीये तर मी चोरून जगण्याचा प्रयत्न करते," पौगंडावस्थेतील अफगाण मुलीचे हे शब्द माझ्या कानात गुंजत होते. एव्हाना मी लंडनमध्ये बसून माझ्या लॅपटॉपमार्गे त्या पडद्यापलीकडे असणाऱ्या गुप्त आणि भयावह जगात प्रवेश केला होता.
माझ्यासाठी त्या गुप्त शाळेत हातात लॅपटॉप घेऊन उभ्या असलेल्या मुलीला मी म्हणाले की, "तू थोडं मागे जाऊन उभी राहू शकतेस का? जेणेकरून मी तुम्हा सगळ्यांना पाहू शकेन."
तिच्याकडे असणाऱ्या लॅपटॉपमध्येच असलेला कॅमेरा ती माझ्यासाठी वर्गभर फिरवते.
30 तरुण महिलांचा एक वर्ग मी बघू शकत होते. या सगळ्या मुली रांगांमध्ये शिस्तीत बसल्या होत्या.
त्यांनी सगळ्यांनीच काळे कपडे घातले होते मात्र त्यांच्या डोक्यावरील स्कार्फ हे पांढऱ्या रंगाचे आणि वेगवेगळ्या डिझाईनचे होते.
त्यांना शिकवणाऱ्या मास्तरीणबाईंनीही काळे कपडे घातले होते आणि त्या पांढऱ्या फळ्याजवळ उभ्या होत्या. त्या फळ्यावर काढलेल्या आकृत्या पाहून मला वाटलं की तिथे बायोलॉजीचा वर्ग सुरु होता.
हळूहळू त्या वर्गात बसलेल्या मुलींची कुजबुज आमच्यातल्या आभासी जगात सुरु झाली आणि त्याचवेळी अफगाणिस्तानात दडवून ठेवलेलं एक सत्य माझ्या डोळ्यासमोर उलगडत होतं.
अफगाणिस्तानातल्या एका अज्ञात जागी भरलेल्या या गुप्त वर्गाची मला फक्त कल्पनाच नव्हती तर तालिबानी शासकांच्या विरोधात गुप्तपणे केल्या जाणाऱ्या उठावाची मी एक साक्षीदार होत होते.
तालिबानने मागच्या दीड वर्षांपासून महिला आणि मुलींसाठी माध्यमिक शाळांची आणि विद्यापीठाची दारे बंद केली आहेत.
हृदय पिळवटून टाकणारे वास्तव
अफगाणिस्तानात सध्या भरवल्या जाणाऱ्या या गुप्त शाळांचा मी केलेला प्रवास माझ्यासाठी हृदय पिळवटून टाकणाऱ्या भावनिक चढउतारांचा होता.
मी डिजिटल माध्यमातून या क्रांतिकारी शिक्षक आणि विद्यार्थिनींशी जोडली तर गेलेच पण अफगाणिस्तानच्या दक्षिणेत असणाऱ्या कंदाहारची आठवणही मला झाली जिथे मी माझा भूतकाळ घालवला होता.

याच देशात माझाही जन्म झाला होता आणि लहानपणी मलाही अशाच गोपनीय शाळेत जाऊन शिकावं लागलं. या शाळेतल्या शिक्षिकेसोबत बोलत असतांना मी काही काळ का होईना मला माझ्या कठीण भूतकाळ आणि आठवणींचा विसर पडत होता.
मात्र शेवटी मी त्यांना हे विचारलंच की "की तुम्ही या शाळेत नेमकं कधीपासून शिकवत आहात?" या प्रश्नाचं उत्तर घाबरत घाबरत का होईना पण त्यांनी दिलं आणि म्हणाल्या की, "मागच्या सहा महिन्यांपासून मी या गुप्त शाळेत येऊन शिकवत आहे."
"माझा भाऊ मला नेहमी म्हणतो की तू त्या शाळेत जाऊ नकोस, अजूनपर्यंत तरी या शाळेची माहिती कुणालाही नाही. पण त्याला अशी भीती वाटते की तालिबान तिथे कधीही पोहोचू शकेल.
मात्र माझ्या आई-वडिलांनी मला या शाळेत जाऊन माझ्या बहिणींना शिकवण्यासाठी प्रोत्साहन दिलं. मला त्यांचं दुःख कळतंय म्हणूनही मी इथे येऊन शिकवू शकते. माझं विद्यापीठही आता बंद झालंय त्यामुळे मग इथे येऊन या मुलींना मी शिकवत असते."
ज्या वर्गात या सगळ्या मुली बसल्या आहेत तो वर्ग लाकडी चौकटी आणि भिंतीवर लटकवलेल्या चित्रांनी सजवला गेलाय, त्या वर्गात जणू काही आयुष्यच भरभरून वाहताना दिसतंय.
1990 च्या दशकाच्या मध्याच्या माझ्या स्वतःच्या आठवणी मात्र यापेक्षा अगदी उलट होत्या. त्यावेळी घडलेल्या हिंसक गृहयुद्धातून एकेदिवशी अचानक तालिबान सत्तेवर आलं आणि त्यांनी रातोरात त्या देशातल्या मुली आणि महिलांचं शिक्षण बंद केलं.
शाळेच्या फाटकापासून परत वळावं लागलं
जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तालिबान सत्तेत आल्यानंतरचा माझा पहिला शाळेचा दिवस मी विसरू शकणार नाही.
त्यावेळी मी सात वर्षांची असेन आणि शाळेच्या गेटजवळ गेल्यावर एका महिलेनं मला सांगितलं होतं की आता या देशात एकाही मुलीला किंवा महिलेला शाळेत जाता येणार नाही.
माझ्या आईने पिवळ्या एम्ब्रॉयडरी बेल्टने बनवलेला काळा गणवेश घालून मी त्यादिवशी शाळेत गेले होते आणि त्यानंतर त्यावरही बंदी घालण्यात आली.
तो गणवेश घालून मी पहिल्यांदाच शाळेत जाणार असल्याने त्यादिवशी मी प्रचंड उत्साही होते पण त्या महिलेने मला शाळेच्या गेटवरून हाकलून दिलं तेंव्हा मला झालेलं दुःख मी सांगूही शकत नाही.
मात्र माझ्या आईवडिलांनी हार मानली नाही आणि त्यांनी माझ्यासाठी गुप्त शाळेचा शोध सुरु केला. त्यांना एका जोडप्याने त्यांच्या घरीच सुरु केलेली एक शाळा सापडली. त्या दोघांनी मिळून त्यांच्या घरातल्या खोल्यांनाच शाळेच्या वर्गात बदललं होतं.
रोज सकाळी माझी आई मला भाजीबाजारात घेऊन जायची आणि हळूचज मी चिखलाने बनवलेल्या माझ्या गुप्त शाळेत गायब व्हायचे.

त्या शाळेतल्या शिक्षकांना जी पुस्तकं मिळायची त्या पुस्तकांचा वापर करून आम्ही मुलं लिहायला आणि वाचायला शिकत होतो.
मात्र त्या जोडप्याने केलेले ते प्रयत्न फारकाळ टिकू शकले नाहीत. ज्या क्षणी तालिबानला त्या गुप्त शाळेची खबर लागली त्याचक्षणी त्यांनी तिथे धाड टाकली आणि मुलींना शिकवू पाहणाऱ्या त्या जोडप्याला पंधरा दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागला होता.
त्या दोघांची सुटका झाली आणि त्यांनी अफगाणिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला.
त्या घटनेच्या पाच वर्षांनंतर अमेरिकेत 9/11 चा हल्ला झाला आणि अमेरिका व मित्र राष्ट्रांनी अफगाणिस्तानातले तालिबान सरकार उलथवून टाकले. त्यावेळी शिक्षणाचा अधिकार परत मिळालेल्या लाखो किशोरवयीन विद्यार्थ्यांमध्ये माझाही समावेश होता.
मात्र ऑगस्ट 2021 मध्ये तालिबान सत्तेवर परतल्यावर पुन्हा एकदा महिला आणि मुलींचा शिक्षणाचा हक्क नाकारला गेला.
यावेळी मात्र मुलींना कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन शिकण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. असं असलं तरी माध्यमिक शिक्षण, महाविद्यालय आणि विद्यापीठांची दारं मात्र मुलींसाठी बंदच करण्यात आली आहेत.
मुलींना त्यांच्या स्वप्नांपासून दूर घेऊन जाणारा आणि त्यांच्या क्षमता नाकारणारा हा नियतीचा एक क्रूर खेळ आहे.
या देशात अजूनही शिकवू पाहणारे निडर शिक्षक अफगाणिस्तानत सुरु असलेल्या या गुप्त शाळांच्या हृदयात वसले आहेत.
तालिबानच्या दहशतीखालीही त्यांनी त्यांचं ज्ञानदानाचं काम थांबवलेलं नाहीये. तालिबानने मुलींच्या शिक्षणावर घातलेल्या या बंदीनंतर या देशात असंख्य भूमिगत शाळांचे जाळे उभे करण्यासाठी काम करण्यामध्ये पश्ताना दुर्रानी या आघाडीवर आहेत.
'लर्न अफगाणिस्तान' नावाच्या त्यांच्या पालक संस्थेमध्ये 12 वर्षांपेक्षा मोठ्या वयाच्या सुमारे 230 विद्यार्थिनी शिकत आहेत.
माझ्या नशिबाची मालक मीच
पश्ताना म्हणतात की, "या कामात असलेली जोखीम खूप मोठी आहे पण अशा परिस्थितीत काहीच न करता शांत राहणे हा पर्याय नाहीये. मी शिकले नसते तर माझंही लग्न लावून दिलं असतं, माझ्या भावाने कुठेतरी बालमजुरी केली असती. मात्र माझ्या शिक्षणामुळे माझ्या कुटुंबात मातृसत्ता आली आणि त्यामुळेच माझ्या नशिबाची मी स्वतः मालक बनू शकले."

फोटो स्रोत, Reuters
माझ्या लॅपटॉपच्या पडद्यावर या शाळेत शिकणाऱ्या मुली सुस्पष्ट इंग्रजीत माझ्याशी बोलत होत्या आणि मी पश्ताना दुर्रानी यांचं स्वप्न जिवंत होताना प्रत्यक्ष बघत होते.
त्यांनी मला सांगितलं की ही शाळा त्यांना सगळं काही शिकवते. बायोलॉजीपासून ते केमिस्ट्रीपर्यंत, फिजिक्सपासून ते फिलॉसॉफीपर्यंत आम्हाला सगळं शिकण्याची संधी तर मिळतेच पण याचबरोबर ग्राफिक डिजाईनसारखे रोजगार मिळवून देऊ शकणारे विषयही आम्हाला शिकवले जातात.
या शाळेत शिकणाऱ्या या मुलींची अनेक स्वप्नं होती, कुणाला डॉक्टर, कुणाला इंजिनियर तर कुणाला अधिकारी व्हायचं होतं.
मी हे सगळं ऐकत तर होते पण त्याचवेळी त्यांचा हा प्रवास किती खडतर असणार आहे हेसुद्धा मला माहित होतं. या शाळांची माहिती तालिबानला झाली तर या शाळा कधीही बंद पडू शकतात आणि ही तालिबानी दहशत मी जाणून होते.
मात्र या तरुण विद्यार्थ्यांची शिक्षण मिळवून प्रगती करण्याची जिद्द या दहशतीसमोर ठामपणे उभी राहताना देखील मी पाहत होते.
मुलींच्या शिक्षणावर घातलेल्या या बंदीबाबत तालिबानची अशी भूमिका आहे की बंदी कायमस्वरूपी घालण्यात आलेली नाही.
तालिबान असं म्हणतं की मुलींसाठी एक 'सुरक्षित वातावरण' निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि त्यांना अभ्यासक्रमांमध्ये देखील 'आवश्यक बदल' करायचे आहेत. मात्र त्यांच्या या बोलण्याचा नेमका अर्थ काय होतो आणि खरोखर ही बंदी उठवली जाईल का? या प्रश्नांची उत्तरं कुणालाच माहिती नाहीयेत.
आशा, निराशा, प्रशंसा आणि दुःख अशा वेगवेगळ्या भावनांच्या कल्लोळात मी अफगाणिस्तानातील या गुप्त शाळांचा माझा प्रवास पूर्ण केला.
सध्यातरी अफगाणिस्तानातील मुलींच्या शिक्षणासाठीचा लढा संपण्याची कसलीच चिन्हे दिसत नसतांना मुलींना गुप्तपणे शिकवू पाहणाऱ्या आणि अशा शाळांमध्ये जाऊन शिक्षण घेणाऱ्या या सगळ्यांची जिद्द हाच एकमेव आशेचा किरण आहे असं म्हणावं लागेल.
शेवटी तिथे शिकणारी एक चिमुरडी म्हणाली की, "आम्ही विरोध करत राहू आणि कदाचित एकेदिवशी या काळोखाच्या पलीकडे आम्हाला प्रकाश दिसू लागेल."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.








