अफगाणिस्ताननं इंग्लंडला चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर काढलं, तालिबानसोबतच्या संघर्षातही इथे क्रिकेट कसं वाढलं?

फोटो स्रोत, Getty Images
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अफगाणिस्ताननं इंग्लंडचा पराभव केल्यानं त्यांना स्पर्धेबाहेर पडावं लागलं आहे. या विजयानंतर पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाबाबत चर्चा सुरू झाली आहे.
या पार्श्वभूमीवर अमेरिकन सैन्याचं अनेक वर्षांचं अस्तित्त्वं आणि मग माघार, तालिबानसोबतचा संघर्ष या सगळ्यात अफगाणिस्तानात क्रिकेट कसं रुजलं?
"तुमचे बूट काढा आणि फेकून द्या. रस्त्यावर या, नाचा आणि गा. आम्हा गरीब लोकांसाठी आनंद दुर्मिळ आहे."
ही अफगाणिस्तानातील कवितेची एक प्रसिद्ध ओळ आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट संघ त्यांच्या टी20 वर्ल्डकपमधील प्रत्येक विजयासह हा दुर्मिळ आनंद आपल्या अफगाण जनतेला देत आहे.अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या वर्ल्डकपमधील प्रत्येक विजयाचा त्यांच्या देशातील लोक आनंद साजरा करतात.
भू-राजकीय समस्या, आर्थिक समस्या, संरचनात्मक कमतरता आणि इतर विविध अडथळ्यांवर मात करत अफगाणिस्तान वर्ल्डकपच्या प्रत्येक सामन्यात परिपक्व क्रिकेटचं दर्शन घडवत आहे.
अफगाणिस्तानमध्ये क्रिकेटची सुरुवात कशी झाली?
अफगाणिस्तान संघाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकदार कामिगिरी होण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची भूमिका महत्त्वाची आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या योगदानाशिवाय अफगाणिस्तान क्रिकेटचा लवकर विकास झाला नसता. मात्र अफगाणिस्ताननं वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघाचा पराभव केला आहे.
अफगाणिस्तान 19 व्या शतकापासून ब्रिटिशांकडून क्रिकेट खेळायला शिकले. पण, पाकिस्तानमध्ये आश्रय घेतलेल्या अफगाण निर्वासितांमध्ये क्रिकेट लोकप्रिय झाला आणि तिथे त्यांना क्रिकेट खेळण्याची सवय लागली.
1995 मध्ये अल्लाह दाद नूरी यांनी अफगाणिस्तानसाठी प्रयोग म्हणून पहिल्या राष्ट्रीय संघाचं नेतृत्व केलं आणि पाकिस्तानमधील ग्रेड-2 स्पर्धेत भाग घेतला.

फोटो स्रोत, Getty Images
तालिबानने क्रिकेटवर बंदी घातली नाही
त्यानंतर अफगाणिस्तानचे लोक त्यांच्या मायदेशी परतले आणि 1995 मध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रयत्नातून अफगाणिस्तान क्रिकेट संघटनेची स्थापना झाली.
अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर क्रिकेटवर इतर खेळांप्रमाणेच बंदी घालण्यात आली.
पण तालिबानला काय वाटतंय माहित नाही, पण त्यांचा विचार बदलला आणि त्यांनी क्रिकेट खेळाला अपवाद ठरवलं.

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानने अफगाण क्रिकेटचं पालकत्व स्वीकारलं
त्यानंतर 2001 मध्ये अफगाणिस्तानचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी) मध्ये सदस्य देश म्हणून समावेश करण्यात आला.
अफगाणिस्तानला 2003 मध्ये आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) मध्ये देखील समाविष्ट करण्यात आलं.
जवळपास 10 वर्षे वेगवेगळ्या देशांमध्ये क्रिकेट खेळल्यानंतर, अफगाणिस्तानला मान्यता मिळाली. अफगाणिस्तान 'आयसीसी'चा पूर्णवेळ सदस्य बनला.
2001 ते 2007 पर्यंत पाकिस्तान संघानेच अफगाणिस्तान क्रिकेट आणि संघाचा स्वीकार केला आणि त्यांच्यासोबत क्रिकेट सामने खेळले.
अफगाणिस्तान क्रिकेटच्या विकासात पाकिस्तानचा मोठा वाटा आहे, हे विसरता येणार नाही.
पहिला विजय
आंतरराष्ट्रीय स्तरावर अफगाणिस्तानचा पहिला विजय 2004 मध्ये बहरीनविरुद्ध होता.
त्यानंतर 2007 मध्ये नवरोज मंगलच यांच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्ताननं आशियाई क्रिकेट परिषद टी -20 चॅम्पियनशिप जिंकली.
अफगाणिस्तानने ही ट्रॉफी जिंकल्यानं देशातील लोकांमध्ये क्रिकेटविषयी उत्सुकता निर्माण झाली.
त्याशिवाय अफगाणिस्तान आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन-5, डिव्हिजन-4 आणि डिव्हिजन-3 देखील जिंकले.

फोटो स्रोत, Getty Images
एकदिवसीय आतंराष्ट्रीय सामन्यासाठी पात्रता
या विजयानंतरच अफगाणिस्तानला 2011 च्या वर्ल्डकप पात्रता फेरीत सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यात अफगाणिस्तानचा संघ अपयशी ठरला.
मात्र, अफगाणिस्तानला प्रथमच 4 वर्षांची वनडे पात्रता देण्यात आली. अफगाणिस्तान क्रिकेटमधील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.
त्यानंतर अफगाणिस्तान संघानं स्कॉटलंड, झिम्बाब्वे आणि नेदरलँड्स संघांसोबत क्रिकेट सामने खेळून स्वत:चं नाव कोरलं.
अफगाणिस्तानच्या खेळाडूंकडे पाश्चात्य देशांप्रमाणे क्रिकेटच्या निम्म्या पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. मात्र त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सुविधांचा वापर करून त्यांनी हळूहळू त्यांचा क्रिकेट संघ विकसित केला.
त्याशिवाय अफगाणिस्तान संघ 2010 आयसीसी टी-20 वर्ल्डकप पात्रता स्पर्धेत खेळला आणि अंतिम सामन्यात आयर्लंडचा 8 गडी राखून पराभव करून वर्ल्डकपमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.
टी-20 वर्ल्ड कप
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संघाचा सहभाग असलेल्या टी 20 वर्ल्डकप अफगाणिस्तान टीमचा सहभाग हा त्यांच्यासाठी मोठा क्षण होता.
अफगाणिस्तान पहिल्या फेरीत भारत आणि दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाल्यानं बाहेर पडला.
मात्र, अफगाणिस्तान संघानं या पराभवातून स्वत:ला लगेच सावरलं आणि दुबई इथं झालेल्या आयसीसी इंटरकॉन्टिनेंटल टी-20 चषक स्पर्धेत स्कॉटलंडचा पराभव करून विजेतेपद पटकावलं.
पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध
2012 मध्ये आयसीसीचा पूर्णवेळ सदस्य असलेल्या अफगाणिस्तान संघाचं नेतृत्व नवरोज मंगलनं केलं होतं. हा पाकिस्तान विरुद्धचा त्यांचा पहिला सामना होता.
10 फेब्रुवारी 2012 रोजी शारजाह येथे अफगाणिस्तानचा पाकिस्तानकडून 7 विकेटने पराभव झाला.
2013 मध्ये अफगाणिस्तान क्रिकेटला मोठी ओळख मिळाली. कारण आयसीसीकडून मान्यताप्राप्त सदस्यावरून बढती देत त्यांना सहयोगी सदस्याचं स्थान मिळालं.
2011 च्या वर्ल्डकपमध्ये पात्रता मिळवण्यात अपयशी ठरल्यामुळे अफगाणिस्तान निराश झाला नाही.
अफगाणिस्तानने 2015 वर्ल्डकप पात्रता फेरीत भाग घेतला होता. त्यांनी अंतिम फेरीत केनियाचा 7 गडी राखून पराभव केला आणि 2015 च्या वनडे वर्ल्डकप मालिकेत भाग घेतला.
दोन वर्ल्डकप स्पर्धांमध्ये सहभाग
2015 च्या वर्ल्डकप सिरीजमध्ये अफगाणिस्तानला अनेक पराभव पत्करावे लागले असले तरी सर्वात संस्मरणीय क्षण म्हणजे त्यांचा स्कॉटलंडवर एक विकेटने विजय झाला.
अफगाणिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी देशातील जनता घरोघरी आणि रस्त्यावर उतरली.
अफगाणिस्तान संघाने 2019 च्या सिरीजमध्ये सलग दुसऱ्यांदा भाग घेतला. पण अफगाणिस्तानने राऊंड रॉबिन फोरमेटमध्ये खेळले गेलेले सर्व सामने गमावले.
टी 20 वर्ल्ड कप 2024
अफगाणिस्तानच्या टीमचा खेळ, गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण, टीमची एकता यामध्ये खूप परिपक्व झाला आहे.
सुपर-8 फेरीतील शेवटच्या सामन्यांपर्यंत उपांत्य फेरीत कोण पोहोचणार याची उत्सुकता होती आणि अत्यंत चुरशीच्या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव केला.
विजयानंतर प्रतिक्रिया देताना अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान म्हणाला की, "मी आज खूप आनंदी आहे. आमच्यासाठी हा विजय स्वप्नवत आहे.
वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ब्रायन लाराने आमच्यावर खूप आधी विश्वास दाखवला होता आणि आम्ही वेस्ट इंडिजमध्ये आलो तेंव्हा त्याने आमच्यासाठी वेलकम पार्टी दिली होती त्या पार्टीत त्याने आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्ही ढळू दिला नाही. माझ्या देशवासियांसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे."
वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा यांनी याआधीच अफगाणिस्तान उपांत्य फेरीत पोहोचेल असा अंदाज वर्तवला होता.
टी-20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत आता 27 जूनला भारतीय वेळेनुसार पहाटे साडेपाच वाजता अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा सामना होईल आणि त्याचदिवशी संध्याकाळी भारत विरुद्ध इंग्लंड अंतिम फेरीत जाण्यासाठी एकमेकांशी लढत असतील.

फोटो स्रोत, Getty Images
दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय
22 जून 2017 रोजी आयसीसीने अफगाणिस्तान आणि आयर्लंडला पूर्ण सदस्यत्व दिलं. त्यानंतर 14 जून 2018 मध्ये अफगाणिस्तान संघानं बंगळुरू इथं भारतीय संघाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भाग घेतला.
अफगाणिस्तानचा हा पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना होता.
मार्च 2019 मध्ये अफगाणिस्ताननं आयर्लंडविरुद्ध कसोटी सामना जिंकला. हा अफगाणिस्तानचा पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी विजय होता. अफगाणिस्तानला दुसऱ्या सामन्यात पहिला कसोटी विजय मिळाला.
त्यानंतर अफगाणिस्तानने त्यांच्या फिरकीच्या जोरावर सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध 224 धावांनी कसोटी सामन्यात विजय मिळवला.
युवा खेळाडू सज्ज
अफगाणिस्तान संघाची भक्कम फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण हे संघातील युवा खेळाडूंमुळे आहे. बहुतेक खेळाडूंनी यापूर्वी अंडर-19 संघात स्थान मिळवलं आहे.
अफगाणिस्तानने 2010 मध्ये प्रथमच आयसीसी अंडर-19 वर्ल्डकप स्पर्धेत भाग घेतला होता पण त्यांना फारसा विजय मिळवता आला नाही. पण अफगाणिस्ताननं 2018 च्या वर्ल्डकप उपांत्य फेरीत प्रवेश केला,
जिथं त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. असं असतानाही त्यांनी पाकिस्तानचा 185 धावांनी पराभव करून अंडर-19 आशिया कप जिंकला.
19 वर्षांखालील संघातून मुजीबूर रहमान, झाकीर खान, वफादार मोहम्मद, रशीद खान आणि इशानुल्लाह यांचा समावेश करण्यात आला आहे.
आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी भारताची मदत
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) अफगाणिस्तान क्रिकेटच्या विकासासाठी आणि तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारचं सहाय्य केलं आहे.
तरुणांना क्रिकेट प्रशिक्षण देण्यासाठी देशाचा दौरा करणं, देशातील क्रिकेटपटूंना आवश्यक सहाय्य देणं आणि अफगाणिस्तानच्या खेळाडूंना आयपीएल लिलावात सहभागी होण्याची परवानगी देणं
यामुळे त्यांना क्रिकेटमध्ये पुढील स्तरावर पोहोचण्यास मदत झाली.

फोटो स्रोत, Getty Images
आयपीएलसारख्या सर्वात मोठ्या व्यासपीठावर खेळल्यानं अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंना त्यांची क्रिकेट कारकीर्द आणखी सुधारण्यास मदत झाली आहे.
आयपीएल सिरीजमध्ये सहभागी झाल्यानंतर आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी आपल्या गरजा पूर्ण करून मातृभूमीला जमेल तशी मदत केली.
अफगाणिस्तानच्या माजी राष्ट्रपतींचे क्रिकेटसाठी योगदान
तालिबान सत्तेवर येण्यापूर्वी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असलेले हमीद करझाई यांनी अफगाणिस्तान क्रिकेटची नवी ओळख आणि विविध पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला.
2 जून 2009 रोजी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांनी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डात सुधारणा करण्याचा आदेश जारी केला.
याद्वारे अफगाणिस्तानला आयसीसी आणि एसीसीच्यावतीने विविध आर्थिक सहाय्य मिळालं.

फोटो स्रोत, Getty Images
अनेक अडथळे पार करून अफगाणिस्तान संघ इथपर्यंत पोहोचला
अफगाण संघानं हा विकास साधण्यासाठी विविध अडथळे आणि सामाजिक समस्यांवर मात केली आहे.
ज्या संघाकडे सर्व सुविधा आहेत अशा संघासाठी जिंकणं सामान्य आहे. पण, गंभीर राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेत असलेल्या देशातून आलेल्या अफगाणिस्तानने क्रिकेटच्या प्रेमात पडून असा विकास साधला, हे उल्लेखनीय आहे.
आजच्या अफगाणिस्तान संघातील राशिद खान, मोहम्मद नबी, मुजीब उर रहमान, रहमत शाह, जादरान, रहमतुल्ला गुरबाज आदी खेळाडूंनी जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे.
याआधी कुलुद्दीन नायब, मोहम्मद शेजाद, माजी कर्णधार असगर अफगाण आणि हमीद हसन यांनीही अफगाणिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यात विविध योगदान दिलं आहे.
अफगाणिस्तानचा राशिद खान आयसीसी टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल आहे, तर फारुकी पहिल्या 10 मध्ये आहे.
मोहम्मद नबी ऑलराउंडर श्रेणीत, राशिद खान आणि मोहम्मद नबी वनडे रँकिंगमधील टॉप 10 गोलंदाजांच्या श्रेणीत,तसेच हे दोघं अष्टपैलू गटातही आहेत.
गोलंदाजीच्या प्रदर्शनामुळे त्यांच्या खेळाचा दर्जा वाढला आणि अफगाणिस्तान संघ आंतरराष्ट्रीय संघांसाठीचा हा स्तर गाठू शकला, हे वास्तव आहे.











