AFG vs SL : अफगाणिस्तानचा शानदार विजय, एकाच विश्वचषकात तीन माजी विजेत्यांना लोळवलं

अफगाणिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हशमतउल्ला शाहिदी आणि रहमत शाह

वन डे विश्वचषकात अफगाणिस्ताननं सलग दुसऱ्या आणि एकूण तिसऱ्या विजयाची नोंद केली आहे.

सोमवारी (30 ऑक्टोबर रोजी) पुण्यात गहुंजे इथल्या एमसीए स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं सात विकेट्स राखून विजय साजरा केला.

श्रीलंकेनं दिलेलं 242 रन्सचं लक्ष्य अफगाणिस्ताननं 45.2 ओव्हर्समध्येच गाठलं.

अफगाणिस्तानच्या खात्यात आता सहा पॉईंट्स जमा झाले असून त्यांनी गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यामुळे उपांत्य फेरीच्या शर्यतीत अफगाणिस्तानचं आव्हानही कायम आहे.

गुणतालिका

फोटो स्रोत, Getty Images

याआधी 2015 आणि 2019 च्या विश्वचषकात मिळून अफगाणिस्तानला केवळ एकदाच विजय मिळवता आला होता.

पण यंदा त्यांनी कमाल केली आहे आणि तीन माजी विश्वविजेत्यांना धूळ चारली आहे.

अफगाणिस्ताननं आधी चेन्नईत गतवेळच्या विजेत्या इंग्लंडला 69 रन्सनी हरवलं. मग चेन्नईमध्येच त्यांनी पाकिस्तानवर 8 विकेट्स राखून मात केली.

त्यानंतर आता श्रीलंकेलाही हरवलं. श्रीलंकेचा यंदाच्या विश्वचषकातला हा चौथा पराभव ठरला.

फलंदाजांचं टीमवर्क हे अफगाणिस्तानच्या विजयाचं वैशिष्ठ्य ठरलं.

टीमवर्कचा विजय

खरंतर अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमानउल्ला गुरबाझ शून्यावरच बाद झाला होता. पण दबावात न येता त्यांच्या बाकीच्या फलंदाजांनी शांतपणे खेळ केला.

इब्राहिम झदराननं 39 धावा केल्या. रहमत शहानं सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावत 62 धावांची खेळी केली.

रहमत बाद झाल्यानंतर हशमतउल्ला शाहिदीनं कर्णधारपदाला साजेसा खेळ केला. त्यानं अझमत ओमरझाईसोबत चौथ्या विकेटसाठी नाबाद 111 धावांची भागिदारी केली.

हशमतउल्लानं नाबाद 58 रन्सची तर ओमरझाईनं नाबाद 73 रन्सची खेळी केली आणि अफगाणिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

त्याआधी अफगाण गोलंदाजांनीही कमाल केली. त्यांच्या फजलहक फारुकीला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं.

फारुकीनं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. मुजीब उर रहमाननं 2 तर रशीद खान आणि अझमत ओमरझाई यांनी प्रत्येकी 1 विकेट घेत त्याला चांगली साथ दिली.

श्रीलंकेच्या टॉप ऑर्डरमधील एकाही फलंदाजाला अफगाणिस्तानविरुद्ध अर्धशतकाची वेस गाठता आली नाही.

रशिद खानची वन डे सामन्यांची 'सेंचुरी'

अफगाणिस्तान क्रिकेट टीमचा मुख्य चेहरा असलेल्या रशीद खानचा हा 100 वा एकदिवस सामना होता.

शंभर एकदिवसीय सामने खेळलेला रशीद हा चौथा अफगाणिस्तानी खेळाडू आहे.

रशिद खान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रशिद खान

रशिद अफगाण टीमचा सध्याचा सर्वात मोठा स्टार आहे. जगभरातल्या क्रिकेट लीग्जमध्ये त्यानं शानदार कामगिरी बजावली आहे आणि यंदाच्या विश्वचषकातही मैदानावर आपल्या टीमचा उत्साह वाढवताना दिसतो आहे.

पुण्यात लंकेविरुद्धही रशिद खाननं एक विकेट काढून आपल्या टीमच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

अफगाणिस्तानला आता विश्वचषकाच्या उरलेल्या सामन्यांमध्ये नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा मुकाबला करायचा आहे.

पुण्यात स्टेडियममध्ये अफगाणिस्तानला पाठिंबा देण्यासाठी जमलेले चाहते

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पुण्यात स्टेडियममध्ये अफगाणिस्तानला पाठिंबा देण्यासाठी जमलेले चाहते

श्रीलंकेची लढाई 2 नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. त्यानंतर त्यांना बांगलादेश आणि न्यूझीलंडचं आव्हान पेलायचं आहे.

साहजिकच उपांत्य फेरीची लढत चुरशीची होणार अशी चिन्हं आहेत.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)