PAK vs AFG : अफगाणिस्तानचा ऐतिहासिक विजय, पाकिस्तानसाठी सेमी फायनलची वाट बिकट

 रशिद खान विजयाचा आनंद साजरा करताना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रशिद खान विजयाचा आनंद साजरा करताना

अफगाणिस्ताननं पाकिस्तानला हरवून क्रिकेट विश्वचषकातल्या एका सनसनाटी विजयाची नोंद केली.

अफगाण टीमनं पाकिस्तानवर 8 विकेट्स आणि सहा चेंडू राखून मात केली असून त्यामुळे पाकिस्तानसाठी सेमी फायनलची वाट आणखी बिकट बनली आहे.

चेन्नईत एम ए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं दिलेलं 283 रन्सचं लक्ष्य अफगाणिस्ताननं 49 ओव्हर्समध्येच गाठलं.

अफगाणिस्तानचा वन डे विश्वचषकाच्या इतिहासातला हा आजवरचा तिसरा तर यंदाच्या वन डे वर्ल्ड कपमधला दुसरा विजय आहे. याआधी 15 ऑक्टोबरला दिल्लीत गतविजेत्या इंग्लंडचा 69 धावांनी पराभव केला होता.

वन डे क्रिकेटच्या इतिहासात अफगाणिस्ताननं पहिल्यांदाच पाकिस्तानला पराभूत केलं आहे.

चेन्नईत आधी टीनएजर गोलंदाज नूर अहमदनं पाकिस्तानला तीनशे धावांच्या आत रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मग अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली.

इब्राहिम झदरान, गुरबाझ, रहमतची अर्धशतकं

या सामन्यात 283 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहिम झदराननं सर्वाधिक 87 रन्सची खेळी केली. त्यानं 113 चेंडूंमधली रही खेळी 10 चौकारांनी सजवली.

त्यालाच सामनावीराचा किताबही देण्यात आला.

झदरान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इब्राहिम झदरान, अर्धशतक साजरं करतानाा

झदराननं आधी रहमानउल्ला गुरबाझसरह सलामीला 130 धावांची भागीदारी रचली आणि टीमच्या डावाची खणखणीत पायाभरणी केली. मग रहमत शाहसह त्यानं आणखी एक 60 रन्सची भागीदारी रचली.

गुरबाझनं 53 बॉलमध्ये 9 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 65 धावा केल्या. तर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या अनुभवी रहमत शाहनं 45 चेंडूंमध्ये 4 चौकारांसह नाबाद 77 धावा केल्या.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानच्या पहिल्या तीन फलंदाजांनी अर्धशतकं झळकावण्याची ही दुसरीच घटना आहे.

झदरान बाद झाल्यावर कर्णधार हशमतउल्ला शाहिदीनं रहमतला चांगली साथ दिली आणि टीमच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

हशमतुल्लाह शाहीदी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहीदी विजय साजरा करताना

शाहिदीनं नाबाद 48 रन्सची खेळी केली आणि रहमतसह तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 96 धावांची भागिदारी उभारली.

पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि हसन अलीला प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

नूर अहमदची कमाल

त्यापूर्वी पाकिस्ताननं पहिल्यांदा फलंदाजी करताना 7 बाद 282 धावा केल्या होत्या.

अफगाणिस्तानकडून या सामन्यात चार फिरकी गोलंदाज खेळवले होते. 18 वर्षांचा नूर अहमद सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. लेफ्ट आर्म स्पिनर नूरनं 3 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद नबीला 1 विकेट मिळाली.

एकमेव वेगवान गोलंदाज नवीन उल हक यानं दोन विकेट्स घेतल्या.

nur ahmad

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नूर अहमद

पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमनं 92 बॉलमध्ये 74 धावांची खेळी केली. बाबरचं या स्पर्धेतील हे दुसरं अर्धशतक आहे. यापूर्वी त्यानं भारताविरुद्ध अर्धशतकी खेळी केली होती.

बाबर बाद झाल्यानंतर शादाब खान आणि इफ्तिखार अहमद यांनी फटकेबाजी करत पाकिस्तानला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.

या दोघांमध्ये इफ्तिखार अधिक आक्रमक होता. त्यानं 27 बॉलमध्ये 2 चौकार आणि 4 षटकारांसह 40 धावा केल्या. शादाब खानही 40 धावांवर बाद झाला.

सलामीवीर अब्दुल्ला शफीकनं अर्धशतक झळकावत 58 धावा केल्या. पाकिस्तानी फलंदाजांचे हे सर्व प्रयत्न अखेर अपुरे ठरले.

चेन्नईच्या खेळपट्टीचा फिरकीला साथ देण्याचा इतिहास आहे. त्यामुळे या सामन्यात अफगाणिस्ताननं 4 फिरकी गोलंदाज खेळवले.

पाकिस्तानचं आव्हान संकटात

पाकिस्ताननं 2023 मधील वन-डे सामन्यात पहिल्या दहा ओव्हर्सच्या ‘पॉवर प्ले’मधील षटकारांचा दुष्काळ या सामन्यात संपवला.

सलामीवीर अब्दुल्ला शफीकनं हा षटकार लगावला. 20 सामने आणि 1169 बॉलनंतर पाकिस्तानी फलंदाजाला यावर्षी वन-डे सामन्यातील ‘पॉवर प्ले’मध्ये षटकार लगावण्यात यश आलं.

पण सामना गमावला

शाहीन शाह आफ्रिदी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शाहीन शाह आफ्रिदी

पाच सामन्यांत दोन विजयांसह अफगाणिस्ताननं आता गुणतालिकेत सहावं स्थान गाठलं आहे.

दुसरीकडे पाकिस्तानला सलग तीन सामन्यांत भारत, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या तीन संघांविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला आहे.

पाकिस्तानं पाच सामन्यांत केवळ दोनच सामने जिंकले असून, गुणतालिकेत ते पाचव्या स्थानावर गेले आहेत आणि त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झालाय.

पाकिस्तानला आता उर्वरित सर्व सामने चांगल्या फरकानं जिंकणे आवश्यक आहे.

पाकिस्तानचा पुढील सामना 27 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. तर अफगाणिस्तानची टीम 30 ऑक्टोबर रोजी श्रीलंकेचा मुकाबला करेल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)