IND vs BAN : विराट कोहलीच्या शतकासाठी अंपायरनी वाईड दिला नाही, हे नियमात बसतं का?

विराट

फोटो स्रोत, Getty Images

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सामन्यात विराट कोहलीच्या शतकाइतकीच अंपायर रिचर्ड रिचर्ड केटलबरो यांच्या निर्णयाची देखील क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चा रंगलीय.

टीम इंडियाच्या इनिंगमधील 42 व्या ओव्हरमध्ये भारताला जिंकायला 2 धावांची गरज होती. विराट शतकापासून 3 धावांनी दूर होता.

बांगलादेशकडून फिरकी गोलंदाज नसुम अहमदनं 42 वी ओव्हर टाकली. या ओव्हरमधील पहिलाच बॉल वादग्रस्त ठरला.

नसुमनं तो बॉल लेग साईडला टाकला होता. विराट कोहली देखील त्यावेळी काहीसा आत सरकला. त्यावेळी अंपायर तो वाईड बॉल दिला नाही.

मर्यादीत ओव्हर्सच्या सामन्यातील वाईड बॉलचे कडक नियम लक्षात घेता तो वाईड बॉल असेल असाच सर्वांचा अंदाज होता. पण अंपायर केटलबरो यांनी तो बॉल वैध ठरवला.

नसुमनं बॉल टाकल्यानंतर विराट काहीसा आत सरकला होता. त्यानंतर तो बॉल त्याच्या शरीराच्या अगदी जवळून गेला. त्यामुळे केटलबरो यांनी तो वाईड बॉल दिला नाही, असं मत त्यावेळी समालोचकांनी व्यक्त केलं.

अंपायरच्या या निर्णयाचा विराटनं फायदा उठवला. त्यानं नसुमला षटकार लगावत आपल्या शतकासह टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

नियम काय सांगतो?

अंपायरच्या निर्णयातील नियम क्रमांक 2.12 नुसार एखादा निर्णय ते तात्काळ दुरुस्त करु शकतात. नियम क्रमांक 20.6 नुसार डेड बॉलचा निर्णय बदलता येत नाही. त्याखेरीच मैदानात अंपायरनं दिलेला निर्णय अंतिम असतो, तो नंतर बदलता येत नाही.

IND vs BAN : भारताचा बांगलादेशवर दणदणीत विजय

भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं पराभव करत विश्वचषक स्पर्धेतील सलग चौथा विजय मिळवलाय. विराट कोहलीचं 48 वं शतक या विजयाचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं.

विराट कोहलीनं षटकार लगावत त्याच्या शतकासह भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. विराटनं हे शतक 97 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं पूर्ण केलं.

या शतकासह गहुंजे इथल्या एमसीए स्टेडियमवरचा भन्नाट रेकॉर्डही विराटनं कायम राखलाय. विराटनं इथं आठ सामने खेळले असून त्यामध्ये त्यानं तीन शतक आणि तीन अर्धशतक झळकावले आहेत.

विराटचं या स्पर्धेतील हे पहिलंच शतक आहे. त्यानं यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान विरुद्धही अर्धशतक झळकावलं होतं.

विराटला केएल राहुलनं चांगली साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 83 धावांची भागिदारी केली. राहुलनं 34 बॉलमध्ये 34 धावा केल्या.

भारताची दमदार सुरूवात

बांगलादेशनं दिलेल्या 257 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मानं आक्रमक सुरूवात केली. दुसरा सलामीवीर शुबमन गिलनंही सेट झाल्यावर चांगली फटकेबाजी केली.

रोहित शर्माचं अर्धशतक 2 धावांनी हुकलं. त्यानं 40 बॉलमध्ये 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 48 धावा केल्या. हसन महमूदनं रोहितला बाद केलं.

शुबमन गिलनं विश्वचषक स्पर्धेतील पहिलं अर्धशतक 52 बॉलमध्ये पूर्ण केलं. वन-डे कारकिर्दीमधील त्याचं हे दहावं अर्धशतक आहे.

शुबमनला डेंग्यूमुळे पहिले दोन सामने खेळता आले नव्हते. अहमदाबादमध्ये पाकिस्तान विरुद्ध त्यानं टीममध्ये पुनरागमन केलं.

शुबमन अर्धशतकानंतर लगेच बाद झाला. मेहदी हसनला षटकार लगावण्याचा त्याचा प्रयत्न फसला. महमदुल्लानं बाऊंड्री लाईनवर त्याचा चांगला झेल घेतला. गिलनं 53 धावा केल्या.

रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

टीम इंडियाचा पुढील सामना 22 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध धरमशालामध्ये होणार आहे. या स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड हे दोनच संघ आत्तापर्यंत अपराजित आहेत.

त्यापूर्वी बांगलादेशनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 8 बाद 256 धावा केल्या होत्या.

या सामन्यात बांगलादेशची सुरुवात चांगली झाली. तांझिद हसन आणि लिटन दास या सलामीच्या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 93 धावांची भागिदारी केली.

वन-डे विश्वकप स्पर्धेच्या इतिहासात बांगलादेशच्या फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी केलेली ही सर्वोच्च भागिदारी आहे.

कुलदीप यादवनं तांझिदला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर 1 बाद 93 वरुन बांगलादेशची 4 बाद 137 अशी घसरण झाली.

अनुभवी मुश्फिकुर रहीमनं तौहित ऱ्हिदोयसोबत पाचव्या विकेटसाठी 52 धावांची भागिदारी करत ही पडझड रोखण्याचा प्रयत्न केला.

तौहित ऱ्हिदोयचा संघर्ष या सामन्यातही सुरूच होता. त्यानं 16 धावा करण्यासाठी 35 बॉल घेतले. शार्दूल ठाकूरला फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला.

बांगलादेशचा अनुभवी खेळाडू मुश्फिकुर रहीमला या स्पर्धेतील सलग तिसरं अर्धशतक झळकावता आलं नाही. जसप्रीत बुमरानं त्याला 38 धावांवर बाद केलं. रविंद्र जाडेजानं उजवीकडं झेपावत त्याचा भन्नाट झेल घेतला.

मुश्फिकूर बाद झाल्यानंतर महमदुल्लानं 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 36 बॉलमध्ये 46 धावा केल्या. बुमरानं शेवटच्या ओव्हरमध्ये त्याला बाद केलं.

भारताकडून बुमरा सिराज आणि जाडेजानं प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव आणि शार्दूल ठाकूर यांना 1-1 विकेट मिळाली.

हार्दिकच्या दुखापतीनं वाढवली चिंता

भारताकडून हार्दिक पांड्यानं नवव्या ओव्हरची सुरूवात केली होती. लिटन दासनं त्याच्या पहिल्या तीन बॉलवरच दोन चौकार लगावले. लिटननं लगावलेला फटका अडवताना हार्दिकचा पाय दुखावला.

हार्दिकवर काही वेळ मैदानात उपचार करण्यात आले. त्या उपचारानंतरही त्याला गोलंदाजी करणं शक्य नाही हे लक्षात आल्यानंतर रोहितनं विराटला हार्दिकची उर्वरित ओव्हर पूर्ण करण्यास सांगितलं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

सध्या हार्दिकच्या दुखापतीची तपासणी करण्यात येतीय. हार्दिकच्या पायाचे स्कॅन करण्यात येणार असल्याची माहिती बीसीसीआयनं ट्विट करून दिलीय.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)