बिशनसिंह बेदींनी जेव्हा 97 धावांवर पाच विकेट्स गेल्या असताना डाव घोषित केला आणि...

फोटो स्रोत, Getty Images
- Author, आदेश कुमार गुप्ता
- Role, बीबीसी हिंदीसाठी
गो हाथ को जुम्बि़श नहीं आँखों में तो दम है
रहने दो अभी साग़रो-मीना मेरे आगे
उन के देखे से जो आ जाती है मुंह पर रौनक़
वो समझते हैं कि बीमार का हाल अच्छा है
सल्लागार संपादक असलेले माजी क्रिकेटपटू व्यंकटसुंदरम आणि लेखक सचिन बजाज यांनी संपादित केलेल्या ‘बिशन सिंग बेदी, द सरदार ऑफ स्पिन या पुस्तकाचं दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये प्रकाशन झालं, तेव्हा मिर्झा गालिबचे हे दोहे अचानक आठवले.
25 सप्टेंबर 1946 रोजी पंजाबमधील अमृतसर शहरात जन्मलेले भारताचे माजी कर्णधार, प्रशिक्षक, निवडकर्ता आणि हवेत तरंगत व दिशा बदलत चतुराईने उडणाऱ्या चेंडूंच्या जोरावर 67 कसोटी सामन्यांमध्ये 266 बळी घेणारे बिशनसिंग बेदी यांचं आज (23 ऑक्टोबर 2023) वयाच्या 77 व्या वर्षी निधन झालं.
पुस्तक प्रकाशनाच्या संध्याकाळी साहजिकच त्यांच्या गोलंदाजीवर चर्चा व्हायला हवी होती, पण ती संध्याकाळ त्यांच्या मद्यपानाच्या सवयी आणि प्रेमळ स्वभावाच्या कथांमध्ये निघून गेली.
अर्थात अधून-मधून त्यांच्या खेळाविषयीही चर्चा झाली.
एकेकाळी आपल्या गोलंदाजीने जगातील महान आणि सर्वोत्तम फलंदाजांना रोखणारे बिशनसिंग बेदी तब्येतीच्या तक्रारींमुळे व्हीलचेअरवर बसून त्यांच्या कुटुंबातील सदस्य, माजी खेळाडू, शेजारी, नातेवाईक, क्रीडा पत्रकार आणि मित्रांना भेटले.
लोकांनी खचाखच भरलेल्या हॉलमध्ये ते जेव्हा दाखल झाले तेव्हा संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने दणादूण गेला.
बिशन सिंग बेदी यांच्या पत्नी, मुलगी नेहा, मुलगा अंगद बेदी, माजी क्रिकेटपटू मदन लाल, अंशुमन गायकवाड, कीर्ती आझाद, गुरशरण सिंग, व्यंकटसुंदरम, विनय लांबा आणि ज्येष्ठ राजकीय पत्रकार-लेखक राजदीप सरदेसाई यांसारखे सेलिब्रिटीही सभागृहात उपस्थित होते.
क्रिकेटपटू म्हणून बेदींच्या सोनेरी आठवणी
बिशन सिंग बेदी यांच्या खेळाशी आणि वैयक्तिक जीवनाशी संबंधित गोष्टी सर्वांसमोर मांडण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यात आलेलं ज्याच्यावरून संवाद साधण्याची जबाबदारी माजी भारतीय क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांचा मुलगा राजदीप सरदेसाई आणि बिशन सिंग बेदी यांचा मुलगा अंगद बेदी यांच्यावर सोपवण्यात आलेली.
अंशुमन गायकवाड यांनी त्या दोघांना साथ दिली.
आपल्या एका अनुभवाने कार्यक्रमाची सुरुवात करताना राजदीप सरदेसाई म्हणाले की, अनेक वर्षांपूर्वी एका मैत्रीपूर्ण सामन्यात ते जेव्हा बिशनसिंग बेदींचा सामना करण्यासाठी मैदानात उतरले, तेव्हा त्यांच्या पहिल्याच षटकात दोन-तीन चेंडूंचा सामना केल्यानंतर फटका मारण्यासाठी ते काही पावलं पुढे आले आणि त्रिफळाचित झाले.

फोटो स्रोत, Getty Images
बिशनसिंग बेदी यांनी नंतर सांगितलं की, ते अजूनही गोलंदाजीसाठी डावा हात म्हणजेच विरुद्ध हात वापरतात.
राजदीप सरदेसाई यांनी नंतर वैयक्तिक संभाषणादरम्यान सांगितलं की, बेदी साहेबांसोबत लहानपणापासून अनेक आठवणी जोडलेल्या आहेत. कारण जेव्हा त्यांना क्रिकेटची आवड होती, तेव्हा बेदीजी भारताचे कर्णधार होते.
क्रिकेटच्या मैदानाबाहेरही बोलबाला...
बेदी राजदीप यांच्या वडिलांसोबत खेळायचे तेव्हाच्या गोष्टीही राजदीप यांना आठवतात. त्यांनी क्रिकेटच्या मैदानाबाहेरही बरंच काही केलंय आणि नेहमी खरं बोलण्याचा प्रयत्न केला. विशेषत: बीसीसीआयसारख्या सर्वशक्तिशाली संस्थेबाबतही ते स्पष्टपणे बोलत असंत.
क्रिकेटर म्हणून केवळ मैदानच गाजवलेलं नाही तर मैदानाबाहेरही त्यांचा बोलबाला होता.
बिशनसिंग बेदी यांच्याशी संबंधित आठवणी सांगताना माजी निवडकर्ता आणि क्रिकेटपटू आकाश लाल म्हणाले की, 1969 साली जेव्हा दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळला जात होता आणि ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या सामन्यात डग वॉल्टर्सला बेदींनी ज्याप्रकारे बाद केलेलं, ते कधीच विसरता न येण्यासारखं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणाले की, बेदींचे हवेत संथपणे फिरत येणा-या सलग चार चेंडूंचा डग वॉल्टर्सने बचावात्मक पद्धतीने सामना केला.
बेदींनी पुढचा चेंडू क्रीजच्या कोपऱ्यातून टाकण्याचा प्रयत्न करत असताना 'आता वॉल्टर्स गेला' असं त्यांच्या तोडून बाहेर पडलं. बेदींनी टाकलेला तो एक वेगवान चेंडू होता ज्यावर वॉल्टर्सने स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न केला पण त्याचा ऑफ स्टंप उखडला गेला आणि तो बाद झाला.
आकाश लाल म्हणाले की तो क्षण किंवा ती गोलंदाजीची अॅक्शन मी कधीच विसरू शकत नाही.
मी अजूनही तरुण आहे...
बिशन हे निर्विवादपणे सर्वोत्कृष्ट खेळाडू होते पण ते भारतीय क्रिकेटमधील एक असे खेळाडू होते ज्यांची खरी किंमत कधीच कुणाला कळली नाही.
विजय हजारेसुद्धा असेच होते आणि दोघेही स्वतःबद्दल कधीच काही बोलले नाहीत. आम्ही बेदींबद्दल जाणून घेण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी काहीही सांगितलं नाही, हे त्यांचं मोठेपण आहे.
क्रिकेटपटूंमध्ये असे गुण क्वचितच आढळतात. ते नेहमी सत्याच्या बाजूने उभे असायचे. ते कधीच चुकीच्या माणसाचं समर्थन करत नसत. क्रिकेटवर त्यांचं जीवपा़ड प्रेम होतं म्हणून त्यांनी कायम क्रिकेटच्या भल्यासाठी काम केलं.
अशी चर्चा सुरू असतानाच तरूणपणी बेदी दिल्लीच्या ज्या पंचशील भागात राहत राहायचे त्या दिवसांची आठवण करून देताना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेने सांगितलं की, बेदी त्यांना आपल्या आईप्रमाणे मानत. बेदींना त्यांनी बनवलेली अंड्याची भुर्जी खूप आवडायची.
महिलेनं सांगितलं की, पूर्वी त्यांचा आवाज खूप गोड होता आणि आत्ताही तो पूर्वीसारखाच असला असता तर त्यांनी बिशन यांच्यासाठी त्यांच्या आवडीचं मलिका पुखराज यांचं - 'अभी तो मैं जवान हूं' हे गाणं गायलं असतं.
वातावरणात क्षणभर हशा पिकला आणि मंचावर सूत्रसंचालन करणारे राजदीप सरदेसाई म्हणाले की, तुम्ही अजूनही तरूणच आहात, गाता येत नसेल तर एक-दोन ओळी गाऊन दाखवा.
महिलेनं त्यानंतर संपूर्ण गाणं गायलं – अभी तो मैं जवान हूं, अभी तो मैं जवान हूं… साहजिकच टाळ्यांचा कडकडाट झाला.
बिशनजींचं इंग्रजी कधीच समजलं नाही
बिशन सिंग बेदी यांच्याशी संबंधित किस्सा सांगताना माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद म्हणाले की, त्यांनी मॉडर्न स्कूल, बाराखंबा रोड, दिल्ली आणि नंतर सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं असलं तरी त्यांना बिशनजींचं इंग्रजी कधीच समजलं नाही.
बिशन यांचा फक्त सुरुवातीचा आणि शेवटचा असे दोनच शब्द त्यांना समजायचे.
कीर्ती आझाद पुढे म्हणाले की, बिशन त्यांचे कर्णधार होते आणि प्रत्येक सामन्यात दुपारच्या जेवणापूर्वी हिरवी, नंतर निळी-पिवळी पगडी बदलून खेळण्यासाठी प्रसिद्ध होते. पण हे सगळ्यांनाच माहीत नाहीये की ते महिलांमध्येही खूप लोकप्रिय होते, मग ती सोळा वर्षाची असो की साठ वर्षाची असो. मैदानाबाहेर त्यांच्याभोवतीच त्यांचाच वेढा असायचा.

फोटो स्रोत, ROLI BOOKS
कीर्ती आझादच्या स्पष्टवक्तेपणाने खूश होऊन, राजदीप सरदेसाई यांनी माजी क्रिकेटपटू मदन लाल यांना बेदी साहेबांच्या काही सेन्सॉर न केलेल्या कथा, म्हणजे काही सेन्सॉर न केलेली गुपितं उघड करायला सांगितलं.
मदन लाल थोडे लाजले आणि म्हणाले की, सेन्सॉर न केलेली गोष्ट असेल तर ती इथे कशी सांगता येईल?
मग मदनलाल इंग्रजीत म्हणाले, ‘बिशन वॉज माय कॅप्टन, आई हॅव ग्रेट रिस्पेक्ट फॉर हिम सो आय डोंट टेल सिक्रेट स्टोरी.’
आता मी हिंदीत बोलतो, नाहीतर सगळे माझं इंग्रजी पकडतील. मदन पुढे म्हणाले, की आम्ही दोघेही अमृतसरचे आहोत आणि दिवंगत ज्ञानप्रकाश हे आमच्या दोघांचेही शिक्षक होते. नम्रपणे कसे वागावे याची शिकवण त्यांच्याकडून मिळाली.
पाकिस्तानची ती घटना
हलक्याफुलक्या वातावरणाला रंजक बनवत राजदीप सरदेसाई म्हणाले की, बिशन आणि ड्रिंक्सशी संबंधित अनेक कथा प्रसिद्ध आहेत.
काही वर्षांपूर्वी ते पाकिस्तानात गेले असताना त्यांनी बेदींना दिल्ली विमानतळावरील ड्युटी फ्री शॉपमध्ये रमची एक बाटली आणि इतर तीन बाटल्या खरेदी करताना पाहिलं. ही 1978 ची गोष्ट आहे जेव्हा ते भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते.
पाकिस्तानमधील कस्टममध्ये याची तपासणी केली जाईल, असं राजदीप यांनी त्यांना सांगितलं. यावर बेदी म्हणाले, काळजी करू नका, काही होणार नाही. आणि जेव्हा ते पाकिस्तानला पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की कस्टमच्या इथे दोन रांगा लागल्या होत्या.
एक बिशनसिंग बेदी यांच्यासाठी आणि दुसरी इतरांसाठी. रम आणि इतर बाटल्या घेऊन बेदीसाहेब आरामात निघून गेल्याचं सर्वांनी पाहिलं.

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानमध्ये त्यांचे अगदी नवज्योतसिंग सिद्धूपेक्षाही जास्त मित्र आहेत.
मी त्या सामन्याबद्दल बोलतोय ज्या सामन्यात 97 धावांवर पाच विकेट पडल्यानंतर डाव घोषित करण्यात आलेला.
बिशनसिंग बेदी यांच्याबद्दल माजी भारतीय फलंदाज आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड म्हणाले की, ते सर्व खेळाडूंना समान मानत होते मग ते सुनील गावस्कर असोत किंवा मदन लाल असोत किंवा करसन घावरीसारखे कुणी तरूण खेळाडू असोत.
बेदी यांनी तरुणांना नेहमीच प्रोत्साहन दिलं. ते खूपच स्वाभिमानी आहेत. ते जे बोलतात ते करतात आणि त्याचविषयी बोलतात, जे ते करतात. बिशन पूर्णपणे वेगळे आहेत म्हणूनच ते इथवर पोहोचलेले आहेत.
अंशुमन गायकवाड पुढे म्हणाले की, त्यांच्यासारखा कर्णधार कधीच पाहिला नव्हता. ते अतिशय मनमिळावू स्वभावाचे होते आणि त्यांनी कधीही स्वतःबद्दल फारसा विचार केला नाही, म्हणूनच ते पुस्तक प्रकाशनासाठी बडोद्याहून आले आहेत.
1975-76 च्या वेस्ट इंडिज दौऱ्यात जमैकामध्ये भारतीय खेळाडूंचा एकापाठोपाठ एक पाडाव होत असताना बिशनसिंग बेदीने दुसरा डाव 5 विकेट्सवर 97 धावांवर घोषित केला आणि भारताचा पराभव झाला. दुखापतीमुळे गायकवाड स्वतः फलंदाजीला आले नाहीत.
बेदींच्या निर्णयाबाबत अंशुमन गायकवाड म्हणाले की, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि वेस्ट इंडिजचे गोलंदाज गोलंदाजी करत असल्याने जिंकण्याचा किंवा हरण्याचा प्रश्नच येत नव्हता. त्याच्यासारखा फलंदाज जखमी झाल्यावर गोलंदाज कसे तगणार?
बिशन पाजींनी जे केलं ते योग्यच होतं, नाहीतर चंद्रशेखर आणि व्यंकट राघवन यांनी काय केलं असतं?
क्लब क्लास ते वर्ल्ड क्लास
बिशनसिंग बेदी यांच्याबाबत क्रीडा पत्रकार जी राजारामन म्हणाले की, त्यांच्याबद्दल नवीन काही सांगणं कठीण आहे. त्याचं हृदय खूप मोठं आहे. ते प्रत्येकाला त्यांच्या पद्धतीने शिकवतात, ते एक उत्कृष्ट खेळाडू होते. अतिशय सुशिक्षित होते. त्यांचे योगदान विसरता येणार नाही.
266 विकेटच्या जोरावर त्यांचं मूल्यांकन करणं योग्य ठरणार नाही. ते भारताचे कर्णधार, प्रशिक्षक आणि निवडकर्ते देखील होते. भारतात आलेल्या न्यूझीलंड संघाच्या डॅनियल व्हिटोरीला त्यांनी शिकवलं आणि आपण फक्त भारताचेच नाही जगाचे गुरू असल्याचं सांगितलं.
ते म्हणाले की, गावस्करांच्या शेवटच्या कसोटी सामन्यात त्यांनी पाकिस्तानच्या तौसिफ अहमद आणि इक्बाल कासिम यांना सांगितलं होतं की, जेव्हा खेळपट्टीवर खूप सा-या गोष्टींना वाव असतो, तेव्हा चेंडू फक्त सरळ ठेवा. भारताच्या पराभवानंतर लोकांनी त्यांच्या विरोधात खूप लिहिलं पण ते बदलले नाहीत.
क्रिकेट समीक्षक प्रदीप मॅगझिनने सांगितलं की, या कार्यक्रमात सर्वांनी पाहिलं की क्रिकेटपटू आणि इतरांनी त्याच्या खेळाव्यतिरिक्त त्यांच्या इतर वेगळ्या गोष्टी कश्या सांगितल्या.
कर्णधार, प्रशिक्षक आणि निवडकर्ता म्हणून त्यांनी किती योगदान दिलं आणि क्रिकेटसाठी त्यांनी नेहमीच कसा आवाज उठवला हे यावरून दिसून येतं.
बीसीसीआय असो, अधिकारी असो की सरकार, कोणाचीही पर्वा न करता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. त्यांच्या प्रशिक्षणाअंतर्गत पंजाब जेव्हा चॅम्पियन झाला तेव्हा त्यांनी खेळाडूंना एकच गोष्ट समजावून सांगितली की, मैदानावर पंचाने चुकीचा निर्णय दिला तरी त्याविरुद्ध अपील करण्याची गरज नाही.

फोटो स्रोत, Getty Images
बिशन सिंग बेदी ‘सरदार ऑफ स्पिन’ पुस्तकाचे सल्लागार संपादक आणि दिल्लीचे माजी क्रिकेटपटू व्यंकट सुंदरम म्हणाले की, ते बिशनसिंग बेदी यांना गेल्या पंचावन्न वर्षांपासून ओळखतात. आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी खास करण्याचा विचार केला.
आम्ही लिहिलं असतं तर कदाचित चार-पाच पुस्तकं आली असती, इतकी माहिती आमच्याकडे आहे. मग विचार केला, बिशनसिंग बेदींसोबत जे देश-विदेशात खेळले आहेत, त्यांना ही संधी द्यावी, त्यांना लेख लिहायला लावावेत म्हणजे वेगवेगळी मतं आणि दृष्टिकोन समोर येतील. या
मध्ये भारतातील सहा कर्णधार आणि परदेशातील तीन जणांनी लेख लिहिले आहेत, बाकीचे वेगळे लेख आहेत. या पुस्तकात फक्त कथा आहेत. वेंकट सुंदरम यांनी या पुस्तकात 'क्लब क्लास टू वर्ल्ड क्लास' असा एक लेख लिहिला आहे.
वेंकट सांगतात की, ते दिल्लीचे क्लब क्रिकेटर होते, बेदींनी त्यांना प्रोत्साहन दिलं. ते खेळले तेव्हा सुरुवातीला कुणीच नव्हते पण पुढच्या दहा वर्षांत दिल्लीने सर्व जेतेपदं पटकावली.
बेदी किती लोकप्रिय होते?
बिशनसिंग बेदी दिल्लीचे प्रशिक्षक असताना मीडियात किती लोकप्रिय होते, याचं जिवंत उदाहरण मी स्वतः पाहिलं आहे.
दिल्लीतील रणजी ट्रॉफी सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाची संततधार सुरू होती. 1 वाजेपर्यंत मैदान खूप ओलं झालं होतं त्यामुळे खेळणं शक्य नव्हतं, पण बेदी साहेबांनी सर्व खेळाडूंना मैदानावर आणलं आणि काहींना मैदानावर चक्कर मारायला सांगितली, काहींना फलंदाजीला, काहींना गोलंदाजी आणि काहींना झेल पकडण्याचा सराव करायला सांगितलं.
अधूमधून ते सीमारेषेजवळ ठेवलेल्या खुर्चीवर बसून पाणी प्यायचे. मी अनेकवेळा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी ते हसून टाळत होते, पण ते टीव्ही चॅनलच्या पत्रकारांशी व्यवस्थित बोलत असल्याचं मी पाहिलं.

फोटो स्रोत, Getty Images
संध्याकाळचे पाच वाजले होते तेव्हा मला राहावलं नाही आणि मी हसत म्हणालो, "बेदी साहेब, जर मी पण मुलगी असते तर तुम्ही मला तेव्हाच मुलाखत दिली असती का? उत्तरात बेदीसाहेबही हसले आणि म्हणाले, तुम्हाला जे विचारायचं आहे ते पटकन विचारा. सेहवाग किंवा दिल्लीतील इतर खेळाडूंशी कोणी बोलण्याचा प्रयत्नही केला नाही, ही बेदी साहेबांची जादू होती."
एकेकाळी फिरकी त्रिकूट म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेदी, चंद्रा, प्रसन्ना यांच्यातील महत्त्वाचा दुवा असलेले भागवत चंद्रशेखर पुस्तकात लिहितात की ते बेदींसोबत 42 कसोटी सामने खेळले. ते अनेकदा बेदींसोबत एकाच खोलीत राहायचे. चंद्रा यांच्याकडे मुकेशच्या आणि बेदींच्या पंजाबी, उर्दू आणि हिंदी कॅसेट होत्या.
या त्रिकुटातील तिसरा दुवा इरापल्ली प्रसन्ना लिहितात की, बेदी फिरकी गोलंदाजीच्या कलेतील प्रतिभावान खेळाडू आहेत.
माजी यष्टिरक्षक फलंदाज फारुख इंजिनियर यांनी लिहिलं आहे की, "पाजींच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षण करणं हा महान विनू मांकड यांच्यासाठी यष्टीरक्षण करण्यासारखा संपन्न करणारा अनुभव होता."
त्यांची सहज केलेली गोलंदाजी म्हणजे जणूकाही एखादी कविता लयीत वाचली जातेय, असा अनुभव येई. फलंदाजाला ते कधीच घाबरले नाहीत. फलंदाजाच्या डोक्यात काय चाललंय याचा ते अंदाज बांधू शकत होते. त्यांची चेंडूफेक अतिशय जलद असे आणि प्रत्येकवेळी बॉलचा टप्पा वेगवेगळ्या ठिकाणी पडायचा. ते कायम हसतमुख असायचे आणि ते जिथे जिथे खेळले तिथे तो खूप लोकप्रिय झाले.
योगायोगाने वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी विनू मांकडच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षण करण्याची संधी इंजिनिअर यांना मिळाली होती.
कपिल, गावस्कर यांना बेदींबद्दल काय वाटायचं?
माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी लिहिलंय की, जोपर्यंत वसीम अक्रम मैदानावर आला नव्हता तोपर्यंत बेदी सर्वोत्तम गोलंदाजी करणारे गोलंदाज होते.
1971 च्या वेस्ट इंडिज दौऱ्यात त्रिनिदाद इथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटी सामन्याच्या वेळी बेदींना पहिला मुलगा झाला. त्यांनी मुलाचं नाव गावस इंद्र सिंग ठेवलं, गावस्कर हा स्वतःसाठी सर्वात मोठा सन्मान मानतात.
माजी कर्णधार कपिल देव लिहितात की जुन्या गोष्टी आठवतो तेव्हा मला शर्टाची बटणं उघडी ठेवलेले आणि कॉलर वर करून गोलंदाजी करणारे बिशन दिसतात. 1990 मध्ये जेव्हा संघाने न्यूझीलंड आणि इंग्लंडचा दौरा केला तेव्हा बेदी हे कपिलचे पहिले कर्णधार आणि व्यवस्थापक होते.
बेदी यांच्याशी दिवस असो वा रात्र कधीही क्रिकेटबद्दल बोलता येतं. 1976 मध्ये, त्यांनी वेस्लीन घोटाळ्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जॉन लीव्हरविरुद्ध एकहाती लढा दिलेला. कोणत्याही गोलंदाजाने विकेट घेण्यासाठी चुकीच्या पद्धतींचा वापर करावा हे बेदींना मान्य नव्हतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








