भारत-पाकिस्तान : ‘नशीब चंद्रावर वस्ती झाली नाही. नाहीतर अहमदाबादला यानं उतरली असती’

फोटो स्रोत, Getty Images
- Author, द्वारकानाथ संझगिरी
- Role, क्रिकेट समीक्षक आणि लेखक
भारत विरुद्ध पाकिस्तान हा शो पीस सामना शनिवारी संपला.
"सामना" खरं तर झालाच नाही. पाकिस्तानी संघ लढतोय असं काही काळ वाटलं आणि त्यांचं अवसान अचानक गळाल. आणि बघता बघता तो संघ दाती तृण धरून शरण आला.
"पाकिस्तानला हरवलं" किंवा काहींच्या बाबतीत "पाकिस्तानची जिरवली" हा चाहत्यांसाठी सेलिब्रेशनचा भाग सोडला तर पाकिस्तानच्या 30 व्या षटकानंतर सामना एकतर्फी झाला.
मला ते अपेक्षित होत. आणि मी वारंवार म्हटलं आहे की आजचा भारतीय संघ पाकिस्तानच्या संघा पेक्षा इतका ताकतवान आहे, की दहापैकी आठ वेळा आपण सहज जिंकू, एक वेळ लढत द्यावी लागेल.
आणि नशीब अगदीच रुसलंअन चार अप्रतिम चेंडू पडले आणि महत्त्वाचे बळी घेऊन गेले, किंवा बूमराचा टप्पा आणि दिशा अचानक रजेवर गेले कुलदीप, जाडेजाची अचूकता अचानक हरवली तर हरू.
शाहीन अफ्रिदीच्या एक दोन स्पेलं नंतर तो काही जणांना वसीम अक्रम वाटायला लागला होता. पण तो पाकिस्तानचा संघ कधीच इतिहास जमा झालाय.
त्या आठवणींवर आपल्याला पाकिस्तान भारत मॅचच आकर्षण वाटतं किंवा पाकिस्तानला हरवल्याने होणारा निव्वळ असुरी आनंद ह्यामुळे, ह्या सामन्याला शो पीस वगैरे बनवलं जात.
त्यात क्रिकेटच्या सर्वोच्च दर्जाचा आनंद लुटण्यासारखं काही राहिलेलं नाही. जे होतं ते भारतीय संघाने दाखवलं. बाबर अझामचे काही ड्राईव्ह, विशेषतः ॲान ड्राईव्ह सोडलं तर पाकिस्तानने काय दिल?
ह्या भारत पाकिस्तान लढतीच महत्त्व हे निव्वळ पैशासाठी प्रचंड वाढवलं गेलंय.
मी काही अर्थशास्त्र विषयातला तज्ज्ञ नाही. पण ह्या एका सामन्यामुळे किती रोजगार उपलब्ध होतो. किती पैशाची उलाढाल होते. हे गणित मांडलं पाहिजे.
इथे ‘दुष्मनी’ विकली जाते
निळे शर्ट तयार करणारे, झेंडे, बनवणारे ते विकणाऱ्या पासून हॉटेल, हॉस्पिटल विमान कंपन्या पर्यंत जो तो उखळ पांढर करून घेतो.
निदान आपल्या जगात 'दोस्ती' अशी विकली जात नाही, मात्र 'दुष्मनी' कायम विकली जाते.
तसं ह्या वर्ल्ड कप मध्ये काही सामने चांगले झाले. अप्रतिम शतकं पाहायला मिळाली. अफलातून पाठलाग पाहायला मिळाला, पण तिथले स्टेडियमे रिकामे होते. इथे दुष्मनी विकायला ठेवली आणि काहीना पाव मिळाला, काहीना लोणी लावून पाव मिळाला काहींनी बेकरी विकत घेतली.
जगात दुष्मनी काय फक्त भारत आणि पाकिस्तानात आहे? एकेकाळी ऑलिम्पिकमध्ये, अमेरिका आणि सोवहिएत युनियन किंवा आता अमेरिका आणि चीन यांच्यातली चुरस काय कमी आहे?
दोन महायुद्ध लढलेले जर्मनी आणि इंग्लंड ह्याच्यातल्या फुटबॉल सामन्यात दुष्मनी उफाळून येते, पण त्याचं आपल्यासारखे मार्केटिंग झालेलं मी पाहिलेलं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
बरं ह्या दोन देशाचे खेळाडू मैदानाबाहेर दोस्त असतात. काही खास धार्मिक गोष्टी सोडल्या तर आवडीनिवडी दोघांच्या सारख्या.
मैदानावर आले की दुश्मन.
आणि त्यासाठी गर्दी, स्टेडियम फुलल्, तिकिटांचा काळा बाजार जोरात. हॉटेल फुल्ल. हॉस्पिटल फुल्ल.
रसिक श्रीमंत लाखापर्यंत तिकीट विकत घेतात.
खंरतर दोन्ही देशांची भाषा जवळपास सारखी, दोन्ही देशांच्या खाण्यापिण्याच्या सवयी सारख्या. दोन्ही ठिकाणी अमिताभ, शाहरुख लोकप्रिय. दोन्ही देशात लता मंगेशकरचा आवाज घुमतो.
पण क्रिकेट मॅच आली की एक विळा होतो दुसरा कोयता.
भारत-पाकिस्तान सामन्यांचं मार्केटिंग कधीपासून?
साधारण 1984 ची गोष्ट.
1983 पूर्वी भारतिय संघ वनडेच्या फॅारमॅटच्या बाबतीत बालक मानला जायचा. विश्वचषकातल्या विजया नंतर तो अचानक वयात आला.
आखातात भारतीय आणि पाकिस्तानी मंडळी नोकरी निमित्त होती. तिथे बुखातीरने ही 'दुष्मनी' प्रथम विकली. पण त्यामागे एक चांगला हेतू होता.
काही माजी आणि एखाद्या त्या काळात खेळणाऱ्या खेळाडूचा गौरव केला जायचा. गौरव म्हणजे नुसतं शाल, श्रीफळ नाही. चांगली रक्कम त्यांना मिळायची. दोन्ही संघाना चांगलं मानधन दिलं जायचं.
त्यावेळी प्रेक्षकात दोन्ही देशांचे प्रेक्षक खच्चून भरलेले असत. शाब्दिक युद्ध होई, पण त्या पलीकडे पाऊल कधी पडत नसे .

फोटो स्रोत, Getty Images
भारत पाकिस्तान हा प्राॅडक्ट करून मार्केट करायला सुरुवात साधारण शारजा स्पर्धेपासून झाली. मुख्य म्हणजे दोन्ही संघ तुल्यबळ होते.
एका संघात सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, कपिल देव ,रवी शास्त्री ,संदीप पाटील,मदनलाल मोहिंदर वगैरे होते. दुसऱ्या संघात इम्रान, सर्फराज, वासिम अक्रम, रमिजराजा कादीर, जावेद मियादाद वगैरे, होते.
एकदा 1984 साली भारताचा डाव 125 धावात आटोपला. वाटलं संपलं. पण भारतीय संघाने पाकिस्तान संघाला 89 धावात खोलून टाकलं.
सुनिल गावसकरने स्लिपमधे चार उत्कृष्ट झेल घेतले.
त्यानंतर 1986 साली तो जावेद मियाँदादने चेतन शर्माच्या शेवटच्या चेंडूवर मारलेला षटकार गाजला. पाकिस्तान जिंकला आणि त्यानंतर काहीकाळ पाकिस्तानचा शारजात वरचष्मा राहीला.
ती हवा पाकिस्तानच्या इतकी डोक्यात गेली की त्यांचा एक मॅनेजर आमच्या प्रेसकॅान्फरन्समधे वदला होता "हमारी बकरीयां भी शारजामें आकर शेर बनती है."
पिढी बदलली, पण...

फोटो स्रोत, Getty Images
पुन्हा एक पिढी बदलली. सचिन आला, संजय मांजरेकर, अझरुद्दीन, कुंबळे, श्रीनाथ, जाडेजा वगैरे खेळाडू आले. त्यांचीही पिढी बदलली. सईद अन्वर, वकार युनूस, शोएब, इंझमाम आले.
भारतीय संघ अधिक सामने जिंकला असं कदाचित आकडेवारी सांगेल. पण बऱ्याचदा सी-सॅाचा खेळ असे. त्यामुळे मॅचला मजा यायची.
पुढे मॅच फिक्सींगचा स्फोट झाला. त्यानंतर दुबईत राहणारा दाऊद मुंबई बॅाम्बस्फोटाचा सूत्रधार सिद्ध झाला आणि शारजातील स्पर्धा बंद होत गेली.
शारजा सारखं मार्केटिंग कॅनडात करून पाहिलं गेलं, पण ते तेव्हढं यशस्वी झालं नाही.
शारजा स्पर्धा बंद झाली तरी इतरत्र दुष्मनीचं मार्केटिंग सुरूच राहील.
प्रत्येक 50 षटकांच्या वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानला चोपले त्यामुळे भारत पाक मॅच ची क्रेझ वाढली.
त्यात भारतीय पाकिस्तानी लोक जगभर पसरले. सुखवस्तू झाले. ते जगात कुठेही मॅच पाहायला जाऊ लागले. मार्केटिंग वाढत गेलं.
नशीब चंद्रावर वस्ती झाली नाही. नाहीतर अहमदाबादला यानं उतरली असती.
राजकारण आणि क्रिकेट
अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना भारत पाक क्रिकेट संबंध सुधारले. मी तीनदा पाकिस्तानात जाऊन आलो. मॅचच्या निमित्ताने अनेक भारतीय नागरिक पाकिस्तानात गेले.
2004 साली भारतीय संघ तिथे वन डे स्पर्धा जिंकला. भारतीय नागरिकांनी मैदानावर राष्ट्रगीत म्हटलं. पाकिस्तानी नागरिकांनी मान ठेवला.
त्यामधील 1999 साली चेन्नईत पाकिस्तान संघ जिंकला तेव्हा प्रेक्षकांनी त्यांना मानवंदना दिली. मैदानातल्या दुष्मनीला अशी खिलाडू वृत्तीची किनार होती.
2013 नंतर पाकिस्तानी संघ कमकुवत होत गेला. तिथल्या रक्तरंजित राजकारणामुळे इतर संघ तिथे जाणं कमी झालं. त्याचाही परिणाम झाला आणि भारतीय संघाची ताकत आणखी वाढत गेली.

फोटो स्रोत, Getty Images
आता भारतीय संघ जगजेतेपदाच्या उंबरठयावर आहे. त्यामुळे सामना एकतर्फी होतो. पण दुष्मिनी प्रेरित इकॉनॉमी सुरूच आहे.
पैसे येत राहू देत पण वृत्ती बदलत चाललीये ते चुकीचं आहे.
पाकिस्तान बद्दल भारतीयांचा राग हा आजवर त्या देशाच्या राजकारणाचा, तिथून झालेल्या अतिरेकी हल्यात निरपराध भारतीय नागरिक मारले गेल्याबददलचा राग आह.
दुष्मानी देशांची आहे. वैयक्तिक खेळाडूंची नाही. आणि निदान माझ्या बाबतीत तरी यात कुठली धार्मिक तेढ नाही.
पण आता कुठेतरी धार्मिक तेढ वाढते आहे असं जाणवतं. अशा गोष्टींचा, रायव्हलरीचा राजकीय फायदा उठवणं, चूकच आहे. राजकीय घोषणा तर अजिबात दिल्या जाऊ नयेत.
महाभारतातही दोन्ही सैन्यातले सैनिक कुरुक्षत्रवर संध्याकाळी भेटत, तेव्हा युद्ध विसरलं जाई. तीच आपली खरी संस्कृती आहे
या लेखात व्यक्त करण्यात आलेली मतं ही लेखकाची वैयक्तिक मतं आहेत. बीबीसी न्यूज मराठी त्यांच्या या मतांशी सहमत असेलच असे नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








