भारतीय संघाचा न्यूझीलंडविरोधात दारूण पराभव, आता ऑस्ट्रेलियात काय होणार?

विराट कोहली

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, विनायक दळवी
    • Role, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार

मर्यादित षटकांचे ‘व्हाईट बॉल’ क्रिकेट आणि ‘रेड बॉल’ कसोटी क्रिकेट वेगळे असते. कसोटी क्रिकेट तुमची योग्यता, दर्जा, लायकी दाखवितो.

10, 20, 50 षटकांपासून 100 चेंडूच्या क्रिकेटपर्यंतचा क्रिकेटचा बाजार गल्ला भरून देऊ शकतो; पण कसोटी क्रिकेटचे समाधान, क्लास, धुंदी, झिंग देऊ शकत नाही.

पांढऱ्या चेंडूवरून थेट लाल चेंडूच्या कसोटी क्रिकेटच्या मैदानात उतरल्यावर भारताचा दुबळ्या न्यूझिलंडविरुद्ध मालिकेतच दारूण पराभव झाला. आता ऑस्ट्रेलियातील आव्हाने यापेक्षा मोठी असतील.

कप्तान रोहित शर्मा सलामीच्या कसोटीत भारताच्या नेतृत्वासाठी उपलब्ध नाही.

भारतीय संघाचे पूर्ण सामन्यात नेतृत्व न केलेल्या जसप्रीत बुमराच्या डोक्यावर नेतृत्वाचा काटेरी मुकूट असेल; तोही ऑस्ट्रेलियात, जेथील खेळपट्‌ट्यांवरील चेंडूची उसळी भारतीय फलंदाजांसाठी कायमची डोकेदुखी ठरली आहे.

सीमारेषा दूरवर असल्यामुळे क्षेत्ररक्षणाचं आव्हान मोठं असेल. भारताचे फिरकी गोलंदाजीचे प्रमुख अस्त्र ऑस्ट्रेलियात बोथट होते. त्यात मध्यमगती गोलंदाजीत भारताचा सेनापती महंमद शमी फिट नाही.

संघातील सत्तर टक्के खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर प्रथमच जात आहेत. तिथली परिस्थिती, खेळपट्‌ट्या, उष्ण हवामान याचाही त्यांना अनुभव नाही.

त्यात न्यूझीलंडविरुद्धच्या अनपेक्षित दारूण पराभवाने, त्यांचे मनोधैर्य आणखी खचले आहे. न्यूझीलंड संघाने भारतीय संघाचे कच्चे दुवे उघडे पाडले आहेत.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

त्यात ऑस्ट्रेलियातील पहिल्या कसोटीआधीचा सराव सामना रद्द करून भारताने पुन्हा एकदा आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे.

ऑस्ट्रेलियासारख्या पाच कसोटींच्या खडतर दौऱ्याची सुरुवातच मुळी अशा चुकीच्या आणि नकारात्मक गोष्टींनी झाली आहे.

ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मैदानात 4-0 असे हरवून विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठणे हे बहुदा दिवास्वप्नच ठरणार आहे. हे स्वप्न साकार करायचं तर आधी नेमकं काय चुकलं, हेही पाहायला हवं.

अननुभवी प्रशिक्षक, सरावाची कमी आणि खेळपट्टी

बुडत्याचा पाय खोलात, तसं काहीसं भारतीय क्रिकेट संघाचं झालंय. कधी नव्हे ते श्रीलंकेतही आपण मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत मालिका गमावून बसलो.

आतापर्यंत ट्वेन्टी-20 आणि आय पी एल मधील कामगिरीवर आपण कसोटी संघ निवडत होतो. आता तर चक्क आय पी एलमधील यशस्वी फ्रँचायजींचे प्रशिक्षकही कसोटी संघासाठी निवडायला लागलो आहोत.

गौतम गंभीरला प्रथम दर्जाच्या क्रिकेटच्या प्रशिक्षणाचा अनुभव किती? सहायक प्रशिक्षक अभिषेक नायर याने तर स्वत:च्या मुंबईलाही प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये मार्गदर्शन केले नाही.

न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत अशा अननुभवी प्रशिक्षकांमुळे भारतीय संघही नवशिका वाटत होता.

रोहित-विराटसारखे कसलेले अनुभवी फलंदाजही बोर्डाची विनंती धुडकावून इराणी, दुलीप सामन्यातही खेळले नाही. त्यांना विश्रांती हवी होती.

विराट कोहली आणि रोहित शर्मा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विराट कोहली आणि रोहित शर्मा

काही अन्य सिनियर खेळाडूंनीही मग त्यांचाच कित्ता गिरविला. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे ही स्थानिक क्रिकेट स्पर्धांचा संपूर्ण हंगाम खेळले आणि कायम सरावात राहिले.

पण त्यांना घरच्या मालिकेत खेळविणे विद्यमान संघ व्यवस्थापनाला कमीपणाचे वाटले.

बंगळूरुला 46 धावांमध्ये खुर्दा उडाल्यानंतर भारतीय फलंदाजांच्या तंत्रावर, मानसिकतेवर मलमपट्‌टी करण्याऐवजी संघ व्यवस्थापन मुंबई, पुणे येथील खेळपट्‌ट्या कशा ‘आखाडा’ करता येतील याकडे जातीने लक्ष देत होते.

पुण्याला तर ‘क्युरेटरला खेळपट्‌टीवर कुठे कुठे ‘स्पॉट’ खराब करायचे याच्या सूचना दिल्या जात होत्या.

गंभीर आणि अन्य सहकाऱ्यांच्या आदेशानुसार खेळपट्‌ट्या खराब केल्या गेल्या; मात्र आपणच केलेल्या खड्‌ड्यात पडलो.

श्रीलंकेहून कसोटी मालिका गमावून आलेल्या न्यूझीलंड संघाने त्या पराभवातही फिरकी गोलंदाजीचा सामना कसा करायचा हे तंत्र घोटून घेतले होते. त्यामुळेच ‘आखाडा’ खेळपट्‌ट्यांवर भारताकडे जाडेजा, अश्विन, वॉशिंग्टन सुंदर हे त्रिकूट त्यांनी खेळून काढले.

एजाझ पटेल आणि फिलिप्स

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या ‘आखाडा’ खेळपट्‌ट्यांनीच सँटनर, एजाझ पटेल आणि फिलिप्स या तीन मामुली फिरकी गोलंदाजांना ‘टेरर’ फिरकी गोलंदाज बनविले. भारतीय फलंदाजांचे लाल चेंडू खेळण्याचे चुकीचे तंत्रही त्यांच्या पथ्यावर पडले.

क्रिकेट प्रशिक्षक चंद्रकांत पंडित याबाबत म्हणत होते, “अशी खेळपट्‌टी असते तेव्हा काही वेळा दडपण झुगारून खेळायचे असते. आक्रमण आणि बचाव यांचे मिश्रण हवे. मुंबईत शेवटच्या डावात, मी फलंदाजांना मुक्त खेळायला सांगितले असते. ‘हरलात तरी बेहत्तर पण संधी मिळेल तेव्हा आक्रमक खेळा’ असा सल्ला दिला असता, कारण बचावात्मक खेळल्यामुळे न्यूझीलंडच्या गोलंदाजांना आपण डोक्यावर बसवून घेतले.”

मुंबईचे यशस्वी प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी सांगतात, “भारतीय फलंदाज फटका खेळतानाच्या चार टप्प्यांमधील मधले दोन टप्पेच विसरून गेले होते. गोलंदाजांच्या हातून चेंडू सुटणे आणि चेंडूचा टप्पा पडल्यानंतरचा उंची व दिशा यामध्ये झालेला बदल फलंदाज पाहातच नव्हते.

“सफेद चेंडू खेळण्याचा एवढा पगडा त्यांच्यावर आहे की, फिरक्या खेळपट्‌टीवर बचाव करताना, स्पिनर्सचा चेंडू “हार्ड पूश” करायचा नसतो हे देखील ते विसरले. सफेद चेंडूवर ‘थ्रू द लाईन’ फटका मारता येतो; लाल चेंडूवर नाही. शिवाय भोवतालचे आणि स्लीपमधील क्षेत्ररक्षक सतत दडपण वाढवत असतात. त्यामुळेच फलंदाज चुका करीत असतात.”

न्यूझीलंडच्या फिरकीपुढे भारतीय फलंदाज धडपडत होते

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, न्यूझीलंडच्या फिरकीपुढे भारतीय फलंदाज धडपडत होते

गंभीर आणि कंपनीने खेळाडूंच्या तंत्रांमध्ये सुधारणा करण्यावर भर दिला असता तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जातात आपण अधिक आत्मविश्वासाने निघालो असतो.

ऑस्ट्रेलियन परंपरेनुसार कसोटी मालिकेचा आरंभ ब्रिस्बेनच्या स्विंग होणाऱ्या खेळपट्‌टीवर कसोटीने होतो. मात्र भारतीय संघाला ते पर्थच्या वेगवान खेळपट्‌टीवर सलामीलाच उतरून अर्धी लढाई आधीच जिंकण्याचा प्रयत्न करतात.

भारतीय फलंदाजांचे वेगवान खेळपट्‌टीवर खेळण्याचे तंत्र कच्चे आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्‌ट्यांवर जुळवून घेण्याआधीच ते पहिला ठोसा मारतात. त्यामुळेच पर्थच्या आधीच्या स्टेडियममध्ये सराव सामना खेळण्याची संधी नाकारून आपणच पायावर धोंडा पाडून घेतला आहे.

भारतीय टीमला लाल चेंडूच्या क्रिकेटचे वावडे आहे तसेच गुलाबी चेंडूचेही. अ‍ॅडलेडच्या दुसऱ्या डे-नाईट कसोटीत गुलाबी चेंडू वापरला जाणार आहे.

ऑस्ट्रेलियाच्या याआधीच्या दौऱ्यात याच दिवसरात्र कसोटीत भारताचा 36 धावात खुर्दा उडाला होता. त्यानंतर विराट कोहली वैयक्तिक कारणास्तव भारतात परतला. अन्य सिनियर खेळाडूही जायबंदी झाले.

अशा परिस्थिती कल्पक नेतृत्वगुणांच्या बळावर अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियावर बाजी पलटविण्याचा पराक्रम केला होता. आज तोच अजिंक्य रहाणेही भारतीय संघात नाही.

शंभर कसोटी खेळलेला चेतेश्वर पुजारा रणजी क्रिकेटमध्ये फॉर्ममध्ये असताना त्याला दुर्लक्षिले गेले.

भारताला अनुकूल, हवी तशी खेळपट्‌टी सिडनीला मिळेल, पण तिथे पाचवी कसोटी आहे. मालिकेचा निकाल कदाचित त्याआधीच लागलेला असेल.

अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा
फोटो कॅप्शन, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा

ऑस्ट्रेलिया दौरा आव्हानात्मक आहे. परंतु नवोदित खेळाडूंसाठी ही मोठी संधीही ठरू शकते. ऑस्ट्रेलियात यशस्वी ठरल्यास खेळाडूंना आत्मविश्वास मिळेल आणि आपली नवी ओळख निर्माण करता येईल.

पण कसोटी क्रिकेटमध्ये भारताच्या नव्या पिढीला किती स्वारस्य आहे?

भारतासाठी शंभराहून अधिक कसोटी खेळलेल्या एका माजी कर्णधारानं मला सांगितले, “नजिकच्या काळात देशासाठी खेळणारे क्रिकेटपटू लवकर निवृत्त होताना पहावयास मिळतील. कारण अल्पावधीत प्रचंड पैसा देणाऱ्या लिगमध्ये खेळण्यास त्यांना अधिक रुची आहे.

“निवृत्तीमुळे वेळेचे, काळाचे, नियमांचे, आचारसंहितेचे बंधनही खेळाडूंवर रहात नाही. सर्वच बाबतीत “विन… विन…” परिस्थिती. टेस्ट चॅम्पीयनशीप कुणाला जिंकायची आहे? याची कुणाला फिकिर आहे. न्यूझीलंडविरुद्ध दारूण पराभव जसा लवकरच विसरला जाईल; तसंच ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतरही होईल.”

पारंपारिक कसोटी क्रिकेटला आपण फारसे महत्त्व देत नाही, हे न्यूझिलंडविरुद्ध मालिकेतील निकालाने स्पष्ट केले आहे.

एरवी पंधरा-पंधरा जणांचा सपोर्ट स्टाफ बाळगणाऱ्या भारतीय क्रिकेटपुढे नंतरच्या पाच वर्षांच्या क्रिकेटच्या प्रगतीसाठीचा ‘रोड मॅप’ तयार नाही.

IPLच्या यशाच्या आणि पैशाच्या धुंदीत मश्गुल असलेले क्रिकेट प्रशासक आणि सुमार दर्जाच्या क्रिकेट ज्ञानाच्या आधारे भारतीय संघांचे भवितव्य घडविण्यासाठी पुढे येत असलेली क्रिकेट यंत्रणा, काळजी वाढविणारी आहे.

मर्यादित षटकांचं, बेसबॉलच्या धर्तीचं क्रिकेट खेळणाऱ्या आजच्या पिढीकडून क्रिकेटचं तंत्रच नष्ट होत चालले आहे. प्रशिक्षकही ‘शॉर्टकट’ मार्ग अंगिकारताना सर्वजण दिसताहेत.

आता कसोटीची वर्ल्ड चॅम्पियनशिप म्हणजे जागतिक विजेतेपदाच्या लढतीत अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत किमान 4-0 असा विजय मिळवावा लागणार आहे. कारण त्यासाठी डिसेंबर महिन्यापर्यंतची कामगिरीच मोजली जाते.

पण भारतीय क्रिकेट संघ त्यासाठी सज्ज आहे का? हा प्रश्नच आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.