IPL च्या लिलावात 13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीवर 1 कोटी 10 लाखांची बोली, जाणून घ्या प्रवास

फोटो स्रोत, @IPL/X
- Author, आशय येडगे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
13 वर्षांचा वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने 1 कोटी 10 लाख रुपये देऊन खरेदी केलं आहे. आयपीएल लिलावाच्या 17 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या तरुण खेळाडूला खरेदी करण्यात आलं आहे.
त्याआधी लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंतवर तब्बल 27 कोटी रुपयांची बोली लावली होती. ऋषभ पंत हा IPL च्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वांत महागडा खेळाडू ठरला आहे.
सौदी अरेबियाच्या जेद्दाहमध्ये मागच्या दोन दिवसांपासून 2025च्या आयपीएलचा लिलाव सुरू आहे.
वैभव सूर्यवंशीला खरेदी करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये बोली लावण्याची स्पर्धा लागली होती.
अखेर राहुल द्रविडच्या राजस्थान रॉयल्सने 1 कोटी 10 लाख रुपयांची बोली लावून 13 वर्ष 8 महिने वयाच्या वैभवला त्यांच्या संघात घेतलं आहे. वैभवची मूळ किंमत 30 लाख रुपये होती.
वैभवला राजस्थान रॉयल्समध्ये घेतल्यानंतर राजस्थान रॉयल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेक लश मॅक्क्युलम म्हणाले की, "आमच्या नागपूरच्या हाय परफॉरमन्स सेंटरमध्ये वैभव आला आहे. तिथे त्याने चाचणी दिली आणि आम्हा सगळ्यांनाच प्रभावित केलं. त्याच्याकडे अचाट क्षमता आहे आणि आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी लागणारा आत्मविश्वास देखील त्याच्याकडे आहे."


कोण आहे वैभव सूर्यवंशी?
तमाम भारतीय क्रिकेट रसिकांना महेंद्रसिंग धोनीने मुंबईच्या वानखेडे मैदानावर मारलेला खणखणीत षटकार नीट आठवत असेल.
भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात धोनीने भारताला हा ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. मात्र, या विजयाच्या पाच दिवस आधी म्हणजेच 27 मार्च 2011 रोजी वैभव सूर्यवंशीचा जन्म झाला.
वैभवने बिहार संघातर्फे वयाच्या 12 व्या वर्षी पदार्पण केलं. पदार्पणानंतर अल्पावधीतच वैभवने त्याची चुणूक दाखवून दिली.
19 वर्षाखालील खेळाडूंच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना वैभवने 58 बॉल्समध्ये शतक झळकावलं होतं. युवा कसोटीमध्ये भारताकडून खेळताना वैभवने सर्वाधिक वेगवान शतक झळकावलं.
वैभवने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "वैभव 9 वर्षांचा असताना त्याला बिहारच्या समस्तीपूरमधल्या क्रिकेट क्लबमध्ये दाखल केलं. तिथे दोन-अडीच वर्षे सराव केल्यानंतर आम्ही विजय मर्चंट ट्रॉफीसाठी 16 वर्षांखालील संघाच्या ट्रायल्स देण्याचं ठरवलं. त्यावेळी माझ्या वयामुळे मला निवडण्यात आलं नाही."

फोटो स्रोत, BCA
ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार वैभव समस्तीपूरचा आहे. त्याने आतापर्यंत पाच रणजी सामने खेळले आहेत. याचवर्षी वैभवने बिहार विरुद्ध मुंबईच्या सामन्यात रणजी पदार्पण केलं. सध्या वैभव सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळतो आहे. त्याने 23 नोव्हेंबर रोजी राजस्थानविरुद्ध टी-20मध्ये पदार्पण केलं.
वैभवने बिहारमध्ये झालेल्या रणधीर वर्मा अंडर-19 स्पर्धेत एक त्रिशतकही झळकावलं आहे. वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ब्रायन लारा हा वैभवचा आदर्श आहे. भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर वैभवला वेळोवेळी मार्गदर्शन करतो.
क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार वैभवचे वडील संजीव हेदेखील क्रिकेट खेळाडू होते. मात्र, त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते मोठ्या पातळीवर खेळू शकले नाहीत.

फोटो स्रोत, rajasthanroyals/facebbok
राजस्थान रॉयल्सने वैभवला त्यांच्या संघात घेतल्यानंतर संजीव सूर्यवंशी म्हणाले की, "मी निशब्द आहे. मला काय बोलू सुचत नाहीये. आमच्या कुटुंबासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. मला असं वाटत होतं की त्याची निवड होईल पण त्याला संघात घेण्यासाठी एवढी स्पर्धा असेल असं नव्हतं वाटलं."
वैभवच्या लहानपणाबाबत बोलताना संजीव म्हणाले की, "मला आता सगळ्या गोष्टी आठवत आहेत. मला स्वतःला क्रिकेटचं वेड होतं. पण वयाच्या 19व्या वर्षी मला मुंबईला जावं लागलं. तिथे मी अनेक कामं केली. एका नाईट क्लबमध्ये बाउन्सर म्हणूनही काम केलं. मुंबईत राहत असताना मला अनेकदा वाटायचं की माझं नशीब कधी बदलेल? पण आता माझ्या मुलाने ते शक्य करून दाखवलं आहे. भविष्यात काय होईल हे मला माहिती नाही पण किमान आता मला त्याच्या क्रिकेटसाठी कुणाकडे हात पसरावे लागणार नाहीत."
राजस्थान रॉयल्सबाबत बोलताना संजीव म्हणाले की, "राजस्थान रॉयल्सने अनेक तरुण खेळाडूंना घडवलं आहे. त्यामध्ये संजू सॅमसन, ध्रुव जुरेलसारखे खेळाडू राजस्थानने तयार केले. मला असं वाटतं वैभवही तसाच घडेल."
वैभवने आतापर्यंत पाच रणजी सामने खेळले आहेत. मात्र अजूनही रणजीमध्ये तो मोठी खेळी करू शकलेला नाही. पाच सामन्यांमध्ये मध्य प्रदेशविरुद्ध खेळताना त्याने सर्वाधिक 41 धावा केल्या आहेत आणि एकूण तो 100 धावाच करू शकला आहे.
शनिवारी (23 नोव्हेंबर)रोजी राजकोटमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पदार्पण करताना, त्याने राजस्थानचा डावखुरा वेगवान गोलंदाज अनिकेत चौधरी याला दोन षटकार खेचले आणि सहा चेंडूंत 13 धावा काढून तो बाद झाला.
या लिलावात किती संघ आणि किती खेळाडू होते?
या लिलावात 10 संघ आयपीएल 2025 आणि पुढील मोसमासाठी खेळाडू निवडणार होते.
हे 10 संघ म्हणजे - चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स, कोलकाता नाईट रायडर्स, लखनौ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि सनरायझर्स हैदराबाद.
यंदाच्या लिलावात 2000 हून खेळाडूंच्या यादीतून 577 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यात 367 खेळाडू भारतीय आहेत तर 210 खेळाडू परदेशी आहेत.
रिटेन केलेल्या खेळाडूंसाठीच्या रकमेबरोबरच प्रत्येक संघाकडे बोली लावण्यासाठी 120 कोटी रुपये आहेत.
सर्व आयपीएल संघांना त्यांच्या सहा खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यात जास्तीत जास्त पाच कॅप्ड असतील तर दोन अनपकॅप्ड असतील.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू
- ऋषभ पंत, लखनौ सुपर जायंट्सनं 27 कोटी रुपयांना खरेदी केलं
- श्रेयस अय्यर, पंजाब किंग्सनं 26.75 कोटी रुपयांना खरेदी केलं
- मिचेल स्टार्क, कोलकाता नाईट रायडर्सनं 24.75 कोटी रुपयांना खरेदी केलं
- पॅट कमिन्स, सनरायझर्स हैदराबादनं 20.50 कोटी रुपयांना खरेदी केलं
- सॅम कॅरन, पंजाब किंग्सनं 18.50 कोटी रुपयांना खरेदी केलं
- बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











