यश दयाल : वेगवान गोलंदाजीतला नवा तारा, भारतीय कसोटी संघात एन्ट्री, असा आहे प्रवास

फोटो स्रोत, ANI
- Author, हिमांशू दुबे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेटमध्ये नवनव्या खेळाडूंचा उदय होत आहे.
आयपीएलसारख्या स्पर्धेमुळे खेळाडूंना संधींचं मोठं दालनच खुलं झालं आहे. यातून भारतीय एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये चांगले खेळाडू येत आहेत.
यश दयाल हे त्यातील आणखी एक नाव.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
या भारतीय संघामध्ये जलदगती गोलंदाज असलेल्या यश दयालला देखील स्थान मिळालं आहे.
कोण आहे यश दयाल?
यश दयालचं नाव पहिल्यांदा आयपीएल एप्रिल 2023 च्या वेळेस चर्चेत आलं होतं.
गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील तो चुरशीचा सामना होता.
कोलकाता नाइट रायडर्स संघाला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 28 धावांची आवश्यकता होती.
गुजरात टायटन्सकडून शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी जलदगती गोलंदाज यश दयालला देण्यात आली होती. त्यावेळेस कोलकाता नाइट रायडर्सचा फलंदाज रिंकू सिंह खेळपट्टीवर होता.
असं वाटत होतं की गुजरात टायटन्स हा सामना सहज जिंकेल. मात्र रिंकू सिंहनं यश दयालच्या एकाच षटकात 5 षटकार ठोकून सामना फिरवला होता.


रिंकूचं कौतुक तर यशबाबत प्रश्नचिन्ह
या सामन्यानंतर एकीकडे रिंकू सिंहच्या तडाखेबाज फलंदाजीची चर्चा झाली होती; तर दुसऱ्या बाजूला यश दयालच्या करियरसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं.
यश दयालला त्यानंतरच्या सामन्यांमध्ये खेळण्याची संधी देखील मिळाली नव्हती.
मग कसं झालं यश दयालचं पुनरागमन?
आयपीएलमधील कटू आठवणी विसरत यश दयालनं देशांतर्गंत क्रिकेट सामन्यांमध्ये लक्षवेधी कामगिरी केली. उत्तर प्रदेशकडून खेळताना यशनं 'रणजी ट्रॉफी'च्या गेल्या हंगामात चार सामन्यांमध्ये सात गडी बाद केले.
यानंतर त्याने 'विजय हजारे ट्रॉफी'मधील सहा सामन्यांमध्ये 9 गडी बाद केले.
त्यानंतर यश दयालला 'दिलीप ट्रॉफी'मध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्यानं 'इंडिया बी' संघाकडून खेळताना चार गडी बाद केले. यशच्या गोलंदाजीच्या जोरावर त्याच्या संघाला 'इंडिया ए' संघाविरुद्धचा सामना 76 धावांनी जिंकता आला.

फोटो स्रोत, ANI

या बातम्याही वाचा:

आयपीएल 2024 चा हंगाम यशसाठी कसा होता?
आयपीएल 2024 मध्ये जलदगती गोलंदाज यश दयालला रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरूच्या संघातून खेळण्याची संधी मिळाली.
18 मे 2024 ला रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात एक महत्त्वाचा सामना झाला.
या सामन्यात जिंकणाऱ्या संघाला आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी मिळणार होती.
चेन्नई सुपर किंग्स संघाला शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 16 धावा करायच्या होत्या. यावेळेस देखील गोलंदाजीची जबाबदारी यश दयालला देण्यात आली.
त्यावेळेस खेळपट्टीवर होता महेंद्र सिंह धोनी. जगातील सर्वोत्तम फिनिशरमध्ये धोनीचा समावेश होतो, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळे, साहजिकच यश दयालवर प्रचंड दबाव होता.
यशच्या पहिल्याच चेंडूवर महेंद्र सिंह धोनीनं उंच षटकार ठोकला. चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांमध्ये आनंदाला उधाण आलं होतं; तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरूच्या चाहत्यांमध्ये शांतता पसरली होती.
मात्र, सामन्याचा निकाल अद्याप निश्चित झाला नव्हता. या 'हाय व्होल्टेज' सामन्यामध्ये पुढच्याच चेंडूवर यश दयालनं धोनीची विकेट घेतली आणि संपूर्ण सामन्याचं चित्रच पालटून गेलं.
चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी शेवटच्या 4 चेंडूंवर 11 धावा करायच्या होत्या. मात्र, चेन्नई सुपर किंग्स संघाला या धावा करण्यात यश आलं नाही.
चेन्नई सुपर किंग्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला; तर यशच्या चमकदार कामगिरीमुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरूला प्लेऑफ मध्ये प्रवेश मिळाला.
या सामन्यानंतरच क्रिकेटप्रेमींमध्ये यश दयालच्या नावाची चर्चा होऊ लागली.

फोटो स्रोत, ANI
'यश दयालसाठी मागील आयपीएल हंगाम चांगला होता'
मागील आयपीएल हंगामामध्ये, एका षटकात 30 धावा दिल्यामुळे यश दयाल नकारात्मक अर्थानं चर्चेत आला होता. मात्र, यावेळेस चेन्नई सुपर किंग्सला एका षटकात 16 धावा न काढू देता यशनं त्याची गुणवत्ता सिद्ध केली.
आता यश दयालला भारतीय कसोटी संघामध्ये संधी देण्यात आली आहे.
वरिष्ठ पत्रकार अखिल सोनी म्हणतात, "भारतात मोठ्या संख्येनं चांगले खेळाडू तयार होत आहेत ही एक चांगली गोष्ट आहे. यश दयाल मध्यम तीव्रगती गोलंदाज आहे. मागील हंगामामध्ये त्यानं चांगली कामगिरी केली होती. त्या जोरावरच कसोटी संघात यशची निवड झाली आहे."
"बुमराह, सिराज आणि अर्शदीपसारखे खेळाडू उत्तम कामगिरी करत असताना यशला संघात स्थान मिळालं आहे हे विशेष. जर यशला पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली तर ती खूप मोठी बाब असेल."
ते पुढे म्हणाले, "आयपीएलसारख्या स्पर्धेमुळे क्रिकेट खेळाडूंसमोर असलेले पर्याय वाढले आहेत. अर्थात यात खेळताना खेळाडू जखमी होण्याचा धोकादेखील असतो."

फोटो स्रोत, ANI
यश दयालचं रेकॉर्ड कसं आहे?
'ईएसपीएन क्रिकइंफो'नुसार, मध्यम तीव्रगती गोलंदाज असलेला यश दयाल देशांतर्गंत क्रिकेटमध्ये 20 'ए लिस्ट' सामने खेळला आहे. यामध्ये त्यानं 32 गडी बाद केले आहेत.
याशिवाय, यश दयाल 56 टी-20 सामने खेळला आहे. या सामन्यांमध्ये त्यानं 53 गडी बाद केले आहेत.
याशिवाय आयपीएल म्हणजे इंडियन प्रीमियर लीगमधील यशच्या कामगिरीचा विचार केल्यास, गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू या दोन्ही संघांसाठी यश एकूण 28 सामने खेळला आहे. या सामन्यांमधून त्याने 28 गडी बाद केले आहेत.
19 सप्टेंबरला भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार आहे. ही दोन कसोटी सामन्यांची शृंखला आहे. 27 सप्टेंबरला कानपूरमध्ये दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. अर्थात, या सामन्यासाठी अद्याप खेळाडूंची निवड जाहीर करण्यात आलेली नाही.
भारतीय कसोटी संघात कोणाचा समावेश आहे?

फोटो स्रोत, ANI
बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड झाली आहे.
भारतीय संघ : यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, के. एल. राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर. अश्विन, आर. जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाशदीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











