ऋषभ पंत बनला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू; कुणाला मिळणार किती रक्कम?

फोटो स्रोत, Getty Images
आयपीएलच्या लिलावात पंजाब किंग्सनं श्रेयस अय्यरला 26.75 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. त्यामुळे आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक महागड्या खेळाडूंपैकी तो एक बनला आहे. पण श्रेयसचा हा विक्रम काही मिनिटेच राहिला असं म्हणावा लागेल कारण त्यानंतर लखनौ सुपर जॉइंट्सने ऋषभ पंतवर तब्बल 27 कोटी रुपयांची बोली लावली.
ऋषभ पंत हा IPL च्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वांत महागडा खेळाडू ठरला आहे.
याआधी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा आयपीएलमधील सर्वांत महागडा खेळाडू होता. त्याला कोलकातानं 24.75 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं.
श्रेयस अय्यरला विकत घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स या दोन संघांमध्ये चुरस होती. यात पंजाब किंग्सने बाजी मारली.
आयपीएलच्या गेल्या मोसमात श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार होता. कोलकातानं आयपीएलचा 17 वा मोसम जिंकला होता. 2022 मध्ये कोलकाताच्या संघानं श्रेयस अय्यरला 12.25 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं.
कोलकाताच्या संघाआधी श्रेयस अय्यर दिल्ली कॅपिटल्सच्या संघासाठी खेळला आहे. तो दिल्लीच्या संघाच्या कर्णधार देखील होता.
तर पंजाब किंग्सनं 18 कोटी रुपयांमध्ये राइट टू मॅच नियमाद्वारे अर्शदीप सिंहला देखील खरेदी केलं आहे.


किती संघ, किती खेळाडू
या लिलावात 10 संघ आयपीएल 2025 आणि पुढील मोसमासाठी खेळाडू निवडणार आहेत.
हे 10 संघ म्हणजे - चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स, कोलकाता नाईट
रायडर्स, लखनौ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि सनरायझर्स हैदराबाद.
यंदाच्या लिलावात 2000 हून खेळाडूंच्या यादीतून 577 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यात 367 खेळाडू भारतीय आहेत तर 210 खेळाडू परदेशी आहेत.
रिटेन केलेल्या खेळाडूंसाठीच्या रकमेबरोबरच प्रत्येक संघाकडे बोली लावण्यासाठी 120 कोटी रुपये आहेत.
सर्व आयपीएल संघांना त्यांच्या सहा खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यात जास्तीत जास्त पाच कॅप्ड असतील तर दोन अपकॅप्ड असतील.
कुणाला किती रुपये मिळाले?
ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर नंतर महागडा ठरलेला खेळाडू म्हणजे व्यंकटेश अय्यर. त्याला कोलकाताच्या संघानं 23.75 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे.
के एल राहुलला दिल्लीच्या संघानं 14 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. त्याच्यासाठी कोलकाता, बंगळूरू, दिल्ली आणि चेन्नईच्या संघांनीदेखील बोली लावली होती.
इंग्लंडचा फलंदाज आणि फिरकी गोलंदाज लियम लिव्हिंगस्टन याला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूच्या संघानं 8.75 कोटी रुपयांना खरेदी केलं.
मोहम्मद सिराजसाठी गुजरात टायटन्सनं 12.25 कोटी रुपये मोजले. त्याच्यासाठी राजस्थानच्या संघानं देखील बोली लावली होती. मात्र गुजरातच्या संघानं किंमत वाढवली होती.
तर पंजाब किंग्सनं युजवेंद्र चहलला 18 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं आहे. त्याच्यासाठी हैदराबादनं 17.75 कोटी रुपयांची बोली लावली होती. मात्र पंजाबनं अधिक रक्कम लावत बाजी मारली.
डेव्हिड मिलर या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाला लखनौ सुपर जायंट्सनं 7.50 कोटी रुपयांना खरेदी केलं.
मोहम्मद शमी या भारतीय गोलंदाजाला 10 कोटी रुपयांमध्ये सनरायझर्स हैदराबादनं खरेदी केलं.
मिचेल स्टार्कसाठी दिल्ली कॅपिटल्सनं 11.75 कोटी रुपये मोजले.
तर गुजरात टायटन्सनं 15.75 कोटी रुपयांमध्ये जोस बटलरचा समावेश आपल्या संघात केला.
कगीसो रबाडा याला गुजरातच्या संघानं 10.75 कोटी रुपयांना खरेदी केलं.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू
- ऋषभ पंत, लखनौ सुपर जायंट्सनं 27 कोटी रुपयांना खरेदी केलं
- श्रेयस अय्यर, पंजाब किंग्सनं 26.75 कोटी रुपयांना खरेदी केलं
- मिचेल स्टार्क, कोलकाता नाईट रायडर्सनं 24.75 कोटी रुपयांना खरेदी केलं
- पॅट कमिन्स, सनरायझर्स हैदराबादनं 20.50 कोटी रुपयांना खरेदी केलं
- सॅम कॅरन, पंजाब किंग्सनं 18.50 कोटी रुपयांना खरेदी केलं
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











