शाळा-कॉलेजमध्ये तुमच्या मुलाचा इतर विद्यार्थ्यांकडून होणारा छळ तुम्ही 'असा' थांबवू शकता

बुलिंग
    • Author, रवी प्रकाश
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

दिल्लीच्या सीमेलगत असलेल्या फरीदाबादमध्ये 2022 मध्ये एका विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणानं सर्वानांच धक्का बसला होता. या मुलाच्या आई आरती मल्होत्रा यांनी बीबीसीला सांगितलं की, त्यांच्या मुलाच्या 'जेंडर'वरून त्याला 'बुली' केलं जात होतं. हल्ली शाळा आणि कॉलेजमध्ये 'बुलिंग'ची प्रकरणं समोर येत आहे.

हे लक्षात घेऊन भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयानं सीबीएसईला 'बुलिंग' थांबवण्यासाठी कठोर कारवाई करण्यास आणि बुलिंगमध्ये दोषी आढळल्यास विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्यात सांगितलं आहे.

तज्ज्ञांच्या मते, 'बुलिंग'चा मुलांच्या मनावर परिणाम होतो आणि युवा अवस्थेतही हा परिणाम कायम राहतो.

जगातील प्रसिद्ध व्यक्तींनाही त्यांच्या आयुष्यात 'बुलिंग'चा सामना करावा लागला आहे आणि सेलिब्रिटी झाल्यानंतरही ते त्या वाईट आठवणी विसरू शकले नाहीत.

अमेरिकन गायिका लेडी गागा, कॅनडियन गायक शॉन मेंडिस, अमेरिकन अभिनेत्री ब्लेक लिवली, अमेरिकन अभिनेत्री कॅरन ऍलन, ब्रिटिश राजकुमारी केट मिडलटन, अमेरिकन दिग्दर्शक माईक निकोलस आणि अमेरिकन रॅपर एमिनेम यांच्या सोबतही 'बुलिंग'च्या घटना घडल्याचं ते सांगतात.

या सर्व सेलिब्रिटींनी त्यांच्या शालेय जीवनात त्यांच्यासोबत 'बुलिंग' झाल्याचं सार्वजनिक व्यासपीठावरून सांगितलं होतं. शालेय जीवनात झालेल्या 'बुलिंग'चा त्यांच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला, हे देखील त्यांनी जाहीरपणे सांगितलंय. 'बुलिंग'मुळं झालेल्या मानसिक आणि शारीरिक परिणामांवरही अनेक संशोधनं झाली आहेत.

किंग्ज कॉलेज लंडनच्या डेव्हलपमेंटल सायकॉलॉजीच्या प्रोफेसर लुईस आर्सेनॉल्ट म्हणतात की, "लोकांना असं वाटायचं की,'बुलिंग' एक सामान्य वर्तणूक आहे आणि ती चांगली आहे, कारण त्यामुळं तुमचं व्यक्तिमत्व घडण्यास मदत होते, परंतु संशोधकांना हे समजण्यास बराच वेळ लागला की 'बुलिंग' एक अशी वर्तणूक आहे, जी नुकसानकारक असू शकते."

त्या सांगतात की, "आधी आमचा विश्वास नव्हता की 'बुलिंग' हा एक आजार आहे. 'बुलिंग'मुळं लोक आजारी पडत आहेत आणि बुलिंगची सवय ही देखील एक प्रकारची मानसिक समस्या आहे, हे समजायला आम्हाला बराच वेळ लागला."

नैराश्य

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सततच्या बुलिंगमुळे नैराश्यही येऊ शकतं

संशोधन काय सांगतं?

एका संशोधनात असं म्हटलं आहे की, बुलिंग लोकांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आजारी बनवू शकतं. लहानपणी 'बुलिंग'ला बळी पडलेल्या अनेकांना प्रौढावस्थेतही मानसिक त्रास जाणवतो.

प्रोफेसर लुईस आर्सेनॉल्ट यांना त्यांच्या संशोधनात असं आढळून आलं आहे की याचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम होतो.

त्या म्हणतात की, 7-12 वर्ष वयात 'बुलिंग'ला बळी पडलेल्या मुलांमध्ये हा प्रभाव त्यांच्या वयाच्या 45 वर्षांपर्यंत राहू शकतो.

हार्वर्ड रिव्ह्यू ऑफ सायकियाट्रिकमध्ये प्रकशित झालेल्या त्यांच्या संशोधन लेखात 'बुलिंग'चे धोके स्पष्टपणे सांगणात आले आहेत.

त्यांनी लिहलंय की, बालपणातील 'बुलिंग'चा परिणाम अनेक दशकं टिकतो आणि याचा लोकांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.

यामुळं 'पॅनिक डिसॉर्डर' (Panic disorder) देखील होऊ शकतो. बरेच लोक नंतरच्या काळातही मित्र बनवू शकत नाहीत आणि इतरांवर विश्वास ठेवण्यात अडचणी येतात.

त्यांच्या शैक्षणिक कामगिरीवरही परिणाम होतो आणि यामुळं त्यांना नंतरच्या काळात आर्थिक समस्यांनाही सामोरं जावं लागतं.

रॅगिंग आणि बुलिंग दोन्हीविरोधात तरतुदी आहेत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

आरती मल्होत्रा यांनी त्यांचा मुलगा आर्वेबद्दल सांगतात की, तो देखील डिप्रेशनमध्ये गेला होता आणि त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र, परिस्थिती बिकट झाल्यानं त्यानं आत्महत्येचं पाऊल उचललं.

परंतु, जर एखाद्या मुलीला बालपणात 'बुलिंग' होत असेल, तर या संशोधनानुसार तिच्या तारुण्यात चिंता किंवा आजार होण्याची शक्यता 27 पट अधिक असतं. तर पुरुषांमध्ये हे प्रमाण 18 पट अधिक असतं.

मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्या

सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सायकियाट्रिकचे सहयोगी प्रोफेसर डॉ. संजय मुंडा म्हणतात की, 'बुलिंग'कडे अनेक लोक दुर्लक्ष करतात, ते योग्य नाही.

डॉ.संजय मुंडा बीबीसीशी बोलताना सांगतात की, "बुलिंगला बळी पडलेली मुलं आयुष्यभर त्या गोष्टी विसरू शकत नाहीत,त्यांना नेहमीचं मनात शंका असते."

याबाबत डॉ. मुंडा पालकांना सल्ला देतात की, "जर मुलं त्यांच्याकडं अशी समस्या घेऊन येत असतील तर त्यांनी त्याबद्दल मोकळेपणाने बोलावे.जर मुलांच्या वागणुकीत बदल दिसला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका."

डॉक्टर संजय मुंडा स्पष्ट करतात की, "पालकांनी सतर्क राहिल्यास वेळेत 'बुलिंग'चा परिणाम कमी करणं सोपे जाईल.

'बुलिंग'बद्दल भारतात तितकी जागरूकता नाही, असं डॉ. मुंडा यांचं मत आहे. त्यांच्याकडे अलीकडेच 11 वर्षांच्या मुलाचं बुलिंग प्रकरण आलं होतं. या मुलाचे मित्र त्याच्यावर 'बुलिंग'करत होते. त्यामुळं तो शाळेत जायला तयार नव्हता. पण त्याच्या समुपदेशनानंतर तो आता पूर्वी प्रमाणं शाळेत जायला लागला.

अशा परिस्थितीत पालकांनी घाबरून न जात मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

बुलिंग

फोटो स्रोत, Getty Images

'बुलिंग' विरोधी कायदा

भारतात बुलिंग रोखण्यासाठी वेगळा कायदा नाही. पण ज्येष्ठ वकील दीपक भारती सांगतात की, 'बुलिंग'साठी वेगळा कायदा नसला तरी आयपीसीच्या विविध कलमांतर्गत त्यावर कारवाई केली जाऊ शकते."

ते सांगतात की, जर एखाद्यानं 'बुलिंग'मुळं आत्महत्या केली,तर त्याचा छळ किंवा दादागिरी करणाऱ्यांवर हत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा ( IPC चे कलम 306) नोंदवला जाऊ शकतो."

"जर हल्ला,शिवीगाळ किंवा शारीरिक हानीचा विषय असेल यात त्यासाठी भारतीय दंड संहितेतही तरतूद करण्यात आली आहे.म्हणूनच बुलिंग करून कुणीही वाचेल असा विचार करणं चुकीचं आहे,त्याला कायद्यानुसार शिक्षा होणारच."

बुलिंग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बुलिंग

पालक कशी मदत करू शकतात?

दक्षिण कॅरोलिना (यूएसए) येथील क्लेमसन विद्यापीठातील डेव्हलपमेंट सायकोलॉजीच्या प्रोफेसर सुशान लिंबर म्हणतात की, मुलांच्या पालकांनी अशी प्रकरण समोर येण्याची वाट पाहू नये.

त्यांच्या पालकांनी स्वतः पुढाकार घेऊन मुलांशी बोलून त्यांना त्यांच्या मित्रांसोबत काही अडचणी आहेत का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

"वाढत्या वयातील मुलांच्या जर काही चिंता असतील तर त्यांना गांभीर्यानं घेतल्या पाहिजेत, जरी आपल्याला ते किरकोळ वाटत असलं, तरी मुलांना काय म्हणायचं आहे ते ऐकून घ्या आणि त्याचं म्हणणं ऐकून घेताना पालकांनी भावनांवर नियंत्रण ठेवावं. शक्य असल्यास शाळेशी संपर्क करून संवाद साधावा म्हणजे मुलांना सुरक्षित वाटेल."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)