'तो' भीषण अपघात, जेव्हा चक्रीवादळ आलं आणि 130 प्रवाशांसह ट्रेनच समुद्रात गायब झाली

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

साठ वर्षांपूर्वी रेल्वेचा एक भीषण अपघात झाला होता. त्या अपघातात डबे घसरले नव्हते, तर संपूर्ण ट्रेनच समुद्रात बुडाली होती.

हा अपघात कोणत्याही मानवी चुकीमुळे झाला नव्हता...तर निसर्गाच्या अवकृपेमुळे ही दुर्घटना घडली होती.

हा अपघात म्हणजे 'Act of God' मानला गेला.

15 डिसेंबर 1964 रोजी, हवामान खात्याने बंगालच्या उपसागरातील अंदमान बेटाच्या दक्षिणेकडे चक्रीवादळ निर्माण होण्याचा अंदाज वर्तवला होता. त्याच दिवसापासून जोरदार वारे आणि पाऊसही सुरू झाला.

नंतरच्या काही दिवसांत चक्रीवादळ दक्षिण भारताकडे सरकले आणि सातव्या दिवशी म्हणजे 22 डिसेंबरला ते सुमारे 110 किमी प्रतितास वेगाने ते श्रीलंकेकडून भारताच्या दिशेने सरकायला लागलं.

हे वादळ तामिळनाडूतील भारताच्या दक्षिण टोकावर असलेल्या पंबन बेटावर सुमारे 200 किमी प्रतितास वेगाने पोहोचले.

या वादळाचा तडाखा बसण्यापूर्वी पंबन बेटावरील धनुषकोडी रेल्वे स्थानकावर खळबळ उडाली होती. वादळ जवळ सरकत असतानाच काही लोक बेट सोडून त्यांचं घर गाठण्याच्या प्रयत्नात होते, तर काही लोक आपलं घर सोडून सुरक्षित जागा शोधण्यासाठी पळून जात होते.

साठीचं दशक होतं, त्यामुळे बेटावरून समुद्रकिनारी असलेल्या शहरात जाण्यासाठी रेल्वेशिवाय वाहतुकीचा दुसरा पर्याय नव्हता. वादळाचा अंदाज वर्तवला असतानाच दिवसभरात अनेक लोक रेल्वेने प्रवासाला निघाले.

पण ज्यांनी 22 डिसेंबरच्या आदल्या रात्रीची ट्रेन पकडली होती, त्यांना आपलं काय होणार आहे, याची कल्पना नव्हती.

वाऱ्याचा असा वेग, जो पॅसेंजर ट्रेनसाठी सुरक्षित नव्हता

पंबन बेटाला भारताच्या मुख्य भूमीशी जोडणारा दोन किलोमीटर लांबीचा ‘पंबन पूल’ अजूनही त्यावरून दिसणाऱ्या दृश्यांसाठी आजही ओळखला जातो. हा पूल बेटाला तामिळनाडूमधील मंडपम रेल्वे स्थानकाशी जोडतो.

धनुषकोडीहून मंडपमकडे जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनच्या पायलटने रात्री 8:30 वाजता मंडपम कंट्रोल रूमला कळवले की, 'धनुषकोडी-रामेश्वरम रोड सेक्शनमध्ये धुळीचे लोट उडत आहेत. ट्रॅकवर इतकी धूळ आहे की पुढे जाणे कठीण झाले आहे.'

संदेश मिळताच नियंत्रण कक्षातील पूल निरीक्षक काही खलाशांसह मार्ग मोकळा करण्यासाठी गेले. कारण पंबन-धनुषकोडी पॅसेंजर ट्रेन रात्री या मार्गावरून जाणार होती.

दरम्यान, रात्री नऊ वाजता पंबन ब्रिज ऑपरेटरने नियंत्रण कक्षाला सध्या वाऱ्याचा वेग ताशी 64 किलोमीटरहून अधिक असल्याचा संदेश दिला. हा वेग प्रवासी गाड्यांसाठी सुरक्षित नव्हता.

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधीक फोटो

त्यानंतर वाऱ्याचा वेग आणि पावसाचा जोर वाढू लागला. त्याच दरम्यान रात्री 11 वाजून 10 मिनिटांनी धनुषकोडीकडे निघालेली सहा डब्यांची पॅसेंजर ट्रेन सुमारे 130 प्रवाशांसह पंबन रेल्वे स्थानकावरून रवाना झाली. त्यात रेल्वेच्या 18 कर्मचाऱ्यांचाही समावेश होता.

रामेश्वरम रोड स्टेशनवर ट्रेन तिच्या नियोजित वेळेवर पोहोचली. मात्र, सिग्नलला उशीर झाल्यामुळे तिथून पंधरा मिनिटं उशिरानं सुटली. पुढचं रेल्वे स्टेशन धनुषकोडी होतं.

रात्री साडेबारा वाजता ट्रेन धनुषकोडी रेल्वे स्थानकावर पोहोचणार होती. सिग्नलमनने स्टेशनजवळच्या केबिनमध्ये ट्रेनची वाट पाहिली, पण ट्रेन तिथे पोहोचलीच नाही.

'पावसामुळे कोणी शोधही घेऊ शकले नाही'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे धनुषकोडी येथील नियंत्रण कक्ष आणि सिग्नल केबिनमधील संपर्क तुटला.

परिस्थिती इतकी वाईट होती की, धनुषकोडी रेल्वे स्टेशन पूर्णपणे पाण्यात बुडाले होते. दरम्यान, ट्रेन नियोजित वेळेवर आली नाही. अशा वादळी-पावसाळी वातावरणामुळे ट्रेन पुन्हा रामेश्वरम रोडवर गेली असावी, असे धनुषकोडीच्या रेल्वे कर्मचाऱ्यांना वाटले.

रामेश्वरम रोडवरील रेल्वे कर्मचाऱ्यांना वाटले की, ट्रेन धनुषकोडीला सुखरूप पोहोचली असेल.

विजांचा कडकडाट, जोराचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे दोन्ही रेल्वे स्थानकावरील कर्मचाऱ्यांना गाडीची माहिती घेण्यासाठी जाता आले नाही आणि मग सकाळ झाली.

23 डिसेंबरला वादळ थोडं शांत झालं, पण निसर्गाच्या तांडवात धनुषकोडी स्टेशनचं अस्तित्व जवळपास संपलं होतं. इथली दृश्यं अंगावर काटा आणणारी होती.

रामेश्वरम रोड आणि धनुषकोडी रेल्वे स्थानकादरम्यान संपर्क पुन्हा सुरू झालं आणि कळलं की, ट्रेन गायब आहे. संपूर्ण मार्ग तपासला, पण ट्रेन कुठेच दिसली नाही.

हा मार्ग समुद्राने वेढलेला होता आणि त्या वेळी समुद्रात बचाव कार्य करणे जवळजवळ अशक्य होते. शोध घेणाऱ्यांसाठी हे एक मोठं आव्हानच होतं.

संपूर्ण दिवस उलटून गेला पण ट्रेन आणि त्यात प्रवास करणारे सुमारे 130 लोक सापडले नाहीत.

24 तासांनंतर समुद्रात काहीतरी दिसले आणि...

24 डिसेंबरला वादळ पूर्णपणे ओसरलं...पण मागे विध्वंसाच्या खुणा उरल्या होत्या..,

शेकडो लोक मृत्यूमुखी पडले, अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले, बेटावरील संपूर्ण शहर उद्ध्वस्त झाले होते.

दरम्यान, एका रेल्वे कर्मचाऱ्याला समुद्रकिनाऱ्यावर काहीतरी संशयास्पद दिसले. वादळामुळे अनेक वस्तू जमिनीवरून समुद्रात उडून गेल्या होत्या, पण ही गोष्ट वेगळी असल्याचं कर्मचाऱ्याला पाहताच कळलं.

त्याने या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली आणि घटनास्थळी जाऊन तपासणी केली असता ती हरवलेली ट्रेन असल्याचे आढळून आले.

अगदी स्पष्टपणे सांगायचे तर ते केवळ ट्रेनचे अवशेष होते...बस्स! ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या 130 जणांपैकी कोणी जिवंत असेल यावर विश्वास बसणे कठीण होते.

ट्रेनचे अवशेष सापडल्यानंतर वादळामुळे प्रवाशांनी भरलेली ट्रेन समुद्रात उलटली आणि कोणीही वाचले नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

त्या लोकांचे प्राण वाचले असते का?

इंडियन एक्सप्रेसची बातमी

फोटो स्रोत, INDIAN EXPRESS

फोटो कॅप्शन, इंडियन एक्सप्रेसची बातमी

पॅसेंजर ट्रेन समुद्रात पलटी झाल्याची बातमी ‘इंडियन एक्सप्रेस’च्या पहिल्या पानावर आली होती.

त्या रात्री पंबन-धनुषकोडी पॅसेंजर ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या मोजण्याचे काम पंबन रेल्वे स्टेशनच्या सहाय्यक स्टेशन मास्तरांवर सोपवण्यात आले होते.

"सामान्यत: आम्ही ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या मोजत नाही. परंतु त्या दिवशी आम्हाला तसे करण्यास सांगितले गेले," असे त्यांनी या घटनेबाबत स्थापन केलेल्या चौकशी समितीला सांगितले.

"प्रवाशांची संख्या मोजण्यामागील कारण म्हणजे त्यांची संख्या कमी असती तर ट्रेन रद्द केली गेली असती," ते पुढे म्हणाले.

पण पॅसेंजर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी सहा डब्यांमध्ये पुरेसे प्रवासी होते.

चौकशी समितीच्या अहवालानुसार या दुर्घटनेतील मृतांची नेमकी संख्या कोणालाच माहीत नाही. ट्रेनमध्ये प्रवास करणारे 110 सामान्य लोक आणि 18 रेल्वे कर्मचाऱ्यांना मृत घोषित करण्यात आले.

ही शोकांतिका 'अॅक्ट ऑफ गॉड' असल्याने कोणीही दोषी आढळले नाही.