भारतात रेल्वे रुळावरुन घसरण्याची 'ही' आहेत कारणं

फोटो स्रोत, ANI
- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
2 जून 2023 रोजी ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात कोरोमंडल एक्स्प्रेसचा अपघात कसा झाला, याबद्दल अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
या अपघातात 275 जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे 1000 लोक जखमी झाले आहेत.
एक एक्सप्रेस ट्रेन रुळावरून घसरून उलटली आणि ती दुसऱ्या बाजूने येणाऱ्या ट्रेनवर धडकली. ती जवळ असलेल्या मालगाडीला धडकली. असा हा विचित्र तिहेरी अपघात होता.
भारताची रेल्वे वाहतूक व्यवस्था जगातील सगळ्यात मोठी वाहतूक व्यवस्था आहे.
185 वर्षांचा इतिहास असलेली भारतीय रेल्वे ही जगातल्या सर्वात मोठ्या वाहतूक व्यवस्थांपैकी एक आहे. देशभरात एक लाख किलोमीटरवर रेल्वे ट्रॅकचं जाळं आहे आणि दररोज अडीच कोटी लोक ट्रेननं प्रवास करतात. आर्थिक वर्ष 2023-24 च्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी तब्बल 2.40 लाख कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार 5200 किमीचे नवे रेल्वे मार्ग स्थापन करण्यात आले. 8000 किमी मार्गाचं नुतनीकरण दरवर्षी होतं असंही ते पुढे म्हणाले.
वैष्णव यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की 100 किमी प्रती तास या वेगाने जाण्यासाठी रुळांचं आधुनिकीकरण केलं जात आहे. काही मार्गाचं 130 किमी प्रती तास आणि काही वेगवान गाड्यांसाठी 160 किमी प्रती तास वेगाने जाण्यासाठी रेल्वे रुळ तयार केले जात आहेत.
भारतात रेल्वे वेगवान पद्धतीने धावाव्यात यासाठी ही तयारी आहे. तसंच मुंबई अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेनही नियोजित आहे.
रेल्वे बोर्डाचे माजी चेअरमन विवेक सहाय यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं की, "रेल्वे रुळावरून घसरणं हा आजही रेल्वेसाठी अतिशय चिंतेचा मुद्दा आहे. रेल्वे रुळावरून घसरण्याची प्रामुख्याने काही कारणं अशी आहेत - रेल्वे रुळांची नीट देखभाल न करणे, एखादा कोच नादुरुस्त असणे किंवा मग ड्रायव्हिंगमधील चुका."
रेल्वे सुरक्षा अहवाल 2019-20 नुसार 70 टक्के रेल्वे अपघात रुळ घसरल्याने होतात. आधीच्या वर्षी हे प्रमाण 68 टक्के होतं. रेल्वेला आग लागल्याने किंवा धडक झाल्याने 14 आणि 8 टक्के अपघात होतात.
या अहवालासाठी डबे घसरण्याच्या 40 घटनांचा अभ्यास करण्यात आला. त्यात 33 प्रवासी ट्रेन आणि सात मालगाड्यांचा समावेश होता. त्यापैकी 17 वेळा डबे ट्रॅकमध्ये असलेल्या त्रुटींमुळे घसरले. त्यात रेल्वे रुळ तुटणं किंवा कमकुवकत असण्याचा समावेश होता.
ट्रेनमध्ये बिघाड असल्याने रुळावरून घसरण्याच्या 9 घटना होत्या असं या अहवालात सांगण्यात आलं आहे.
रेल्वे ट्रॅक धातूपासून तयार केलेल्ल्या असतात. उन्हाळ्यात त्या प्रसरण पावतात आणि उन्हाळ्यात त्या आकुंचन पावतात. त्यामुळे त्यांना सतत देखभालीची गरज असते. त्यात रुळ एकमेकांना घट्ट लावणं, स्लीपर्स बदलणं, स्विचेसमध्ये तेल घालणं अशा अनेक प्रकारच्या निगा ट्रॅकच्या राखल्या गेल्या पाहिजेत.
110 ते 130 किमी प्रतितास ट्रेन व्यवस्थित धावल्या पाहिजेत यासाठी रेल्वे रुळांची निगा नीट राखली पाहिजे अशी सूचना नेहमीच करण्यात येते.

फोटो स्रोत, Getty Images
एप्रिल 2017 ते मार्त 2021 या काळात केंद्र सरकारच्या एका समितीने केलेल्या विश्लेषणात काही धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या.
ट्रॅक रेकॉर्डिंग कार ने केलेल्या सर्वेक्षणात 30 ते 100 टक्क्यांपर्यंत त्रुटी आढळल्या होत्या. ही कार ट्रॅकचं आकारमान तपासण्यासाठी वापरल्या जातात.
रेल्वेचे डबे रुळावरून घसल्याच्या 1129 घटनांचा अभ्यास करण्यात आला. त्यात दोन डझनापेक्षा अधिक गोष्टी यासाठी जबाबदार असल्याचं समोर आले.
171 केसेसमध्ये रुळाची देखभाल न केल्याने डबे घसरल्याच्या घटना झाल्या होत्या.
180 पेक्षा अधिक वेळा डबे रुळावरून घसरण्यासाठी तांत्रिक बाबी जबाबदार होत्या. एक तृतीयांश केसेसमध्ये डब्यांमध्ये असलेल्या त्रुटींमुळे डबे रुळावरून घसरले.
निष्काळजीपणाने रेल्वे चालवणं आणि अति वेग सुद्धा डबे रुळावरून घसरण्याची मुख्यं कारणं आहेत.
कोरोमंडल रेल्वे अपघात का झाला हे चौकशी अंती कळेलच. भारतीय ट्रेनमध्ये Anti collision devcice लावण्याची चर्चाही बराच काळ होत आहे. मात्र ही व्यवस्था सध्या दिल्ली-कोलकाता आणि दिल्ली- मुंबई या ट्रॅकवरच असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
कोरोमंडल एक्सप्रेस घसरल्यावर तिथे शालीमार एक्सप्रेस किती वेळाने आली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 2010 मध्ये अशीच पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरली आणि त्यावर मालगाडी धडकली होती. त्यात 150 लोकांचा मृत्यू झाला होता. चौकशीत समोर आलं होतं की माओवाद्यांनी रुळांचं नुकसान झालं. त्यामुळे मुंबई पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरली होती. या ट्रेनचे पाच डबे घसरले होते आणि समोरच्या मालगाडीला धडकले होते. शुक्रवारी झालेल्या घटनेत कोणत्याच घातपाताचा संशय नाही.
धडक, रुळावरून घसरणे, आग आणि स्फोट या कारणामुळे 2021-22 या काळात 34 अपघात झाले होते. आधीच्या वर्षी या अपघातांची संख्या 27 होती. तर 2022-23 मध्ये ही संख्या 48 झाली आहे अशी बातमी द हिंदू वृत्तपत्राने दिली आहे.
वाढत्या अपघातामुळे रेल्वे विभागाची काळजी वाढली आहे. दक्षिण पूर्व रेल्वे आणि पूर्व किनारी रेल्वे या विभागात कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास जास्त असतात. यावर ज्येष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करायला सांगितली आहे. कालचा अपघात पूर्व भागातच झाला होता.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








