ओडिशा-कोरोमंडल एक्सप्रेस अपघात : 5 प्रश्न, 5 उत्तरे

फोटो स्रोत, Getty Images
तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथून पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्याजवळील शालिमार रेल्वे स्थानकापर्यंत धावणाऱ्या कोरोमंडल एक्सप्रेसला शुक्रवारी (2 जून) सायंकाळी अपघात झाला.
ओडिशातील बालासोर जिल्ह्यात बाहानगा बाजार स्टेशनजवळ सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात घडला.
या अपघातातील मृतांची संख्या 288 वर पोहोचली असून हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
अपघाताच्या तिसऱ्या दिवशी येथील एका बाजूचा रेल्वे मार्ग खुला करण्यात प्रशासनाला यश आलं. पण आजूबाजूचा राडारोडा दूर करण्याचं काम अजूनही सुरूच आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (3 जून) घटनास्थळाला भेट दिली. तर, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे प्रशासनातील इतर वरीष्ठ अधिकारी घटनास्थळी ठाण मांडून आहेत.
तिसऱ्या दिवशीही अपघाताबाबत लोकांमध्ये संभ्रमावस्था कायम आहे. तुम्हालाही अपघात नेमका कसा घडला, त्याचं कारण काय, जीवितहानी किती झाली आणि सध्या काय परिस्थिती आहे, असे प्रश्न पडले असतील, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
जाणून घेऊ, ओडिशा अपघातासंदर्भात 5 प्रश्न आणि त्यांची 5 उत्तरे -
1. अपघात नेमका कसा घडला?
तीन रेल्वे एकमेकांना धडकून झालेल्या या अपघाताच्या घटनेबाबत विविध प्रकारच्या बातम्या सुरुवातीला माध्यमांमध्ये पाहायला मिळाल्या. पण नेमकं काय घडलं याबाबत दुसऱ्या दिवशी उलगडा झाला.
रेल्वेच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कोलकात्यानजिकच्या शालिमार येथून चेन्नईच्या दिशेने निघालेली कोरोमंडल एक्सप्रेस (12841) सायंकाळी सातच्या सुमारास बाहानगा रेल्वे स्टेशनजवळ होती. पण तिथे उभ्या असलेल्या एका मालगाडीला ही गाडी धडकली."
येथील रेल्वेमार्ग हा दुहेरी आहे. मालगाडी लूप लाईनवर थांबलेली होती. धडकेनंतर कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे बाजूच्या रुळावर अस्ताव्यस्त पसरले.
ही धडक इतकी जोरदार होती की अपघातानंतर कोरोमंडल एक्सप्रेसचं इंजीन मालगाडीच्या डब्यांवर चढलं.

फोटो स्रोत, ANI
दरम्यान, त्याचवेळी बंगळुरूनजिकच्या यशवंतपूर स्थानकावरून कोलकात्याजवळच्या हावडा स्थानकापर्यंत धावणारी यशवंतपूर-हावडा एक्सप्रेस (12864) याठिकाणी आली. रुळांवर आडव्यातिडव्या पसरलेल्या डब्यांना या गाडीने धडक दिली.
थोडक्यात, या अपघातात एका प्रवासी रेल्वेची मालगाडीला धडक झाली. धडकेनंतर डबसे पसरून दुसऱ्या गाडीला त्याचं नुुकसान झालं.
कोणत्याच गाडीची समोरासमोर धडक झालेली नाही, याविषयी चुकीची माहिती पसरवू नये, असं आवाहन रेल्वे बोर्डाने पत्रकार परिषदेत केलं आहे.
या भागात कमाल 130 किलोमीटर प्रतितास वेगाने रेल्वे चालवण्याची चालकांना परवानगी आहे. कोरोमंडल एक्सप्रेसचा वेग अपघातावेळी 128 किमी प्रतितास इतका होता. तर यशवंतपूर-हावडा एक्सप्रेसचा वेग 126 किमी प्रतितास इतका होता.
2. अपघातस्थळ नेमकं कुठे आहे?
तिन्ही रेल्वे गाड्यांचा अपघात ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बाहागना रेल्वे स्टेशनजवळ झाला. हे ठिकाण हे ओडिशाच्या ईशान्य भागात पश्चिम बंगालच्या सीमेजवळ आहे.
बालासोर जिल्ह्याचं केंद्र असलेल्या बालासोर शहर पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यापासून जवळपास 250 किलोमीटर तर ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथून 170 किलोमीटरवर आहे.
तर, बालासोर शहराच्या दक्षिणेकडे जवळपास 30 किलोमीटर अंतरावर बाहानगा बाजार नामक रेल्वेस्टेशन आहे. इथेच हा अपघात घडला. भारताच्या पूर्व सागरी किनाऱ्यापासून जवळपास 20 किलोमीटरवर हा परिसर आहे.

शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेस (12841) ही कोलकात्याजवळच्या शालिमार स्थानकावरून दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी सुटते.
ही रेल्वे बालासोर स्टेशनला सायंकाळी 6 वाजून 32 मिनिटांनी पोहोचते. तर पाच मिनिटांचा थांबा घेऊन ती 6 वाजून 37 मिनिटांनी चेन्नईच्या दिशेने रवाना होते.
त्यानंतर, पुढच्या 20 ते 30 मिनिटांत ती बाहानगा स्थानकाजवळ असते. बालासोरनंतर कोरोमंडल एक्सप्रेसचं पुढचं स्थानक थेट भद्रक आहे. त्यामुळे यादरम्यानच्या प्रवासात साहजिकच गाडीचा वेग जास्त असतो.
तर, अपघातग्रस्त दुसरी गाडी यशवंतपूर-हावडा एक्सप्रेसबाबत (12864) बोलायचं झाल्यास ती यशवंतपूरच्या सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनलवरून सकाळी 10 वाजून 35 मिनिटांनी सुटते.
तिथून तिरुपती, नेल्लोर, विजयवाडा, विशाखापट्टणम, भुवनेश्वर आणि कटक मार्गे ती हावड्याला रात्री 8 वाजता पोहोचते.
ही गाडी बालासोरला पोहोचण्याची वेळ दुसऱ्या दिवशी 3 वाजून 50 मिनिटांची आहे. म्हणजेच बाहानगा स्थानकाजवळ ती साधारणपणे त्याच्या अर्धा तास आधी अर्थात साडेतीनच्या सुमारास असते.
पण अपघात घडला त्यादिवशी ही गाडी जवळपास तीन तास उशिराने धावत होती. त्यामुळे अपघात घडला त्यावेळी नेमकी ही गाडी बाहानगाजवळ दाखल झाली.
3. जीवितहानी नेमकी किती?
दक्षिण पूर्व रेल्वेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, शनिवारी (4 जून) रात्रीपर्यंत या अपघातात 275 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर तर गंभीर जखमींची संख्या 56 असून किरकोळ जखमींची संख्या 747 आहे.

फोटो स्रोत, SAMIRATMAJ MISHRA
जखमींवर जवळच्या गोपालपूर आणि बालासोर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमींवर उपचार करण्यासाठी बालासोर मेडिकल कॉलेज, एससीबी मेडिकल कॉलेज, बालासोर जिल्हा रुग्णालय आणि भद्रक जिल्हा रुग्णालय यांच्या तुकड्या तयार करण्यात आल्या होत्या.
त्यांच्यामार्फत जखमींवर उपचार करण्यात आले, अशी माहिती ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी दिली.
4. बचावकार्य कुठेपर्यंत आलं आहे?
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या घरच्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये तर गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 2 लाख तर किरकोळ जखमी झालेल्या लोकांना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केली आहे.

फोटो स्रोत, Twitter
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी स्पेशल रिलीफ कमिशनर कंट्रोल रुमला भेट दिली. जखमींवर लवकरात लवकर उपचार सुरू व्हावेत यासाठी त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
200हून अधिक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. जखमींची संख्या जास्त असल्याने त्यांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मोठ्या बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.

अपघातासंदर्भात माहिती देण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून काही हेल्पलाईन नंबरही देण्यात आलेले आहेत.

काल रात्रीपर्यंत जखमींना हलवण्याचं काम सुरू होतं. आता याठिकाणी मोठा राडारोडा जमलेला आहे. तसंच अस्ताव्यस्त पसरलेल्या इतर डब्यांच्या खाली दबलेल्या डब्यांना पूर्वस्थितीत आणण्याचं काम केलं जात आहे.
अपघातस्थळी क्रेन आणि इतर वाहने तसंच लोकांची मोठी गर्दी अजूनही कायम आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
अपघातानंतर येथील सर्वच रेल्वे रूळांवर डबे पसरले होते. ते हटवण्यात आले असून डाऊन मेन लाईन रेल्वे मार्ग दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मोकळा करण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतेच ANI वृत्तसंस्थेला दिली.
5. अपघाताचं कारण काय?
कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात हा इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमधील बदलामुळे झाला आहे, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
वैष्णव म्हणाले, “या अपघाताचा कवच यंत्रणेशी काहीही संबंध नाही. हे पूर्णपणे वेगळं प्रकरण आहे. यामध्ये पॉईंट मशीन, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यांचा समावेश होतो. यामध्ये झालेल्या बदलांमुळे अपघात घडला आहे. पण हे बदल कशामुळे झाले, कुणी केले, याचा तपास केला जाईल.”
“रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांनी या प्रकरणाची तपास सुरू केला आहे. याबाबत सविस्तर अहवाल लवकरच प्राप्त होईल. मात्र, अपघाताचं कारण आपल्याला कळालं आहे. त्यासाठी जबाबदार कोण आहेत, तेसुद्धा आपल्या लक्षात आलेलं आहे. पण सध्या आम्ही येथील परिस्थिती पूर्ववत करण्याकडे लक्ष केंद्रीत केलं आहे, असंही अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








