वालचंद हिराचंद : भारतात जहाज-विमान-वाहन उद्योगांचा पाया घालणारे क्रांतिकारक उद्योगमहर्षी

फोटो स्रोत, walchand group
- Author, हर्षल आकुडे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
यशस्वी उद्योजक होण्यासाठी काय लागतं?
भांडवल, मनुष्यबळ की सरकारी योजनांमधून प्रोत्साहन?
आणि समजा हा काळ पारतंत्र्यांचा असेल, परिणामी सरकारकडून प्रोत्साहन मिळण्याची शक्यताही अत्यंत कमी असेल तर?
अशा बिकट परिस्थितीतही एक उद्योजक उभा राहतो. आपला पक्का निर्धार आणि दूरदृष्टीच्या बळावर तो एकेका उद्योगाची पायाभरणी करतो.
इतकंच नव्हे, तर भविष्याची गरज ओळखून देशात पहिला विमान निर्मिती कारखानाही तो सुरू करतो.
त्याचवेळी राष्ट्राभिमानी बाणा बाळगून प्रसंगी सरकारविरोधात कठोर भूमिकाही घेतो.
ही कथा अविश्वसनीय आणि एखाद्या चित्रपटात शोभेल अशी वाटू शकते. पण हे आयुष्य प्रत्यक्ष जगणाऱ्या कर्तृत्ववान आणि धाडसी उद्योजकाचं नाव आहे वालचंद हिराचंद.
तुटपुंजी साधनसामुग्री, वाहतुकीचे पुरेसे पर्याय उपलब्ध नसल्याने 50-100 किलोमीटरच्या प्रवासासाठीही जिथे अख्खा दिवस खर्ची घालावा लागायचा, अशा काळात वालचंद हिराचंद यांनी देशभरात उद्योगांचं जाळं उभारलं.
देशात पहिल्या विमाननिर्मिती कारखान्यासोबतच, आधुनिक जहाजनिर्मिती कारखाना आणि चारचाकी कारखाना सुरू करण्याचंही श्रेय वालचंद यांनाच जातं.
आज वालचंद हिराचंद यांचा स्मृतीदिन. 8 एप्रिल 1953 रोजी वालचंद हिराचंद यांचं निधन झालं. पण, जाण्याआधी त्यांनी खूप मोठा वारसा आपल्या सर्वांसाठी उभा करून ठेवलेला आहे.
आज त्यांच्या 70 व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने जाणून घेऊ त्यांच्या थक्क करणाऱ्या जीवन प्रवासाविषयी -
सोलापूरचे सुपुत्र वालचंद
वालचंद हिराचंद यांचं पूर्ण नाव वालचंद हिराचंद दोशी. त्यांचा जन्म 23 नोव्हेंबर 1882 रोजी सोलापूर येथे झाला.
18 व्या शतकात गुजरातच्या ईडर परिसरातून अनेक जैन बांधव महाराष्ट्रात स्थलांतरित होत होते.
वालचंद यांचे आजोबा नेमचंद हे सर्वप्रथम साताऱ्यातील फलटणमध्ये आले. तिथे त्यांनी सूत आणि कापडाचा व्यवसाय सुरू केला. तसं त्यांचा परंपरागत पेढीचा (सावकारी) व्यवसायही त्यांनी तिथे सुरू केला.
काही काळानंतर ते सोलापूरला येऊन स्थायिक झाले. नेमचंद यांचे पुत्र हिराचंद हेसुद्धा पेढीच्या कामात त्यांना मदत करू लागले. ते सोलापूरसह मुंबई येथे आपला पारंपरिक व्यवसाय सांभाळायचे. तसंच सोलापूर, औरंगाबाद येथील कापडगिरण्यांचे एजंट म्हणूनही ते काम पाहत.

फोटो स्रोत, hsl twitter
वडील हिराचंद आणि आई राजुबाई यांच्यापोटी वालचंद यांचा जन्म झाला. त्यांना माणिकचंद आणि जिवराज नावाचे दोन ज्येष्ठ बंधूही होते.
पण जन्मानंतर काही दिवसांतच वालचंद यांच्या आई राजुबाई यांचं निधन झालं. त्यामुळे पुढील काही दिवस वालचंद यांचा सांभाळ त्यांच्या काकूंनी केला.
दरम्यान, हिराचंद हे कामानिमित्ताने मुंबईला स्थायिक झाले. दरम्यान, त्यांचा दुसरा विवाह सखुबाई यांच्याशी झाला.
हिराचंद-सखुबाई यांना पुढे गुलाबचंद, रतनचंद आणि लालचंद अशी तीन अपत्ये झाली.
प्लेगची साथ, कुटुंबावर संकट, शिक्षणही सोडलं
वडील मुंबईची पेढी पाहत असल्याने वालचंद यांचं शालेय शिक्षण मुंबईतील एलफिन्स्टन हायस्कूलमध्ये सुरू झालं.
पण, मुंबईत त्या काळी वारंवार प्लेगची साथ यायची. त्यामुळे त्यांना मुंबई सोडावी लागली.
तीन वर्षांपूर्वी कोरोना व्हायरसची साथ आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर झालेले त्याचे विपरित परिणाम आपण पाहत आहोत.
अगदी असाच प्रकार 120 वर्षांपूर्वी वालचंद हिराचंद यांच्या बाबतीत प्लेगच्या साथीवेळी घडला.
मुंबईतील शाळा सोडून वालचंद यांना पुन्हा सोलापूरला परतावं लागलं. सोलापुरातील नॉर्थकोट प्रशालेतून ते मॅट्रिकची परीक्षा 1899 साली उत्तीर्ण झाले.
त्यानंतर, पुढील शिक्षणासाठी वालचंद मुंबईच्या सेंट झेवियर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथून ते इंटर (बारावी) परीक्षा पास झाले.
दरम्यान, वालचंद यांचा विवाहही झाला. संसाराची गाडी रुळावर येत असताना मुंबईत पुन्हा प्लेगची साथ सुरू झाली. त्यामुळे त्यांनी पुढील शिक्षणासाठी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
डेक्कन कॉलेजमध्ये अर्थशास्त्र आणि इतिहास या दोन विषयांमधून बी. ए. च्या शिक्षणास त्यांनी प्रारंभ केला. परंतु तिथेही प्लेगच्या साथीचा त्यांच्या शिक्षणाला फटका बसला.
1903 साली प्लेगच्या साथीत वालचंदांचे दोन ज्येष्ठ बंधू माणिकचंद आणि जिवराज हे मृत्युमुखी पडले.
दोन्ही मोठे बंधू मुंबईच्या पेढीचा व्यवसाय पाहत होते. दोन कर्ती मुले हातची गेल्यामुळे हिराचंद हे प्रचंड खचले होते.
यावेळी वालचंद यांनी आपल्या वडिलांना कामात मदत करण्यासाठी शिक्षण सोडण्याची इच्छा बोलून दाखवली.
पण, वालचंद यांनी शिक्षण सोडू नये, व्यवसायात न पडता त्यांनी आपलं शिक्षण आधी पूर्ण करावं, असं हिराचंद यांचं मत होतं.
मात्र, वडिलांचं न ऐकता वालचंद शिक्षण सोडून सोलापूरला परत आले. त्यांनी आपली मुंबईची पेढी बंद करून टाकली. त्यानंतर वालचंद आपल्या वडिलांना व्यवसायात मदत करू लागले.
ठेकेदारीच्या ‘दुय्यम’ व्यवसायात प्रवेश
पेढीचा व्यवसाय करत असताना हिराचंदांनी वालचंद यांना ज्वारी खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू करून दिला. परंतु, या व्यवसायात वालचंद यांचं नुकसान झालं.
यानंतर त्यांनी कापुस विक्रीचा व्यवसायही करून पाहिला. पण त्यातही त्यांना फारसं यश मिळालं नाही.
यामुळे वालचंदांनी आपला परंपरागत पेढीचा व्यवसाय पुढे चालवावा, असं हिराचंद यांचं मत बनलं.
त्यानुसार, वालचंद काही दिवस पेढीच्या व्यवसायात आले. पण, एका ठिकाणी बसून काम असल्याने शिवाय लोकांकडून व्याज घेणं मनाला न पटल्याने वालचंद या व्यवसायातून बाहेर पडण्याचा विचार करू लागले.
पेढी व्यवसायापेक्षा दुसरं काही तरी करण्यासाठीची त्यांची खटाटोप सुरू झाली.
दरम्यान सोलापूर कापड गिरणीतील एजंटाच्या शिफारसीवरून हजरत खान नामक एक ठेकेदार वालचंद यांना येऊन भेटला.
हजरत खान हा सोलापूरच्या कापड गिरणीला जळाऊ लाकडे आणि कोळशाचा पुरवठा करायचा.
हजरत खानाकडे कामाची मागणी खूप होती, मात्र पुरेशा भांडवलाअभावी त्याला व्यवसाय वाढवणं जमत नव्हतं.

फोटो स्रोत, indian post
हजरतने वालचंद यांना ठेकेदारीच्या व्यवसायात पैसे गुंतवण्याची ऑफर दिली. पण, वडील हिराचंद यांनी वालचंदांना या व्यवसायात न उतरण्याचा सल्ला दिला.
हिराचंद यांच्या मते, पेढीचा व्यवसाय हा प्रतिष्ठेचा व्यवसाय आहे. तुलनेने ठेकेदारीचा व्यवसाय हा दुय्यम स्वरुपाचा मानला जातो. त्यामुळे, आपल्या मुलाने ठेकेदारीच्या व्यवसायात पडावं, हे हिराचंद यांना बिलकुल मान्य नव्हतं.
परंतु, वालचंद यांच्या मनात वेगळंच काही तरी सुरू होतं. नवं काहीतरी करून दाखवण्याच्या प्रेरणेने झपाटलेल्या वालचंद यांनी वडिलांची नाराजी पत्करून काकांच्या मदतीने ठेकेदारीच्या व्यवसायात प्रवेश केला. त्यात त्यांना मोठा फायदाही झाला.
ज्वारी-कापूस व्यवसायात चटके सहन करणाऱ्या वालचंद यांना पहिल्यांदाच एखाद्या व्यवसायात नफा प्राप्त झाला.
फाटक अँड वालचंद
वालचंद यांचा स्वभावच मुळी नवनवीन आव्हानं स्वीकारण्याचा होता. त्यामुळे नवनव्या व्यवसायांमध्ये उतरण्यासाठीची त्यांची शोधाशोध सुरूच होती.
दरम्यान, आणखी एक संधी वालचंद यांच्याकडे चालून आली.
सोलापूर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग कंपनीत कारकून म्हणून सुरुवातीला काम करणारे आणि नंतर नोकरी सोडून ठेकेदारीच्या व्यवसायाकडे वळालेले लक्ष्मण बळवंत फाटक त्यांना भेटण्यासाठी आले.
लक्ष्मण फाटक यांनी नोकरी सोडल्यानंतर रेल्वेची काही कामे ठेका पद्धतीने पूर्ण केली होती. स्वतःच्या आर्थिक बळावर त्यांनी या कामात चांगलं यश मिळवलेलं होतं. पण आता ठेकेदारीच्या कामात आणखी काहीतरी मोठं करून दाखवण्यासाठी ते व्यवसायवाढीच्या विचारात होते.
त्यासाठी लागणारं भांडवल मिळवण्यासाठी म्हणून फाटक यांनी वालचंद यांची भेट घेतली. खरं तर वालचंद आणि फाटक यांचा पूर्वीचा परिचयही होता. पण व्यवसायाच्या निमित्ताने दोघे पहिल्यांदाच एकत्र आले. त्यांनी फाटक अँड वालचंद प्रायव्हेट लिमिटेड नामक कंपनी स्थापन करून कामे घेण्यास सुरुवात केली.
लक्ष्मण फाटक व वालचंद हिराचंद या दोघांनी मिळून सर्वप्रथम येडशी ते तडवळ हा सुमारे 11 किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग बांधला.

फोटो स्रोत, walchand group
या कामासही वडील हिराचंदांचा विरोध होता. पण पुन्हा काका सखाराम वालचंदांच्या मदतीला धावून आले. फाटक अँड वालचंद कंपनीने हे काम यशस्वीरित्या पूर्ण केलं.
वालचंद हे ठेकेदारीच्या व्यवसायात येत असताना लक्ष्मण फाटकांना असं वाटलं होतं की हा तर पेढी चालवणाऱ्या कुटुंबातील व्यक्ती आहे, हा काय तिथे येऊन थांबणार नाही, पैसे मिळाले की मोकळा होईल. पण वालचंद हे कोणत्याही कामावेळी स्वतः जातीने हजर राहत.
पुढे, त्यांना रेल्वेची अनेक कामे मिळत गेली. यात मुंबईच्या बोरीबंदर ते करीरोड दरम्यान दुहेरी रेल्वेमार्ग, हार्बर रेल्वे ब्रँचच्या रे रोड-कुर्ला रेल्वेमार्ग या कामाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
बोरीबंदर-करी रोड कामाचं कंत्राट मिळवताना मुंबईतील प्रस्थापित कंत्राटदारांनी त्यांना हे कंत्राट मिळू नये यासाठी अनेक प्रयत्न केले. बाहेरील खेडूत ठेकेदार काय मुंबईत काम करतील, असं म्हणत त्यांना हिणवण्यातही आलं. पण त्या सर्वांना मागे सारून फाटक-वालचंद यांनी हे कंत्राट मिळवलं.
हार्बर रेल्वेवरील रे रोड-कुर्ला मार्गाचं काम करणं प्रचंड अवघड असं होतं. या मार्गावर बऱ्याच ठिकाणी उंचवटे, उतार आणि दलदलीचा परिसर होता. हे काम घेण्यास कुणीही ठेकेदार तयार होत नव्हता. वालचंद मात्र अशा कामांचं आव्हान धाडसाने स्वीकारायचे.
पुढे त्यांनी सायन, माटुंगा आणि बेळगाव लष्करी छावणीची कामेही गाजली.
पुण्याच्या खडकी कॅन्टोनमेंट येथे दारूगोळ्याच्या कारखान्याजवळच मोठे खडक सुरूंग लावून फोडायचे होते, ते कामही करण्यास कुणी तयार होत नव्हतं.
पण वालचंदांनी पुण्याच्याच रानडे या ठेकेदाराला सोबत घेऊन हे काम स्वीकारलं. रानडे ठेकेदाराचीच उपकरणे, मजूर वापरून त्यांनी संबंधित काम पूर्ण केलं. आपल्या कामाच्या बळावर फाटक-वालचंद जोडीने 1912 च्या सुमारास ठेकेदार म्हणून खूप प्रतिष्ठा मिळविली.
बेधडक निर्णय, कामांचा धडाका
वालचंद हे ठेकेदारीची कामे करत असताना अनेकवेळा बेधडक निर्णय घ्यायचे. पण त्यांच्या या कामान त्यांचे सहकारी मात्र अवाक होत असत.
उदाहरणार्थ, वालचंद यांचा टांगा विकत घेण्याचा एक किस्सा प्रसिद्ध आहे.
झालं असं की बेळगावमध्ये लष्करी छावणीचं काम वालचंदांनी मिळवलं होतं. बेळगावमधील काम काही महिने चालणार होतं. त्यादृष्टीने येथे कामास येणाऱ्या लोकांची सोयसुविधा यांचं नियोजन करण्यासाठी वालचंद मुंबईहून काही इंजिनिअर्सना घेऊन बेळगावला गेले.
पण बेळगाव रेल्वेस्टेशनला गेल्यानंतर तिथे गव्हर्नरच्या दौऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त होता. वालचंद यांना तिथे कोणतेही वाहन किंवा राहण्याची सोय करणं शक्य झालं नाही.
.रेल्वे स्टेशनवरून टांगा करून ते आपल्या एका जुन्या मित्राकडे गेले. त्याच्या मदतीने इंजिनिअर्सच्या निवासाची सोय केली. वाहनाची सोय करण्याच्या दृष्टीने त्यांनी काही गोष्टींचा आढावा घेतला.
अखेरीस, रेल्वे स्टेशनवरून आपल्याला घेऊन आलेल्या टांगेवाल्याशीच त्यांनी बोलणी सुरू केली.
टांगेवाल्याला वालचंदांनी विचारलं, "हा टांगा किती रुपयांचा आहे आणि तू दिवसाला किती रुपये कमावतोस.
टांगेवाल्याने टांग्याची किंमत 300 रुपये सांगत दिवसभराच्या कमाईबद्दलही त्यांना सांगितलं.
वालचंद उत्तरले, 'हे घे 300 रुपये. आजपासून हा टांगा मी विकत घेतला आहे. आता तू या टांग्यावर काम करशील. तू जितके दिवसभरात कमावतोस तेवढी रक्कम मी तुला रोज पगार म्हणून देईन. इंजिनिअर लोकांना राहत्या घरापासून कामाच्या ठिकाणापर्यंत ने-आण करण्याचं तुझं काम असेल."
या प्रसंगातून वालचंद यांच्या बेधडकपणाची प्रचिती येऊ शकेल. त्याचवेळी त्यांचा हा निर्णय कदाचित काहींना रुचणारही नाही.
परंतु, काही प्रसंगी कोणत्याही परिणामांची पर्वा न करता अशा प्रकारचे निर्णय वालचंद घेत असत.
अवघड आव्हानं स्वीकारणं, कोणतंही काम खितपत न ठेवता तत्काळ निर्णय घेण्याकडे त्यांचा कल असायचा.

फोटो स्रोत, twitter
वालचंद यांची ही पद्धत वडील हिराचंद यांनाही रुचायची नाही. अशी जोखमीची कामे घेतल्यानंतर तोटा झाल्यास आजवर कमावलेलं हातचं सगळं निघून जाईल, अशी भीती त्यांच्या मनात असायची. पण वालचंद यांचा कामाचा सपाटा सुरूच होता.
वालचंद यांच्या बेधडक निर्णयांचा त्यांचे सहकारी लक्ष्मण फाटक यांनाही अनेकवेळा धक्का बसायचा.
अखेर, 14 वर्षे एकत्रित काम केल्यानंतर ते आपला वाटा घेऊन बाजूला झाले. मात्र, वालचंद यांनी कंपनीचं नाव मात्र बदललं नाही. पुढील काही दिवस ते फाटक अँड वालचंद प्रायव्हेट लिमिटेड नावानेच कारभार सांभाळत होते.
पुढे आपली कंपनी टाटा कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये विलीन करण्याचा वालचंद यांचा निर्णयही बेधडक आणि धाडसी असाच म्हणावा लागेल.
टाटा ग्रुप आणि वालचंद यांनी यासंदर्भात योजना आखून ‘द टाटा कन्स्ट्रक्शन कंपनी’ची 1920 मध्ये स्थापना केली. झाली. वालचंदांच्या कुशल व्यवस्थापनाखाली या नव्या कंपनीला महत्त्वाची व प्रतिष्ठेची अनेक कंत्राटे मिळत गेली. ती पूर्ण केल्याने मुंबईची औद्योगिक भरभराट होण्यास चालना मिळाली.
उदाहरणार्थ, मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर सह्याद्री पर्वतरांगांमध्ये (बोरघाट) बोगद्यांचं काम टाटा कन्स्ट्रक्शन कंपनीने वालचंद यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण केलं. मुंबई-पुणे थेट रेल्वेवाहतूक शक्य झाली. तानसा तलावाचं बांधकामही टाटा कन्स्ट्रक्शन कंपनीनेच केलं.
जहाज-विमान-चारचाकी उद्योगांचे प्रणेते
वालचंद हे ठेकेदारीच्या व्यवसायात उतरल्यानंतर त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये आपला व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न केला.
भारताच्या किनाऱ्यावरून चालणारी जहाजवाहतूक ही पूर्णतया ब्रिटिश जहाजकंपनीच्याच अखत्यारीत असणे, ही गोष्ट वालचंदांना सदैव खटकत होती.
दरम्यान, ग्वाल्हेरचे राजे सिंधिया एक बोट विकत असल्याचं त्यांच्या कानी पडलं. शिंदे यांची S. S. लॉयल्टी नावाची भारतीय बनावटीची बोट त्यांनी 25 लाखांना विकत घेतली.
ती बोट आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्याचा त्यांचा विचार होता. पण त्यामध्ये काही दुरुस्ती करणं आवश्यक होतं.
इंग्लंडहून साहित्य मागवून बोटीची दुरुस्ती भारतातच करायचं झाल्यास सहा महिने लागणार होते.
त्यामुळे वालचंद या बोटीची किरकोळ दुरुस्ती करून ती इंग्लंडला नेण्याचा निर्णय घेतला.
5 एप्रिल 1919 रोजी S. S. लॉयल्टी नामक हे जहाज मुंबईहून लंडनला रवाना झालं.
या प्रसंगाची आठवण म्हणून 5 एप्रिल हा दिवस भारतात राष्ट्रीय सागरी दिन म्हणून साजरा केला जातो.

फोटो स्रोत, twitter
विशेष म्हणजे, या भारतीय जहाजाच्या या पहिल्या प्रवासात स्वतः वालचंद हे उपस्थित होते. हा त्यांचा पहिला परदेश प्रवासही होता.
बोट लंडनला पोहोचल्यानंतर तेथील प्रस्थापित कंपन्यांनी भारतीय कंपनीच्या बोटीची दुरुस्ती करून देण्यास टाळाटाळ केली.
वालचंद यांना मजूर न मिळाल्याने अनेक दिवस ते लंडनमध्ये अडकून पडले. पण वालचंदांनी सातत्याने वाटाघाटी केल्या. हा मुद्दा त्यांनी तेथील माध्यमांमध्येही छापून आणला.
एकीकडे, सरकार व्यापार वाढवण्याच्या दृष्टीने कायदे तयार करतं, पण भारतीय उद्योजकांची मात्र अडवणूक केली जाते, असं म्हणत त्यांनी प्रसंगी राजकीय पुढाऱ्यांशीही संपर्क साधला. अखेर त्यांचं काम पूर्ण होऊन ते भारतात परतले.
वालचंद यांनी नरोत्तम मोरारजी यांच्या सहकार्याने ‘सिंदिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनी’ ही पहिली भारतीय जहाजकंपनी स्थापन केली.
पुढे त्यांच्या प्रयत्नांमधून ‘डफरिन’ बोटीवर भारतीय युवकांना नाविक शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध झाली.
नंतर वालचंद हॉलंडला गेले व तेथे त्यांनी जहाजबांधणीच्या कारखान्यांचा अभ्यास केला. भारतात परतल्यानंतर विशाखापटनम् येथे त्यांनी नौकाबांधणी केंद्र स्थापन केले.
या सगळ्या प्रयत्नांमुळे भारतीय जहाजउद्योगास व्यापक स्वरूप प्राप्त झालं.

फोटो स्रोत, twitter
1940 मध्ये वालचंद यांनी म्हैसूर संस्थानच्या महाराजांच्या सहकार्याने बंगलोर येथे विमाननिर्मितीचा कारखाना उभारला.
हिंदुस्तान एअरक्राफ्ट असं नाव या कंपनीला देण्यात आलं होतं. भारतीय अभियंत्यांनी आराखडा तयार करून आणि संपूर्णपणे देशी सामान वापरून बनविलेले पहिले ग्लायडर विमान याच कारखान्यात तयार झाले.
या कंपनीची स्थापना झाली 1940 साली. 1941 मध्ये भारताच्या ब्रिटिश सरकारने या कारखान्यातील एक तृतीयांश शेअर्स विकत घेतले. नंतर पुढच्याच वर्षी सरकारने याची उपयुक्तता ओळखून कंपनीचं सरकारीकरण करून घेतलं.
1942 मध्ये या कारखान्यात तयार झालेली परवानाप्राप्त विमाने उडण्यासही प्रारंभ झाला होता. आज ही कंपनी हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) नावाने ओळखली जाते.
जर्मनीत पहिली मोटार कार 1885 साली तयार करण्यात आली. त्यानंतर भारतात तिची निर्मिती होण्यासाठी सुमारे 60 वर्षे लागली. तेही वालचंद यांच्या प्रेरणेनेच शक्य झालं.
1944 मध्ये वालचंदांनी प्रीमियर ऑटोमोबाइल्स लिमिटेड हा मोटारींची निर्मिती करणारा कारखाना मुंबई येथे उभारला.
प्रीमियर कंपनी सुरुवातीला प्लिमथ, डॉज, देसोटा, फियाट यांसारख्या युरोपीय कंपन्यांच्या वाहनांच्या दुरुस्ती आणि देखभालीची कामे करायची.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर प्रीमियर कंपनीने अमेरिकेच्या ‘क्राइस्लर कॉर्पोरेशन’ आणि इटलीच्या ‘फियाट’ या जगप्रसिद्ध मोटारकंपन्यांशी करार करून भारतात वाहन उत्पादन सुरू केलं.
वालचंदनगर आणि रावळगाव
वालचंद हिराचंद यांच्याविषयी बोलत असताना वालचंदनगर-रावळगावचा उल्लेख होणार नाही, असं कधी होणारच नाही.
वालचंद यांनी पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहराच्या पश्चिमेस 38 किलोमीटरवर एक औद्योगिक शहर वसवण्याचा निर्णय घेतला.
पूर्वी हे गाव कळंब नावाने ओळखलं जायचं. पण वालचंदांनी याठिकाणी विविध उद्योगांची पायाभरणी केल्यामुळे हे गाव पुढे वालचंदनगर म्हणून प्रसिद्धीस आलं.
वालचंदनगरमध्ये मार्सलँड प्राईज कंपनीच्या सहकार्याने साखर कारखाना उभारण्यात आला. आजूबाजूला काही जोडधंदेही त्यांनी उभारले. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आणि कुटुंबीयांसाठी वसाहती सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या.
वालचंदनगर परिसरात ऊस हे प्रमुख पीक असून स्वातंत्र्यपूर्व काळात कंपनीतर्फे अवजड, उचित आणि अद्ययावत अवजारांच्या साहाय्याने येथील शेती करण्यात येत होती.
कंपनीने त्यावेळी ज्वारी, बाजरी, गहू, कापूस, भाजीपाला पिकवून स्थानिक कामगारांना रास्त दरात धान्य – भाजीपाला तसेच दुभती जनावरे पाळून दूध व दुग्धजन्य पदार्थ पुरविणे इ. सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.

फोटो स्रोत, walchand engineering
उसाच्या चिपाडांपासून कागद तयार करणे वनस्पती तूप, साबण व डबे तयार करणे, तेलगिरणी इ. उद्योगही कंपनीने सुरू केले होते.
पुढे वालचंदनगर इंडस्ट्रीजने साखर कारखाना इंदापूर सहकारी साखर कारखान्यास विकला आणि तो इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथे हलविण्यात आला.
तत्पूर्वी वालचंदनगर इंडस्ट्रीजने अन्य उद्योगंधद्यांवर लक्ष केंद्रित करून औद्योगिक यंत्रसामग्री बनविण्याच्या क्षेत्रात प्रवेश केला.
यानंतर वालचंदनगर इंडस्ट्रीजने साखर कारखान्यांना लागणारे काही सुटे भाग तयार करण्यास प्रारंभ केला.
पुढे या कारखान्याचे रूपांतर सिमेंट, बाष्प जनित्रे, युद्धनौकांसाठी उच्च शक्तिशाली अचूक व गिअर बॉक्स, अणुभट्टी साधने इ. बनविणाऱ्या मोठ्या कारखान्यात झालं. याबरोबरच अणुऊर्जा प्रकल्प, उपग्रह क्षेपणसाधने, देशाच्या संरक्षणासाठी लागणारे क्षेपणास्त्रांचे सुटे भाग इत्यादींचं उत्पादन येथे होऊ लागले.

फोटो स्रोत, twitter
वालचंदनगरप्रमाणेच वालचंदांनी नाशिक जिल्ह्यात रावळगाव या ठिकाणीही विविध उद्योगांची उभारणी केली.
येथे ‘रावळगाव शुगर फार्म लिमिटेड’ ही कंपनी स्थापन करण्यात आली. सर्वप्रथम रावळगावमध्ये आंब्याची कलमे, ऊस, कापूस भुईमूग इ. विविध पिके घेण्याचे प्रयोग केले. 1933 मध्ये मात्र केवळ ऊसाच्या पिकावरच लक्ष केंद्रीत करण्यात आलं.
येथील कारखान्यांचा पुढे विकास होऊन साखरेसोबतच गोळ्या, टॉफी, पेपरमिंट व इतर तत्सम वस्तूंची मोठ्या प्रमाणावर निर्मिती सुरू झाली.
‘रावळगाव’ ब्रँडच्या नावाने येथील उत्पादन महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलं आहे. पेपरमिंटच्या वड्या, ताज्या दुधाची टॉफी, लॅको बॉन बॉन, पत्री खडीसाखर इ. येथील खास उत्पादने मानली जातात.
याशिवाय येथे गुळ तयार करणे, उसापासून मेण व कागद तयार करणे, साखर कारखान्यास आवश्यक अशी यंत्रसामग्री तयार करणे, मिठाईसाठी डबे तयार करणे इ. व्यवसायांचाही विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे.
वालचंदनगरप्रमाणेच कारखान्याच्या भोवताली एक वसाहत स्थापन झाली असून संपूर्ण गावासाठी आरोग्य केंद्रे, रुग्णालय तसेच प्राथमिक-माध्यमिक शाळा, डाक व तार कार्यालय, विश्रामधाम इ. सुविधा करण्यात आल्या आहेत. पण कालांतराने वालचंदनगर तसंच रावळगाव येथील उद्योगांन उतरती कळा लागल्याचंही दिसून येतं.
आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पाहणारे स्वातंत्र्यसैनिक वालचंद
कोरोना काळानंतर देशात आत्मनिर्भर शब्द ट्रेंडिंगमध्ये आहे. आपण देशात उत्पादन करण्याला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं पाहिजे, असं केंद्र सरकार सांगतं.
पण स्वातंत्र्यपूर्व काळात असा विचार वालचंद यांनी मांडला होता.
"इंग्रज देशातून कच्चा माल घेऊन जायचे. त्यावर प्रक्रिया करून त्याची विक्री पुन्हा भारतात केली जायची. त्यामुळे आपणच का या वस्तूंची निर्मिती किंवा उत्पादन करू नये," असं म्हणणं वालचंद सतत मांडायचे.
असहकार आंदोलनादरम्यान 1930 साली महात्मा गांधीजींना अटक करण्यात आल्यानंतर वालचंद हिराचंद यांनी त्याचा निषेध नोंदवला होता.
आपल्या इंडियन मर्चंट्स चेंबरच्या माध्यमातून त्यांनी महात्मा गांधींना तत्काळ मुक्त करण्याची मागणी एक प्रस्ताव पाठवून केली होती.
राज्यकर्ते देशातील उद्योगांकडे दुर्लक्ष करतात, यावरून महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत वालचंदांचे काही मतभेद झाल्याचंही पाहायला मिळतं.

फोटो स्रोत, Twitter
त्याचवेळी, आपल्या विविध प्रकल्पांच्या उद्घाटनांना वालचंद हे अत्यंत विचारपूर्वकपणे मोठे नेते आणि स्वातंत्र्यसैनिकांना आमंत्रित करायचे.
या सर्व गोष्टी विचारात घेतल्यास भारताने स्वदेशीचा पुरस्कार करून आत्मनिर्भर बनण्याच्या मोहिमेत वालचंदांचा नक्कीच मोठा वाटा आहे.
वालचंद हिराचंद यांच्यावरील 'जिंकिले भूमि जल आकाश' या पुस्तकात सविता भावे लिहितात, “लोकमान्य टिळकांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा पाया घातला. त्यांची परंपरा पुढे महात्मा गांधींनी चालू ठेवली. वालचंद हिराचंद यांच्या कर्तृत्वाचं मूल्यमापन करताना असं जाणवतं की लोकमान्यांच्या चळवळीचा दुसरा भाग म्हणजे आर्थिक स्वातंत्र्याचा लढा. या लढ्याचं समर्थ नेतृत्व वालचंदांनी केलं.
भावे पुढे लिहितात, “अर्थात वालचंदांचं क्षेत्र भिन्न असल्यामुळे त्यांचे मार्ग आणि आवाकाही राजकीय संघर्षापेक्षा वेगळा राहिला. राजकीय चळवळीच्या विशिष्ट मार्गानुसार तुरुंगात जाणं हे देशभक्तीचं एकमात्र लक्षण समजलं जात होतं, अशा काळात आर्थिक स्वातंत्र्यासाठी मूलभूत स्वरुपाचे काम करणाऱ्यास देशभक्त म्हणून गौरवलं जाणं शक्य नाही. तरीही मध्ये बराच काळ लोटल्यावर मागे वळून पाहताना स्वातंत्र्यलढ्याच्या सर्व अंगांचा साकल्याने विचार करणे आवश्यक आहे.”
त्या पुढे लिहितात, “ज्यावेळी इंग्रज देशातील आपली सत्ता बळकट करत होते, त्यांच्या साम्राज्यावरून सूर्य कधीच मावळणार नाही, असं जेव्हा म्हटलं जात होतं. त्या 19 व्या शतकातच अशा काही विभूती जन्माला आल्या की ब्रिटिशांकडून राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य हिसकावून घेण्याचे कार्य नियतीने त्यांच्यावर सोपवलं होतं, त्यापैकी एक महापुरुष म्हणजे वालचंद होत.”
संदर्भ –
- वालचंद हिराचंद : व्यक्ती, काळ व कर्तृत्व – गंगाधर देवराव खानोलकर
- वालचंद हिराचंद चरित्र : जिंकिले भूमि जल आकाश – सविता भावे
- उद्योगपती वालचंद हिराचंद – अरविंद ताटके
- वालचंद हिराचंद : जीवन व कार्य – प्रा. चंद्रकांत चव्हाण यांचा युट्यूब व्हीडिओ
- वालचंद हिराचंद यांच्यासंदर्भातील मराठी विश्वकोश वेबसाईटवरील लेख
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








